पारगडावरचे आबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaba Shelar

सूर्य अस्ताला चाललेला असतो...तो कधी पाठीवर, तर कधी तोंडावर असतो. उत्तरायण-दक्षिणायनानुसार डाव्या-उजव्या अशा कोणत्याही बाजूला असला तरी भोवतीच्या डोंगरांपलीकडे तो खाली खाली जात असतो.

पारगडावरचे आबा

सूर्य अस्ताला चाललेला असतो...तो कधी पाठीवर, तर कधी तोंडावर असतो. उत्तरायण-दक्षिणायनानुसार डाव्या-उजव्या अशा कोणत्याही बाजूला असला तरी भोवतीच्या डोंगरांपलीकडे तो खाली खाली जात असतो. कडे-कपाऱ्यांत हळूहळू शांतता पसरत असते. एक कातर शांतता... डोंगर-उताराची पायवाट संपता संपत नसते. पाठीवरच्या सॅकच्या छातीवर बांधलेल्या बंदांच्या पट्टीत दोन्ही हातांचे अंगठे अडकवून कुणाशी फारसं न बोलता मोहिमेच्या शेवटाचा उताराचा टप्पा सुरू असतो..

चालणंही तसं मंदावलेलंच असतं. दिवसभराच्या पायपिटीनं घामानं चिंब भिजलेलं अंग आता वाळू लागलेलं असतं. हळूहळू भोवतीचे डोंगर धूसर होऊ लागतात. खालची कोरडी भातखाचरं दिसू लागतात. या निसर्गचित्राच्या पार्श्वभूमीवर असतो माझ्या पुढं चालणारा ढगळ अंगरख्यातला, खाकी-निळ्या असल्या कोणत्या तरी रंगाच्या चड्डीतला, खरं तरं हल्ली जुना टीशर्ट आणि जुनीच विजोड ट्रॅक-पँट घातलेला, पायात बहुतांश वेळेला स्लिपर किंवा प्लॅस्टिकचे चप्पल-बूट असलेला, एक-दोन जणांची सॅक खांद्यावर, हातात घेतलेला आणि बरोबर स्वतःची बंदाची पिशवी खांद्याला अडकवलेला पाठमोरा माणूस...पावसाळा वगळता गेली चाळीस वर्षं मोहिमेच्या शेवटाचं चित्र हे असच असतं.

पावसाळ्यात निसर्ग आणि पोशाख बदलला तरी काफिला हा असाच असतो...मग दुर्ग-डोंगरवाट कोणतीही असो!

हा पाठमोरा चालणारा माणूस म्हणजे आमचं सर्वस्व असतो. या माणसांना आपण सहजपणे ‘वाटाडे’ असं म्हणतो; पण त्याही पलीकडे ती असतात. ती अरण्य-डोंगरांना भारून राहिलेली माणसं जर माझ्या आयुष्यात आली नसती तर सह्याद्री, सातपुडा, विंध्य आदी पर्वतरांगांमधल्या किती घाटवाटा, दऱ्या-खोऱ्या, डोंगरशिखरं, पठारं आणि मुख्य म्हणजे गड-कोट मी पाहू शकलो असतो असा प्रश्न नेहमी मला पडतो!

पडसाळीजवळचा म्हातारगडगीचा सडा, वळताई, कापलिंग डोंगर, ससेटेंभीचा माळ...तशी ही नावं अनाकलनीय आणि दुर्बोध वाटली तरी गड-कोट, डोंगर-अरण्ये, घाटवाटा फिरणाऱ्यांना ती माजघर, परसू, सोपा, अंगण

अशा शब्दांइथकी जवळची असतात. आणि अशा निसर्गाच्या विस्मयकारक भूगोलात उभं आयुष्य काढणारी ही माणसं...मग तो गोठण्याचा बारक्या असो, मानवाडचा भागोजी असो, बोरबेटचा धाकल्या असो... कुणीही असो, ती या नावांएवढीच जवळची असतात.

एखाद्या चित्रपटातला नायक जसा भावतो, मनात घर करतो, तशी ही माणसं माझ्या आयुष्याची नायक बनली आहेत. गोष्ट गेल्या वर्षीच्या मे महिन्याचा मध्यावरची. सूर्य प्रखरपणे तळपत असलेल्या दिवसांतली. कडक लॉकडाऊन सर्वत्र सुरू होता. मोहीम तर सोडाच; पण दशकांच्या नियमाप्रमाणे ज्योतिबाच्या डोंगरावरही मी जाऊ शकलो नाही. अचानक धुवाँधार पडणाऱ्या पावसात घराच्या गच्चीत बसलो होतो, पावसापलीकडचे डोंगर आठवत...

खुर्चीत बसल्या बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. मिटलेल्या डोळ्यांपुढे जणू मीच स्वगत बोलत होतो...

‘आज सगळंच बदलून गेलंय. वाऱ्याचं तुफान सुरू आहे. पानापानांमधूनची त्याची घुसखोरी डोंगर-दऱ्यांमधल्या त्याच्या नेहमीच्या परिचित तांडवाची अनुभूती जागवत आहे. हा वारा गारही आहे, झोंबणाराही आहे. पाऊस त्याच्या टिपेत सुरू आहे. सारं काही आभाळ-समुद्राच्या आणि डोंगर-दऱ्यांच्या नियमाप्रमाणं सुरू आहे. आम्ही नाही का त्यांच्या नियमात बसत? त्यांच्या चैतन्याला खंड नाही. खरं तर आज रविवार. मी या भन्नाटात कुठं तरी एका किल्ल्यावर, डोंगरमाथ्यावर असलो असतो. भन्नाट वारा पिऊन घेतला असता, ऊरभर श्वास घेतला असता, पावसाच्या उभ्या-आडव्या सरींत चिंब भिजलो असतो. त्या मातीच्या सुगंधात भान हरपून गेलो असतो. डोंगरमाथ्यावर एकामागून एक येणाऱ्या ढगांच्या लोटात स्वतःला विसरून गेलो असतो. पाण्याच्या लोंढ्यात हरवलेल्या नेहमीच्या परिचित पायवाटा शोधत मैलोगणती फिरलो असतो. करवंद, नेरली शोधत आडवाटांत शिरलो असतो. आता अळू-जांभळं वयात आलीत का हे पाहिलं असतं...

धाकल्या, सखा, भागोजी, बारक्या, भिम्या यांना कारवीच्या कुंपणासाठी मदत केली असती. आजची एक रात्र त्यांच्या घरच्या चुलीच्या ऊबीत, त्या धुरात काढली असती. रात्री कांबळ्यावर पडून जंगल ऐकलं असतं.

अपरात्री झोपड्याच्या आजूबाजूच्या खसफशीनं जाग आली असती.

धाकल्या, सखा, भागोजी, बारक्या, भिम्या यांना द्यायची टकुऱ्याची, कमरेची, तापाची औषधं सगळी आणलीत ना याची चाचपून खात्री केली असती. दिवसभर माझं मनं असं डोंगर-दऱ्यांमध्येच आहे...

पण मी कुठं आहे?

घरात नाही बसवलं. पहाटे तीनच्या आधीच जाग आली. तशी ती गेली तीस-पस्तीस वर्षं येतेच ; पण उठून उपयोग काय? आज ज्योतिबाला जायचं नाही, कसं जाणार? कडक लॉकडाऊन! डोळा लागेना. मन ज्योतिबाच्या रस्त्यावर धावू लागलं...वडणगे फाटा ओलांडला...पार्वतीमंदिराला हात जोडले...पादुकामंदिरापाशी छातीला हात लावला... निगव्याचा चौक ओलांडला...नेहमीप्रमाणे गुऱ्हाळापलीकडचं कुत्र अंगावर आलं...कुशिऱ्याचा चौपाळा ओलांडून चढाला लागलो...विसाव्याचा आंबा आला...फरसबंदी चढलो...वाघजाईला नमस्कार केला...माळ ओलांडून पिंपर्णीपाशी आलो...वाघजाईपासून इतका वेळ दिसणारी कमान गायब झाली...

गायमुखावर आज काहीच हालचाल नाही...पायऱ्या चढून फरसबंदीवर आलो...फरसबंदीवरचा वारा आज जरा जास्तच...वरच्या गणपतीअलीकडच्या अनगढ पायऱ्यांवर मी एकटाच...आज कमानीतही मी एकटाच? जोरात ओरडलो...‘ज्योतिबाच्या नावांन चांगभलं.’

कुणाचाच प्रतिसाद नाही.

दक्षिणद्वारापर्यंत कुणीच दिसत नाही? आज दाजीही दिसत नाहीत कडकडून मिठी मारायला...टाकळकरही नाहीत साष्टांग नमस्कार घालून डोकं ठेवायला...

कानावर शब्द येऊ लागले : नागरिकांना सक्त सूचना... कुणीही घराबाहेर पडू नये...’

दचकून डोळे उघडले...घराच्या गॅलरीत पहाटेपासून आरामखुर्चीत बसून होतो. केव्हा डोळा लागला कळलंच नाही.

आता उजाडलं होतं, पाऊसही उणावला होता. घराच्या गॅलरीतून ज्योतिबाचा डोंगर पाहण्याचा प्रयत्न केला, ढगाळ वातावरण असलं तरी दिसत होता...हात जोडले...‘ध्याये देवं परेशं त्रिगुणं...’ मोठ्यांदा म्हटलं.

आज दिवसभर मी असाच गॅलरीत बसून आहे. सिद्धाच्या डोंगरापासून ते पन्हाळ्याच्या डोंगरापर्यंत डोंगररेषा पाहत. अपवाद फक्त हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्याचा काही वेळ. आज हे सारं मनात दाटून आलंय...कारण, सकाळी सकाळीच पारगडावरून फोन आला होता. आबा शेलारांचा.

‘‘डॉक्टर, कसं हायेसा?’’

या शब्दांनी हे सारं ओसंडून वर आलं.

आबा म्हणतो : ‘‘डॉक्टर, पारगडाला येन्यात तुमचं यवढं अंतर कवा पडलं न्हाई.’’

मग हळूच विचारतो : ‘‘उमरठला गेलता का?’’

हा आबा तानाजींचे मामा शेलारमामा यांच्या वंशातला. रायबाबरोबर यांचे पूर्वज पारगडी आले. अजून तिथंच आहेत. माझं आबाशी नातं रक्तापलीकडचं. पारगडावरची यांची भूमी, घरं राखीव जंगलात आली. पायथ्याची जागा देऊ केली. जड मनानं आबा चंदगड तहसीलला निवेदन देताना मला म्हणाला : ‘डॉक्टर... कोण ओळखीचं आहे का बघा?’

मला सिंहगडाच्या डोणागिरी कड्यावरचा म्हातारा शेलारमामा आठवला.

आबा म्हणतो : ‘‘डॉक्टर, आता पावसाळ्याचं सामान भराया पायजे. औंदा हेऱ्यातनंच भराया पायजे. लाकडाऊन हाय.’’

मी विचारलं : ‘‘आबा, तुमच्याकडच्या कोरोनाचं काय?’’

आबा म्हणतो : ‘‘आमी ठीक हाय. मोकळा वारा हाय न्हवं, तरी बी जपून हाय.’’

मी मनोमन प्रार्थना केली...डोंगर-दऱ्यांतली माझी ही साधीभोळी माणसं अशीच सुरक्षित राहू देत...

क्वारंटाईन, कोविड-सेंटर, ऑक्सिजन-बेड, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हिअर असलं काही त्यांच्या वाट्याला नको...

मग तो पारगडावरचा आबा शेलार असो, ‘हरेरगडा’च्या आसमंतातल्या निरगुडपाड्याचा समाधान असो, पडसाळीचा भागोजी असो, बोरबेटचा धाकलू असो, रसाळवाडीचा सखाराम असो, भीमाशंकर पायथ्याच्या खांडसचा हरी विदे असो, ‘हरिचंद्रा’वरचा भास्कर-अमोल असो, माहुली गडपायथ्याचा गुरुनाथ असो, अलंग पायथ्याचा पिंट्या ठवाळे असो, सांदण दरीच्या सामरदचा यशवंत बांडे असो, मोहरीचा शिवाजी पोटे असो, लिंगाणा माचीचा बबन कडू असो...कुणीही असो.

ही सारी डोंगर-दऱ्यांची लेकरं सुरक्षित राहू देत. त्यांना काही झालं तर कुणी ॲडमिट करून घेतलं असतं हो त्यांना? हॉस्पिटलची बिल परवडली नसती त्यांना. माझ्यापेक्षा त्यांची चिंता मला जास्त सतावत राहायची. कारण, त्यांना काही झालं तरी ही माणसं त्यांच्या वेदना डोंगरदऱ्यांच्या पलीकडे जाऊच देत नाहीत.

आबा हळूच मला म्हणतो : ‘‘भाजी काय परड्यात हाय, भात घरचं हाय, पानी बी बारमाही हाय, वारा नगं म्हनलं तरी नाका-तोंडात शिरतोया, छाती फुटंपर्यंत फुगतीया, आनि काय लागतं जगाया?’’

असं जगणं आपण कधी शिकणारं!

संध्याकाळपासून आबाला फोन लावतोय...लागत नाही. रेंज नाही. त्याला कसलीही इमर्जन्सी नाही. कारण, त्याला कसलीही फॅसिलिटीच नाही!

श्रीशिवाजीमहाराजांच्या गड-कोटांवरची माणसं ही अशीच असतात. ना त्यांना जगण्याचा तणाव असतो, ना मृत्यू त्यांना घाबरवतो...छ्त्रपती श्रीशिवाजीमहाराज की जय.

(सदराचे लेखक गड-दुर्ग यांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Dr Amar Adake Writes Pargad Aaba Shelar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top