शिस्तप्रिय, चारित्र्यसंपन्न राजा शिवछत्रपती

डॉ. आनंद पाटील
बुधवार, 6 जून 2018

रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. त्यानमित्त शिवछत्रपतींविषयी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी मांडलेले निरीक्षण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ८ मार्च १९१४ रोजी बडोद्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी इंग्रजीत केलेले तीन पानी भाषण बाबा भांड यांनी महाराष्ट्र सरकारच्या सौजन्याने प्रकाशित केलेल्या महाराजांच्या भाषणांच्या संग्रहात उपलब्ध झाले. संकल्पित पन्नास खंड प्रकाशित होतील; तेव्हा महाराष्ट्राचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास बराच बदलावा लागेल. हे गोळीबंद तुलनात्मक भाषण मराठीमधील कथाकीर्तन शाहिरीवाल्या तथाकथित इतिहासकारांनी या दिशेने शिवरायांच्या प्रतिमेचा आंतराष्ट्रीय संदर्भात कधीच प्रतिमा अभ्यास केलेला नाही हे दाखवून देते. शिवरायांच्या खरा राजनीतीचा वारसा महाराष्ट्राबाहेर बडोद्याने प्राणपणाने जिद्दीने जपला होता. हे महाराजा सयाजीरावांच्या त्या भाषणावरून स्पष्ट होते. ज्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत भाषण केले, त्याच परिषदेचे सयाजीराव अध्यक्ष होते.

जगप्रवास केलेला हा लोककल्याणी आदर्श राजा भारतातील समकालीन सर्व राजांत पुरोगामी आणि जनहितदक्ष असल्याचे विवेकानंदांनी जाहीरपणे सांगितले होते. सयाजीरावांचे गुरू इलियट आणि शाहू महाराजांचे शिक्षक फ्रेझर हे सरंजामदार साम्राज्यवादी ब्रिटिश नव्हते. आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंडमधून आलेले बहुसंख्य शिक्षक ब्रिटिशांच्या त्यांच्या मातृभूमीवरील वर्चस्वाविरोधी होते. त्यामुळे त्यांनी प्रतिवसाहतवादी विचारधारा शिष्यांना शिकवली होती. भाषणाच्या सुरुवातीलाच या सांस्कृतिक राजकारणाचा संदर्भ या बडोद्याच्या नरेशाने दिला. शिवरायांच्या विषयीच्या ‘वादांच्या धुळी’चा (dust of controversy) उल्लेख केला.

महाराष्ट्राचा देशभक्‍त, पश्‍चिम भारताच्या प्रबोधनाचे उत्पस्य म्हणून या भूमिपुत्राचे शब्दचित्र तत्कालीन परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर रेखाटले आहे. त्यात नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांचा उल्लेख येतो. कुशल सेनापती पाश्‍चात्त्यांशीच नव्हे तर मोगलांशी लढला हे सांगताना शेतकरी सैनिकाच्या शिस्तीला स्पार्टातील कडक शिस्तीची उपमा दिली आहे. मराठ्यांच्या शिवशाहीतील या शिस्तीला स्पार्टन शिस्त असे अन्य कुठल्याच इतिहासकाराने म्हटलेले नाही.  पोर्तुगीज इतिहासकारांनी गौरविलेल्या शिवाजी राजांच्या निष्कलंक चारित्र्याचा, कडक शिस्तीचा, धार्मिक वृत्तीचा, सहनशीलता आणि शेतकऱ्यांच्या हक्‍क रक्षणाचा उल्लेख समकालीन राजांच्या तुलनेत केला आहे. शिवाजीराजांना त्यांनी हिंदू भारताचा आत्मा म्हटले आहे. वैयक्‍तिक लोहचुंबकीय प्रभावातून खूप चांगली जनसेवा केली. मराठा साम्राज्याचा घट्ट पाया त्यांनी घातला. आपल्या पूर्वजांच्या लोकश्रद्धेचे आणि त्या शतकाचे प्रतीक म्हणून शिवाजीराजांकडे सयाजीराव बघतात.

मध्ययुगातील सुतार, कुंभार आणि आदींनी देखील इतिहास घडवल्याची नोंद ते घेतात. सामान्य माणसाला असामान्य बनवण्यात आणि विखुरलेल्यांना ऐक्‍यात बांधण्याची महाराजांची कला सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवशाहीशी संबंधित पोकळ घोषणा किंवा शाहिरी बाळबोध नाटकी प्रसंग रचना हा मराठी वक्‍त्यांच्या बालिशपणाचा दोष सयाजीरावांच्या भाषणाला कुठेही चिकटलेला नाही. सयाजीराव महाराजांनी भाषणाच्या शेवटी स्फूर्तिदाता म्हणून शिवराय स्वातंत्र्य, रचनात्मक मानवी इंजिनिअरिंग आणि युद्धाशी तुल्यबळ नैतिकता आणि साहसाचे चैतन्य या वाटा दाखवतात, असे सयाजीराव म्हणतात.

मराठा इतिहासाला कधीच माहीत नसलेली अत्यंत वेगळी अशी शिवरायांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय आचारसंहितेमुळे उजेडात आणतात. इंग्लंडचा राजा आल्बर्ट राजाशी ते राजांची तुलना करतात. संशोधकाने शिवाजी महाराजांच्या भारतभरातील पुतळ्यांच्या अनावरणप्रसंगी झालेल्या भाषणांचा तुलनात्मक अभ्यास करावा. सयाजीराव महाराजांनी तुलनात्मक कल्पनाशक्‍ती साकारलेल्या राजभीदेवी, स्तवनाप्रधान, घोषणाबाज, नाट्यमय भाषणापेक्षा विवेचक, संयमी आणि साक्षेपी ठरते. नेता, देशभक्‍त आणि कुशल सेनानी म्हणून राष्ट्र उभारणीचे श्रेय शिवरायांना दिले आहे. महाराजांचे स्वच्छ चारित्र्य, श्रद्धाळूपणा, मुळाशीही कठोर, शिस्तप्रियता, सहनशीलता अशी ही वैशिष्ट्यांची यादी आहे. या निमित्ताने सयाजीराव भारतीय, पाश्‍चात्त्य शक्तींना भिडण्यात कमी पडल्याचे सांगतात. सयाजीराव महाराजांच्या या भाषणाची महाराष्ट्राला खरी गरज आहे.

Web Title: Dr Anand Patil article