
सेगन हे सुप्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि कॉर्नेल विद्यापीठातील नामवंत प्राध्यापक होते. तेरा भागांच्या या मालिकेत त्यांनी ब्रह्मांड, सूर्यमाला आणि विश्वाचा धांडोळा घेतला होता.
शिक्षक होऊ आपण सारे
- डॉ. अनिल राजवंशी
बऱ्याच वर्षांपूर्वी, नेमकं सांगायचं तर, सत्तरच्या दशकाच्या अखेरीस, मी अमेरिकेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पीएच.डी. करायला गेलो होतो. त्या काळात पीबीएस (पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस) नावाच्या तेथील टीव्ही चॅनेलवर कार्ल सेगन यांचा ‘कॉसमॉस : अ पर्सनल व्हॉयेज’ नावाचा एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित व्हायचा.
आम्ही तो नेहमी पाहायचो. सेगन हे सुप्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि कॉर्नेल विद्यापीठातील नामवंत प्राध्यापक होते. तेरा भागांच्या या मालिकेत त्यांनी ब्रह्मांड, सूर्यमाला आणि विश्वाचा धांडोळा घेतला होता.
पीबीएसवर ही मालिका प्रथम १९८० मध्ये प्रसारित झाली आणि तब्बल ६० वेगवेगळ्या देशांतील एकूण ५० कोटी प्रेक्षकांनी ती पाहिल्याची नोंद आहे. साहजिकच सेगन हे टीव्ही-प्रेक्षकांचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्त्व झाले; पण, त्यामुळेच मुख्य प्रवाहातील वैज्ञानिक त्यांना काहीसं कमी लेखू लागले.
त्यांना वाटे की, सेगन यांची कीर्ती म्हणजे स्वतःचीच जाहिरात करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीला लाभलेलं यश होय. आज मात्र काठिण्य पातळीची पर्वा न करता आपला विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रवृत्ती जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये प्रबळ होत आहे.
या ‘कॉसमॉस’ मालिकेनंतर दिलेल्या एका मुलाखतीत सेगन यांनी सांगितलं होतं : ‘‘मी माध्यमिक शाळेत ऐकलेल्या एका व्याख्यानामुळेच विश्वोत्पत्तिशास्त्र आणि एकंदरीतच विज्ञानाविषयीची माझी जिज्ञासा जागृत झाली.’’
सेगन यांची ही मुलाखत माझ्या मनातून कधीच पुसली गेली नाही. माझं स्वतःचंच उदाहरण घ्यायचं तर, १२-१३ वर्षांचा असताना माझ्या लखनौच्या शाळेत आम्हाला दाखवल्या गेलेल्या एका चित्रपटामुळे माझ्या मनात अमेरिकेला जायची इच्छा निर्माण झाली. हा चित्रपट म्हणजे न्यूयॉर्क इथं १९३९ मध्ये भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय महोत्सवाबद्दलचा माहितीपट होता. त्यात अमेरिकेच्या औद्योगिक सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवलेलं होतं.
याच्याच जोडीला नववीत असताना, इतिहासाच्या शिक्षकांनी, बाबर भारतात ‘का’ आला याची कारणमीमांसा आम्हाला सांगितली. इतिहासाचे इतर शिक्षक बाबर भारतात ‘केव्हा’ आला याबद्दल माहिती देत; पण या ‘का?’च्या स्पष्टीकरणानं माझ्या कोवळ्या मनात इतिहासाबद्दलचं प्रचंड कुतूहल आणि प्रेम निर्माण केलं. त्यामुळेच भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या अनेक घटनांकडे सूक्ष्म आणि विश्लेषणात्मक नजरेनं पाहणं मला पुढील काळात शक्य झालं.
म्हणून मला वाटतं की, आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या, आपापल्या क्षेत्रात काहीएक पराक्रम गाजवलेल्या प्रत्येक व्यक्तीनं, आपण राहतो त्या शहरातील माध्यमिक विद्यालयात जाऊन तिथल्या मुलांशी संवाद साधणं हे आपलं कर्तव्य मानलं पाहिजे. या मुलांसमोर त्यांनी नियमित व्याख्यानं द्यायला हवीत. यामुळे ते मुलांना प्रेरणा देऊ शकतील आणि अधिक चांगले नागरिक घडवण्याच्या कार्यात सहभागी होऊ शकतील.
आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अशा नामवंत व्यक्तींना आवर्जून बोलावणाऱ्या अनेक शाळा आजही आपल्याला दिसतात; पण असं आमंत्रण न देणाऱ्याही काही शाळा असतात. तिथल्या मुलांनाही आपल्या अनुभवांचा लाभ व्हावा म्हणून आपण स्वतःहून अशा शाळांचं आमंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.
दरवेळी कुणा थोर अथवा महत्त्वपूर्ण व्यक्तीनंच अशा प्रकारची व्याख्यानं द्यायला हवीत असं नव्हे, त्याची मुळीच गरज नसते. नवनव्या श्रेष्ठ कल्पनांना सामोरं जाण्याची संधी मुलांना मिळणं, याला खरं महत्त्व असतं.
मी फलटण नावाच्या महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहतो. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही तिथं एक शाळा सुरू केली. ‘कमला निंबकर बालभवन’ नावाच्या या शाळेत आज बालवाडीपासून दहावीपर्यंतचे वर्ग आहेत.
मधुरा ही माझी धाकटी मुलगी २००१ मध्ये याच शाळेतून दहावी उत्तीर्ण झाली. नंतर तिनं ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (TISS) या संस्थेतून ‘प्राथमिक शिक्षण’ या विषयातील आपलं पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलं. आज ती या शाळेची विश्वस्त असून तिथंच शिक्षक म्हणूनही काम करते.
अधूनमधून आपल्या शाळेतील आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ती माझी व्याख्यानं आयोजित करते. या वर्गातील मुलांशी संवाद साधताना विज्ञानातील त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नसलेल्या अनेक गोष्टींची मी चर्चा करतो.
विद्यार्थी आणि मी मिळून संशोधनाच्या अद्भुतरम्य प्रवासाचा आनंद लुटत राहतो. हळूहळू आम्ही या मुलांना ‘टेड टाॅक्स’ही (TED - Technology, Entertainment and Design) ऐकवायला सुरुवात केली. काही वेळा त्यातील एखाद्या भाषणावर आता आम्ही सविस्तर चर्चा करतो. शाळेच्या इंटरनेटवर मुलं या भाषणांचा आस्वाद घेतात.
एका छोट्या गावातील मराठी माध्यमातून शिकणाऱ्या या मुलांना टेड टाॅक्सचा अनुभव घेता आल्यामुळे एक नवंच जग त्यांच्यासमोर खुलं होतं आणि त्यांची क्षितिजं विस्तारतात. या व्याख्यानांचा परिणाम होऊन आपल्याही आयुष्यात आपण काही अद्भुत घडवावं, काही वेगळं बनावं अशी प्रेरणा या विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशी माझी धारणा आहे.
एकजात सगळ्याच मुलांना अशा व्याख्यानातून प्रेरणा मिळेल असं नव्हे; पण एखाद्याच्या मनातील ज्योत जरी पेटली, तरी तो किंवा ती आपल्या भावी आयुष्यात काही भव्यदिव्य घडवू शकेल. आपल्यापुरतं बोलायचं तर समाजाचं देणं थोडंफार फेडल्याचं आणि देशाच्या जडणघडणीला साहाय्य्यभूत ठरल्याचं समाधान आपल्या वाट्याला येईल.
मला सतत असं वाटत राहिलं की, जीवनात पुढं काही करून दाखवण्याची प्रेरणा मुलांना त्यांच्या शालेय वयातच देता येते. या मुलांचं वय अतिशय संस्कारक्षम असतं, त्यांची मनं टवटवीत असतात. तऱ्हेतऱ्हेच्या बहारदार कल्पना आणि विचार या काळात त्यांच्यासमोर मांडले गेले तर निश्चितच त्यांच्या मनात चमत्कार घडू शकतो.