आरोग्याला हानिकारक ध्वनिप्रदूषण

केवळ ध्वनिप्रदूषणाचा विचार करता भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषणग्रस्त देशांत मोडतो.
Noise pollution
Noise pollutionsakal
Summary

केवळ ध्वनिप्रदूषणाचा विचार करता भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषणग्रस्त देशांत मोडतो.

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

केवळ ध्वनिप्रदूषणाचा विचार करता भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषणग्रस्त देशांत मोडतो. याबाबतची वस्तुस्थिती-निदर्शक आकडेवारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही; परंतु आपल्या देशातील बहुतेक शहरांत ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर जात असतं ही गोष्ट उपलब्ध असलेल्या त्रोटक माहितीवरून नक्कीच दिसून येते.

ध्वनिपातळी किंवा गोंगाटाची पातळी ही चढत्या श्रेणीच्या लागॅरिथमिक मापनानं डेसिबल (dB) या एककात मोजतात. प्रत्येक वेळी १० डेसिबल वाढ झाली की ही ध्वनिपातळी दुप्पट होते. म्हणजेच, ४० डेसिबलची ध्वनिपातळी ही ३० डेसिबल ध्वनिपातळीच्या दुप्पट असते.

आपण एकमेकांशी सामान्य सुरात बोलत असतो तेव्हा ध्वनिपातळी ४० ते ५० डेसिबल इतकी असते आणि रॉक किंवा तत्सम दणकेबाज संगीताचा जलसा असतो तेव्हा सरासरी १४० डेसिबल इतकी पातळी गाठली जाते. याचाच अर्थ रॉक संगीत हे आपल्या स्वाभाविक संभाषणाच्या ५०० पट अधिक तीव्रतेचं असतं.

अलीकडेच मिळवल्या गेलेल्या माहितीतून असं दिसून येतं की, भारतीय शहरात आवाजाची किंवा गोंगाटाची पातळी ७५ डेसिबलपेक्षा जास्त असते; पण वाहतूक ज्या वेळी कमालीची वाढून ठप्प होते त्या वेळी वाहनधारक वाजवत बसतात त्या भोंग्यांचा कान किटवणारा आवाज १०० ते १२० डेसिबल इतकी मजल गाठतो. वाहतुकीच्या नियमपालनाविषयी वाहनचालकांची संपूर्ण बेफिकिरी, पोलिसांचं ढिसाळ निरीक्षण आणि रस्त्यांची केविलवाणी अवस्था अशा घटकांमुळे ध्वनिप्रदूषणात अधिकच भर पडत जाते. उपलब्ध वैद्यकीय आकडेवारीनुसार, भारतातील सहा ते सात टक्के लोक कर्णबधिर बनले आहेत. अर्थात्, बऱ्याच लोकांची आयुष्यात कधी चाचणीच केली जात नसल्यामुळे बहिरेपणाचा प्रत्यक्ष आकडा निश्चितच याहून मोठा असेल.

आरोग्यावरील दुष्परिणाम

शास्त्रज्ञांनी असं दाखवून दिलं आहे की, ८५ डेसिबलपेक्षा जास्त पातळी गाठणारे आवाज मानवी आरोग्याला घातक असतात. कालांतरानं असे आवाज श्रवणक्षमतेवर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे मनावरील ताणही वाढतो. जगभर विस्तृत प्रमाणात केल्या गेलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, आवाजाची पातळी जास्त वाढली की४ तो आवाज कानावर पडणाऱ्यांचा रक्तदाब वाढतो, तसंच त्यांना निद्रानाश जडतो. प्रचंड आवाजामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व ठोके जलदगतीनं पडू लागतात. मेंदूतील रासायनिक स्रावातही त्यामुळे अनपेक्षित बदल होतात.

आजकाल शहरवासीयांमध्ये रागीट आणि आक्रमक वृत्ती वाढत चाललेली दिसते. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या मनावर येत असलेला तणावच याला कारणीभूत असावा असं मला वाटतं.

पौगंडावस्थेत निर्माण झालेल्या पूर्ण किंवा आंशिक कर्णबधिरतेमुळे पुढील आयुष्यात व्यक्तीचं वर्तन आक्रमक होतं आणि पुढं त्यातून स्मृतिभ्रंश हा विकारही जडतो असं जगभर केल्या गेलेल्या अभ्यासातून वैद्यकीय संशोधकांनी दाखवून दिलं आहे. या निष्कर्षांमुळे माझ्या वरील मताला दुजोराच मिळतो.

आपल्या कर्णेंद्रियांद्वारा आपण ध्वनी ऐकतो. आपल्या कानात या ध्वनिलहरींचं रूपांतर विद्युत्-संदेशात होतं. त्यानंतर आपल्या मेंदूतील श्रवणकेंद्रात या संदेशांचं बोधन होतं; परंतु हा आवाज खूपच मोठा असेल तर तो आपल्या कवटीतून थेट आत आपल्या मेंदूत शिरू शकतो. सर्व प्राण्यांमध्ये मानवाचीच कवटी ही सर्वात कमी जाडीची असते.

यांत्रिक बलांचा मेंदूच्या कार्यप्रणालीवर कोणता परिणाम होतो हे ठिकठिकाणच्या शास्त्रीय अभ्यासांतून आपल्यासमोर आलं आहे. विविध यांत्रिक ताणांमुळे मेंदूतील रासायनिक प्रक्रियांमध्ये उलथापालथ होते. त्यामुळे मेंदूतील न्यूरॉनच्या संप्रेषणावर आणि मेंदूच्या सर्वसाधारण कार्यावरही विपरीत परिणाम होतो. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात मृदुल पेशीसमूह आहे. त्यामुळे कवटीतून आत शिरणाऱ्या तीव्रतम ध्वनिलहरी मेंदूचं काम बिघडवू शकतात. प्रचंड आवाजाचा मेंदूवर होणारा परिणाम हा काही अंशी डोक्यावर अकस्मात तीव्र आघात होण्यासारखाच असतो.

शरीरावर होणाऱ्या सर्व आघातांना शरीर नैसर्गिक प्रतिसाद देतच असतं. त्याची घडणच तशी बनलेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कवटीतून थेट मेंदूत शिरणारे दाब-तरंग मेंदूवर विपरीत परिणाम करतच असणार. वैद्यकीय संशोधन सांगतं की, आंशिक बहिरेपण आलं की त्यापासून होणारा तोटा भरून काढण्यासाठी मेंदू आपल्या इतर भागांचा वापर करू लागतो. त्यामुळे बोधन, विश्लेषण आदी उच्च प्रतीच्या विचारप्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी कार्यात्मक स्मरणशक्ती कमी कमी होऊ लागते. यातूनच स्मृतिभ्रंश आणि अन्य मेंदुविकार उद्भवतात.

संगीत हाही अर्थातच एक ध्वनी आहे. त्याचा मानवी जीवनावर सखोल परिणाम होतो. उच्च प्रतीचं संगीत आपली भावस्थिती उंचावतं. आपल्या अंतरात्म्याला थंडावा देतं. संगीताच्या सातत्यपूर्ण श्रवणानं मानवाच्या सर्वांगीण स्वास्थ्यावर सखोल परिणाम होतो. आपल्या संपूर्ण मेंदूवर संगीताचा नेमका कसा परिणाम होतो हे आपल्याला आज तरी नक्की सांगता येत नाही. कारण, श्रवणकेंद्रांनी मेंदूचा केवळ एक छोटासा भागच व्यापलेला आहे; परंतु ध्वनिकंपनं मेंदूवर यांत्रिक ताण निर्माण करतात या वस्तुस्थितीच्या आधारे याचं उत्तर आपल्याला कधी ना कधी मिळू शकेल.

त्याचप्रमाणे ‘कर्कश आणि ढणाढण’ आवाज संपूर्ण मेंदूवर दुष्परिणाम घडवत असणार. अंतिमतः मानवी आरोग्यावर याचा तीव्र हानिकारक परिणाम होतच असणार. मंद स्वरात लावलं असता मनःशांती देणारं संगीतसुद्धा दणाणू लागतं तेव्हा कान किटवतं.

‘एकाधिक मज्जापेशीकाठीण्य’ (Multiple Sclerosis) या विकारामुळे आपल्या मज्जातंतूंवर जे जे हानिकारक परिणाम होतात तेच कर्णकटू संगीतामुळेही होतात. असं संगीत कानापासून मेंदूपर्यंत जाणाऱ्या मज्जातंतू पेशींवरील आवरण नष्ट करतं. केवळ मोकळ्या जागी वाजत असलेलं कर्कश संगीतच आपल्या आरोग्याची हानी करतं असं नव्हे. आपण कानाला लावतो त्या हेडफोन्समधून मोठ्या आवाजात संगीत ऐकण्यानंही अगदी त्याच स्वरूपाची हानी होते.

प्रचंड आवाजातील संगीत सतत कानावर आदळत राहिल्यामुळे ताण-तणाव, मूड खराब होणं आणि आक्रमकता यांची वाढ होते. रात्रंदिवस चॅटिंग करणारी किंवा कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणारी तरुण पिढी वरील विकारांना सहज बळी पडते.

ध्वनिप्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर आणखीही एक घातक परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही. रात्रीही चालूच असलेल्या ध्वनिप्रदूषणामुळे आपल्याला गाढ झोप लागत नाही. जगभरातील ठिकठिकाणच्या शास्त्रीय संशोधनानुसार, आपल्याला पुरेशी गाढ झोप मिळाली नाही तर आपल्या मेंदूत साचलेल्या विषारी द्रव्यांचा निचरा होत नाही. त्यामुळे दीर्घकालीन तणाव उत्पन्न होतात. अशा तणावांमुळे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याची सर्वांगानं हानी होते.

ध्वनिप्रदूषणामुळे केवळ मानवांच्याच नव्हे तर, प्राण्यांच्याही आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे. देवमासे आणि डॉल्फिन किनाऱ्यावर येऊन थडकलेले आढळतात. जगात ठिकठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या लष्करी सरावांदरम्यान श्राव्यातीत ध्वनितरंगांचा वापर करून पाण्यात असलेल्या वस्तूची दिशा आणि अंतर मोजण्याचे प्रयोग केले जातात. याला ‘सोनार प्रयोग’ (Sound Navigation and Ranging) असं म्हणतात. या प्रयोगांचा आणि डॉल्फिन व देवमासे किनाऱ्यावर येऊन थडकण्याचा संबंध असू शकेल असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे साँगबर्डस् एकमेकांना पाठवत असलेल्या सांकेतिक इशाऱ्यांवरसुद्धा नागरी भागातील ध्वनिप्रदूषणाचा विपरीत परिणाम होतो असंही जीवशास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.

यावर उपाय काय?

ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्या लढाईतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यासंबंधी विश्वासार्ह माहिती गोळा करणं. ध्वनिमापन करणारी असंख्य ॲप्स आज उपलब्ध आहेत. आपण ती स्मार्ट फोन्सवर डाउनलोड करू शकतो. यामुळे प्रत्येकजण चालता-फिरता ध्वनिमापक बनू शकेल. तो कोणत्याही ठिकाणची ध्वनिपातळी अचूक मोजू शकेल.

जिथं जिथं आपण जातो तिथं तिथं ध्वनिपातळी प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याचं आढळताच आपण ती आपल्या स्मार्ट फोनवर ध्वनिमुद्रित करून एका केंद्रीय संकेतस्थळावर (Site) अपलोड करावी. ठिकठिकाणाहून अशी माहिती एकत्र आल्यानं देशभराचा ध्वनिप्रदूषण-नकाशा आपल्याला पटकन बनवता येईल. त्याचप्रमाणे शाळेतील मुलांनाही, ध्वनीची तीव्रता मोजून ती शाळेच्या संकेतस्थळावर अपलोड करायला शिकवता येईल.

या नकाशाच्या आधारे ध्वनीची पातळी मर्यादित करण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना असलेले कडक ध्वनि-रोधक कायदे आपल्याला बनवता येतील. भारतीय न्यायव्यवस्थेत एखाद्या खटल्यासंदर्भात न्यायनिवाडा व्हायला कमालीचा विलंब लागत असतो. म्हणून ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही अत्यंत गतिमान यंत्रणा उभी करावी लागेल. जागच्या जागी प्रचंड दंड करण्याची व्यवस्था अमलात आली तर कदाचित या गोंगाटसम्राटांना वचक बसेल. आपणा सर्वांना या समस्येचं पुरतं भान आलं की, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी इतर परिणामकारक उपायही आपल्याला शोधता आणि योजता येतील असा विश्वास मला वाटतो.

गेल्याच वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला; पण मला वाटतं, ध्वनिप्रदूषणातून आपली मुक्तता होईल तेव्हाच खरंखुरं स्वातंत्र्य आपल्या वाट्याला येईल आणि सुखी व शाश्वत भारताच्या मार्गावर आपण वाटचाल करू लागू.

(लेखक फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट़’चे संचालक आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com