स्टीफन हॉकिंग - एका विज्ञानपर्वाचा अस्त 

डाॅ. अंजली आठवले
बुधवार, 14 मार्च 2018

स्टीफन हॉकिंग एक असे व्यक्तिमत्त्व ज्याने आपल्या दूर्धर आजारावर मात करत विज्ञानाला तसेच आजच्या तरुणपिढीला प्रेरणादायी असे काम केले. वयाच्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉन या दूर्धर आजाराने ग्रासलेले असून देखील आपल्या डोळ्यांच्या हालचालींच्या सहाय्याने त्यांनी आपले संशोधनकार्य सुरू ठेवले. 

स्टीफन हॉकिंग एक असे व्यक्तिमत्त्व ज्याने आपल्या दूर्धर आजारावर मात करत विज्ञानाला तसेच आजच्या तरुणपिढीला प्रेरणादायी असे काम केले. वयाच्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉन या दूर्धर आजाराने ग्रासलेले असून देखील आपल्या डोळ्यांच्या हालचालींच्या सहाय्याने त्यांनी आपले संशोधनकार्य सुरू ठेवले. 
ऑक्‍सफर्ड विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर 1965 मध्ये त्यांनी केंब्रीज विद्यापीठामध्ये पीएचडीचा अभ्यास पूर्ण केला. 1974 मध्ये ते रॉयल सोसायटीचे सर्वात कमी वयाचे सदस्य बनले. त्यानंतर पाच वर्षांची ते केंब्रीज विद्यापीठात गणित विषयाचे प्रोफेसर म्हणून नियुक्त झाले, जेथे आधी महान शास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काम केले होते. 

विश्‍वाची निर्मिती ही बिग बॅगपासून झाली आहे. हे 1940 साली मांडण्यात आले होते. परंतु विज्ञानाने ते मान्य केले नव्हते. स्टीफन हॉकिंग त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी त्यावर संशोधन केले व त्याच्या संशोधनानंतर विज्ञानक्षेत्रातील अनेकांनी बिग बॅग थेअरी मान्य केली. काॅन्टम मेकॅनिक्‍स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये मांडण्याचे महाकठीण काम त्यांनी पूर्णत्वास नेले. अनेक वर्षांच्या अभ्यासानुसार त्यांनी सांगितले की कृष्णविवर चमकू शकतात, या सिद्धांताला "हॉकिंग रेडिएशन' असे म्हटले होते. 

वयाच्या 43 व्या वर्षी न्युमोनिअा आजारावरील शस्त्रक्रियेमुळे त्यांनी आपला आवाज गमावला. त्यांचे संगणकतज्ञ मित्र डेव्हिड मेसन यांनी एक संगणकीय प्रणाली कार्यान्वीत करून दिली, ज्याद्वारे त्यांनी संगणकीय आवाजाच्या माध्यमातून आपले संशोधनाचे कार्य भविष्यत सुरू ठेवले. 

स्टीफन हॉकिंग यांनी "ब्रीफ हिस्ट्री आॅफ टाइम' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे मराठी भाषांतर डॉ. सुभाष देसाई यांनी  केले आहे. त्यांनी "थेअरी ऑफ एव्हरीथिंग'वर आपले काम सुरू ठेवले. आपल्या "द ग्रॅंड डिजाईन' या पुस्तकात असे म्हटले की विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलण्यासाठी एकच "थेअरी ऑफ एव्हरीथिंग' लागू होईल असे नाही. म्हणजे आयुष्याची तीन दशके "थेअरी ऑफ एव्हरीथिंग' यावर काम केल्यानंतर ते म्हणाले, "अशी एकच थेअरी सापडणे हे कठीण काम आहे. 

आपल्या या संशोधन कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले  "प्रेसिडेशिअल मेडल ऑफ फ्रीडम', "कोपले मेडल', "वूल्फ प्राइझ इन फिजेक्‍स', अल्बर्ट आईन्स्टाईन मेडल' एवढे सर्व पुरस्कार मिळूनही ते नोबेल या विज्ञाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कापासून वंचित राहिले. कारण त्यांनी केलेल्या संशोधनाची खातरजमा करण्याची व्याप्ती ही मानवी आवाक्‍याबाहेरची होती. 

त्यांची मुलाखत घेतली असता लोकांसाठी काही संदेश द्याल का यावर ते म्हणाले, "अधिक महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.' 

मृत्यूविषयी त्यांचे असे मत होते की, "मी मृत्यूला घाबरत नाही. पण मला मृत्युची घाईही नाही. त्याची उकल करण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे.' 

एका संघर्षमय विज्ञानपर्वाची अखेर झाली असली तरी त्यांचे जीवनकार्य अनंत काळासाठी जगाला प्रेरणादायी असेल. 

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रसायानशास्त्र विभागामध्ये प्राद्यापक म्हणून कार्यरत आहेत) 

Web Title: Dr Anjali Athawale article