घायाळ मी हरिणी... (डॉ. अर्चना अलोणी)

डॉ. अर्चना अलोणी
रविवार, 2 जून 2019

तिसऱ्या दिवशी संबंधित विषयाचा पेपर झाला. पेपर संपल्यावर प्राचार्यांनी रेखाला आपल्या कक्षात बोलावलं व "तुमची प्रश्‍नपत्रिका कशी काय फुटली?' अशी विचारणा त्यांनी रेखाकडं केली. रेखाचं डोकं सुन्न झालं.

तिसऱ्या दिवशी संबंधित विषयाचा पेपर झाला. पेपर संपल्यावर प्राचार्यांनी रेखाला आपल्या कक्षात बोलावलं व "तुमची प्रश्‍नपत्रिका कशी काय फुटली?' अशी विचारणा त्यांनी रेखाकडं केली. रेखाचं डोकं सुन्न झालं.

रेखाला अपघात झाला होता. प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना झालेल्या स्फोटात तिच्या हाताला आणि डोळ्यांना इजा झाली होती. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्या कॉलेजमधली प्राध्यापकमंडळी व शिक्षकेतर कर्मचारी रुग्णालयात तिला पाहायला आले. राहुल तिच्याजवळच बसून तिला धीर देत होता. डॉक्‍टरांना सारखी विनंती करत होता ः "डॉक्‍टर हिला लवकर बरं करा. रेखा, तुझं काही बरं-वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं? थॅंक गॉड, तू थोडक्‍यात बचावलीस. आय लव्ह यू, रेखा.'

रेखा आणि राहुल यांचं प्रेम पाहून सगळ्यांना आश्‍चर्य वाटायचं. ती प्राध्यापिका आणि तो लॅबोरेटरी असिस्टंट. या विसंगत जोडीबद्दल लोक कुजबुजही करत असत.
हळूहळू रेखाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पंधरा दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आलं. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार, पुढचे काही दिवस तिला झोपूनच विश्रांती घ्यायची होती. मात्र, तशी काही काळजी नव्हती. राहुलनं सगळी जबाबदारी घेतली होती. खरंच, राहुलचं किती प्रेम आहे आपल्यावर हाच विचार रेखाच्या मनात येत होता.
पडल्या पडल्या तिला कॉलेजचे दिवस आठवले. एखादा चित्रपट पाहावा तशी ती आपल्या भावविश्‍वात रमून गेली.
* * *

रेखा आणि राहुल दोघंही शिकायला एकाच कॉलेजात होते. दोघांच्याही घरची परिस्थिती तशी साधारणच. दोघंही सायकलनं कॉलेजात येत-जात असत. दोघांचा जाण्या-येण्याचा रस्ता एकच. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर यथावकाश प्रेमात झालं. रेखाला खूप खूप शिकायचं होतं. शिक्षणक्षेत्रात आपण करिअर करावं, अशी तिची इच्छा होती. ती अभ्यासातही हुशार होती. कॉलेजच्या प्राचार्य मॅडम तिच्यावर खूप खूश होत्या. "हुशार, होतकरू मुलगी' अशी रेखाची प्रतिमा होती. कधी कधी कॉलेजची फी भरणं तिला अवघड जात असे; पण प्राचार्या तिला सांभाळून घेत. त्या तिला प्रत्येक पावलावर मदत करायला तयार असायच्या. त्यांच्या मदतीनंच ती पुढं जात होती.

अचानक एक दिवस घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत राहुल तिला भेटला. आपल्या वडिलांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला असल्याचं राहुलनं तिला सांगितलं. वडिलांच्या नोकरीशिवाय अर्थप्राप्तीचा दुसरा स्रोत राहुलच्या घरात नव्हता. त्यामुळे वडिलांच्या आजारपणामुळं राहुलला आता शिक्षण सोडून नोकरी करावी लागणार असंच एकूण दिसत होतं. रेखाजवळ राहुलनं डबडबत्या डोळ्यांनी मन मोकळं केलं. कॉलेजच्या प्राचार्यांना सर्व परिस्थिती सांगितली. जी मिळेल ती नोकरी करायला आपण तयार आहोत असं राहुलनं त्यांना सांगितलं. प्राचार्यांच्या प्रयत्नांमुळं तो त्याच कॉलेजात लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून रुजू झाला. तुटपुंजा का होईना पगार मिळू लागला व घराचा गाडा सुरू राहिला.
मात्र, आपलं भविष्य अंधकारमय आहे, असं राहुलला सतत वाटू लागलं. आपल्या शिक्षणाअभावी रेखाही आपल्यापासून दूर जाईल की काय, अशी भीती त्याला वाटायला लागली.
रेखा शांत होती. तिनं राहुलला धीर दिला.
""मी कोणत्याही परिस्थितीत तुला सोडून जाणार नाही. तू खचू नकोस. अरे, सुख-दुःखात एकत्रच राहण्याच्या आणा-भाका आपण घेतलेल्या आहेत ना? विसरलास का इतक्‍यात? तुला एकटं सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करायचा विचारही माझ्या मनात आला नाही. येणार नाही. एखाद्‌-दोन वर्षं आपण थांबू. तू थोडा स्थिर झालास आणि मला नोकरी मिळाली की आपण लग्न करू या,'' रेखा म्हणाली.
राहुलनं बीएस्सी पूर्ण केलं. त्याची नोकरी सुरूच होती. रेखा एमएस्सी झाली. आता दोघंही विवाहबद्ध झाले. रेखाचं शिक्षण सुरूच होतं. दिवस आनंदात चालले होते. रेखा मेहनती होती. तिनं रिसर्च फेलोशिपची परीक्षा दिली आणि ती त्यात उत्तीर्ण झाली. तिला फेलोशिप मिळायला लागली. आता पीएच. डी. करता येणार असल्यानं तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या या सर्व मेहनतीचं चीज झालं. ती त्याच कॉलेजात प्राध्यापक या पदावर रुजू झाली. त्या दिवशी ती खूप आनंदात होती. येताना पेढे घेऊनच ती घरी आली. त्या दिवशी राहुल लवकर घरी आला होता. त्यानं हसतमुखानं तिचं स्वागत केलं. "आधी तोंड गोड कर' म्हणून राहुलच्या गळ्यात पडत रेखानं त्याच्या तोंडात पेढा घातला. ""अगं...अगं, कशाबद्दल? काही सांगशील की नाही?'' राहुलनं तिला जवळ घेतलं.
रेखा म्हणाली ः ""अरे बाबा, मी उद्यापासून "रेखामॅडम' म्हणून कॉलेजात जाणार आहे. हे बघ अपॉईंटमेंट लेटर...'' राहुलला खूप आनंद झाला.
आता खरी कसरत होती दोघांची. एकाच कॉलेजात ती प्राध्यापिका आणि तो लॅबोरेटरी असिस्टंट. दोघंही सोबतच कॉलेजला जायचे. रेखाला या सर्व गोष्टींचं कधी वैषम्य वाटलं नाही. दिवस सरकत होते. राजा-राणी खूशच होते. पण...राजा-राणीच्या कहाणीत "ट्‌विस्ट' येणं सुरू झालं. तो "ट्‌विस्ट' चोरपावलांनी जीवनात डोकावला.
* * *

एक दिवस प्राध्यापकांची गोपनीय बैठक सुरू होती. बैठकीत परीक्षेच्या कामाबाबात चर्चा चालली होती. राहुल मध्येच आत आला आणि त्यानं तिला विचारलं ः ""अगं, माझा जेवणाचा डबा तुझ्याजवळ राहिला का?'' यावर, सगळ्या प्राध्यापकांनी नाराजीच्या सुरात रेखाकडं तक्रार केली ः "राहुलनं असं न विचारता थेट आत येऊ नये.' राहुलच्या वतीनं तिनं सर्वांची माफी मागितली. मात्र, असे प्रसंग वारंवार यायला लागले. "माझी पत्नी एवढी मोठी प्राध्यापिका आहे,' हे सगळ्यांसमोर दर्शवायला राहुलला आवडायचं आणि त्याच्या अशा वागणुकीमुळं रेखा हैराण व्हायची...पेचात सापडायची.
एक दिवस रेखानं राहुलजवळ हा विषय काढला. तो भडकून गेला.
- म्हणाला ः ""का? आता तुला माझी लाज वाटायला लागली का? नवरा आहे मी तुझा. मला कोण रोखतं तेच पाहू''
रेखा त्याला समजावत राहिली ः ""अरे, घरी आपण नवरा-बायको आहोत; पण बाहेर मात्र आपली जी पोझिशन आहे तिचा मान ठेवावा लागतो. नाहीतर लोकांना उगीच विषय मिळतो चघळायला.''
""बरं बाई, ठीक आहे'' म्हणत राहुलनं माघार घेतली. मात्र, त्याचा अहंकार दुखावला गेला होता.
कॉलेजची काही प्राध्यापकमंडळी रेखाची प्रतिमा डागाळण्याच्या प्रयत्नात होतीच. त्यांना राहुलमुळे अनायासेच संधी मिळत होती.
* * *

कॉलेजच्या परीक्षा सुरू होणार होत्या. रेखा परीक्षाप्रमुख होती. तिनं परीक्षेचे पेपर्स व काही गोपनीय माहिती तिच्या कॉम्प्युटरमध्ये ठेवली होती.
यासंदर्भात एक-दोन प्राध्यापक तिच्या घरी यायचे. दोन दिवसांनी परीक्षा होती. अचानक एके दिवशी मुकेश नावाचा विद्यार्थी त्याच्या वडिलांसोबत रेखा-राहुलच्या घरी आला. त्याच्या वडिलांनी रेखाकडं प्रश्‍नपत्रिकेची मागणी केली व "तुम्ही मागाल तितके पैसे त्याच्या मोबदल्यात देऊ' अशी लालूच दाखवली. हा प्रकार पाहून रेखा भयंकर संतापली. तिनं त्यांना त्या संतापातच परत पाठवलं व "असलं काही करण्यापेक्षा मुलांना अभ्यासाची सवय लावा' असा सल्ला दिला.
या अनपेक्षित हल्ल्यानं अपमानित झालेला तो माणूस तिला धमकी देऊन गेला.
तिसऱ्या दिवशी संबंधित विषयाचा पेपर झाला. पेपर संपल्यावर प्राचार्यांनी रेखाला आपल्या कक्षात बोलावलं व "तुमची प्रश्‍नपत्रिका कशी काय फुटली?' अशी विचारणा त्यांनी तिच्याकडं केली. रेखाचं डोकं सुन्न झालं.
"मुकेश नावाच्या मुलाला तुम्ही पेपर विकलात, त्यानं सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका आधीच दिल्या. आणि हे तुमच्यामुळं झालं,' असा आरोप रेखावर ठेवण्यात आला व ""रेखा मॅडम, तुमच्या सांसारिक गरजा तुम्ही अशा भागवता का?'' असंही तिला कुत्सितपणे विचारण्यात आलं.
रेखानं तिच्या परीनं खुलाशाचा खूप प्रयत्न केला.
आपला या सगळ्यात काहीही हात नाही, असं ती परोपरीनं विनवत राहिली.
"पुढच्या प्रश्‍नपत्रिकेबाबत आता सावध राहा,' असं प्राचार्यांनी तिला बजावलं.
रेखाची प्रतिमा डागाळायला निघालेले प्राध्यापक छद्मीपणानं हसत होते.
रेखा अतिशय व्यथित झाली होती. तिचा उतरलेला चेहरा पाहून राहुलनं चौकशी केली व झाला प्रकार जाणून घेतला.
रेखाला राहुल म्हणाला ः""आपण दोघं मिळून याविरुद्ध लढू. तुझ्या पाठीशी मी आहे. माझी रेखा असं करूच शकत नाही. जे प्राध्यापक तुझ्या मागं लागले आहेत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव.''
* * *

विमनस्क अवस्थेत रेखा कॉलेजला जात राहिली व आपली कामं करत राहिली. त्या दिवशी प्राचार्यांनी तिला बोलावलं. ती धास्तावूनच त्यांना भेटायला गेली. ती भीत भीतच त्यांच्या कक्षात शिरली. प्राचार्यांनी हसून तिचं स्वागत केलं. तिला हे अनपेक्षित होतं.
प्राचार्या तिला म्हणाल्या ः ""रेखा अभिनंदन. तुला यूजीसीतर्फे एक मोठा प्रोजेक्‍ट देण्यात आला आहे आणि त्यासाठी दोन लाखांचं
अनुदानही देण्यात येणार आहे. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू परवा कॉलेजला भेट देणार आहेत. त्या वेळी त्यांच्या हस्ते तुझा सत्कार करण्यात येईल. पेपरफुटी प्रकरणात तुझा हात नाही, हे मला माहीत आहे; पण लोकांना उत्तर द्यावं लागतं. तसाही त्या प्रकरणाचा तपास आपण पोलिसांकडं दिलेला आहेच. आता मात्र फार सावधगिरीनं हा प्रोजेक्‍ट पूर्ण कर...'' तिनं प्राचार्य मॅडमना वाकून नमस्कार केला आणि ती घरी आली.
तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. ही गोड बातमी राहुलला जेवताना सांगायची असं तिनं ठरवलं. तिनं त्याच्या आवडीचा साखरभात केला. मनासारखा साग्रसंगीत स्वयंपाक झाल्यावर तिनं राहुलला जेवायला हाक मारली. केव्हा एकदा ही बातमी राहुलला सांगतेय, असं तिला झालं होतं. साखरभाताचा पहिला घास तो घेत असतानाच तिनं ही बातमी त्याला सांगितली. राहुलनं तिचं अभिनंदन केलं.
""वा, वा... रेखा मॅडम, अशाच पुढं पुढं जात राहा. हा सेवक सदैव तुमच्या दिमतीला आहे,'' राहुलच्या या अभिनंदनपर बोलण्यात उपरोधिक स्वर आहे असं - का कोण जाणे- तिला वाटलं.
* * *

तो दिवस उजाडला. कॉलेजात तिचा सत्कार करण्यात आला. सर्व प्राध्यापकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कुलगुरूंना ओळख करून देण्यात आली. राहुलची ओळख "रेखाचे यजमान' म्हणून नव्हे तर "एक शिक्षकेतर कर्मचारी' म्हणून करून देण्यात आली. कुलगुरूंसोबत चहा घेण्यासाठी रेखाला बोलावण्यात आलं. कुलगुरूंनी तिचं खूप कौतुक केलं व तिला प्रोजेक्‍टसाठी शुभेच्छा दिल्या.
रेखा घरी आली. राहुलला प्रेमानं हाक मारत ती म्हणाली ः ""अरे राहुल, किती शोधलं मी तुला... कुठं होतास? कुलगुरूंना तुझी ओळख करून द्यायची होती मला''
राहुल उपरोधिकपणे म्हणाला ः ""का? माझा नवरा एक यःकश्‍चित कर्मचारी आहे! तो माझ्याइतका हुशार नाही, मला त्याच्यासोबत चालायचीही लाज वाटते, हे त्यातून तुला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं का?''
रेखाचा चेहरा एकदम उतरला.
""राहुल प्लीज, मला असं कधीच वाटलं नाही. मला तुझी कधीच लाज वाटत नाही. गैरसमज करून घेऊ नकोस.'' त्या दिवशी दोघंही जेवले नाहीत.
रेखानं आता आपल्या प्रोजक्‍टकडं लक्ष द्यायला सुरवात केली.
ती लॅबोरेटरीमध्ये आपला वेळ देऊ लागली. काही दिवसांच्या अबोल्यानंतर राहुलही पूर्वपदावर आला. तो तिच्या कामात तिला प्रोत्साहन देऊ लागला. मदत करू लागला. तिला हायसं वाटलं. ती तिच्या प्रोजक्‍टबद्दल त्याच्याशी चर्चा करू लागली. तो तिला विविध रसायनांची माहिती देऊ लागला. तिला नेमकी कोणती रसायनं हवी आहेत हे तो जाणून घेऊ लागला.
राहुल तिला मदत करत असल्यानं ती खूप आनंदात होती. मात्र, विशिष्ट प्राध्यापकमंडळी, तिचे विरोधक यांच्या रेखाबद्दल कागाळ्या, कारस्थानं सुरूच होती. रेखा मॅडमचे तास त्यांना "एंगेज' करावे लागत होते.
* * *

त्या दिवशी नेहमीप्रमाणे तिनं प्रयोग करून नोंदी घ्यायला सुरवात केली. मात्र, एकदम जोरदार धुराचा लोट आला. तिच्या डोळ्यांसमोर अंधेरी आली. ती जोरात किंचाळली. राहुल धावतच आला. ती खाली पडली होती. हातातली टेस्ट ट्यूब पडून फुटली होती. तिच्या बोटांनाही इजा झाली होती. रेखाचं किंचाळणं ऐकून प्राचार्य, प्राध्यापक सर्वजण धावत आले. तिला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आलं. उपचार सुरू झाले. राहुल तिच्या जवळ बसून होता. तो एकसारखा रडत होता. पोलिस आले. चौकशी सुरू झाली.
""तुमचा कुणावर संयश आहे का?'' या पोलिसांच्या प्रश्‍नानं रेखा भानावर आली. आपल्याच आयुष्याचं चल्‌च्चित्र ती पाहत होती. तिला काही उत्तर देता आलं नाही. पोलिसांचा तपास सुरू होता.
काही दिवसांनी रेखा घरी आली. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. तिच्या हातालाही इजा झाली होती. त्यामुळे सगळं काम राहुललाच करावं लागायचं; पण तो हसतमुखानं सगळं करायचा. तिचे केस विंचरणं, तिला जेऊ घालणं, तिला एकटं वाटू नये म्हणून तिच्याशी गप्पा मारणं इत्यादी...

रेखाला सारखं वाटायचं ः "हा माझ्यासाठी किती करतो. "बाई ठेव कामाला', म्हटलं तर ऐकत नाही..."अगं, मला तुझी सेवा करायला खूप आवडतं' म्हणतो. अधूनमधून राहुल पोलिसांना फोन करून अपघाताच्या तपासाबद्दल विचारत असतो. मी जर म्हटलं की मला असं पडून राहायचा कंटाळा आलाय तर म्हणतो, "अगं घाई काय आहे? अजून काही महिने आराम कर. माझी चिंता करू नकोस. मी कम्फर्टेबल आहे.' '
रेखा थोडी विचारातच पडली ः " पूर्वी मी सगळी कामं करायची...कॉलेजात जायची... प्रोजेक्‍टचं काम करायची तर हा चिडचिड करायचा! आणि आता मी याच्यावर खूप अवलंबून आहे, प्रोजेक्‍टचं काम बंद आहे, प्रोजेक्‍ट दुसऱ्याला सोपवायची वेळ आली आहे तर हा खूश आहे...' याच्या मनात काय आहे कोण जाणे!' असा विचार करत करतच ती राहुलच्या टेबलावर ठेवलेले कागद बघू लागली. टेबलाच्या ड्रॉवरमध्ये तिला दोन-तीन कोरे कागद दिसले. त्या कागदांवर बारीक अक्षरांत दोन शब्द लिहिलेले तिला आढळले. मॅग्निफाईंग ग्लासमधून तिनं ते वाचले असता त्यावर Invisible Ink असं लिहिलेलं तिला दिसून आलं. ड्रॉवरमध्येच छोट्या बाटलीत एक रसायन होतं. तिला सारं काही कळून चुकलं. तिनं कागदावर ते रसायन लावल्यावर त्यावरची अक्षरं दिसू लागली. कोणती रसायनं एकत्र केली तर स्फोट होऊ शकेल, कोणती रसायनं ज्वलनशील आहेत याचे फॉर्म्युले त्यात लिहिलेले होते. प्रोजेक्‍ट करताना राहुलनं माहिती विचारली म्हणून तिनंच ती माहिती त्याला दिली होती. आता हळूहळू तिला सगळ्याचा उलगडा होऊ लागला...बेसावध हरिणीला शिकाऱ्यानं घायाळ करून जाळ्यात पकडलं होतं आणि ती त्याची शिकार बनली होती
* * *

हे सर्व पाहून रेखाला भोवळ आली. आपण आता खाली कोसळणार बहुतेक...जगण्याला काही अर्थच राहिला नाही आता...असं तिला वाटत असतानाचा प्राचार्यांनी दिलेला सावधनतेचा इशाराही तिला आठवला. तिनं सगळ्या वस्तू जशाच्या तशा ठेवून दिल्या.
तिनं प्राचार्य मॅडमना बोलावून घेतलं आणि त्यांच्या मदतीनं तडक पोलिस स्टेशन गाठलं.
पोलिस घरी आले. रेखानं राहुलला फोन केला. तोही घरी आला. पोलिसांनी राहुलला सांगितलं ः ""रेखा मॅडमला झालेला "अपघात' हा अपघात नव्हता, तो घातपात होता. गुन्हेगार सापडला आहे.''
राहुल लगेच म्हणाला ः ""कुठं आहे तो? माझ्या रेखाला किती त्रास दिला त्यानं.''
पोलिस म्हणाले ः ""हो ना! तुमच्या रेखाला त्रास देणारा गुन्हेगार आमच्यासमोरच बसला आहे!''
आणि पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं. राहुलनं गुन्हा कबूल केला.
रेखाकडं बघून तिला उद्देशून तो म्हणाला ः ""हो, मीच केलं हे सगळं. तू जिथं तिथं मिरवत असायचीस. ज्याला त्याला तुझंच कौतुक होतं. तू माझ्यापेक्षा वरचढ होत होतीस. सगळेजण माझी टिंगळटवाळी करायचे ः "अरे बाबा, याची बायको काय, व्हीआयपी आहे बाबा...' मी या सगळ्याला कंटाळलो होतो. तुझी प्रतिमा कशी डागाळता येईल असा प्रयत्न मी करत होतो; पण तुला याची पुसटशीही कल्पना येणार नाही याची खबरदारी घेऊनच. मुकेशला पेपर मीच विकले. तुझी बदनामी करायलाही मीच सांगितलं होतं. तुझ्याविरुद्ध प्राध्यापकांना अपरोक्षपणे मीच भडकावत होतो; पण एवढ्यानं काही साधलं नाही. उलट, नंतर तुला प्रोजेक्‍ट मिळाला. तुझा नावलौकिक आधीपेक्षा जास्तच वाढला. माझा इगो दुखावला गेला. मी तुला अपंग करायचं ठरवलं व स्फोट घडवून आणला. प्रोजेक्‍टच्या निमित्तानं ही सगळी माहिती मी तुझ्याकडून घेतली. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे, रेखा! तू असहाय्य होतीस, तेव्हा तुझी सेवा करायला मला खूप आनंद वाटत होता; पण तुझा वरचष्मा मला नको होता.''
एवढं सांगून राहुल ओक्‍साबोक्‍शी रडायला लागला.
हे सर्व ऐकून रेखा घायाळ झाली.
""राहुल, मी तुझ्यावर प्रेम केलं रे, खरंखुरं प्रेम. मला फक्त तू हवा होतास, हातात हात घालून चालायला. मला तुझा खांदा हवा होता, थकल्यावर डोकं टेकायला. राहुल, तू असं का केलंस?''
एवढं कसंबसं त्याला विचारून, जवळच्याच टेबलचा आधार घेत तिनं जमिनीवर बसकण मारली...हतबलतेनं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr archana aloni write article in saptarang