शस्त्रक्रियेच्या परवानगीचा रस्ता खोटेपणाचा...

Dr-Arun-Gadre
Dr-Arun-Gadre

भारतीय औषधी केंद्रीय परिषदेच्यावतीनं आयुर्वेदिक तज्ज्ञांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. २० नोव्हेंबरला या शिखर संस्थेनं काढलेल्या परिपत्रकात या शस्त्रक्रियांची यादी देखील देण्यात आली आहे. या संस्थेनं शब्दांची कसरत केली असली तरीही परवानगी देताना जो रस्ता निवडलाय तो खोटेपणाचा आहे. वैद्यकीय विश्‍वात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा....

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील न्यायालयानं नुकताच म्हणजे ३० सप्टेंबरला एका आयुर्वेदिक सर्जन व आयुर्वेदिक भूलतज्ञाला सिझेरिअनच्या शस्त्रक्रियेनंतर एका स्त्री चा मृत्यू झाल्याबद्दल दहा वर्षांची कैद सुनावली. न्यायालयानं ही शिक्षा देताना असं म्हटलंय की हे दोन्ही डॉक्टर आयुर्वेदिक पदवीधारक असल्यामुळे सिझेरिअन करण्याची पात्रता आणि ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. 

भारतीय औषधी केंद्रीय परिषद (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन) या देशातील वैद्यक क्षेत्रातील शिखर संस्थेनं १९ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून आयुर्वेदिक तज्ज्ञाना कोणत्या शस्त्रक्रिया करता येतील याची एक यादी प्रकाशित केली आहे. ज्या शस्त्रक्रिया या यादीत आहेत त्या सर्वांना आता कायद्याची कवचकुंडले मिळणार आहेत. या यादीमधे बहुतेक शस्त्रक्रियांना आधी शल्यशास्त्रामधली नावे दिली गेली आहेत आणि नंतर आधुनिक वैद्यकामधे (अ‍ॅलोपॅथीमधे) आज प्रचलित असलेली नावे दिली गेली आहेत. उदा : अधिमंथ - ग्लॉकोमा, (ट्रबेक्युलेक्टॉमी), परिकर्तिकासन्निरुद्ध गुदास(अ‍ॅनल फिशर).  इंडिअन मेडिकल असोसिएशनने या अधिसूचनेला तीव्र विरोध केल्यानंतर तातडीनं या केंद्रीय परिषदेनं एक खुलासा केला आहे त्यात असं आग्रहानं प्रतिपादन केलं गेलं आहे की शल्यशात्रातल्या टर्मिनॉलॉजीला अनुरूप अशी आधुनिक वैद्यकातली टर्मिनॉलॉजी परिषदेनं वापरण्यात गैर काय आहे? प्रश्न असा आहे : या यादीमधे व्हिडिओ प्रोक्टोस्ट्कोपी”, “लॅरिंजिअल एअर वे”, कृत्रिम भिंग बसवण्यासकट मोतिबिंदू फॅको सर्जरी अशा शस्त्रक्रिया आहेत. या शस्त्रक्रियांचा दुरावन्वयानं देखील सुश्रुत संहितेशी संबंध नाही. या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकामधे निर्माण झालेल्या आहेत. यातले व्हिडिओ लेन्स / प्रोक्टोस्कोप ही आधुनिक साधने आयुर्वेदाने स्वतंत्र निर्माण केलेली नाहीत. प्राचीन शस्त्रक्रिया-पद्धतीला आधुनिकतेचा काहीसा टेकू द्यायला विरोध नाही. कारण शेवटी रुग्णांचे हित साधल्याशी कारण. पण आयुर्वेदाचा जुजबी, नावापुरता, वापर करायचा व मुख्यत: आधुनिक शास्त्र, तंत्र यांचा वापर करून त्याला आयुर्वेदाच्या / प्राचीन भारतीय शास्त्राच्या आधारे केलेली शस्त्रक्रिया म्हणायचे हा खोटारडेपणा आहे.       

एक तर आधुनिक वैद्यक हीच काही एकमेव उपचार प्रणाली नाही हे खरेच आहे आणि वैद्यकशास्त्र आजच  निर्माण झाले असेही नाही. शस्त्रक्रियांचे पुरावे प्राचीन काळात इजिप्त ख्रिस्त पूर्व २६५०, ग्रीस (४ थे शतक), मोहेंजोदडो (ख्रिस्त पूर्व ९ हजार वर्षे मध्यपूर्व - अल झहरवी (दहावे शतक) असे मिळतात. पण हेही सत्य आहे की जगभर या प्राचीन पद्धती हळूहळू लुप्त झाल्या आणि निदान गेली काही शतके आधुनिक वैद्यकशास्त्र अतिशय वेगाने प्रगत झाले. आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा काही शतकांपूर्वी मागासलेलेच होते. जळवा लावणे आणि पारा खायला घालणे अशा प्रकारचेच उपचार तिथंही होते. पण गेल्या काही शतकांत युरोप,अमेरिकेत झालेल्या विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या घुसळणीनं आजच्या शस्त्रक्रियांची सोय मानवजातीसाठी झाली आहे. या शस्त्रक्रियांचा प्राचीन अशा कोणत्याच पद्धतीशी, आयुर्वेदाशीसुद्धा काडीचा संबंध नाही हे कटू असले तरी वास्तव आहे.  गृहीतक / प्रयोग / एव्हिडंस आणि  सुधारणा अशा वैज्ञानिक तर्कपद्धतीचा पाया माणसाच्या इतिहासात आधुनिक वैद्यकानं सातत्यानं वापरला आहे. आज ज्या यशस्वी शस्त्रक्रिया होतात त्यामागे मानवी प्रयत्नांचा एक दीर्घ इतिहास आहे. ल्यूवेनहॉकने मायक्रोस्कोपमधून जंतू दाखवले. (आजल कोरोनाचा व्हायरस हा एलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधे बघता येतो), लिस्टरने  कार्बोलिक अ‍ॅसिड वापरले तर जखमा चिघळत नाहीत हे  सिद्ध केले.

सेमेंवेलीस आणि आधुनिक शस्त्रक्रियेचा जनक- विल्यम हाल्स्टेडने कार्बोलिक ॲसिडने हात धुवून आणि हात निर्जंतुकीकरण केल्यानंतर शस्त्रक्रिया केली तर शस्त्रक्रियेनंतर सेप्सीस होत नाहीत आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाण लक्षणीय असे कमी होते हे सप्रयोग सिद्ध केले. दहाव्या शतकात अल झहरवीने शरीरातल्या आतल्या अवयवांना जोडताना म्हणजेच ते शिवताना आतल्या आत काही आठवड्यानंतर विरघळून जाणारा ‘कॅटगट’नावाचा दोरा मांजराच्या आतड्यापासून निर्माण केला. त्याचाच आजचा आधुनिक भाऊबंद आहे - कृत्रिम धागा - वायक्रील ! १७७६ साली जॉन हण्टर या सर्जननं ज्ञात इतिहासातले मृत गर्भवती स्त्रीचे पहिले शरीर विच्छेदन केले ज्यामुळे सिझेरिअन करायचे तर कोणते कोणते टिश्यू कापावे लागतील हे समजले आणि सिझेरिअन शस्त्रक्रियेसाठीचा दरवाजा उघडला. त्याच्याच नेतृत्वाखाली शरीरशास्त्रातली १४ हजार विच्छेदन केलेली स्पेसिमेन जमा केली गेली ज्यामुळे सर्जिकल अ‍ॅनॉटमीचा पाया घातला गेला.

अ‍ॅन्टिबायोटिक हा शब्द आधुनिक वैद्यकाला १९२८ ला पेनीसिलीनचा शोधा लागेपर्यंत पर्यंत माहीत नव्हता पण त्यानंतर झालेल्या फार्मकॉलॉजीच्या दमदार वाटचालीने शस्त्रक्रियेनंतर सेप्सीस होऊ नये म्हणून नवनवी अ‍ॅन्टिबायोटिक  निर्माण झाली आणि होत आहेत, किंबहुना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अ‍ॅन्टिबायोटिकशिवाय जवळपास अशक्य आहेत. भूल देण्याची पद्धत विकसित होता होता आता कार्डिअ‍ॅक शस्त्रक्रियेला, मरणोन्मुख रुग्णाला, तान्ह्या बाळापासून नव्वद वर्षाच्या वृद्धाला निर्धोक भूल देता येते. आधुनिक वैद्यकाला जोड मिळाली ती आधुनिक तंत्रज्ञानाची. एक्स रे, सी.टी.स्कॅन, एम. आर. आय, सोनोग्राफी ही आज ज्या परिचित तंत्रज्ञान सुविधा आहेत ती या आधुनिक काळाची आणि आधुनिक वैद्यकाची देणगी आहे. काही शतकांच्या घुसळणीतून आजची शस्त्रक्रियेची पद्धती निर्माण झाली आहे. 

हे खरे आहे की सुश्रुत संहितेने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेचा पाया घातला. त्या काळी कानाची पाळी, नाकाचा शेंडा कापण्याची शिक्षा दिली जाई. अशा लोकांवर शस्त्रक्रिया करून रूप सुधारणा-या शस्त्रक्रिया त्याकाळी विकसित झाल्या. भगेन्द्र उर्फ फिशुला यावरील ‘क्षारसूत्र’ ही क्रिया काही रुग्णांच्या बाबतीत आधुनिक शस्त्रक्रियेइतकीच गुणकारी ठरते. या सर्व मर्यादित, वर वर करायच्या शस्त्रक्रिया होत्या. आणि हे अपवाद सोडले तर आधुनिक शस्त्रक्रियेच्या तोडीचे शल्यकर्म आयुर्वेदात नाही याची प्रामाणिक नोंद  भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने घ्यायला हवी. 

ही परिषद आज ज्या आयुर्वेदिक डॉक्टरना ही शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी देतं आहे, ते डॉक्टर ही शस्त्रक्रिया करताना आधुनिक वैद्यकशास्त्रानं दिल्या जाणाऱ्या भुलीचा वापर करतात की आयुर्वेदाने स्वतंत्र भूलप्रणाली विकसित केली आहे? आज ते ज्या शस्त्रक्रिया करतात त्यासाठी ते  आधुनिक वैद्यकातली अ‍ॅन्टिबायोटिक  वापरतात की आयुर्वेदातील औषधे वापरतात? ते आतले अवयव शिवायला वायक्रील वापरतात की आयुर्वेदाने धागा तयार केला आहे? शस्त्रक्रियेसाठी हत्यारे निर्जंतुक करण्यासाठी आधुनिक आयुधे वापरतात की आयुर्वेदात जंतूमुळं रोग होतात हेच न शिकवल्यामुळे हत्यारे निर्जंतुकच करत नाहीत? शस्त्रक्रियेनंतर ते सलाईन वगैरे देतात का? आणि मुळात म्हणजे ते निदान कसे करतात? कफ, पित्त, वात अशा संकल्पना वापरून की जंतु-संसर्ग, उती-दाह, उती-जीर्णता, अनियंत्रित प्रक्रिया इ. आधुनिक वैद्यकशास्त्रातील संकल्पना वापरुन? अगदी सामान्य माणूससुद्धा याचे उत्तर देईल. म्हणजे हा जो सगळा गोंधळ केला जात आहे त्यात आयुर्वेदाची डिग्री आहे पण निदान, उपचार व शस्त्रक्रिया मात्र आधुनिक वैद्यकानुसार आहेत.

हा आयुर्वेदिक डॉक्टरचा, आधुनिक वैद्यकामधला मागच्या दाराचा प्रवेश आहे. ही क्रॉस-पॅथी आहे. आता ती कायदेशीर होत आहे. या सर्वांमागे गांभीर्यही दिसले असते जर अशा परवानगीसाठी फार्मकॉलॉजी आणि सर्जिकल ॲनॉटॉमीसकट काही कमीत कमी प्रशिक्षणाची आणि त्या प्रशिक्षणात तो आयुर्वेदिक परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याची अट या अधिसूचनेत दिली गेली असती तर. ते जास्त योग्य ठरले असते. तिचा अभाव या अधिसूचनेमागचा हेतू दाखवतो, तो म्हणजे काही आयुर्वेदिक पदवी-धारकांना शस्त्रक्रियेच्या बाजारात प्रवेश देणे; मग रुग्ण-सेवेच्या दर्जाचे काहीही होवो. 

हा असा गैरकारभार करण्याची दोन कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे भारतातील सर्जनची कमालीची कमी संख्या आणि ग्रामीण भारताची गरज. वरवर पहाता हे संयुक्तिक वाटते. पण याचा अर्थ असा आहे की ग्रामीण आणि आदिवासी व्यक्तीला कमी दर्जाची ट्रीटमेंट मिळाली तरी चालेल ! असा निर्णय घेणारे या पद्धतीने प्रॅक्टिस करणाऱ्या सर्जनकडून स्वत: सर्जरी करून घेणार आहेत का? हा प्रश्न अनुत्तरित राहणार यात संशय नाही. 

असा विचित्र निर्णय करण्याची गरज नव्हती. सरकारी आरोग्य यंत्रणेत सर्जन्सच्या ढीगभर जागा रिकाम्या आहेत. त्या भरण्यातील अडचणी दूर करून त्या भरता येतील.  प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालय आहे. अनेक तज्ज्ञांनी सुचवल्याप्रमाणे त्याला जोडून वैद्यकीय महाविद्यालय काढून तिथे ग्रामीण भागासाठी सरकारी सेवेत राहणारे शेकडो सर्जन्स निर्माण करता येतील. सैन्यासाठी जशी खास वैद्यकीय महाविद्यालये आहेत तशी महाविद्यालये जिल्हावार काढून त्यातील सर्जन्सना सक्तीने ग्रामीण व आदिवासी भागात शासकीय सेवेत्र रुजू करून घेता येईल. अवघ्या काही वर्षात एक सक्षम अशी सरकारी वैद्यकीय सेवा निर्माण करता येईल. पण मग बड्या मंडळींची खाजगी वैद्यकीय महाविद्यालये कशी चालणार? त्यामुळे मागच्या सरकारसारखाच सोपा आणि आपली जबाबदारी झटकणारा व या वर्गाचे हित साधणारा मार्ग या सरकारनेही स्वीकारला आहे. पुढे जाऊन ही सरकारी रुग्णालये खाजगी कंपन्यांना खाजगी वैद्यकीय महविद्यालये काढायला देण्याचे चालले आहे! 

वैद्यकीय क्षेत्रात ग्राहक अडलेला वा असहाय्य असतो आणि त्याला हे माहीत असण्याची कोणतीही व्यवस्था नाही की पैसे मोजून तो ज्या सर्जनची निवड करत आहे तो असा मागच्या दाराने आलेला कमी प्रशिक्षित सर्जन आहे की आधुनिक वैद्यक शिकून आलेला प्रशिक्षित सर्जन आहे. पेशंटची सुद्धा या अधिसूचनेने फसवणूक होणार आहे.

हा असा गैरकारभार करण्याची अजून एक भूमिका अशी सांगितली जाते की आयुर्वेद, होमिओपॅथी, इतर काही पॅथी व आधुनिक वैद्यक यांचे एकत्रीकरण व्हायला हवे. (ईंटीग्रेशन). ही कल्पना रम्य आहे पण अतार्किक आहे. या सर्व पॅथीचा पाया पूर्णपणे भिन्न आहे. आजमितीला तरी असे कोणतेही ज्ञान वा तंत्रज्ञान उपलब्ध नाही जे या विभिन्न पॅथीमधला समान दुवा शोधू शकेल. असे ज्ञान वा तंत्रज्ञान उपलब्ध होईपर्यंत ही भाबडी कल्पना सोडून देणेच हिताचे ठरेल. एकत्रीकरण होऊ शकत नाही पण या तीनही पॅथी समान प्रतिष्ठेने समांतर अशा प्रॅक्टिस नक्कीच करू शकतात. त्यासाठी चीन प्रमाणे व्यवस्था (प्ल्यूरॅलिझम) करणे शक्य आहे की ज्यामुळे पेशंट ठरवू शकेल की तो कोणत्या पॅथीचा वापर करायचा ते.  

सुश्रुतांनी निर्माण केलेल्या आयुर्वेदाच्या आपल्या प्राचीन ठेव्याचा अभ्यास करून त्याचा वापर करायचा प्रयत्न जरूर करायला हवा. याबाबत चीनची वाटचाल आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. तिथेही एक अभिमानास्पद वारसा होता. ख्रिस्त पूर्व शंभर वर्षे आधी निर्माण झालेल्या अ‍ॅक्युपंक्चरचा. सुश्रुतांसारखेच ते ज्ञान काळाच्या ओघात लुप्त झाले होते. १९५० मधे तिथल्या साम्यवादी सरकारने चीनचा हा वारसा जगापुढे नेण्यासाठी आणि अ‍ॅक्युपंक्चरचा जनतेला उपयोग होण्यासाठी चीनमधे सर्वत्र स्वतंत्र रुग्णालये सुरू केली जिथं फक्त अ‍ॅक्युपंक्चरच वापरले जाईल. अ‍ॅक्युपंक्चरवर अभ्यास केले गेले. जागतिक स्तरावर मांडले गेले. आणि आज अ‍ॅक्युपंक्चर ही उपचाराची पद्धत आधुनिक वैद्यकाबरोबर प्रतिष्ठेने उभी आहे. हे लक्षात घेऊ की चीनने अ‍ॅक्युपंक्चरशिक्षित तज्ज्ञांना आधुनिक वैद्यक शस्त्रक्रिया करायला वा आधुनिक भूलशास्त्र वापरण्याची परवानगी दिली नाही भारतासारखी, तर या हॉस्पिटलमधे फक्त अ‍ॅक्युपंक्चरच वापरले. आयुर्वेदसुद्धा नक्कीच स्वयंसिद्ध असे स्वतःला सिद्ध करू शकेल. तशी काही उदाहरणे आहेतही.

मुंबईत केईएम हॉस्पीटल (जी एस मेडिकल कॉलेज) या आधुनिक वैद्यकाच्या फार्मकॉलॉजी डिपार्टमेंटने डॉ शरदिनी डहाणूकर यांच्या नेतृत्वाखाली तर पुण्यात डॉ. भूषण पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदीक उपचार पद्धती शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करण्यासाठी काही यशस्वी प्रयत्न केले आहेत. अशा प्रयत्नांना सातत्याने, पुरेसे व नियोजनबद्ध रितीने शासकीय बळ देणे आवश्यक आहे. 

भारतीय औषधी केंद्रीय परिषदेच्या या अधिसूचनेमुळे आयुर्वेदाला पुर्नवैभव प्राप्त कसे होईल? उलट यामुळे आयुर्वेदिक तज्ञ आयुर्वेदाचा त्याग करून अर्धवट अशा क्षमतेने आधुनिक वैद्यकाकडे वळणार आहेत. आयुर्वेदाचा उपयोग ते फक्त एक शिडी म्हणून करणार आहेत. आयुर्वेदाच्या ऱ्हासाची ही सुरुवात आहे, गतवैभव पुन्हा मिळवण्याची दिशा नक्कीच नाही.  

भारतीय औषधी केंद्रीय परिषदेचा हा निर्णय दुर्दैवी आहे. त्याऐवजी सरकारने आयुर्वेदाला झळाळी कशी मिळेल त्यासाठी गंभीर प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय नागरिक त्या दिवसाची वाट बघत आहे, जेव्हा देशाचा गौरवशाली असा प्राचीन ठेवा असलेले आयुर्वेद आधुनिक वैद्यक शास्त्राच्या कुबड्या फेकून देत पुन्हा दमदार पावले चालू लागेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com