वक्तशीर गांधीजी (डॉ. अश्विनकुमार)

dr ashwinkumar
dr ashwinkumar

दोन ऑक्‍टोबर 2018 पासून महात्मा गांधी जयंतीचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या "वक्तशीरपणा' या एका महत्त्वाच्या पैलूविषयी...

महात्मा गांधीजींच्या आयुष्याचा गोफ इतका विविधरंगी आहे, की त्यातल्या प्रत्येक पैलूतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ते वेगवेगळ्या प्रकारची डोंगराएवढी कामं करू शकले, ते त्यांच्या आंतरिक ऊर्जेच्या बळावर. त्यात त्यांच्या वेळेच्या उत्तम व्यवस्थापनाचा वाटा मोठा होता. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे, याची प्रखर जाणीव त्यांना होती. त्यामुळेच प्रत्येक क्षणाचा चांगल्या कामासाठी उपयोग कसा होईल, हे ते पाहत असत. गांधीजींच्या कमरेला एक घड्याळ नेहमी लटकवलेलं असे, हे आपण त्यांच्या अनेक छायाचित्रांमधून पाहत आलेलो आहोत. ते वेळेला देत असलेलं महत्त्व पाहता ही मोठी अर्थपूर्ण गोष्ट होती, असं म्हणता येईल.

सन 1904 मध्ये दक्षिण आफ्रिकेत "फिनिक्‍स वसाहत' आणि 1910 मध्ये "टॉलस्टॉय फार्म'ची स्थापना गांधीजींनी केली होती. शिक्षणाचा संबंध केवळ मेंदूशी नव्हे तर हृदय आणि हात यांच्याशी आहे, असं ते मानत. प्रत्येक काम त्यांनी शिक्षणाशी जोडलं होतं. अंदाजे शंभर वर्षांपूर्वीच्या गांधीजींच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास गांधीजींच्या शिक्षणाविषयीच्या व्यापक दृष्टिकोनाची कल्पना येते. त्यांचे तिसरे पुत्र रामदास गांधी (जन्म : 1898, डर्बन) यांनी लिहिलेल्या "संस्मरणो' नावाच्या पुस्तकात "बापूंची शाळा' या शीर्षकांतर्गत एक आठवण दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे ः "फिनिक्‍स' आणि "टॉलस्टॉय फार्म'मध्ये आमची दिनचर्या खालीलप्रमाणे असायची :
सकाळी साडेपाचला आम्ही उठत असू.
साडेपाच ते सात ः नित्यक्रम तथा प्रार्थना.
सात ते आठ ः शेतीकाम.
आठ ते नऊ ः न्याहारी.
नऊ ते अकरा ः शेतीकाम, सफाई, स्वयंपाक, कावडीनं पाणी भरणं, लाकडं फोडणं, छपाईचं काम, श्रमदान वगैरे.
अकरा ते एक ः स्नान, भोजन, भांडी घासणं-विसळणं, नंतर विश्रांती.
एक ते साडेचार ः शिक्षण.
साडेचार ते साडेपाच ः शेतीकार्य आणि लाकडं फोडणं.
साडेपाच ते साडेसहा ः खेळ (फुटबॉल, क्रिकेट, हुतूतू, आट्यापाट्या इत्यादी देशी खेळ).
साडेसहा ते आठ ः भोजन, भांडी घासणं-विसळणं आणि स्वयंपाकघराची स्वच्छता.
आठ ते नऊ ः प्रार्थना आणि धार्मिक पुस्तकांचं वाचन.
नऊ ते दहा ः स्वाध्याय.
रात्री दहा ते पहाटे साडेपाच ः झोप...विश्रांती.

वेळापत्रक परिणामकारक बनवण्यासाठी ते अचूक पाळणं आवश्‍यक आहे. शिक्षणसंस्थांमध्ये घंटेच्या ठोक्‍यानं वेळापत्रकाची अंमलबजवणी करण्यात येते. आपण सकाळी योग्य वेळी उठलो नाही तर पूर्ण दिवसाचं वेळापत्रक बिघडून जाण्याची शक्‍यता असते. गांधीजींच्या आश्रमात सूर्योदयापूर्वी दिवस सुरू होत असे. आश्रमवासीयांना रोज पहाटे एका ठराविक वेळी उठावं लागतच असे.

याविषयी आचार्य विनोबा बावे यांचे बंधू बाळकोबा भावे आपल्या आठवणींत लिहितात ः सकाळी झोपेतून जागं होण्यासाठी चार वाजताच घंटा वाजे. तो आवाज अत्यंत कर्कश भासत असे. याचं कारण, ताटावर वाटी आपटून हा आवाज केला जाई. मग तुम्ही कितीही गाढ झोपेत असलात तरीही तुम्हाला उठण्यावाचून पर्यायच नसे. गांधीजी प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ ठेवत असत व प्रत्येक वेळेसाठी ठराविक काम ठेवत असत. ते कामाचा व वेळेचा अचूक हिशेब ठेवायचे. जुगतराम दवे हे गांधीजींच्या वेळापत्रकाचं कसोशीनं पालन करायचे. त्यांचा एकही क्षण आळसामध्ये जात नसे. गांधीजींची दिनचर्या ते स्वतः तयार करत व तिचं तंतोतंत पालन केलं जाई. ज्या कामाची वेळ ठरलेली असे, त्याच वेळेत ते काम पूर्ण केलं जात असे. पूर्ण दिवस ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे वागायचे. दिवसभरात कोणतं काम केव्हा केलं त्याची रोजनिशीही ते ठेवायचे. ता. नऊ जानेवारी 1915 रोजी गांधीजी स्वदेशी परत आले. सार्वजनिक जीवनात व्यग्र होत असताना जनमानसाच्या विस्कळित जीवनशैलीचंही ते निरीक्षण करत असत. परिणामी, गांधीजींनी "यंग इंडिया'मध्ये (सहा नोव्हेंबर 1924) "वेळेचं भान' या शीर्षकाचा लेख लिहिला. त्या लेखात गांधीजी म्हणतात : "आपण शिक्षित लोक प्रत्येक बाबतीत खूपच उशीर करत असतो. कोणतीही सभा नियोजित वेळीच सुरू झाली पाहिजे; पण आपल्याकडं हे होत नाही. सभेची, कार्यक्रमाची कार्यवाही नियोजित वेळेत न करणं ही बाब आपल्या अंगवळणीच पडून गेली आहे जणू काही! कुठली तरी सबब सांगून केवळ एका व्यक्तीसाठी शेकडो लोकांना बसवून ठेवलं जातं. अशा प्रकारे वाट पाहणं मान्य केलं जाणं, वेळेचा अपव्यय सहन केला जाणं हे देशाच्या प्रगतीसाठी अडथळ्याचं आहे.'

गांधीजींच्या वक्तशीरपणाविषयी सूत्ररूपानं सांगायचं झाल्यास पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरावेत. (1) शिक्षणासाठी; किंबहुना जीवनशिक्षणासाठी हृदय, हात आणि मेंदू यांची सुयोग्य सांगड घातली गेली पाहिजे आणि त्यासाठी तंतोतंत वेळापत्रक निश्‍चित केलं गेलं पाहिजे. (2) विद्यार्जनासाठी सूर्योदयापूर्वी झोपेतून झडझडून उठणं अत्यावश्‍यक आहे. (3) वेळापत्रकामध्ये नियोजन व त्याची अंमलबजवणी तेवढीच अत्यावश्‍यक. रोजनिशी लिहिणंही तितकंच गरजेचं. (4) वेळेचं पालन न करणं हा चिंतेचा नव्हे तर टीकेचा विषय झाला पाहिजे.

गांधीजी सत्यासाठी जगले, वेळेसोबत जगले. गांधीजींचा आग्रह जसा सत्यासाठी आहे, तसाच वेळेचं पालन करण्यासाठीदेखील आहे. वेळेचा अपव्यय ही एक प्रकारची हिंसाच आहे! आपण विद्यार्थी असू वा व्याख्याता, संशोधक असू वा शिक्षक... आपण प्रत्येक क्षणाचा हिशेब दिला आणि घेतला पाहिजे.
(मूळ गुजराती लेखाचा मराठी अनुवाद : अरुण कापुरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com