आजारानंतरची वंध्यत्व समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infertility problem

वंध्यत्व या समस्येमुळे आपल्या देशात १०-१५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही मूल होत नाही. पूर्वी लग्नानंतर एक-दोन वर्षांत मूल झाले नाही, की ती मुलगी समाजाच्या अवहेलनेमुळे, टीकेमुळे जास्त दुःखी व्हायची.

आजारानंतरची वंध्यत्व समस्या

- डॉ. अविनाश सुपे

वंध्यत्व या समस्येमुळे आपल्या देशात १०-१५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही मूल होत नाही. पूर्वी लग्नानंतर एक-दोन वर्षांत मूल झाले नाही, की ती मुलगी समाजाच्या अवहेलनेमुळे, टीकेमुळे जास्त दुःखी व्हायची. दुसरे लग्न करावे, असे पर्यायही सुचवले जायचे; पण आता गेल्या ३०-४० वर्षांत समाजाचा दृष्टिकोन बदलला. कामाचा ताण, अवेळी झोप, स्वतःचे व्यवसाय, करिअर यामुळे जीवनशैली बदलली. दीर्घकालीन आजारांमुळे वंध्यत्वाची समस्या वाढली. त्याबाबत जनजागृती होऊन आता नवे पर्याय स्वीकारले जात आहेत.

माझी एक संगीता नावाची रुग्ण होती. साधारण त्या वेळी १६ वर्षांची असेल. अत्यंत देखणी आणि हुशार. त्या वेळी ती दहावीमध्ये शिकत होती. परीक्षा झाल्यावर ज्या वेळी तिला सुट्टी पडली, तेव्हा तिला रक्ताची उलटी झाली. उलटीतून थोडेसे रक्त बाहेर पडले. तिचे वडील तिला लगेच रुग्णालयात घेऊन आले. तपासाअंती लक्षात आले, की तिला पोर्टल हायपरटेन्शन-यकृताच्या रक्तवाहिनीचा उच्च रक्तदाब आजार आहे.

पोर्टल हायपरटेन्शन अनेक कारणांमुळे होऊ शकते; परंतु तिचा आजार हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो; पण तो या वयापर्यंतही दिसू शकतो. आमच्या लक्षात आले, की तिच्या अन्ननलिकेच्या रक्तवाहिन्या फुगलेल्या आहेत. त्यामुळे तिला उलटी झाली. सगळ्या तपासण्या केल्या. सुदैवाने तिचे यकृत चांगले होते. दुर्बिणीतून इंजेक्शन्स देऊन/ बँडिंग करून तिचा आजार आटोक्यात ठेवला. ती नियमित येत होती. नंतर कॉलेजमध्ये जाऊ लागली. काही काळाने तिला पुन्हा मोठी उलटी झाली. आम्हाला तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि तिचा होत असलेला रक्तस्राव आटोक्यात आणला. ती त्यानंतरही नियमित येत असे. पुढे ती एम.बी.ए. झाली आणि चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तिला चांगली नोकरी मिळाली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले. अत्यंत समजूतदारपणे त्यांनी तिच्या भावी पतीला तिच्या आजाराची पूर्ण माहिती दिली. ती मुलगी हुशार होती. त्या दोघांनी विचारपूर्वक लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नापूर्वी आम्ही तिला मातृत्वाचा विचार करताना स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे याची कल्पना दिली होती. तिने एकदोन वेळा प्रयत्न केले; पण तिला मूल झाले नाही. गर्भार राहिली, पण गर्भपात झाला. आम्हीही तिला सल्ला दिला. लग्नानंतर काही वर्षांत त्यांच्या लक्षात आले, की तिला मूल होणार नाही. मग त्यांनी विचारपूर्वक मूल दत्तक घ्यायचे ठरवले आणि एक लहान मुलगी दत्तक घेतली. आज २० वर्षांनंतर ते मुलीला छान वाढवत आहेत व मुलगीही आज वकील होण्याच्या मार्गावर आहे. त्या दोघांचे करिअरही सुव्यवस्थित असून ते आनंदी आहेत.

आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे आणि काही वर्षांत ती १५० कोटी होऊन आपण जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश होण्याची शक्यता आहे. आपण चीनपेक्षाही लोकसंख्येत आघाडी घेऊ, कारण आता चीनची लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. असे असूनही वंध्यत्व ही समस्या आपल्या देशात आहे. १०-१५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही मूल होत नाही. समाजाचा दृष्टिकोन याबाबत आता बदलला. पूर्वी लग्नानंतर एकदोन वर्षांत मूल झाले नाही, की ती मुलगी समाजाच्या अवहेलनेमुळे, टीकेमुळे जास्त दुःखी व्हायची. दुसरे लग्न करावे असे पर्यायही सुचवले जायचे; पण आता गेल्या ३०-४० वर्षांत समाजाचा दृष्टिकोन बदलला. कामाचा ताण, अवेळी झोप, स्वतःचे व्यवसाय, करिअर यामुळे हार्मोनल समस्या यामुळे जोडप्यांच्या आरोग्यात बदल झाला.

वंधत्वावरचे उपायही बदलले. दारोदार वंध्यत्व निवारण करणारी केंद्रे आली आहेत. आयव्हीएफ, नवीन तंत्रे आली आहेत. यात पैसा खर्च होतो; पण यश मिळतेच असे नाही. १०० पैकी १५ ते २० जणांना मुलं होतात. कित्येक वेळा आमच्याकडे असे रुग्ण येतात, की अगदी लहान वयात त्यांना दीर्घकालीन आजार होतात किंवा एखाद्या मोठ्या अपघातामुळे त्यांच्या शरीरात कमजोरी येते, अशा वेळी त्यांच्यामध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा गर्भ पूर्णकाळ राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला मोठा आजार असेल, जसे पोर्टल हायपरटेन्शन, कोलायटिस, हृदयविकार इत्यादी; अशा वेळी गर्भारपण धोक्याचे होऊ शकते.

मातेचा जीव जाऊ शकतो, मुलाचाही जीव जाऊ शकतो. रक्ताचा किंवा इतर अवयवांचा कर्करोग बरा झाला असेल तर त्या वेळी रुग्णाने केमोथेरपी, रेडिओथेरपी घेतली असेल, तर तेव्हाही मुले होणे शक्य नसते किंवा मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अशा वेळी तो धोका न घेता, मुलाविना राहणे किंवा मूल दत्तक घेणे हे चांगले मार्ग होऊ शकतात. माझ्या नात्यातील आणि ओळखीच्या कित्येक कुटुंबांनी असा योग्य निर्णय योग्य वेळी घेऊन आज अनेक अश्राप जीवांना आई-वडिलांचे सुख मिळवून दिले. आपले घरही लहान बाळाच्या आगमनाने संपन्न केले आहे. अशा वेळी घरातल्या सर्वांनी एकत्र घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने असे निर्णय घ्यावेत. असे निर्णय हे नेहमीच समाजाला दिशादर्शक असतात व पुरोगामी समाजाचे प्रतीक असतात.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

टॅग्स :saptarang