फिरूनी नवी जन्मेन मी !

बृहन्मुंबई महापालिकेने चालवलेल्या सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालय या जुळ्या संस्थांचे माझ्या आयुष्यातील स्थान आणि नाते शब्दांच्या पलीकडचे आहे.
फिरूनी नवी जन्मेन मी !
Summary

बृहन्मुंबई महापालिकेने चालवलेल्या सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालय या जुळ्या संस्थांचे माझ्या आयुष्यातील स्थान आणि नाते शब्दांच्या पलीकडचे आहे.

- डॉ. अविनाश सुपे

एका क्षणी तिच्या मनात स्वतःचे आयुष्य संपवावे असा विचार आला होता. त्यासाठी प्रयत्नही केला, परंतु उपचार घेऊन ती सावरली आणि तिला तिच्या कर्तव्याची जाणीव झाली. आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. ‘एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवी जन्मेन मी’ असे म्हणत लक्षिताने नव्या पिढीपुढे कर्तव्याचा पाठ ठेवला आहे. जीवनाकडे पाठ न फिरवता ती धैर्याने सर्वाला सामोरी गेली आणि जिंकली फिनिक्स पक्ष्यासारखी.

बृहन्मुंबई  महापालिकेने चालवलेल्या सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालय या जुळ्या संस्थांचे माझ्या आयुष्यातील स्थान आणि नाते शब्दांच्या पलीकडचे आहे. या संस्थांमुळे मी माझ्या जनसेवेच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकलो. या संस्थांचे माझ्या आणि प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यात मोलाचे स्थान आहे.

या संस्थांमध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त काळ  सर्जन म्हणून काम करताना समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींशी आणि अनेक रुग्णांशी संपर्क आला. या रुग्णालयाच्या भव्य दगडी वास्तूमध्ये फिरताना केवळ वैद्यकीय शास्त्रच नव्हे, तर मोलाचे माणूसपणही शिकलो. त्यातील काही मनाला भावलेल्या व लक्षात राहिलेल्या रुग्णांच्या या गोष्टी आहेत. रुग्णांची नावे मात्र बदलली आहेत.

लक्षिताची एक कहाणी आठवते. ती रुग्णालयात आली तेव्हा १४ वर्षांची होती. तिच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. वडिलांना  गळफास लावून घेतलेला पाहून लक्षिताने ॲसिडचे  सेवन केले होते आणि निराशेच्या भरात हे आत्मघाताचे पाऊल का उचलले याचे कारण फक्त तिलाच माहीत होते.  देव तारी त्याला कोण मारी या न्यायाने तिचा आत्महत्येचा प्रयत्न सफल झाला नाही.  तिची आई जी शाळेत शिक्षिका होती, ती तिला योग्य वेळी सापडली आणि परिस्थितीचे गांभीर्य आणि गरज लक्षात घेऊन ती लक्षिताला लगेच जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. आईवर हा खरे तर दुहेरी आघात होता. एका बाजूला तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती आणि त्यांचा मृत्यू झाला होता, दुसरीकडे तिची मुलगी होती जिने आत्महत्या केली होती आणि ती मृत्युशय्येवर होती. तिची आई तिला जवळच्या सरकारी इस्पितळात घेऊन गेली, जिथे तिच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया झाली आणि तिथे फीडिंग जे जूनोस्टोमीसह ट्रेकीओस्टोमी (श्वासनलिकेस मानेमध्ये भोक पडून त्यातून श्वास घेणे) आणि गॅस्ट्रेक्टॉमी  (जठर काढून टाकणे) केली.

तीन महिन्यांनंतर तिला आमच्या हॉस्पिटल म्हणजेच केईएममध्ये अतिविशेषोपचार विभागात पाठवण्यात आले. त्या वेळी ती १५ वर्षांची मुलगी जी आठवीत शिकत होती, तिच्यावर ट्रेकीओस्टॉमी केली होती; पण तिच्यात प्रशंसनीय गोष्ट होती ती म्हणजे सर्व संकटांशी लढण्याची आणि पुन्हा एकदा जगण्याची जिद्द दाखवत होती. तिचा अन्न नलिकेचा रस्ता बंद झाला होता, त्यामुळे तोंडावाटे काहीच जात नव्हते. तिचे प्राथमिक मूल्यांकन केल्यानंतर ईएनटी तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही अत्यंत अरुंद असलेल्या अन्ननलिकेमध्ये प्रवेश करू शकलो व हळूहळू काही उपकरणांद्वारे तिची अन्ननलिका रुंद करायला सुरुवात केली. ही प्रक्रिया जवळपास चार महिने चालली. मग आम्ही तिच्यावर शस्त्रक्रिया करून अरुंद अन्ननलिकेचे वरचे तोंड मानेतून बाहेर काढले व त्यातून उपचार करायला सुरुवात केली. या मानेतील तोंडातून आम्ही dilators द्वारा तिची अन्ननलिका रुंद करण्याची प्रक्रिया अजून तीन महिने चालू ठेवली. जवळजवळ आठ ते नऊ महिन्यांनंतर ती अंतिम शत्रकियेस तयार झाली.

सर्व अडचणींशी लढण्याची तिची जिद्द आणि एकल पालक म्हणून तिच्या आईचा पाठिंबा, हे आव्हानात्मक तसेच कौतुकास्पद होते. ती या सर्व शारीरिक आणि मानसिक वेदनांमधून सहनशीलतेने आणि मनोधैर्याने जात होती. ती जगण्यासाठी लढत होती. सुरुवातीला जगण्यासाठी आणि नंतर किमान तोंडाने खाऊ शकेल यासाठीच या सर्व प्रक्रियेला सामोरे जावे लागले. तिला धड बोलता येत नव्हते. ती तिच्या ट्रेकिओस्टोमीवर बोटे ठेवून आमच्याशी बोलायची. कालांतराने जेव्हा तिने स्वतःला dilate करायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही तिला अन्ननलिका कोलोप्लास्टीसाठी नेले. यामध्ये मोठ्या आतड्याचा भाग काढून तो खराब अन्ननलिकेच्या जागी लावला जातो. प्रक्रिया चांगली झाली, पण ॲसिडमुळे जोडाची जागा अजूनही घट्ट होती (फायब्रोटिक अनस्तोमोसिस). त्यासाठी आम्ही एक अँटी-कार्सिनोजेनिक औषध मिटोमायसिन सी वापरून ते थांबवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही कोलोप्लास्टी करून मोठे आतडे घशाजवळ अन्ननलिकेस जोडले होते. अन्ननलिका आम्ही नव्याने तयार केली होती. काही अडचण येण्याच्या भीतीने आतड्यातून अन्न देण्याची नळी ठेवलीच होती. आम्ही अन्ननलिका रुंद करण्यासाठी अंतर्गत स्ट्रिंग ठेवली होती. दर तीन महिन्यांच्या कालावधीत ती नियमितपणे दोन पोकळ नलिकांच्या (अॅनास्टोमोसिसच्या) विस्तारासाठी (dilatation) यायची. हे आणखी दोन वर्षे चालले. त्यानंतर काही छोट्या शस्त्रक्रिया करून शेवटी ती स्वतःहून व्यवस्थित खाऊ लागली.

सुरुवातीस ती जेव्हा आली तेव्हा ती खूप अबोल होती. शांत शांत असायची; पण काही दिवसांनी ती गप्पा मारायला लागली. तेव्हा तिने सांगितले- डॉक्टर, वडिलांचा मृत्यू पाहिल्यावर मला वाटले, की आईवर जास्त बोजा नको म्हणूनच मी घरात बाथरूममध्ये असलेले ॲसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; पण आता मला जगायचं आहे आणि आईला आधार द्यायचा आहे.

लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे एका क्षणी आलेल्या विचाराने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला व तिला या सर्व प्रक्रियांतून जावे लागले. त्या वेळी ती अबोध होती, त्यामुळे आईवर ओझे होण्यापेक्षा तिला आपण दुःखाच्या खाईत लोटतो आहोत हे कळले नाही, पण ज्या वेळी कळले तेव्हा ती कर्मयोगी झाली. जीवनाकडे पाठ न फिरवता ती धैर्याने सर्वाला सामोरी गेली आणि जिंकली फिनिक्स पक्ष्यासारखी. आपण हेसुद्धा शिकले पाहिजे, की एका क्षणी स्वतःचे आयुष्य संपवावे असा विचार येतो; परंतु त्यामधून बाहेर येण्यासाठी सात ते आठ वर्षे प्रचंड सहन करावे लागते. कारण जन्म आणि मृत्यू या आपल्या ताब्यातील गोष्टी नाहीत. आजच्या पिढीने हे लक्षात ठेवावे, की यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यासाठी मनाच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

या सर्वांत वाखाणण्याची गोष्ट म्हणजे ज्या काळात तिने या सर्व प्रक्रिया पार पाडल्या, तेव्हा तिने तिचे शिक्षण चालू ठेवले. तिने आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आणि या सर्व काळात ती स्वतःची आणि तिच्या आईची काळजी घेत होती. कधी वसतिगृहात राहून, ट्रॅकोस्टोमीच्या जखमेसाठी मान झाकत होती. जेजुनोस्टॉमी फीडिंग करत होती आणि स्वतःला शिक्षित करत होती. आज तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ती एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत आहे आणि लग्नही करणार आहे. आज ती २४ वर्षांची आहे आणि एक स्थिर व्यवहार्य जीवन जगते आहे. तिची जबर इच्छाशक्ती आणि आमच्याकडून थोडीशी मदत यामुळे ती आज एक स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभी अशी स्वाभिमानी भारतीय मुलगी आहे. ‘एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवी जन्मेन मी’ असे म्हणत लक्षिताने नवीन पिढीपुढे कर्तव्याचा पाठ ठेवला आहे. तिच्या पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com