दुर्गम भाग आरोग्य व्यवस्थेपासून दूरच! dr avinash tupe writes Remote areas are far away from the health system doctor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

दुर्गम भाग आरोग्य व्यवस्थेपासून दूरच!

- डॉ. अविनाश सुपे

सुमारे ४७ वर्षांपूर्वी दुर्गम भागात गेलो होतो, तेव्हा तिथे आरोग्य व्यवस्था पोचली नसल्याची जाणीव झाली होती. महाराष्ट्र सुधारणांमध्ये अग्रेसर असे आपण म्हणतो, तरी या राज्यात आजही अशी अनेक गावे, डोंगराळ प्रदेश आहेत जिथे आरोग्य व्यवस्था चांगली नाही. या दुर्गम ठिकाणी आपण काहीतरी करणे गरजेचे आहे. निदान प्राथमिक आरोग्य व्यवस्था तिथे पोचण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.

मी शिकत असताना सन १९७६ मध्ये मित्रांनी रायगडला जायचे ठरवले. माझे तीन मित्र शिशिर मोडक, गुरुनाथ मेथर आणि नाना असे आम्ही त्यावेळच्या वाहतूक व्यवस्थेप्रमाणे एसटी बसने महाडला आणि तिथून दुसऱ्या एसटी बसने खूब लढा बुरुज येथे पोचलो. त्यावेळी रोप वे वगैरे नव्हते. साधारणतः दोन तास चढून आम्ही रायगडावर पोहोचलो. तेथील झोपडीवजा हॉटेलमध्ये थांबलो. संपूर्ण रायगड पाहिला. दुसऱ्या दिवशी निघायचे होते.

एका मित्राने खाली काळ नदीच्या पात्रात जाण्याची कल्पना मांडली आणि आम्ही निघालो. केईएमच्या आमच्या हॉस्टेलच्या मेसमध्ये एक नामदेव नावाचा मुलगा आम्हाला जेवण वाढत असे. त्याचे गाव रायगडाच्या पायथ्याशी काळ नदीच्या काठी छत्री निजामपूर येथे होते. तिथे चालत असताना माझ्या मित्राने सांगितले की, हे नामदेवचे गाव आहे.

योगायोगाने नामदेवचे वडील शेजारच्या शेतात काम करत होते. त्यांनी हे ऐकले व आम्हाला अगत्याने घरी घेऊन गेले. प्रेमाने जेवू घातले. त्यांनी व इतर स्थानिकांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही दोन दिवस ट्रेक केला की तुम्ही वेल्ह्याला पोचाल आणि तिथून एसटी बसने पुण्याला जाऊ शकाल. त्यांनी आम्हाला योग्य रस्तासुद्धा दाखवला. नदीच्या काठाकाठाने चालताना आमच्याबरोबर घाटात जे जनावरे देशावर नेतात ते होते. त्यांच्यासोबत रमतगमत आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत रायगडाला प्रदक्षिणा करत होतो व पुढे चालत होतो.

आम्ही रात्री एका अगदी डोंगरावर छोट्या गावात पोचलो. झोपड्याबाहेरील खाटेवर त्यांनी टाकून दिलेल्या पथारीवर अंग टाकले. आमच्याजवळ खायला काहीच नव्हते. त्यांनीच आम्हाला भाकरी व चटणी खायला दिली. दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता त्यांनी आम्हाला उठवले. आम्ही त्यांच्याबरोबर डोंगरातल्या रस्त्याने चढायला सुरुवात केली. हा डोंगरातला रस्ता त्या काळी अत्यंत खडतर होता. छोट्या छोट्या दगडांचा, रस्त्यातून एकावेळी फक्त एक जनावर जाईल एवढाच होता.

चार-पाच तासानंतर सकाळी आठ वाजता आम्ही सिंगापोरची नाळ या ठिकाणी पोचलो. तिथून लिंगाणा किल्ला फार सुंदर दिसत होता. दक्षिणेला मकरंद गड, तोरणाही दिसत होते. तिथे त्या ओसाड ठिकाणी एक छोटे झोपडीवजा घर होते. त्यात दोन माणसे होती. आम्ही त्यांच्याशी संवाद साधत होतो. ‘‘तुम्ही इथे एकटे कसे राहू शकता?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘पावसाळ्यात तर आमचा जगाशी संपर्क राहत नाही. डोंगरातील खडतर रस्ता पावसामुळे निसरडा होतो व काही महिन्यांसाठी बंद होतो.’

तेव्हा फोन, मोबाईल असे संपर्काचे काहीच साधन नव्हते. ते म्हणाले, ‘‘आम्हाला पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी मीठसुद्धा साठवून ठेवावे लागते.’ आम्ही विचारले की, ‘काही आरोग्याची समस्या आली, तर काय करता?’’ ते म्हणाले, ‘‘घरीच आयुर्वेदिक काहीतरी झाडपाल्याचे औषध करतो. काही गंभीर आजार, अपघात असेल, तर रुग्णाला पाठीवर घेऊन अत्यंत धोक्याची अशी वाट पायी चालत जातो.’’ ते किती धोक्याचे आणि जिकिरीचे होते हे आम्ही स्वतः अनुभवले होते. एखादी बाई अडली किंवा पक्षाघात, हृदयविकाराचा रुग्ण यांनी तर तिथे राहूच नये. कारण तिथून सहीसलामत रुग्णालयापर्यंत पोचणे अशक्यप्राय होते.

आमच्यासारख्या केईएममध्ये शिकणाऱ्यांना हा एक मोठा आश्चर्याचा धक्का होता. केईएममध्ये सर्व सुविधा असतात व काही मिनिटांतच रुग्णावर अत्यानुधिक उपचार होतात; परंतु अशा ठिकाणी अशी आरोग्यसेवेची वानवा पाहून आम्हाला आपल्या देशातील आरोग्यसेवेची कमतरता जाणवली.

आज या प्रसंगाला ४७ वर्षे झाली आहेत. मागे वळून बघता त्या सिंगापोर नाळ या ठिकाणी आजही रुग्णवाहिका जात नाही. कारण आजही तिथे रस्ते नाहीत. प्राथमिक आरोग्य व्यवस्था तिथे पोचली का, तर त्याचे उत्तर आजही ती व्यवस्था सक्षमपणे देऊ शकलो नाही, हे आहे. पुढे अनेक वेळा हिमालयात ट्रेकिंग करताना काश्मीर असो, की कैलास मानसरोवर किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प अशा अनेक डोंगराळ भागात आरोग्य सेवेचा अनुभव असाच होता.

महाराष्ट्र राज्य सुधारणांमध्ये अग्रेसर असे आपण म्हणतो, तरी या राज्यात अशी अनेक गावे, डोंगराळ प्रदेश अजूनही आहेत जिथे आरोग्य व्यवस्था चांगली नाही. या दुर्गम ठिकाणी आपण काहीतरी करणे गरजेचे आहे. आज टेलिमेडिसिन, टॉवर्स, मोबाईल आहेत. त्याचा वापर करून निदान प्राथमिक आरोग्य व्यवस्था तिथे पोचण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अडलेल्या बाईला व गंभीर रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

आपल्याकडे जसा पाऊस पडतो तसा कॅनडा, स्विझर्लंड, नॉर्वे यांसारख्या अनेक प्रगत देशात बर्फ पडतो. तिथंही त्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यांच्या डोंगराळ प्रदेशात विरळ लोकवस्ती आहे; पण त्यांच्याकडे अशा दुर्गम भागातील लोकांपर्यंत आरोग्य व्यवस्था कशी पोचेल, असे तळमळीने पाहिले जाते. आपल्याकडे सर्वच देवभरोसे चालते. कुठे काही थोडे प्रयत्न झाले, तर त्यांचे नशीब फळफळले म्हणावे लागेल.

उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना चादरीची झोळी करून आणलेले मी पाहिले आहे. यात त्या रुग्णाचे काय हाल होत असतील, त्याची कोणीही कल्पना करू शकेल. त्यामुळे अशा दुर्गम भागात रस्ते, आरोग्य व्यवस्था, रुग्णवाहिका कशा पोचू शकतील, याचे नियोजन राज्य सरकार आणि सेवाभावी संस्था यांनी करणे गरजेचे आहे. जर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आपण एवढेही करू शकलो नाही, तर ते आपले फार मोठे अपयश म्हणावे लागेल. निदान आरोग्य व शिक्षण तरी आपण तळागाळापर्यंत पोचवले पाहिजे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

टॅग्स :doctorsaptaranghealth