'रिटर्न' म्हणजे नक्की काय? (डॉ. दिलीप सातभाई)

डॉ. दिलीप सातभाई dvsatbhaiandco@gmail.com
रविवार, 12 ऑगस्ट 2018

जून-जुलै महिना आला, की बहुतेक सगळ्यांच्याच कानावर इन्कमटॅक्‍स रिटर्न म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र हा शब्द कानावर पडायला लागतो. हा "रिटर्न' म्हणजे नक्की काय, तो का भरायचा, कसा भरायचा, त्याचे फायदे काय आदी गोष्टींवर एक नजर.

जून-जुलै महिना आला, की बहुतेक सगळ्यांच्याच कानावर इन्कमटॅक्‍स रिटर्न म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र हा शब्द कानावर पडायला लागतो. हा "रिटर्न' म्हणजे नक्की काय, तो का भरायचा, कसा भरायचा, त्याचे फायदे काय आदी गोष्टींवर एक नजर.

जून-जुलै महिना आला, की बहुतेक सगळ्यांच्याच कानावर इन्कमटॅक्‍स रिटर्न म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र, रिफंड म्हणजे परतावा, ड्यू डेट म्हणजे देय तारीख वगैरे अनेक प्रकारचे शब्द कानावर पडायला लागतात. प्राप्तिकर भरणारे किंवा त्या क्षेत्राशी संबंधित सगळ्यांना या गोष्टी माहीत असल्या, तरी इतर सर्वसामान्यांना मात्र हा नेमका काय प्रकार आहे, रिटर्न म्हणजे विवरणपत्र नक्की का भरायचं, ते नाही भरलं तर काय होतं वगैरे प्रश्नांची उत्तरं माहीत नसतात. त्यामुळं प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे नक्की काय, ज्यांनी कधी हे विवरणपत्र भरलंच नसेल, तर त्यांना त्याची माहिती व्हावी, या उद्देशानं आपण थोडक्‍यात सोपेपणानं या विवरणपत्राविषयी समजून घेऊया.

प्रत्येक व्यक्ती वर्षभर काही न काही उत्पन्न मिळवते. त्या उत्पन्नासंदर्भातली माहिती प्राप्तिकर कायद्याअंतर्गत एका विशिष्ट फॉर्ममध्ये प्राप्तीकर विभागाला द्यावी लागते. त्या फॉर्मचं नाव प्राप्तिकर विवरणपत्र. त्यात भराव्या लागणाऱ्या उत्पन्नाची विभागणी कशी करायची यासाठी थोडं टिपण ठेवावं लागतं आणि त्या टिपणाच्या आधारे गृहपाठ करून वर्षभरात वेतन किती मिळालं, घरभाडं किती मिळालं, व्यवसाय करत असल्यास त्यातून नक्की किती फायदा वा तोटा झाला, बॅंकेतल्या ठेवींवर किंवा बचत खात्यावर किती व्याज मिळालं, काही मालमत्ता विकली असल्यास त्यावर काही फायदा मिळाला की नुकसान झालं, नवीन गुंतवणूक केली असल्यास काय केली आहे, विम्याचे किती हप्ते भरले, आगाऊ कर भरला आहे की काही संस्थानीच करकपात केली आहे आदी माहिती संकलित करावी लागते. सर्व माहितीचा गोषवारा तयार झाला, की विवरणपत्र भरायची तयारी पूर्ण झाली, असं म्हणता येईल. तथापि, हे प्राप्तिकर विवरणपत्र भरायला एक कायम खाते क्रमांक असायला लागतो, त्याला इंग्लिशमध्ये "पॅन' असं म्हणतात.

प्राप्तिकराचा रिफंड (परतावा) पाहिजे असेल म्हणजे उत्पन्नावर जेवढा कर देणं अपेक्षित असताना त्यापेक्षा जास्त कर भरला किंवा कापला गेला असेल, तर उत्पन्न करपात्र असो वा नसो, पॅन असलेले प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्याशिवाय तो जास्तीचा कर परत मिळू शकत नाही. प्राप्तिकर विभाग परत करत असलेल्या याच रकमेला "रिफंड' असं म्हणतात. थोडक्‍यात सांगायचं तर, प्राप्तिकर विवरणपत्र हा असा एक फॉर्म आहे, की त्यात करदात्यानं सरकारी वित्तीय वर्षभरातल्या वर सांगितलेल्या सर्व स्रोतांतून मिळवलेल्या करपात्र आणि करमुक्त असणाऱ्या उत्पन्नाच्या रक्कमेची माहिती आणि त्यावरच्या देय असणाऱ्या आणि भरलेल्या प्राप्तिकराची माहिती प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर विशिष्ट देय तारखेपूर्वी प्राप्तिकर विभागाकडं दाखल करण्याचं बंधन असतं. करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असेल, तर कागदी स्वरूपातल्या फॉर्ममध्ये प्राप्तिकर विभागात जाऊन देता येतं, तर त्यापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पाठवावं लागतं.

उत्पन्नाबाबतची माहिती गोळा झाल्यानंतर ती योग्य रकान्यांत भरणं त्या मानानं सोपं असतं. करदात्यांचं करपात्र उत्पन्न वजावटीनंतर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, किंवा ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न अनुक्रमे तीन आणि पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ते ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर एका विशिष्ट तारखेच्या आत हे विवरणपत्र दाखल करावं लागतं. सर्वसाधारणपणे ही तारीख 31 जुलै असते, मात्र वेगवेगळ्या कारणांमुळं त्यात वाढ केली जाऊ शकते. त्या तारखेनंतर पुढं विलंब शुल्क देऊन काही विशिष्ट मर्यादेत हे विवरणपत्र दाखल करता येतं.
विवरणपत्र वेळेत दाखल केलं नाही, वेगवेगळ्या प्रकारचे तोटे होऊ शकतात आणि आर्थिक भुर्दंडही बसू शकतो. ज्या करदात्यांना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळवायचा असतो, त्यांनी वेळेत विवरणपत्र भरलं आहे की नाही हे संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासलं जातं. एकदम दोन विवरणपत्रं भरणाऱ्यांना कधीकधी व्हिसा मिळत नाही, असा अनुभव आहे. ज्या करदात्यांना गृह किंवा वाहन कर्ज घ्यायचं असेल, तर कोणतीही बॅंक सर्वसाधारणपणे कर्जदाराचं वार्षिक उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्राच्या आणि इतर निकषांच्या आधारे ठरवते. म्हणून देय तारखेअखेर विवरणपत्र आवर्जून भरणं अगत्याचं असतं.

सध्या देशभरात 29 कोटी पॅनकार्डधारक असून, त्यातले 6.2 कोटी करदाते प्राप्तिकर विवरणपत्रं भरतात. यंदा प्राप्तिकर विभागातर्फे अशा सर्व पॅनकार्डधारकांना ई-मेल वा एसएमएसद्वारे विवरणपत्र मुदतीपूर्वी स्वेच्छेनं दाखल करण्याचं स्मरण करून प्रोत्साहित करण्यात आलं होतं. एकूणच आपलं उत्पन्न करपात्र असेल, किंवा आपल्या उत्पन्नाच्या आधारे पुढं काही गोष्टी करायच्या असतील, तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणं गरजेचं आहे. परदेशी जाणं, कर्ज काढणं अशा गोष्टींसाठी तर हे विवरणपत्र अनिवार्यच असतं. स्वतः किंवा एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीनं तुम्ही हे विवरणपत्र भरू शकता. तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास अनेक गोष्टी सोप्या होतात.

Web Title: dr dilip satbhai write return article in saptarang