ज्ञानपरंपरेचे उपासक

bhushan patwardhan
bhushan patwardhan

एक शिक्षक संशोधकवृत्ती, भविष्यवेधी दृष्टिकोन आणि अविरत प्रयत्न यांच्या संयोगातून ज्ञानपरंपरा कशी निर्माण करू शकतो याचे उदाहरण म्हणजे प्रा. भूषण पटवर्धन! शिक्षण, संशोधन, धोरणनिश्चिती, व्यवस्थापन, उद्योग, प्रशासन, सामाजिक संस्था, व जनसामान्यांचे प्रबोधन अशा अनेक पैलूंना सामावणारे ते एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व आहेत. पारंपारिक शास्त्रे व आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांच्यातील समन्वय व सहकार्य वाढावे याकरीता गेली तीन दशके ते कार्यरत आहेत. जैव-रसायनशास्त्रापासून सुरु झालेले त्यांचे संशोधन आज विज्ञानाच्या अनेकविध शाखांना सांधते आहे. आपल्या संशोधनातून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी सिद्धिस नेले आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अभ्यासकांच्या प्रशिक्षण व जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे.

प्रा. पटवर्धन यांनी आपल्या प्रत्येक संशोधनात केवळ शिखरच गाठले नाही, तर भारतीय शिक्षण-संशोधन क्षेत्राची जगाला वेगळी ओळख करून दिली आहे. भारत सरकारच्या वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या प्रकल्पात देशभरातील आधुनिक वैद्यकशात्रात अग्रेसर संस्थांच्या सहकार्याने आयुर्वेदाच्या औषधांवर जे संशोधन झाले, त्याचे नेतृत्व त्यांनी केले. ते सूक्ष्म (clinical to molecular) अशा सर्व स्तरांवर एका संकल्पनेचा मागोवा कसा घ्यावा व उत्तम व स्वस्त औषध निर्मिती कशी करावी, याचा वस्तुपाठच त्यांनी या प्रकल्पात भारतीय शास्त्रज्ञांना दिला. या संशोधनाचे निष्कर्ष नामवंत जर्नल्स मध्ये प्रकाशित झालेच, पण सुमारे २० संस्थामधल्या अनेक चिकित्सक, अध्यापक, विद्यार्थी व संशोधकांमध्ये निर्माण झालेली संघभावना व संशोधकवृत्ती हे या प्रकल्पाचे मोजता न येण्यासारखे यश होते. आयुर्वेदाच्या ‘प्रकृति’ या संकल्पनेचा जनुकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास त्यांनी सुरू केला. या अभ्यासातून AyuGenomics या नवीन क्षेत्राची सुरुवात झाली व देशभरातील अनेक संशोधकांना प्रेरणा मिळाली. संगणकशास्त्राच्या उपयोगाने आयुर्वेदाच्या ज्ञानभांडाराचे (knowledgebase) संवर्धन करण्याकरीता त्यांनी सीडॅकच्या साहय्याने AyuSoft या प्रकल्पाची संकल्पना मांडली. सुमारे १५ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रकल्प जगभर पथदर्शी मानला जातो. सीरम इन्स्टीट्यूट बरोबर त्यांनी केलेले संशोधन हा तर अनेक अर्थाने योजकतेचे उदाहरण ठरले आहे. विद्यापीठ व उद्योगक्षेत्र यातील समन्वय, आयुर्वेदाची ‘रसायन’ संकल्पना व त्याची अद्ययावत लसीकरणाशी सांगड, स्वत:च्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रकल्पाची जागतिक स्तरावर अमेरिकन पेटंटपर्यंत भरारी अशा अनेक स्तरांवर हे संशोधन आगळे ठरले. त्यांचे प्रत्येक संशोधन अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, प्रशिक्षण व प्रेरणा देणारे ठरले. यातून देशभरातील उभरत्या संशोधकांचा परस्पर संवाद व त्यातून संशोधन संस्थांच्या कार्याला दिशा मिळाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग प्रा. पटवर्धन यांनी सातत्याने केले आहेत. विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम करताना त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांनी अनेक प्रयोगांना चालना दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधला आरोग्यशास्त्र विभाग हे असेच एक उदाहरण. प्रा. पटवर्धन व त्यांचे सहकारी यांनी विविध विषयातील प्रवाहांनी हा विभाग संमृद्ध केला आहे. मानववंशशास्त्रातील शास्त्रज्ञांपासून वैद्यकाच्या विविध विषयातील चिकित्सक ते प्रशासनातील अनुभवी अधिकारी या सर्वांच्या अनुभवांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा याकरीता हा विभाग प्रयत्नशील असतो. त्यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘वैद्य - शास्त्रज्ञ गुणवत्ता कार्यक्रम’ (Vaidya – Scientist Fellowship Program) हा ‘कुलगुरु’ व ‘गुरुकुल’ या दोन्ही पद्धतींच्या अनोख्या संयोगातून निर्माण झाला आहे. विविध विषयातील तरूण अध्यापकांना अनुभवी ऋषितुल्य व्यक्तिमत्वांबरोबर या कार्यक्रमात रहाण्याची संधि मिळाली. भारतीय तत्वज्ञानाचा ‘शिक्षण’ या संज्ञेत अन्तर्भूत ज्ञान-कौशल्य-दृष्टिकोन-आचार या घटकांचा विचार या कार्यक्रमात प्रा. पटवर्धनांनी प्रत्यक्षात आणून दाखवला आहे.

स्वत: बहुश्रुत असणारे प्रा. पटवर्धन जगभरातील विचारवंतांशी सतत संपर्कात असतात. ‘आ नो भद्र: क्रतवो यन्तु विश्वत:’ या उक्तिप्रमाणे विद्यार्थ्यांचा जगभरातील शक्य त्या विचारप्रवाहांशी परिचय व्हावा यासाठी प्रा. पटवर्धन आग्रही असतात. अनेक शास्त्रीय नियतकालिकांचे ते संपादक व मार्गदर्शक आहेत. सहकारी व विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतानाच गुणवत्ता, पारदर्शकता व नीतीनियम यात काटेकोर शिस्त हा दुर्मिळ समतोल त्यांना साधला आहे. संशोधक व अध्यापकांच्या मांदियाळीत अनेक वैशिष्ठ्यांमुळे त्यांचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. शास्त्राचा अभ्यास हे ‘सर्वेषां अविरोधेन’ असे व्रत असते व व्यापक कल्याण हे त्याचे साध्य असते, ही भावना आपल्या सहकारी व विद्यार्थी यांच्यात आपल्या सहज वागण्यातून रुजवणारा व ज्ञानपरंपरा वृद्धिंगत करणारा असा गुरु विरळाच!

(श्री. गिरीश टिल्लू यांचे हे मनोगत आहे, ते प्रा. पटवर्धन यांचे विद्यार्थी असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात अध्ययन व अध्यापन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com