
मानससूत्र : सर्जनशीलता आणि नावीन्य
- डाॅ. जयश्री फडणवीस
आत्मपरीक्षणापासून ते नेतृत्वगुणकौशल्यापर्यंतच्या अनेक लेखांमध्ये सर्जनशीलता; तसेच नावीन्यपूर्ण असणे हे कोणत्याही कौशल्यविकासासाठी किती आवश्यक आहे हे आपण पाहिले. पौराणिक; तसेच बोधकथांमध्ये सर्जनशीलतेचा उलेख आढळतो. अकबर-बिरबलाच्या कथांमध्ये राजाला कोणतीही गोष्ट पटवून देण्यासाठी बिरबलाने अनेक क्लृप्त्या वापरल्या असल्याचे आपण वाचले आहे.
आजही मानवी आयुष्यात सर्जनशीलता व नावीन्यपूर्णताही तितकीच आवश्यक आहे. चित्रकला, अभिनय, संगीत, ललितलेखन, विशिष्ट विषयावरील प्रकाशित लेखन, वाङ्मय, शिक्षण क्षेत्र; तसेच वैज्ञानिक क्षेत्रदेखील. सतत विकसित होणारी टेक्नॉलॉजी हे सर्व विकसित होणे सर्जनशीलतेशिवाय अशक्य आहे.
सर्जनशीलता व नावीन्यपूर्णता हे एकमेकांवर अवलंबून असणारे घटक आहेत. अनेक आव्हानांना तोंड देणे, कोणतेही प्रश्न सोडवणे, एखाद्या व्यवसायाचा विस्तार करणे अथवा एखाद्या नवीन क्षेत्रात पदार्पण करणे असो- यात सर्जनशीलतेला पर्याय नाही; तसेच नावीन्यपूर्णतेलाही नाही. कारण मानवी मनाला सातत्याने नावीन्याचा ध्यास असतो. बदल हवा असतो.
सर्जनशीलता म्हणजे आपल्याला जे माहिती आहे त्यातूनच काहीतरी नवीन शोधणे. त्याकरिता आपल्याला अवगत असलेल्या कला, असलेली माहिती अथवा ज्ञानाचा वापर करून, आहे त्यात थोडेसे कल्पकतेने बदल करून नवीन संकल्पना मांडणे. नावीन्यपूर्णता म्हणजे एखाद्या सर्जनशील संकल्पनेला मूर्त स्वरूप देणे.
उदा. आपल्या पूर्वीच्या स्कूटर्स सुरू करताना खूप किक माराव्या लागत. कधी स्कूटर तिरकी- आडवी करावी लागे. यावर एक कल्पकतेने बदल करण्यात आला, की एक साधेसे बटण कोणत्याही गाड्यांना लावणे- जे दाबताच इंजिन स्टार्ट होइल. आणि आज आपण बघतोय, की अनेक दुचाकी अथवा चारचाकी या एका बटणावर सुरू होतात. सर्जनशीलतेतून नावीन्यपूर्णता, त्यातून सर्वांनाच मिळालेली सहजता.
सर्जनता आणि नावीन्य या संकल्पनांना मूर्त स्वरूप देताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. आजवर जपलेली मूल्ये, तत्त्वे यांना सांभाळून नवीन गोष्टींची ओळख करून द्यावी लागते. आजवरील उत्पादनावर ग्राहकांच्या गरजा ओळखून उत्पादनात नावीन्य आणावे लागते. उपलब्ध अर्थसंचयात, खूप नुकसान होणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागते. विश्वासार्हता संपादित करावी लागते ती वेगळीच.
सर्जनशीलता व नावीन्यपूर्णता ही खरे म्हणजे मानवाला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. जसे आपण श्वास घेतो; तसेच आपला मेंदू सतत कोणत्या ना कोणत्या संकल्पनांना जन्म देत असतो. आयुष्यात पुढच्या क्षणी काय करायचे, ते करणे वेगळे कसे असेल याचा विचार सतत मानवी मन करते. कारण तेच तेच करणे अतिशय कंटाळवाणे असते. मानवी मनाला सातत्याने नावीन्याची ओढ असते.
सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णता या दोन गोष्टींचा वापर करत असताना आपली विचारसरणी जर विधायक असेल, तर प्रत्येक क्षण आनंदी ठरेल आणि वैयक्तिक; तसेच व्यावसायिक आयुष्य प्रगतिपथावर असेल; पण नकारात्मक विचार विध्वंसक ठरतील.
वैयक्तिक अथवा व्यावसायिक आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णतेवर आधारित कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे. एखाद्या कंपनीला जागतिक पातळीवर काम करायचे असेल, तर सर्जनशीलता व नावीन्यपूर्ण अद्वितीय कामे करावी लागतील. त्यासाठी प्रत्येकालाच स्वतःतील सर्जनशीलता व नावीन्यपूर्णता जाणीवपूर्वक वाढवायला हवी. ती वाढविता येते. त्याकरीता हवे खुले मन, संयम आणि चिकाटी. सर्जनशीलता वाढवा, आयुष्यात नावीन्यपूर्णता आणा; समृद्ध व्हा.