मानससूत्र : भावनिक बुद्धिमत्ता dr jayashri fadnavis writes emotional intelligence | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student

मानससूत्र : भावनिक बुद्धिमत्ता

- डाॅ. जयश्री फडणवीस

‘नेतृत्वगुणांची जोपासना’ या लेखात आपण नेतृत्वासाठी आवश्यक विविध गुण-कौशल्यांची थोडक्यात माहिती घेतली. त्यापैकी भावनिक बुद्धिमत्ता (इमोशन एंटेलिजन्स-ईक्यू) म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया.

आपल्या आयुष्यातून आनंद, दुःख, प्रेम, त्रास अशा सर्व भावना काढून टाकल्या, तर आपल्या आयुष्यात काय उरेल याचा जरा विचार करून बघा! आयुष्य निरर्थक होईल. या सर्व भावनांच्या गोंधळातच नात्यांची गोतावळी निर्माण होतात. या भावनाच आयुष्यात काहीतरी करत राहण्यास, जगण्यास प्रवृत्त करत असतात. आपली भावनिक बुद्धिमत्ता सतत कार्यरत असते. आयुष्यात अनेक चढ-उतार येतात, तेव्हा कधी सरळ, सोपे, कठीण तर कधी चुकीचे निर्णय भावनात्मक होऊन आपण घेत असतो.

मानसशास्त्रज्ञ, लेखक; तसेच पत्रकार डॉ. डॅनिएल गोलमन यांनी मानवी मेंदू आणि वर्तनशास्त्रावर अनेक अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांच्या मते कोणत्याही क्षेत्रातील यशामध्ये आयक्यूचा सहभाग २० टक्के, तर ईक्यूचा सहभाग ८० टक्के असतो. एखादी व्यक्ती अभ्यासात खूप हुशार नसते; पण व्यवहारचातुर्याने; तसेच उत्तम मानवी नातेसंबंधातून ती आयुष्यात यशस्वी होत जाते. डॉ. गोलमन यांच्या व्याख्येनुसार भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना नीट समजून घेऊन त्या भावनांचा समतोल साधत वापर करणे, त्या विधायकतेतून ताण-तणावांचे निर्मूलन करणे, उत्तम संवाद करणे, इतरांनाही भावना असतात हे समजून घेऊन त्यांच्याविषयी सहानुभूती असणे, आव्हानांना तोंड देणे व आलेल्या अडचणी कमी करून त्याकरिता उत्तम उपाय शोधणे! ही संपूर्ण भाव-भावनांची प्रक्रिया होणे म्हणजेच भावनिक बुद्धिमता. तिचा वापर वैयक्तिक; तसेच व्यावसायिक आयुष्यात करणे.

आपला बुद्ध्यांक सहजासहजी बदलू शकत नाही; पण भावनिक बुद्धिमत्तेबद्दल समजून घेऊन, शिकून आपला भावनांक वाढवता येतो. हे शिकल्यावर भावनांचे नियंत्रण करणे हळूहळू जमू लागते. भावनिक बुद्धिमत्ता एक शक्तिशाली ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करत असते. जिचा उपयोग आलेल्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे, कोणते निर्णय घ्यायचे यासाठी होतो.

भावनिक बुद्धिमत्ता ही वैचारिक बुद्धिमत्तेपेक्षा वेगाने काम करते. त्यामुळे अनेकदा बुद्धीला पटले, तरी भावनांच्या वेगामुळे मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी, पटत नसलेल्या गोष्टी थांबवता येत नाहीत. तेव्हा आपण विचारतो, ‘दिल से सोचा या दिमाग से?’

भावनांचे व्यवस्थापन

प्रत्येक प्रसंगानुसार भावना बदलत असतात. भावनांना मूल्य व महत्त्व असते. त्यामुळे भावनांचे व्यवस्थापन करताना नेमक्या कोणत्या कारणांमुळे भावना बदलल्या हे जाणले पाहिजे. कोणती कारणे मन अशांत करतात, हे कळेल, तेव्हा त्या जाणिवांना नियंत्रित करण्यासाठी स्वतःची मानसिक तयारी करता येईल. यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपला मेंदू पाची ज्ञानेंद्रिये वापरून भोवतालची परिस्थिती जाणून घेतो. त्याचा अर्थ लावत असताना मागील आठवणी आणि भविष्यातील शक्यता यांचाही विचार करतो. यातूनच एखादा विचार प्रबळ झाला, तर तोच मनात फिरू लागतो. त्याला आपण भावना म्हणतो.

आपल्या भावनांना दुर्लक्षित करण्याऐवजी त्यांना जर आपण सर्वांगीण विचार करून संतुलित करायला शिकलो, तर आपोआपच भावनांचे व्यवस्थापन जमू लागेल. भावनिक व्यवस्थापनात ‘चिंता’ या विषयावर विशेष काम करावे लागते.

चिंता

एखाद्या चिंतेचे जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल, तेव्हा भावनांना सांभाळणे अधिकच कठीण जाते. अनेकदा बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसते; पण चिंता मात्र वाढतच जाते. त्यातूनच मग मधुमेह, उच्च रक्तदाब, घाबरून शरीराला झटके येणे; तसेच झोप न लागणे अशा प्रकारचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. मानसिक आरोग्यही धोक्यात येते. अशा वेळी निश्चितच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

विलंबित समाधान (Delayed Gratitude)

काही व्यक्तींमध्ये लहानपणापासूनच समजूतदारपणा असतो. एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही, तरीही निराश न होता त्यावर सातत्याने काम करतात. आपले ध्येय साध्य करतात. शांतपणे कार्यरत राहिल्याने अनावश्यक भावनांची निर्मिती खूप कमी प्रमाणात होते. जे यश प्राप्त होते, ते दीर्घकाळ टिकते. अनेक यशस्वी उद्योजक अथवा नेत्यांच्या लहानपणात आपण डोकावलो, तर हे भावनांचे संतुलन आपल्याला दिसून येईल. अशा व्यक्ती वैयक्तिक; तसेच व्यावसायिक आयुष्यात यशस्वी असतात- कारण त्या संतुलित भावनांमुळे आत्मनिर्भरही असतात. आपल्या छान छान भावना व्यक्त करा! भावनांशी प्रामाणिक राहा. आनंदी आणि यशस्वी जीवन जगा.

टॅग्स :articlesaptarang