मानससूत्र : ध्येय आणि उद्दिष्ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goals and objectives

आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर ध्येये आणि उ‌द्दिष्टे ठरविणे आणि ते साध्य करणे हे वैयक्तिक; तसेच व्यावसायिक प्रगतीकरिता अतिशय आवश्यक आहे.

मानससूत्र : ध्येय आणि उद्दिष्ट!

- डाॅ. जयश्री फडणवीस

आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर ध्येये आणि उ‌द्दिष्टे ठरविणे आणि ते साध्य करणे हे वैयक्तिक; तसेच व्यावसायिक प्रगतीकरिता अतिशय आवश्यक आहे. भविष्यात नक्की काय करायचे त्याला एक दिशा मिळते. ध्येयांना मूर्तस्वरूप देण्याचा मार्ग विकसित होऊ लागतो. आपली ध्येये आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ती सर्व तंत्रे, कौशल्ये आपण शिकू लागतो. प्रत्येक कामागिरी चोखपणे पार पाडण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. प्रत्येक घटनेची जबाबदारी स्वतःवर घेत गेल्याने व्यक्तिमत्त्व दिवसेंदिवस सक्षम होत जाते.

आपण या पूर्वीच्या लेखांमध्ये आत्मपरीक्षण SWOT च्या माध्यमातून करायला शिकलो. याचा उपयोग आता Goal setting मध्ये करायचा आहे. आपली बलस्थाने ओळखून Strengths नुसार ध्येये ठरवता येतात, तर न्यूनतांचा विचार केल्यामुळे नवीन तंत्रे व कौशल्ये शिकण्यास सुरवात झालेली असेल. चला तर बघूया, ध्येये आणि उद्दिष्टे कशी लिहावीत!

1) ध्येये व उद्दिष्टांची निवड : स्वतःची आवड, आर्थिक कुवत; तसेच आत्तापर्यंत अवगत झालेले ज्ञान तथा एखाद्या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन ध्येये आणि उद्दिष्टांची निवड करता येईल. येथे स्वतःतील बलस्थानांचा आढावा घ्या.

2) पंचवार्षिक योजना : व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून प्रत्येक ध्येय किमान पाच वर्षांकरिता लिहिले जाते. मला पाचव्या वर्षी काय साध्य करायचे याचा विचार उतरत्या क्रमाने केला जातो. उदाहरणार्थ, वर्ष २०२३ ते २०२८ मध्ये मी पाचव्या वर्षी व्यवसाय सुरू करू इच्छितो. त्याकरिता येत्या पाच वर्षांचे नियोजन. २०२८ मध्ये व्यवसाय सुरू, तर २०२५ मध्ये माझे एमबीए पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याकरिता २०२३ मधे पूर्वपरीक्षा पास करणे. या पाच वर्षांत अनेक Goals ना अल्पकालीन, मध्यमकालीन; तसेच दीर्घकालीनमध्ये विभागून त्यावर काम करावे लागेल.

3) SMART : आपल्या ध्येये आणि उद्दिष्टांना तोलूनमापून घेण्याची पद्धत. ध्येय अल्पकालीन असो, वा दीर्घकालिन त्याला SMARTच्या पट्टीवर पडताळून बघा.

  • S-Specific (विशिष्ट) : उदा. MBA (Marketing)

  • M- (Measurable) (मोजमाप) : माझी नैसर्गिक क्षमता (aptitude) समजून घेणे. त्यातून आपल्या ध्येयाचे मोजमाप करणे म्हणजे सतत त्याचा आढावा घेणे. उदा. MBA प्रथम वर्ष सर्वांना सारखेच विषय असतात; पण specialization कडे वळताना जरी HR घ्यायचे ठरवले होते, तरी मला जर कायद्याचा अभ्यास करणे कंटाळवाणे वाटत असेल, तर मार्केटिंग घेतलेले बरे, हे कळणे!

  • A- Achievables : ठरवलेले ध्येय साध्य होईल ना? ते माझ्याशी संबंधित आहे ना? ते साध्य करण्याची पद्धत. प्रत्येक ध्येय हे कृतिपूर्ण राहूनच साध्य होईल.

  • R- Relevant : प्रत्येक कृती ध्येयप्राप्तीसाठी विचारपूर्वक करणे, ध्येय ठरवताना व्यावहारिक दृष्टिकोन; तसेच सद्य व सत्य परिस्थितीचे ज्ञान.

  • T. Time Bound: २०२३ ते २०२८ मध्ये MBA करून माझा व्यवसाय सुरू झालाच पाहिजे. प्रत्येक कृती करताना तारीख, वार, महिने, आणि वर्षे यांची जोड दिलीच पाहिजे. तरच ठरवलेल्या काळात आयुष्याची ध्येये आणि उद्दिष्टे साध्य होतील.

4) कृती योजना (Action Plan) : अंतिम ध्येयाचे छोट्या छोट्या ध्येयांमधे विघटन करा. त्यांनाही SMART तत्त्वावर साध्य करा.

5) प्रोत्साहित रहा (stay motivate) : स्वतःच्या प्रत्येक साध्य झालेल्या ध्येयांचे कौतुक करा. ध्येयप्राप्तीचा प्रवास सतत आनंददायी असेल याची काळजी घ्या.

6) इतरांची मदत : व्यवस्थापनशास्त्रात एक LIBK कॉन्सेप्ट असते Let It Be known! आपले ध्येय सर्वांना म्हणजेच कुटुंबीयांना, मित्रांना, व्यावसायिक सहकाऱ्यांना सांगून ठेवा, म्हणजे ते तुम्हाला आठवण करून देण्याबरोबरच मदतही करतील.

7) परिस्थितीशी जुळवून घेणे (Be adaptable) : अनेकदा ठरल्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. अदा. प्रवेश परीक्षेला नेमके आजारी पडणे, अपघात होणे किंवा उत्तम विद्यापीठात प्रवेश मिळालाय; पण भरमसाठ की भरण्याची ऐपत नसल्याने माघार. अशा अडचणींमुळे खचून न जाता पुन्हा एकदा नव्याने ध्येये आणि उ‌द्दिष्टे लिहून स्वतः प्रोत्साहित करा.

आयुष्य खूप सुंदर आहे. रोज काहीतरी नवीन आणि छानही घडत असते. त्यावर लक्ष केंद्रित करा. सुंदर आयुष्याला ध्येये आणि उद्दिष्टांची जोड दिल्यास नक्कीच आयुष्याची यशस्वी वाटचाल आपण करू शकाल. विजयी भव!

टॅग्स :saptarang