उत्तुंग झेप घेणाऱ्या महिलांची नोंद

नॉर्वेजियन नोबेल समिती कोणत्याही प्रकारची जात-पात, लिंग, देश, असा भेदभाव करत नाही. स्त्रियांच्या महान कार्याचाही विचार नोबेल समितीने केलेला दिसतो.
Dr Jyoti Dharmadhikari writes about Nobel Prize honored women
Dr Jyoti Dharmadhikari writes about Nobel Prize honored women sakal

- डॉ. ज्योती धर्माधिकारी

नोबेल, जगातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार. दरवर्षी विविध सहा शाखांमध्ये दिला जातो. मानवकल्याणकारी कार्य आणि विज्ञान वैद्यकशास्त्र यामध्ये मूलभूत संशोधन करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. एकंदर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, विश्वशांती आणि साहित्य या पाच विषयांमध्ये सुरुवातीला हा पुरस्कार दिला जात असे. १९०१ मध्ये नोबेल पुरस्कार वितरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि १९६९ च्या दरम्यान अर्थशास्त्र या विषयाचा पुरस्काराच्या यादीत समावेश कऱण्यात आला. आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे महत्त्व अर्थातच मोठे आहे. आजतागायत ९४३ पुरस्कारांचे वितरण झाले आहे. त्यापैकी ८६६ पुरुष आणि ५३ स्त्रिया आहेत. प्रतिवर्षी वरील विविध विषयांत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्तीचा पुरस्कारासाठी विचार केला जातो.

नॉर्वेजियन नोबेल समिती कोणत्याही प्रकारची जात-पात, लिंग, देश, असा भेदभाव करत नाही. स्त्रियांच्या महान कार्याचाही विचार नोबेल समितीने केलेला दिसतो. त्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र स्त्रियांनीही नोबेल पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले, अशी सकारात्मक बाजू अधिक महत्त्वाची. नोबेल पुरस्कारप्राप्त महिलांची नेत्रदीपक भरारी हा महत्त्वपूर्ण विषय या पुस्तकातून वाचकासमोर येतो. आशाराणी व्होरा यांच्या या पुस्तकाचा ‘नोबेल विजेत्या महिला’ या शीर्षकाद्वारे डॉ. विजया देशपांडे यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या स्त्रियांचा समावेश या पुस्तकात आहे. सन २००३ पर्यंत २९ महिलांना नोबेल पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचे विश्लेषण तीन भागांत केल्यामुळे पुस्तकाला नेमकेपणा येतो. या सगळ्या महिलांची गरुडझेप आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी चरित्रात्मक निबंध या पुस्तकात समाविष्ट आहेत. प्रत्येक स्त्रीची संशोधनाची कथा विलक्षण आहे. स्वत:ला सिद्ध करताना स्त्रियांना विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. स्त्रियांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या पुरस्कारामागची कहाणी ही नक्कीच पुरुषांपेक्षा भिन्न आहे. संपूर्ण वेळ आपल्या संशोधनाला किंवा कार्याला झोकून देणे स्त्रीला जमतेच असे नाही. तिची नैसर्गिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या कोणत्याही परिस्थितीत ती दुर्लक्षित करत नाही. म्हणूनच प्रत्येक स्त्री ही एक वेगळा दीपस्तंभ सिद्ध होते.

नोबेल यादीत स्त्रियांची संख्या कमी असण्याची कारणे समाजशास्त्रीय आहेत. अर्थात तुलनेने कमी असलेल्या स्त्रिया सबंध स्त्रीवर्गाचे प्रतिनिधित्व करतात. स्त्रियांची संख्या पुरेशी नाही याची खंत लेखिका आशाराणी व्होरा यांनी व्यक्त केली आहे. तर अनुवादिका आपली पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सांगतात की, ‘‘संख्येने कमी असल्या तरी हृदयात प्रेम आणि मानवकल्याणाचा ध्यास घेऊन अविरत प्रवास करणार्‍या या नोबेल विजेत्या स्त्रियांनी आपल्याला मार्ग दाखवून दिला आहे.’’ नोबेल विजेत्या स्त्रियांचे जीवन-चरित्र प्रत्येक वाचकाला प्रेरणा देणारे आहे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात साहित्यक्षेत्रातील नोबेल विजेत्या नऊ, तर दुसर्‍या भागात विश्वशांतीचा नोबेल मिळवणार्‍या अकरा महिला आहेत. त्यापैकी मूळ पुस्तकात दहा स्त्रियांचा समावेश होता. मलाला युसूफझाई या पाकिस्तानी युवतीला २०१४ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले तिचा वैशिष्टपूर्ण समावेश त्यात करण्यात आला आहे.

तत्पूर्वी आल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कार याची पूर्वपीठिका पहिल्या प्रकरणात विशद केलेली आहे. जगभरातल्या पुरस्कारांमध्ये नोबेल पुरस्कार सर्वश्रेष्ठ का ठरतो त्याची स्पष्टता या प्रकरणांमध्ये येते. आर्थिकदृष्ट्या नोबेल पुरस्काराला अत्यंत महत्त्व आहे. मात्र, त्याहीपेक्षा नोबेल पारितोषिक हे मानव कल्याणकारी संशोधक आणि कार्यकर्तृत्वाची मोहर म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या स्त्रियांमध्ये सिग्रिड अंडसेट, पर्ल, बक, नदीन गार्डीमर, टोनी मोरीसन, अशा प्रसिद्ध महिला आहेत. विश्वशांती पुरस्कारमध्ये बार्था फॉन सुटनर यांना पहिल्यांदा पुरस्कार मिळाला. त्यानंतर जेन अडम्स, एमिली ग्रीन बाल्श, बेटी विल्यम्स, मदर तेरेसा यांसारख्या अकरा स्त्रिया आहेत. विविध वैज्ञानिक क्षेत्रात काम करणार्‍या मेरी क्युरीसह आयरिन क्युरी, डोरोथी होजकिन, रोझालीन यालो, क्रिस्टीन व्होलार्द, अशा दहा उत्कृष्ट काम करणार्‍या स्त्रिया आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com