आजोळची धमाल! (डॉ. ज्योती गाजरे)

dr jyoti gajare
dr jyoti gajare

तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते. कपडे पिवळे झाले होते...

सुटी कसकशा प्रकारे घालवायची याचे बेत वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वीच घराघरात आखले जाऊ लागतात. त्याच उत्साहात वार्षिक परीक्षेचे पेपरही छानपैकी सोडवलेले असतात. मला अजूनही परीक्षांच्या आणि मे महिन्याच्या या काळात खूप छान वाटतं. बालपणीच्या आठवणी मनात ताज्या होतात.
आमचं आजोळ पनवेलला होतं. आईला पाच बहिणी आणि तीन भाऊ असं मोठं खटलं होतं. आम्हा भावंडांचा शेवटचा पेपर देऊन झाला की त्या दिवशी लगेचच दुपारच्या गाडीनं आई आम्हाला एसटीत बसवून द्यायची.

प्रवासात आमच्याकडं लक्ष द्यायला कंडक्‍टरमामांना सांगून निर्धास्त व्हायची.
पुण्याहून पनवेलला पोचायला तीन-साडेतीन तास लागायचे; पण मनानं मात्र आम्ही कधीच तिथं पोचलेलो असायचो. तिकडं पोचल्यावर काय काय मजा
करायची हे वाटेत ठरवताना वेळ मजेत जायचा. घाटात मंदिर आलं की आम्ही कंडक्‍टरमामांकडून हक्कानं पैसे मागून घेऊन ते त्या मंदिराला अर्पण करायचो! पनवेलच्या स्टॅंडवर आमचा मामा आलेला असायचा. आमची वाट बघत राहायचा. आम्ही दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद अजूनही आठवतो. त्याच्या हातात सामानाच्या पिशव्या सोपवून आमचं खास "ऍट्रॅक्‍शन' असणाऱ्या टांग्याकडं आम्ही धूम ठोकायचो. टांग्यात बसल्यावर घोड्याच्या टापांचा, त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा विशिष्ट आवाज ऐकून, आपण कुणीतरी "स्पेशल' आहोत, असं आम्हाला उगाचच वाटायचं. तेव्हाचं पनवेल खूप साधं होतं. एकदम निवांत असं खेडं होतं असं म्हटलं तरी चालेल. गरजेच्या वस्तूंची दुकानं, दवाखाने, गजबजलेला बाजार, मातीचे रस्ते, छोट्या-मोठ्या बंगल्यांसारखी छान छान घरं तेव्हा पनवेलला होती. एकदा आम्ही घरी पोचलो की आजीकडून लाड सुरू व्हायचे. दारातच आम्हाला उभं करून आधी पोळी-भाकरीचा तुकडा ओवाळून, दृष्ट काढून टाकून घरात घेतलं जाई. आम्ही सगळ्यांच्या पाया पडायचो. सगळ्यांना भेटून आमच्या आनंदाला उधाण आलेलं असायचं. आजी-आजोबा, मामा-मावश्‍या आम्हाला जवळ घेऊन आमचे लाड करायच्या. सगळ्यांच्या तोंडात एक वाक्‍य नक्की असायचं ः "किती वाळलात रे? नीट खाता-पिता की नाही?'

ही प्रेमाची वाक्‍यं ऐकून आम्हाला फार भरून यायचं. रात्रीचं जेवणखाण उरकलं की आम्ही हळूच गोठ्यात जाऊन म्हशींच्या अंगावरून हात फिरवून यायचो. आमचं आजोळचं घर भलं मोठं, चौसोपी होतं. प्रसन्न होतं. घरात चारही बाजूंनी मस्त हवा, ऊन्ह खेळत असायचं. अंगणात नाना प्रकारची फुलझाडं-फळझाडं होती. संपूर्ण घराभोवती दगडादुगडांचं ओबडधोबड; पण सारवलेलं कुंपण होतं. आजी तिचा मोकळा वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांशी गप्पा मारत कुंपणाजवळ उभी असायची. आमच्याप्रमाणे इतरही मामे-मावसभावंडं यायची. आम्ही सगळेजण मिळून आठ-10 जणं तरी नक्कीच असायचो. दंगा तर काय बघायलाच नको. पहाटे लवकर उठून व्यायाम म्हणून जवळच असणाऱ्या टेनिस क्‍लबच्या मैदानाला पळत पळत फेऱ्या मारायचो. त्यानंतर थोडी दंगा-मस्ती करून घरी यायचो. आजीचा स्वयंपाक चुलीवर असायचा. आजीच्या हातची गरमागरम धिरडी/आंबोळ्या, पोहे, फोडणीचा भात अशी कर्दळीच्या पानावरची भरपेट न्याहारी करून आवरलं की पुन्हा दंगा सुरू व्हायचा. दुपारी गरमागरम आमटी-भात, लोणची, पापड, पोळी-भाजी असा साधाच; पण रुचकर जेवणाचा थाट असायचा. मामाबरोबर शेण-गोठा करायला, अंगण झाडायला-सारवायला, झाडांची काटछाट करायला, साफसफाई करायला, गोवऱ्या थापायला, पाणी भरायला मावश्‍यांबरोबर आम्ही पुढं असायचो. दुपारच्या वेळी अंगणात झाडांच्या सावलीत कॅरम, पत्ते, साप-शिडी, लुडो, सागरगोटे, बिट्ट्या असे वेगवेगळे खेळ चालायचे. दारावर "बूढ्ढी के बाल', बिट्टी आंबे, छोटे छोटे गोड चवीचे गावठी आंबे, आईस्फ्रूट, शिंगोळे (रानमेव्यातलं एक फळ), चन्या-मन्या, विलायती चिंचा, फुगे, पिपाण्या, ताडगोळे वगैरे विकायला विक्रेते यायचे. मामा-मावश्‍यांकडून मिळालेले आणि जपून ठेवलेले पैसे त्यांना देऊन आमची ही खरेदी व्हायची. त्यात आवडी-निवडीनुसार आमचे गट पडायचे. आवडती वस्तू जास्त मिळवण्यासाठी भांडाभांडी , चकवाचकवी, पळापळी चालायची. कधीकधी घरातल्या इतर स्त्रीवर्गाबरोबर मला आणि इतर मावसबहिणींना पापड लाटायला बसवलं जायचं. पापडाच्या लाट्या खायला सगळ्यांनाच आवडायच्या. सगळी भावंडं आम्हाला बाहेरून खाणाखुणा करून जास्तीत जास्त लाट्या पळवायला सांगायची. लाटताना पापड बिघडल्याचं नाटक करून आम्ही लाट्या पाटाखाली ढकलायचो व अशा प्रकारे बऱ्याच लाट्या जमवायचो.
नंतर "बास बाई, कंटाळा आला!' असं म्हणून कुणाचं लक्ष नसताना "ते सगळे बिघडलेले पापड' अर्थात लाट्या हळूच तेलात बुडवून बाहेरच्या कंपूला आणून द्यायचो. आलटूनपालटून राखण करताना पापड, ओल्या कुरडया, बटाट्याच्या चकल्या, मिरगुंड वगैरे खायचो ते वेगळंच. आम्हा सर्व भावंडांची खूप एकी होती. कधी कुणाच्या चहाड्या आम्ही केल्या नाहीत. उलट, एकमेकांना सांभाळून घ्यायचो. त्यातच सगळ्यांचा फायदा असायचा. मौज-मजेची एकही संधी आम्ही सोडायचो नाही. एक दिवस आमचा दंगा असह्य होऊन आम्हाला मोठ्या हॉलमध्ये कोंडून ठेवण्यात आलं. "दंगा थांबला नाही तर दार उघडलं जाणार नाही', असंही दटावण्यात आलं. आम्ही आत दबकं हसत बाहेरच्या सगळ्यांची नक्कल करत बसलो. तेवढ्यात आमच्यातलं कुणाचं तरी लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचा आमचा खेळही खेळून झाला होता. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते. कपडे पिवळे झाले होते. हे सगळं शांतपणे सुरू होतं. "आम्ही इतके शांत कसे बसलो आहोत,' याचं बाहेर सगळ्यांना आश्‍चर्य वाटून त्यांना आमची दया आली. आम्ही झोपलो असू असं वाटून एका मावशीनं दार किलकिलं करून पाहिलं आणि ती एकदम ओरडली ः" अरे, हा काय गोंधळ घातलाय?'

पटापट बाहेरून हॉलची तिन्ही दारं उघडली गेली. मावशी आत यायच्या आत आम्ही हातातले आंबे घेऊन बाहेर धूम ठोकली. ती बसली आमच्या नावानं बडबडत पसारा आवरत! त्या काळी विजेचे दिवे नव्हते. कंदिलाच्या उजेडात सगळी कामं चालायची. नंतर मामा गोष्टी सांगायचा. भुताखेतांच्या गोष्टींबरोबरच सिनेमाच्याही स्टोरीज्‌ तो तोंडानं वेगवेगळे आवाज काढत अगदी रंगवून सांगायचा. मग गोष्टी ऐकत रात्री अंगणातच आम्ही झोपायचो. मोकळ्या थंड हवेत, गप्पा-गोष्टी करताना चांदण्या मोजत छान झोप लागून जायची. रोज रात्री एक गुरखा त्याची घुंगराची काठी आपटत, शिट्टी वाजवत यायचा. घराच्या कुंपणाजवळ पेंढ्यांचे भारे, चुलीसाठीचं सरपण यांचे ढीग रचलेले असायचे. त्यावर चढून तो त्याच्या हातातल्या विजेरीचा प्रकाश सगळीकडं टाकून परिसराचा आढावा घ्यायचा. त्याची फजिती करायला म्हणून आम्ही पांघरुणातूनच एकमेकांना खुणा करून वेगवेगळे आवाज काढायचो. तो गडबडीनं खाली उतरून निघून जायचा. एकदा आमचे आवाज इतके जोरात झाले की त्याची शिट्टी पिचकल्यासारखी वाजली, त्याच्या हातातली काठी, विजेरी खाली पडली आणि त्या वस्तू घ्यायला तो वाकला तर पेंढ्यांवरून पाय घसरून बिचारा जोरात पडला. आम्ही सर्वजण पांघरुणाबाहेर येऊन त्याला हसलो. त्या गुरख्यानं सकाळी येऊन त्याच्या हिंदीत आजीकडं आमची तक्रार केली. मग आजीनंही त्याला हिंदीतच उत्तर द्यायचा प्रयत्न केला! त्याला काहीच कळलं नाही. त्या दोघांचं संभाषण ऐकून पुन्हा आमची करमणूक झाली. हसून हसून मुरकुंडी वळली. तो निघून गेला. त्यानंतर आम्ही बरेच दिवस आजीचा हिंदीचा क्‍लास घेत होतो. आपल्याला काहीच जमत नाही हे बघून शेवटी तिनं "जा मेल्यांनो, मला हिंदी शिकवताय! पळा खेळायला...' असं म्हणत हातातलं लाटणं आमच्यावर उगारलं. आम्ही धूम...डबल मजा! त्यानंतर किती तरी दिवस आम्ही ते आठवून हसत होतो. रात्री आइस्क्रीमचा कार्यक्रम ठरायचा. मग दुपारपासूनच दूध उकळवून ठेवणं, सायकलवरून मामाबरोबर जाऊन बर्फाच्या लाद्या, खडेमीठ, आइस्क्रीमचा पॉट आणणं वगैरे तयारी सुरू असायची. पॉटचा दांडा हात दुखेपर्यंत फिरवून 10-12 लिटर दुधाचं आइस्क्रीम सहज केलं जायचं. सगळे जण एकमेकांना आग्रह करत आम्ही ते खायचो. त्या गुरख्यालाही आजी आग्रहानं आइस्क्रीम खायला घालायची. खूप मजा यायची. एकदा आम्ही पनवेलला गावाबाहेरच्या सुनसान थिएटर मध्ये "मेरे अपने' या सिनेमाला गेलो होतो. जातानाच लागलेल्या जोरदार पावसामुळं दुपारी तीनच्या शोसाठी निघालेल्या आम्ही सहाच्या शोला पोचलो. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे, संपूर्ण थिएटरमध्ये आम्ही तिघी, दोन डोअरकीपर आणि पुढच्या रांगेत एक माणूस एवढेच जण होतो. खूप भीती वाटत होती आणि हसायलासुद्धा येत होतं. वेगळाच थरार अनुभवून रात्रीच्या अंधारात घरी येताना रस्त्यातच आम्हाला शोधत आलेला मामा भेटला तेव्हा जरा हुश्‍श झालं. सुट्या संपत आल्यावर पनवेलहून निघताना आईबरोबर भरपूर सामान असायचं. रडवेली आई जड पावलानंच निघायची. स्टॅंडवर सोडायला मामा असायचा. आई एसटी सुटायच्या वेळी मामाच्या हातावर काही पैसे ठेवून सांगायची ः "जाताना उसाचा रस पिऊन जा, ऊन्ह फार आहे.'

- मामा "हो' म्हणायचा. गाडी दिसेनाशी होईपर्यंत आम्ही सर्वजण मामाला हात करायचो. आई मात्र डोळे पुसत शांत बसायची. एकदा तर गंमतच झाली. मी आणि थोरला भाऊ दोघंच परतीचा प्रवास करणार होतो. स्टॅंडवर मामा सोडायला आला होता.
"आता मामाला आई पैसे देते तसे पैसे द्यायला हवेत, नाहीतर मामा आईला सांगेल आणि आई ओरडेल,' असं वाटून आम्ही दोघांनी गुपचूप आमच्या सेव्हिंग्ज बॉक्‍समधले - म्हणजेच पत्र्याच्या हिंगाच्या डबीतले - पैसे गाडी सुटायच्या वेळी मामाच्या हातात दिले. मामानं विचारलंः ""हे काय?'' आम्ही म्हणालोः ""जाताना आई तुला देते ना पैसे? म्हणून आम्हीही तुला देतोय...पण आमच्याकडं एवढेच आहेत. तू जाताना नीट जा आणि उसाचा रस पिऊन जा, पत्र लिही...त्या पत्रात आमच्या खोड्या अजिबात लिहू नकोस मात्र...''

-मामाला काहीच सुचेना. त्यानं ती चिल्लर एसटीच्या खिडकीतून आम्हाला परत दिली आणि म्हणाला ः ""ठेवा परत बॉक्‍समध्ये. तुम्हीच घ्या काहीतरी छान खाऊ.'' हसत, निरोपाचा हात हलवत मामा निघून गेला. आम्ही विचारात पडलो, मामानं पैसे का घेतले नसावेत? कमी होते म्हणून का? आता सगळे ओरडणार...आम्ही खूप घाबरलो; पण नंतर बरेच दिवस काहीच घडलं नाही. मामाच्या पत्रातही याचा उल्लेख नव्हता. मग आम्ही शांत झालो.

हळूहळू आजोळच्या घरातलं वातावरण बदलत गेलं. छोट्या मावशी-मामांची लग्नं झाली. मीसुद्धा लग्न होऊन सासरी गेले आणि संसारात गुरफटले. पनवेलही खूप बदलत गेलं. बंगल्यांच्या जागी उंच इमारती उभ्या राहिल्या. घरांच्या भोवतालचे गाई-म्हशींचे गोठे गेले. रस्ते रुंद झाले. पनवेल नवी मुंबईत समाविष्ट झालं. आमच्या घराभोवतीसुद्धा मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. मग आजीनं ठरवलं की आपल्या घराचंसुद्धा नूतनीकरण करायचं. मग घराच्या जागी चारमजली इमारत उभी राहिली.
असं सगळं असलं तरी अजूनही आजोळच्या आठवणी मनाला ताज्या करतात. पहिल्या पावसाचा गारवा आणि मृद्गंध आपल्या मनाला सुखावतो, तरतरीत-टवटवीत करतो. आजोळच्या माझ्या आठवणीही अशाच आहेत...मनाला सुखावणाऱ्या, टवटवीत करणाऱ्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com