‘आरोग्य’ समाजमनाचं... (डॉ. मंदार परांजपे)

‘आरोग्य’ समाजमनाचं... (डॉ. मंदार परांजपे)

वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात, असं दिसतं! स्वतःच्या व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, प्रसंगी अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी आज चांगल्या डॉक्‍टरांना कधी नव्हे एवढी समाजाच्या विश्‍वासाची आणि सहकार्याची गरज आहे; पण निरपराध डॉक्‍टरांवर हिंसक हल्ले होत राहिले, तर हे कसं साध्य होणार?

वैद्यकीय हा एकेकाळी एक उदात्त व्यवसाय (नोबल प्रोफेशन) म्हणून ओळखला जात होता; पण आज हिंसक हल्ल्यांमुळं हतबल झालेला वैद्यकीय व्यवसाय एक नो-बल प्रोफेशन (शक्तिहीन व्यवसाय) बनला आहे. अंतिमतः रुग्णांसाठी घातक ठरणारी अशी ही वैद्यकीय व्यवसायाची दुःस्थिती का झाली आहे? गेल्या शतकापर्यंत महाराष्ट्रात संसर्गजन्य रोग, कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, अपघात, कावीळ अशा अनेक कारणांनी लोकांचे मृत्यू होत असत; पण एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला ठाणे शहरातलं एक नामवंत रुग्णालय जाळून टाकण्यात आल्यापासून सर्व मृत्यूंचं जणू एकच कारण असतं, असा समज समाजात पसरला. ‘डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा’ हे एकमेव ‘कारण’ अनेकांनी ठरवून टाकलं.

वास्तविक अकाली मृत्यू का होतात, या प्रश्‍नाच्या मुळाशी कोणीच जाऊ इच्छित नाही. काही मोजक्‍या अनुवांशिक रोगांचा अपवाद सोडला, तर बहुसंख्य रोग हे भवतालच्या परिस्थितीमुळं उद्‌भवतात. अशी स्थिती उद्‌भवण्यात धोरणकर्ते, प्रशासक यांचा मोठा वाटा असतो. नागरिकांची वर्तणूकही अनेकदा कारणीभूत असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वाट लावून प्रदूषण आणि अपघातप्रवण परिस्थिती निर्माण केली जाते. खेळण्यासाठी मोकळी मैदानं शिल्लक ठेवली जात नाहीत. भेसळ माफिया, टेकडीफोड माफिया, जंगलतोड माफिया, अतिक्रमण माफिया, हातभट्टी माफिया, नाले-बुजव माफियांच्या आरोग्यविघातक ‘उद्योगां’ना बाबुशाहीकडून (ऊर्फ खाबूशाही) संरक्षण मिळतं. नागरिकही रस्त्यात पचापचा थुंकणं, कचरा टाकणं, ठिकठिकाणी पाणी तुंबवणं, नदीत प्लॅस्टिक कॅरीबॅग्ज टाकणं, ‘बेदरकार’पणे नियम मोडत वाहनं हाकणं, हेल्मेटचा वापर टाळणं, व्यायामाचा कंटाळा करणं, व्यसनं-जागरणं-कुपथ्यं करणं अशा सवयी सोडायला तयार नसतात. १९७७ पासून ‘नसबंदी’ आणि ‘लोकसंख्या नियंत्रण’ हे शब्द बदनाम झाले आहेत. ग्रामीण विकासाच्या अपुरेपणामुळं शहरांमध्ये जनघनतेची असह्य दाटी तयार झाली आहे. या सगळ्या स्फोटक साखळी प्रक्रियेचा अपरिहार्य परिणाम म्हणून जेव्हा एखादा अकाली मृत्यू घडतो, तेव्हा त्याबद्दल गुन्हेगार कोणाला ठरवलं जातं? तर डॉक्‍टरला! जो डॉक्‍टर या साखळीची शेवटची कडी असतो आणि जो आधीच्या सगळ्या घातक कड्यांनी घडवलेल्या दुष्परिणामांशी झुंज देऊन रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्या डॉक्‍टरलाच ‘खलनायक’ ठरवलं जातं! प्रसारमाध्यमांत त्याची बदनामी केली जाते. ‘ब्लॅकमेलिंग’, खंडणीवसुली आणि हिंसक हल्ल्यांना त्याला बळी पडावं लागतं. प्रस्थापित समाजरचनेतल्या सर्व तऱ्हेच्या अन्यायांविरुद्ध जनमानसात सतत खदखदत असलेला राग काढण्याचं एक सुलभ लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) म्हणजे डॉक्‍टर!

नागरिकांनी सावध राहावं
जनमानसातल्या क्रोधाचा स्वार्थासाठी असा गैरवापर करण्यांपासून नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे. ‘स्वास्थ्य’ या शब्दातच स्वतः जबाबदारी घेण्याचं सूतोवाच आहे. एक वेळ दुसऱ्याला मारण्यासाठी ‘सुपारी’ देता येईल; पण स्वतःला जगवण्याचा ‘विडा’ आपला आपणच उचलायला हवा. स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्याची पहिली जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. ती ‘आउटसोर्स’ करता येत नाही. आगीचा बंब उपलब्ध आहे म्हणून आपण आग लावतो का? मग डॉक्‍टर उपलब्ध आहे म्हणून आपण वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याची हेळसांड करणं योग्य ठरतं का? ज्या उत्साहानं आपण ‘सेल्फी’च्या कॅमेऱ्याकडं पाहतो, त्याच उत्साहानं आपण ‘आत्मपरीक्षणा’च्या आरशातही डोकावलं पाहिजे. पण दुर्दैवानं डॉक्‍टरवर हिंसक हल्ले करण्याचा सवंग मार्ग अनेक जण पत्करतात.

सर्वोच्च न्यायालयानं ५ ऑगस्ट २००५ आणि ता. १७ फेब्रुवारी २००९ अशा दोन वेळा स्पष्ट निर्देश दिले होते, की रुग्णाचा मृत्यू झाल्यावर डॉक्‍टरांबद्दल काही तक्रार असेल, तर सरकारमान्य तज्ज्ञ समितीनं चौकशी करावी. चौकशीत डॉक्‍टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचं सकृतदर्शनी आढळले; तरच डॉक्‍टरांवर आरोप ठेवावा. घाईनं आरोप ठेवल्यास संबंधित यंत्रणेवर सर्वोच्च न्यायालय ‘सुओ मोटो’ (स्वतःहोऊन) कारवाईही करू शकतं. पण प्रत्यक्षात अनेकदा या न्यायालयीन निर्देशाची पायमल्ली करून डॉक्‍टरांना घाईघाईनं खलनायक ठरवलं जातं. वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे, हेही तितकंच खरं. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारे, व्यावसायिक अपप्रवृतींवर विनोदी टीका सादर करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात! क्ष-किरणतज्ज्ञांची संघटना व्यवसायातल्या कमिशनबाजीविरुद्ध ठराव मांडण्याचा निर्भिडपणा दाखवते. वैद्यकीय व्यवसायामधली रोगप्रतिकारकशक्ती जिवंत असल्याचीच ही सुचिन्हं आहेत.

स्वतःच्या व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, प्रसंगी अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी आज चांगल्या डॉक्‍टरांना कधी नव्हे एवढी समाजाच्या विश्‍वासाची आणि सहकार्याची गरज आहे. पण निरपराध डॉक्‍टरांवर हिंसक हल्ले होत राहिले, तर हे कसं साध्य होणार?

नाराजीचं मूळ कारण काय?
वैद्यकीय क्षेत्राविषयी नाराजी निर्माण होण्याचं एक कारण म्हणजे तपासण्यांविषयीचे गैरसमज. वैद्यकीय संशोधनातल्या प्रगतीमुळेच नवनवीन तपासण्या विकसित झाल्या आहेत. पूर्वी वरवरच्या लक्षणांमधल्या साम्यामुळं जे रोग एकसारखे वाटायचे, ते प्रत्यक्षात अगदीच वेगवेगळे असू शकतात आणि त्यांच्यावरचे उपचारही भिन्न असतात. ही रुग्णहिताची माहिती वैद्यकीय क्षेत्राला तपासण्यांमुळंच मिळाली आहे. एके काळी अनाकलनीय आणि असाध्य वाटणाऱ्या रोगांची कोडी तपासण्यांमुळं उलगडली आहेत. मात्र, तपासण्यांबाबत समाजाच्या संशयी नजरेमुळं डॉक्‍टर मात्र कोड्यात पडतात. कारण तपासण्या करायला सांगितल्या, तर ‘उगाच का सांगितल्या,’ आणि नाही सांगितल्या, तर ‘वेळीच का नाही सांगितल्या,’ असे दोन्ही बाजूंनी आरोप होतात.

वैद्यकीय उपचारांचा खर्च हा सर्वांत वादग्रस्त विषय आहे. ताज्या एमबीए किंवा बीटेक पदवीधराच्या पाऊण एक कोटीच्या पॅकेजचं रास्त कौतुक होतं. एखादा नामवंत वकील अवघी पाच मिनिटं बोलण्याचे किती लाख घेतो, याचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो; पण प्रचंड जोखमीचं आणि गुंतागुंतीचं काम करणाऱ्या डॉक्‍टरच्या फीबद्दल मात्र जनमानस नाराज असतं. वैद्यकीय सेवेसाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज आपल्या समाजाला बहुधा पटलेलीच नसावी. ‘घरगुती समारंभ’, ‘कपडे’, ‘पर्यटन’, ‘मनोरंजन’, ‘हॉटेलिंग’ यांवर खर्च करायला आनंदानं तयार होणारे लोक ‘वैद्यकीय उपचार’ हेसुद्धा संभाव्य खर्चाचं एक कारण असतं, हे मानायला राजी नसतात. रुग्णांची परिस्थिती ओळखून ज्येष्ठ नागरिकांना शुल्कामध्ये स्वतःहून सवलत देणारे, खऱ्या गरजू रुग्णांवर अत्यल्प दरात आणि क्वचित मोफतही उपचार करणारे, ‘आनंदवन’, ‘लोकबिरादरी’सारख्या समाजसेवी प्रकल्पांवर जाऊन विनामूल्य सेवा देणारे, पंढरीच्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणारे, भूकंप किंवा महापुरासारख्या आपत्तीत मदतीला धावून जाणारे अनेक चांगले डॉक्‍टर आहेत; पण रुग्णांच्या आर्थिक समस्येवर अशा डॉक्‍टरांची वैयक्तिक दानत हा काही अंतिम उपाय होऊ शकत नाही. सरकारनं आरोग्यावरची तरतूद वाढवणं हाच या समस्येवरचा खरा दूरगामी उपाय आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी (ता. १६ मार्च) संसदेत मांडलेलं नवं राष्ट्रीय आरोग्य धोरण या दृष्टीनं आशादायक आहे.

भीतीची ‘बाधा’ नको
ज्या डॉक्‍टरच्या हातात आपण आपल्या रुग्णाला सोपवतो, तोच हात भीतीनं कापत असेल, तर त्यातून रुग्णाचं भलं कसं होणार? जीवनमृत्यूच्या खेळात नियतीशी लढताना डॉक्‍टर-रुग्ण-नातलग यांची एकजूट व्हायला हवी. आपल्यावर हल्ले होणार नाहीत, याची खात्री असल्यामुळंच डॉ. प्रकाश आमटे आदिवासींवर उपचार करताना, डॉ. सुभाष मुंजे अलिबागच्या सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना आणि डॉ. हिंमतराव बावीसकर कोकणात विंचूदंशावर नवीन उपचारांचा शोध लावताना प्रयोग करू शकले. त्यामुळं हजारो रुग्णांना जीवदान मिळालं. या प्रयोगशीलतेला वाव राहायला हवा.

प्रतिकूलतेला तोंड देत भारतीय डॉक्‍टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळं भारतीयांचं सरासरी आयुर्मान आता वाढलं आहे. १९४७ मध्ये ते ३२ वर्ष होतं, आता ते ६४ वर्षांपर्यंत वाढलं आहे. अर्भक मृत्यूदर हजारी १४५ पासून ४२ पर्यंत, तर माता मृत्यूदर हजारी २० वरून २ पर्यंत खाली आला आहे. १९७५ मध्ये भारत देवीच्या रोगापासून पूर्ण मुक्त झाला; तर २०१४ मध्ये पोलिओपासून जवळजवळ मुक्त. एचआयव्हीबाधित रुग्णांना एकवेळ त्यांचे कुटुंबीय शिक्षणसंस्था, नोकरीच्या संस्था दूर लोटतील; पण भारतीय डॉक्‍टर त्यांच्यावर दुजाभाव न ठेवता उपचार करत आले आहेत. परदेशी नागरिक विश्‍वासार्ह उपचारांसाठी वाढत्या संख्येनं भारतात येऊ लागले आहेत. यकृत आणि हृदय प्रत्यारोपणही आता भारतात होऊ लागलं आहे. हे सारं काही जादूटोण्यामुळं नव्हे; तर हजारो डॉक्‍टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळं साध्य झालं आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या अपप्रवृत्तींचे एकांगी आणि अतिरंजित चित्रण थोडं बाजूला ठेवलं, तर कुणाच्याही लक्षात येईल, की सॉफ्टवेअर, अवकाशसंशोधन, शस्त्रास्त्रनिर्मितीप्रमाणंच भारतीय वैद्यकीय क्षेत्र हासुद्धा देशाचा एक मानबिंदू आहे. भारतीय वैद्यकीय व्यवसायाची ही ताकद जर नेते, प्रशासक, प्रसाममाध्यमं, नागरिक आणि मुख्य म्हणजे खुद्द डॉक्‍टरांनी ओळखली; तरच डॉक्‍टरांवरच्या हिंसक हल्ल्यांना आळा बसेल आणि वैद्यकीय व्यवसाय हा एक ‘know- बल’ प्रोफेशन ठरेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com