मळभ (डॉ. नंदा हरम)

डॉ. नंदा हरम
रविवार, 8 एप्रिल 2018

कामानिमित्त महिनाभर बाहेरगावी गेलेला माझा नवरा शेखर दोन-तीन दिवसांनी परत आला. त्याला पाहिलं आणि माझ्या मनाचा बांधच फुटला. मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. त्याला काही कळेचना. तो म्हणाला ः "मृणाल, अगं अशी काय करतेस? ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू...!''
त्याला काय सांगणार मी?

कामानिमित्त महिनाभर बाहेरगावी गेलेला माझा नवरा शेखर दोन-तीन दिवसांनी परत आला. त्याला पाहिलं आणि माझ्या मनाचा बांधच फुटला. मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. त्याला काही कळेचना. तो म्हणाला ः "मृणाल, अगं अशी काय करतेस? ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू...!''
त्याला काय सांगणार मी?

माझा रियाज चाललेला होता. माझ्या नकळत तल्लीनपणे मी गात होते. शेवटी भैरवीला सुरवात केली. "श्‍यामसुंदर मनमोहन...' आणि अचानक मी थांबले. माझे साथीदार तबलावादक प्रकाशभाऊही लगेच थांबले. खोलीत नीरव शांतता पसरली. प्रकाशभाऊ घसा खाकरून म्हणाले ः ""मृणालिनीताई...'' त्यांच्या हाकेनं मी भानावर आले आणि जाणवलं की माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत. अचानक लक्षात आलं की रियाज करत असताना हे काय घडलं? अगदी कानकोंडी अवस्था झाली. ""प्रकाशभाऊ, आलेच हं...'' असं म्हणून चटकन आत गेले.

आतल्या खोलीत जाऊन अश्रूंना आणखी वाट करून दिली. कळत नव्हतं...नेमकं काय होतंय? ज्या क्षणी मी "मनमोहन...' असं म्हटलं त्या क्षणी मोहनचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळला आणि त्याच्याच विचारात मी हरवून गेले. रियाज करताना पहिल्यांदाच माझ्या हातून असं काहीतरी घडलं होतं. लक्ष विचलित करणारं. सूर अर्ध्यावर टाकून मी उठले, याची टोचणी मनाला लागली होती. तोंडावर पाण्याचे हबके मारले, तोंड पुसलं आणि मी पुन्हा बाहेर आले.
प्रकाशभाऊ वाटच बघत होते.
ते मला म्हणाले ः ""ताई, बऱ्या आहात ना? काय होतंय?''
""बरं वाटत नाही,'' असं सांगत मी त्यांना म्हणाले ः ""आज रियाज आपण इथंच थांबवू या. मी विश्रांती घेते. पुन्हा रियाज करायचा असेल, तेव्हा बोलावेन मी तुम्हाला.''
त्यांच्या उत्तराची वाट न बघताच मी आत निघून गेले. घरात मी एकटीच होते.
शेखर - माझा नवरा - कामानिमित्त गेला महिनाभर बाहेरगावी गेला होता. मी बिछान्यावर अंग टाकलं.
डोळे पुन्हा वाहू लागले...रडू नेमकं कशाचं येतंय, हे मला कळत नव्हतं; पण मोहनच्या विचारानं आपण इतके का विचलित झालो आहोत, याचं माझं मलाच नवल वाटत होतं. खरंच...मोहन, तू अशी काय जादू केलीस की मी एवढी गुरफटत गेले? माझी आणि मोहनची ओळख केवळ गेल्या काही महिन्यांतली. लगतचा सगळा भूतकाळ फेर धरून माझ्याभोवती नाचू लागला...

मला चांगलं आठवतंय, साधारणचः सहा-सात महिन्यांपूर्वी माझा गाण्याचा कार्यक्रम झाला होता. गाणं संपल्यावर मोहन माझ्याकडं आला आणि माझ्या गाण्याची स्तुती करू लागला. आभार मानून, जुजबी बोलून मी माझ्या मार्गाला लागले. यानंतर पंधरा-एक दिवसांनीच माझा पुन्हा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर याही वेळी मोहन माझ्या जवळ आला आणि म्हणाला ः ""दीदी, मारुबिहाग तर इतका सुंदर गायलात तुम्ही...कान अगदी तृप्त झाले.''
-मी म्हटलं ः ""आपल्यासारख्या रसिकश्रोत्यांची दाद हीच आमची कमाई असते! आपली ओळख?''
""मी मोहन...'' असं म्हणत त्यानं त्याचं कार्ड माझ्या हातात ठेवलं.
पुढं काही बोलणार, तेवढ्यात इतर रसिकश्रोते तिथं आले आणि मी त्यांच्या गराड्यात अडकले.

नंतरच्याही दोन कार्यक्रमांना मोहन आला होता आणि कार्यक्रम संपल्यावर आवर्जून गाण्यातल्या आवडलेल्या जागा सांगून गेला होता. त्यानंतरचा नाशिकचा कार्यक्रम चांगलाच स्मरणात राहिला. मध्यंतराच्या वेळी समोर बघते तर मोहन माझ्याकडंच बघून हात हलवत होता. मध्यंतरानंतर कार्यक्रम खूपच रंगला. एकदा मोहन तिथं बसला आहे, हे लक्षात आल्यावर माझी नजर सारखी सारखी त्याच्याकडं वळत होती. तो गाणं ऐकण्यात कमालाचा रंगून गेला होता आणि उत्स्फूर्तपणे दाद देत होता. त्याच्या चेहऱ्यावरून कौतुक अगदी ओसंडून वाहत होतं. कार्यक्रम संपवून बाहेर पडले आणि मन अगदी नकळत त्याचा शोध घेऊ लागलं. एवढ्यात सोमनाथ - माझा ड्रायव्हर - गाडी घेऊन आला, त्यामुळं मी लगेच गाडीत बसले. मोहनची भेट न झाल्यामुळं थोडी हुरहूर लागली. थोडं अंतर पार केलं आणि अचानक गाडी आचके देऊन बंद पडली. एकतर रात्रीचे बारा वाजून गेले होते, कुठं जवळपास गॅरेज असल्याचंही दिसत नव्हतं. गाडी सुरू करण्याचे सोमनाथचे प्रयत्न सुरू होते. एवढ्यात दुरून एक मोटरसायकल येताना दिसली. ती आमच्या गाडीजवळ येऊन थांबली. हेल्मेट असल्यामुळं कोण व्यक्ती आहे, हे समजत नव्हतं; त्यामुळं मी थोडी धास्तावलेच. त्या व्यक्तीनं हेल्मेट काढलं अन्‌ बघते तर काय...चक्क मोहनच माझ्या पुढं उभा होता! मी न राहवून म्हटलं ः ""अगदी देवासारखा आलास, नाव सार्थ केलंस!''

थोडंसं बावरून तो म्हणाला ः ""काहीतरीच काय दीदी! मी तुमच्या सेवेकरिता कधीही तयार आहे.''
""काय करायचं आता?'' या माझ्या प्रश्‍नावर तो तत्परतेनं म्हणाला ः ""तुमची हरकत नसेल तर गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय ते बघू का?''
"हा कालचा मुलगा काय फॉल्ट शोधणार?' असं सोमनाथच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्याच्या नाराजीकडं दुर्लक्ष करून मी मोहनला म्हटलं ः ""बघ प्रयत्न करून.''
-मोहननं बारकाईनं निरीक्षण केलं. थोडा वेळ गेला; पण त्यानं गाडी स्टार्ट करून दिली.
-मी मनापासून त्याचे आभार मानले आणि घरी येण्याचं आमंत्रणही दिलं.
त्याला मी पत्ता सांगणार, तर तो म्हणाला ः ""दीदी, तुम्ही कुठं राहता हे सांगायची गरजच नाही. मी येईन जरूर!''
तो कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी मी घरी गेले. रियाज तर रोज सुरूच असायचा. कार्यक्रम असला की त्यानुसार वेगवेगळे राग, चीजा यांचा सराव चालायचा. अशीच एकदा रियाजाला बसले होते. त्या दिवशी चांगलाच सूर लागला होता. अगदी तल्लीन झाले होते. गाणं संपलं आणि टाळ्यांच्या आवाजानं डोळे उघडले. बघते तर मोहन उभा राहून टाळ्या वाजवत होता.
"दीदी, कमाल केलीत!' त्याचे डोळेच सांगत होते. त्या दिवसानंतर काय माहीत, असं काय घडलं... त्यानं जणू काही जादूच केली माझ्यावर. उठता-बसता त्याचाच विचार...रियाजाच्या वेळी क्वचित यायचा; पण तो असला की खूप छान वाटायचं. गाणं खुलायचं. त्यानंतरच्या जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाला त्याची हजेरी होती. हळूहळू तो माझ्याबरोबर गाडीनंच येऊ-जाऊ लागला.
प्रकाशभाऊ उगीचच अस्वस्थ होत आहेत, असं वाटायचं.
एकदा त्यांना मी हटकलंही ः ""नाही ताई, काही नाही'' असं म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली.
मला कळत नव्हतं, यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? मला त्याची सोबत आवडते, त्याच्या उपस्थितीत माझा कार्यक्रम बहरतो; यात गैर काय, तेच मला कळत नव्हतं.
पण एक मात्र खरं, की जसजसा मी त्याचा विचार करत होते; तसतशी मी त्याच्यात गुंतत जात होते. कधीही भेट झाली की गाण्याविषयीच गप्पा चालायच्या. आमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आम्ही दोघं एक अवाक्षरही कधी बोललो नव्हतो. आठेक दिवस तो भेटला नाही की बेचैनी यायची हे मात्र खरं! अचानक एक दिवस त्यानं अशी काही बातमी सांगितली, की माझं अवसानच गळालं.
माझं पोस्टिंग न्यूयॉर्कला झालं असून, कमीत कमी एक वर्षाचं प्रोजेक्‍ट असेल; पण जास्त काळही लागू शकतो,'' मोहननं माहिती दिली.

मोहननं हे सांगितल्यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला कळेनासं झालं. बातमी चांगली असली तरी आता तो दुरावणार, या कल्पनेनं मी पार गोंधळून गेले. त्याचं अभिनंदन करणं तर दूरच; पण माझेच डोळे भरून आल्याचं बघून मोहनही भांबावला. तो म्हणाला ः ""दीदी, अहो असं काय करता? मला वाटलं, तुम्हाला खूप आनंद होईल अन्‌ मला मस्त पार्टी मिळेल!''
नंतर तो दिङ्‌मूढ होऊन बघतच राहिला. माझ्या मनात आलं ः "खरंच किती भाबडा आहे मोहन...मी त्याच्यात किती गुंतलेय, याचा त्याला काही पत्ताच नाही! पण चला, एका अर्थानं हेही बरंच झालं...या कानाचं त्या कानाला कळू द्यायला नको.'
- मी सावरत म्हटलं ः ""मोहन, अरे काही नाही. तुझी मला इतकी सवय झाली आहे, की "तुझ्याशिवाय माझा कार्यक्रम' ही कल्पनाच मला सहन होत नाही.''
तो म्हणाला ः ""अहो दीदी, काहीतरीच तुमचं! तुमचे कितीतरी श्रोते आहेत. त्या असंख्य श्रोत्यांमधलाच मी एक.''
तसं पाहिलं तर तेही खरंच होतं, त्याच्या दृष्टीनं...पण माझ्यासाठी तो फक्त श्रोता नव्हता. नेमक काय नातं म्हणायचं आमच्यातलं? त्याचा सहवास मला हवाहवासा वाटतो, त्याच्याबरोबर बोलत राहावंसं वाटतं; पण नेमकं काय आवडतं? नेमकं काय वाटतं? प्रश्‍नावर प्रश्‍न...पण उत्तर सापडेना. मग वाटलं, जाऊ दे. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर मिळालंच पाहिजे, असा आग्रह का? काही प्रश्‍नं अनुत्तरितच राहावेत...नाही तरी आता तो चाललेलाच आहे...परदेशात.
माझ्या मनातलं वादळ आतल्या आत मी परतवलं. त्याचं अभिनंदन केलं. दुसऱ्या दिवशीच्या पार्टीचं निश्‍चित केलं. कारण, लगेच दोन दिवसांत तो गावाला म्हणजे नाशिकला जाऊन आई-बाबांना भेटून येणार होता. गाडी बंद पडली असताना नाशिकला तो त्या रात्री देवासारखा कसा धावून आला, त्याचा उलगडा मला आत्ता झाला. तेव्हा मी विचारच केला नव्हता. दुसऱ्या दिवशी पार्टी झाली. माझ्याच कार्यक्रमाची सीडी मी त्याला भेट दिली. त्यानं माझा निरोप घेतला.
***

वरकरणी मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न करत होते; पण आतून मात्र ढासळले होते. खूप काही गमावल्यासारखं वाटत होतं मला. कुणाशीही हे बोलता येत नव्हतं.
भूतकाळातला हा फेरफटका मारल्यावर मन थोडंसं शांत झालं. लक्षात आलं की केवळ त्याच्या सहवासाची आपल्याला सवय झाली होती. कामानिमित्त बाहेरगावी गेलेला माझा नवरा शेखर दोन-तीन दिवसांनी परत आला. त्याला पाहिलं आणि माझ्या मनाचा बांधच फुटला. मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. त्याला कळेचना. तो म्हणाला ः ""मृणाल, अगं अशी काय करतेस? ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू...!''
त्याला काय सांगणार मी?
एक खरं, शेखरच्या कुशीत मला खूप बरं वाटत होतं. त्याचा आश्‍वासक स्पर्श सुखावत होता. शेखरच्या मिठीत शिरणारी मी तीच होते. त्या भावना, त्यांची तीव्रता तीच होती. त्यात काही बदल नव्हता. एका झटक्‍यात मनावरचं मळभ निघून गेलं. आता खूप मोकळं वाटत होतं. मनाची संभ्रमावस्था दूर झाली होती.
मी सावरले. परत एकदा मी दिनक्रमात गुरफटून गेले. मनाच्या तारा परत झंकारू लागल्या आणि गळ्यातल्या सुरांनी ताल पकडला.
"श्‍यामसुंदर मनमोहन...' रियाज करताना डोळे आता हसत होते...!

Web Title: dr nanda haram write article in saptarang