क्षुद्र दगडाला देवत्व देणारा माणूस !

Inspiration
Inspirationesakal

काशिनाथ हरि मोडक (१८७१-१९१६) अर्थात् माधवानुज कवीचा जन्म सुधागड तालुक्यातील पडधवली या गावी झाला. तेथे इयत्ता चवथी पावेतो चे शिक्षण घेऊन ते पुढील शिक्षणासाठी मामाकडे रोह्याला काही काळ राहिले. त्यानंतर इंग्रजी शिक्षणासाठी ते पुणे येथे गेले. गणित विषय कठीण वाटल्याने त्यांनी बी. जे. मेडिकल स्कूल मधून हॉस्पिटल असिस्टंटची परीक्षा १८९४ साली उत्तीर्ण केली. आरंभी सरकारी नोकरी व नंतर कल्याण येथे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय त्यांनी केला. नोकरीतील दगदग अन् प्लेग मुळे होणारी धावपळ यामुळे त्याची प्रकृती बिघडली व त्यातच सन १९१६ साली दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.


त्यांचे मोठे भाऊ माधव त्यांच्या गावातील पहिले पदवीधर असून कवी ही होते. काशिनाथला बंधुंविषयी अत्यंत आदर होता, म्हणूनच त्यांनी स्वतःचे टोपण नाव माधवचा लहान भाऊ अर्थात् माधवानुज असे घेतले. कविने अनेक आंगल अन् बंगाली कवींचा अभ्यास केला. बंकिमचंद्र, टागोर, मधुसूदन यांच्या अनेक कवितांचे मराठी रूपांतर केले. कवीची कविता सुबोध व रसाळ आहे. कविने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या वेदना त्याच्या अनेक कवितांतून प्रभावीपणे मांडलेल्या दिसतात. एका कवितेत कवी लिहितो,

औते गेली, शेते गेली, बैल ही गेले मरोनी |
घरात वाजे नकारघंटा गेली शक्ति मम हरोनी ||
कामासाठी वणवण फिरतो, सोय न लागे कुठे परी |
धनिक जनाच्या जवळी जाता, टोचूनी वदती परोपरी ||

शंभराहून अधिक वर्षानंतर ही या ओळी शेतकऱ्यांच्या स्थितीला हुबेहूब लागू व्हाव्यात, ही बाब जशी कवीची प्रतिभा दाखवते तशीच किंवा त्याहूनही अधिक शासन अन् समाजव्यवस्थेची असंवेदनशीलताच दाखवते.

Inspiration
ऋतूंचे स्वप्न वसंत

आज आपण कवीच्या मूर्तिकार या स्फुट कवितेचे अवलोकन करणार आहोत. कवितेच्या आरंभी कवी वर्णन करतो की, 'एक मूर्तिकार स्वच्छंद फिरत असता, त्याला एक भव्य शिला दिसली. त्या दगडाला पाहून तो मुग्ध होऊन उभा राहिला. 'दगडाला पाहून मुग्ध होणे कल्पनाच वेगळी वाटते ना? हो पण दगडाला पाहून तोच मुग्ध होऊ शकतो, ज्याला दगडाच्या काळजात दडलेले शिल्प दिसू शकते, दिसते.
'तो त्या शिळेवर हळूहळू घाव घालू लागला. त्याच्या कुशल कारागीरीचा प्रभावातून त्या शिलेला आकार येऊ लागला.' या विषयी कवी लिहितो,

दूर सारे जै कृष्णमेघ होती | रम्य तारे चमकती नभ: प्रांती ||
शिळा शकले यापरी निघुनि गेली |
सुभग सत्वर बाहेर मूर्ति आली ||

किती सुंदर उपमा युक्त वर्णन आहे हे. ज्याप्रमाणे काळे मेघ दूर सरताच लख्ख चांदणे दिसू लागावे, तशीच त्या शिळेतील असलेली शकले दूर होताच मूर्ती बाहेर आली. कवी 'मूर्ती निर्मिली' असे म्हणत नाही, तर 'ती बाहेर आली' असे म्हणतो. याचे कारण ती मूर्ती त्या शिळेत विद्यमान होतीच, फक्त तिच्यावर दाटलेले पुट कुशलतेने बाजूला सारावयाचे होते हा एक भाग अन् मुर्तिकाराच्या मनात ती मूर्ती होतीच तीच बाहेर आली हा दुसरा भाग होय. याशिवाय मूर्तींचे पावित्र्य दाखविण्यासाठी हा अपौरुषेय भाव कवी व्यक्तवित असावा. जो त्याचा भारतीय विचारप्रणालीशी असलेला वैचारिक अनुबंध दाखवतो.

कवी म्हणतो, 'असे अद्भुत शिल्प पाहून मूर्तिकार हरखून गेला. आंनदे नाचला आणि निघून गेला.' यात कोठेही तो मूर्ती घेऊन निघून गेला, मूर्तीवर त्याने आपले नाव कोरले वगैरे असे वर्णन नाही. कारण त्याने केवळ मूर्ती कोरण्याचे नाही तर देव अवतरण्याचे महान काम केले आहे. त्यामुळेच तो निष्काम, निःस्वार्थ काम करून निघून गेला असे कवीला म्हणायचे आहे. त्यामुळेच कवी त्यास महान कार्य संबोधतो. पुढे तो लिहितो, 'त्या जागी दुसरा एक भक्त आला. त्याने ती मूर्ती स्थापून तेथे प्रशस्त मंदिर बांधले. पूर्वी जी रुपहीन शिळा होती, ती मूर्तीत बदलल्याने लोक तिला मान देऊ लागले. जी पडीत, निर्जन जमीन होती ती थोर पुण्य क्षेत्र बनली. 'जवळपास प्रत्येक महान क्षेत्राचे चित्र असेच असणार आहे. यावरून कवी सिद्धांत मांडतो,

क्षुद्र दगडा देवत्व द्यावयाचे |
असे मनुजा ! सामर्थ्य तुझे साचे !

Inspiration
सोनेरी स्वप्नं : सोन्याच्या पार्किंगची जेजुरी

मनुष्यातच ही ताकद असते की तो दगडाचा देव बनवतो. मग असे असताना 'तू असा निर्विर्य, दीन दुबळा का बनतोस. या मूर्तिकाराकडून काही शिक. तुझ्या मार्गात येणाऱ्या अडथळा रुपी दगडांना भिऊ नकोस. तर त्यातून दिव्य मूर्ती काढत जा. मग बघ तुझ्या इच्छा कशा तत्काळ पूर्ण होतात त्या. 'असे प्रतिपादन करीत या कवितेतून कवी मुर्तीकाराचे रूपक वापरत मानवाला जीवन मूर्ती घडविण्याची प्रेरणा देतो. कालौघात विस्मरण होऊ घातलेल्या माधवानुज कवीची मूर्ती उजळविण्यास त्याची ही एक कविता पुरेशी आहे.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com