माधुर्याने भरलेले रिकामे मधुघट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bha Ra Tambe

माधुर्याने भरलेले रिकामे मधुघट!

रसिका, भा रा तांब्यांच्या माधुर्याने मोहविणाऱ्या अनेक कविता आहेत. यातील बहुतेक कवितांना लता मंगेशकरांच्या मधुर स्वरांचा लाभ झाल्याने त्या आजही मराठी रसिकांच्या मनांत वास करून आहेत. या मधूर कवितांतील मधुरतम कविता म्हणजे ‘मधुघट रिकामे पडती घरी’ होय. भा रा तांब्यांच्या कवितांची निर्मिती ही बहराप्रमाणे होत असे. ज्यावेळी बहर येई त्यावेळी एकेका दिवशी शंभर शंभर कविता मनांत रुंजी घालतात अशी दस्तुरखुदद कविची साक्ष आहे.

१९२९ नंतर तांब्यांची प्रतिभा मौन झाली होती. सुमारे चार वर्षे तांब्यांनी एकही गीत रचले नव्हते. पण सन् १९३३ साली तांब्यांना भेटायला भवानीशंकर पंडित तांब्यांचे मामेभाऊ विसूभाऊ डोगरे सोबत गेले होते. त्यांनी कविराजाला चटकदार गीत ऐकवावे अशी विनंती केली त्यावेळी तांबे उत्तरले, ‘’तुम्हाला चटकदार गीत हवं काय? पण आता माझे ते दिवस राहिले नाहीत.’’ असे सांगत तांब्यांनी, त्यांना आलेले त्याच आशयाचे मायदेवांचे पत्र वाचायला घेतले. मायदेव तांब्यांना लिहितात, ‘’dear Mr Tambey, we ever held you as ‘our poet’ and not to as philospopher. But from your recent pieces, you seem to have become a philosopher.’ त्यापत्राला उत्तर देताना तांब्यांनी लिहिले होते, ‘’ Dear friend of mine! You demand honey from me; but, its vessels are lying empty at my home.’’ भवानीशंकर लिहितात हे उत्तर वाचून दाखवता दाखवता कविराजांनी गीत आळविण्यास आरंभ केला.

हेही वाचा: फिरूनी नवी जन्मेन मी !

मधु मागसि माझ्या सख्या ! परी

मधु घटचि रिकामे पडती घरी

आजवरि कमळाच्या द्रोणीं

मधु पाजिला तुला भरोनी

सेवा ही पूर्वीची स्मरोनी

रोष न सखया ! दया करी !

हे वाचताना कविच्या मनातील करुणभाव चटकन ध्यानात येतो. आपण रसिकांना दिलेली आजवरची गीतरचना हा त्याच्यावर केलेला उपकार नाही तर सेवा आहे. ती आपण आता देऊ शकत नसल्याने वाटणारी खंत 'दया करी ' म्हणत कवि व्यक्त करतो. मजेदार गोष्ट अशी की, 'तांबे तत्कालीन समाजबंधनांमुळे मोकळेपणाने भाष्य करु शकत नाही' अशा आशयाचे प्रतिपादन करताना पु. ल. त्यांच्या अवखळ शैलीत म्हणाले होते कि, ‘कमळाचे द्रोण भरुन कुणी कधी मध पित असतो का? ‘ येथे त्यांना समाजबंधन तोडणारे केशवसूत अपेक्षित होते. पण तांबे मूळातच धर्मश्रध्द आहेत. त्यामुळे तत्कालीन अनेक कुप्रथांवर प्रहार करतानाचा त्यांचा अभिनिवेश निश्चितच वेगळा आहे. तांबेच नाहीत तर हरिवंशराय बच्चन सुध्दा आपल्या कवितेला मधुचीच उपमा देतात. येथे भेद एवढाच की बच्चनांना मधु म्हणजे मद्य म्हणायचे आहे. अर्थात् बच्चनांनाही मद्य म्हणजे केवळ दारु एवढेच अपेक्षित नाही. म्हणून तर काही ठिकाणी भारतमातेला तर दोन ठिकाणी चक्क यमाला ते मधुशालेची उपमा देताना आधळतात. थोडक्यात कविने वापरलेल्या प्रतीकांचा विचार आपल्याला कवीच्याच दृष्टीतून करावा लागतो. तांब्यांना मधच अपेक्षित आहे कारण त्यात केवळ मद नाही, मधाहोशी नाही तर निखळ माधुर्य आहे, संसाराचे मर्म आहे.

पंडित लिहितात हे कडवे म्हणताना, त्यातील प्रत्येक ओळीवर, ओळीतील प्रत्येक शब्दावर, त्यामागे दडलेल्या सूचकतेवर तांबे इंग्रजीत रसाळ भाष्य करीत होते. आणि अचानकपणे ते उद्गारले, ‘’ हो! मला आता फिलॉसॉफर झालेच पाहिजे. Poetry is like honey and philosophy is like milk. I must now offer a can of milk to that Almighty.’’ आपल्या या विचारांना काव्यरुप देताना कवि,

नैवेद्याची एकच वाटी

अता दुधाची माझ्या गाठीं;

देवपूजेस्तव ही कोरांटी

बाळगी अंगणी कशी तरी

यातील भाव कविला वाटणारी स्वतःची निरुपयोगिता दाखवतानाच, त्यातील पावित्र्य ही अधोरेखित करत जातो. कविला वाटते, 'रसिकाला, प्रणयाचे गीत हवे, त्यात तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज हवी, वृक्ष झऱ्यांचे गूढ गुंजन हवे, संसाराचे मर्म हवे.' पण आता नवीन काही देता यावे, असे आपल्यात काहीच उरले नाही. हे सांगताना सुस्कारा सोडत कविने खोल आवाजात आर्ततेने विनविले,

मधु पिळण्या परि रे बळ न करी !

स्वतःला वाटणारी खंत अधिकच स्पष्ट करीत, आपली असमर्थता दाखविताना कवि गातो,

ढळला रे ढळला दिन सखया !

संध्याछाया भिवविति हृदया,

अता मधुचे नांव कासया?

लागले नेत्र रे पैलतिरी

यावर भाष्य करताना राजकवि पंडितांना म्हणाले, ‘’ Dear friends ! my day is done. Now I have grown an old man. The Death is approaching me. I am now eager to start for that distant World. Why should you now ask for मधु?’’

हेही वाचा: सोनेरी स्वप्नं : तीन रुपयांची गारीगार !

रसिका, जीवनाची संध्याकाळ आली हे सूचित करताना तांबे ढळला रे ढळला दिन सखया म्हणत जो आर्त स्वर लावतात. तो रसिक हृदयाला भेदून जातो. हे गीत वाचताना वाटते जर त्याकाळी आजच्या इतके तंत्रज्ञान विकसित असते तर तांब्यांच्या साभिनय भाष्यासह ही कविता जगाला लाभली असती. तो खरोखरच अद्भूत योग ठरला असता.

येथे हे विसरता कामा नये कि, आरंभी मायदेवांनी कविता संग्रह प्रकाशित करण्याचा ठरवला होता. त्यामुळे १९२० साली तांब्यांच्या प्रतिभेला बहर आला होता. आणि १९३३ साली त्यांनी तांब्याना लिहिलेल्या पत्रामुळेच रसिकांना रिकाम्या मधुघटाची मधूरतम मेजवानी मिळाली. या काव्याची हृदयंगमता, माधुर्य, प्रासादिकता, कवीचा स्वत:च्या जीवनाकडे पाहण्याचा वास्तववादी दृष्टिकोन रसिकाला ही थिजवून जातो. योगायोग म्हणजे या कवितेनंतर ही तांब्यांनी सुमारे ४७ कविता लिहिल्या. जणु कवीला रिकाम्या वाटणाऱ्या मधुघटात शिल्लक राहीलेले अमृतोपम मधुच बाहेर निघाले. ज्यामुळे मराठीचे काव्यजीवन अधिकच समृध्द झाले.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Dr Neeraj Deo Writes Saptarang Article On Marathi Poetry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Poetrysaptarang
go to top