सुन्नतेतील विकल समाधान : 'राजहंस माझा निजला!'

Ram Ganesh Gadkari
Ram Ganesh Gadkariesakal

गोविंदाग्रजांची प्रतिभेची भरारी उत्तुंग होती. ती दुःखाला, वेदनेला चटकन स्पर्श करी. त्यामुळे ती केवळ वरवरच्या शोकात न रमता वेदनेचे अंतरंग जाणत असे. त्यामुळेच त्यापल्याड जावून दुःखिताचे मनोभाव उलगडून दाखवू शके. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवीची ‘राजहंस माझा निजला !’ ही विख्यात कविता होय. कवितेच्या आरंभी दिलेल्या टिपणीत कवी लिहितो, "पती निधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही?" बघ रसिका, आपल्या टिपेतच कवी वरवरच्या शोकात न गुरफटता भावनिक अंतरंगाकडे वळताना दिसतो. याच सुत्राला धरून तो धृपदात म्हणतो,
हे कोण बोलले बोला?

'राजहंस माझा निजला !
दुर्दैवनगाच्या शिखरी | नवविधवा दुःखी आई !
तें हृदय कसे आईचें | मी उगाच सांगत नाहीं !
जे आनंदही रडते | दुःखांत कसें मग होई -
हे कुणी कुणा सांगावें !
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गावां जावें -मग ऐकावें या बोला | 'राजहंस माझा निजला !'
कवितेचा आरंभ ‘हे कोण बोलले बोला’ या शब्दांनी होतो नि ती अभागी आई चटकन त्यांना उत्तर देते, ‘राजहंस माझा निजला !’ तिच्या उत्तरावरुन लक्षात येते की कोणीतरी तिच्या बाळाविषयी अभद्र, अमंगल काहीतरी बोलतय. कविने ते खुबीने अर्धे लपवत मांडले आहे. पुढे कवी म्हणतो, 'दुर्दैव रुपी पहाडाच्या शिखरावर नवविधवा दुःखी आई आहे.' यातील एकेक शब्द मोलाचा आहे. आजही आपल्याकडे वैधव्य शाप समजले जाते. त्यातील व्यथा ती दुःखिताच जाणे. त्यातही नुकतेच आलेले वैधव्य असेल तर ते मनाला अधिकच डाचते. त्यात त्या नवविधवेचे दूध पिते एकलुते एक बाळ वारले तर? नुसती कल्पनाच ऊर फाडून टाकणारी अन् ती घटना १०० वर्षांपूर्वी घडलेली असेल तर तिची तीव्रता कल्पनेच्या पलीकडची होय. म्हणूनच या घटनेचे वर्णन करताना कवी दुर्दैव रुपी पर्वताचे शिखर अर्थात् दुर्दैवाचा कळस असे त्या घटनेचे वर्णन करतो. आईचे हृदय सुखातही अश्रूंनी भरून येते मग दुःखात ते कसे होईल? असे सांगत कवी विचारतो, ‘हे आईच्या बाळालाच ठाऊक असते. अर्थात् आईचे ममत्व स्मरणाऱ्या प्रत्येकालाच ज्ञात असते.’

Ram Ganesh Gadkari
स्त्रीजन्मा म्हणुनी न व्हावे उदास

त्या नवविधवा आईच्या मांडीवर तिचे एकुलते एक दूध पिते मूल मरून पडले आहे. त्या अतीव शोकाच्या धक्क्याने तिचे हृदय बधिर झाले, तिच्या भावना थिजून गेल्या, आपल्या मलूल होऊन पडलेल्या चिमुकल्याला पाहून तिला वाटले. 'हे मूल मेलेले नाही, तर केवळ झोपलेले आहे.' म्हणून ती साऱ्यांना सांगते, 'राजहंस माझा निजला!'
तिच्या भोवती चार लोक त्या मृत बाळाला उचलायला गोळा झाले. ते पाहताच तिला पती निधनाची वेळ आठवली. तो पहिला अन् हा दूसरा असे दोन्ही प्रसंग काळीज पिळवटून टाकणारे एकाच वेळी आठवले. याचे वर्णन करताना कवी अत्यंत सूचकपणे म्हणतो,
ते चित्र दिसे चित्ताला !
हे चित्र दिसे डोळ्यांला !
निज चित्र चित्तनयनाला !
पुत्र निधनाचे चित्र तिच्या डोळ्यांना दिसत होते तर पती निधनाचे चित्र मनाला दिसत होते आणि त्यामुळे तिची झालेली जीवंमृत अवस्था तिला दिसत होती. त्यामुळे ती रडत रडत सर्वांना वारंवार सांगू लागली, ' माझा राजहंस केवळ झोपलाय.'

अन् जमलेल्यांना ती विनवून म्हणू लागली, 'कोणी गलबला करू नका. माझ्या बाळाला आधीच झोप नसते. सारखा खेळाचा चाळा चालतो. आताच कुठेशी झोप लागली तोच तुम्ही आलात. कोणी पाऊल ही वाजवू नका त्याला चाहूल लागली तर तो उठून बसेल, मग पुन्हा झोपणार नाही. तो आताच कोठेसे थोडेसे दूध पिऊन झोपला. त्याच्या डोळ्याला डोळा लागतो न लागतो तोच तुम्ही जमलात. मी तुम्हाला चांगलेच ओळखते. मागे माझा हिरा तुम्ही नेलात आणि आता या हिरकणीस न्यायला टपलात. पण यावेळी मी हे होऊ देणार नाही. याला माझ्या जीवा पलिकडे लपवीन.' आपल्या बाळाला ते मेलेले म्हणतात हे तिला सहन होत नाही म्हणून ती राग मिश्रीत काकुळतीने विचारते, 'माझ्या बाळा विषयी का असे अमंगळ, भलते सलते बोलताय? मी माझ्या छबकड्यावरून सारे ओवाळून टाकीन. तुमची नजर लागू नाही म्हणून त्याला माझ्या पदराखाली घेते. मी कितीही गरीब असले, माझे नशीब जरी फुटके असले तरी हे असे अमंगळ बोलणे मी खपवून घेणार नाही. 'इथे ती दुर्भागी आई आपले मूल मेले हे साफ नाकारते. मानसशास्त्रच्या दृष्टीने याला denial अर्थात् नाकारणे म्हणतात. अत्यंत तीव्र आघातात हे घडून येते. कवी ते अचूक टिपतो हेच त्याचे मोठेपण आहे.

Ram Ganesh Gadkari
क्रांतिकारक विचारवंत

पुढे ती म्हणते, 'पूर्वी असेच सांगून माझा जीवाचा राजा तुम्ही असाच नेला होतात. त्याला पुन्हा दाखवला ही नाही. आणि आता या राजस राजहंसाला न्यायला आलात. तुम्हाला याची लाज ही वाटत नाही का? हा कोणत्या जन्मीचा दावा तुम्ही साधताय? मी गरीब आहे म्हणून माझा गळा का कापताय ?' नीट बघितले तर कोणी मेल्यावर नेण्यासाठी जमलेल्यांचा काहीच दोष नसतो. पण येथे ती आई आपल्या बाळाचा मृत्यूच स्वीकारत नसल्याने जमलेल्यांचा दोष देते. कविने येथे ती केवळ मूल मेल्याने शोक करताना दाखविली असती तर करुण भाव उत्पन्न झाला असता पण त्यात ही कविता वाचताना वाचकाची जी घालमेल होते, आईचे पुढे कसे होणार हा भाव उभा राहतो तो उभा राहिलाच नसता.
पुढे ती त्यांना सांगू लागते, 'याचे डोक्यावर उडणारे काळे कुरळे केस पहा, माझ्याकडे पाहत असलेली ही दृष्टी पहा, कानातील नाचते डुल पहा, तोंडावरचे हास्य पहा, तो अर्ध्या झाकल्या डोळ्यांनी मला पाहतो, अर्ध्या उघड्या तोंडाने बोलतो, हसतो तुम्हाला कळत नसले तरी मला सगळे कळते. 'हे वाचताना वाचक विव्हळ होतो, तिची अवस्था पाहून तीळ तीळ तुटतो. त्याच वेळी ती हतभागी आई सांगू लागते, 'माझ्या मनाच्या मानस सरोवरात हा राजहंस पोहत रहातो, सारखा पोहून तो दमला, भुकेला झाला. त्याला माझ्या डोळ्यांच्या शिंपामधून अश्रू रुपी मोती मी त्याला देतेय.'
रसिका! कवीच्या या ओळी आईचे हृदगत चपखल दाखवणाऱ्या आहेत. यातील खालील ओळी बघ एकदा,

नयनांच्या शिंपांमधुनी,
अश्रूंचे मौक्तीकसुमनी,
मी दिले तया काढोनी
मोत्यांचा चारा असला

ती अभागी आई त्या चिमुकल्याला राजहंस म्हणते, राजहंसाला खाण्यासाठी मोती लागतात, ही वाब ध्यानांत घेतली तर कवीची अश्रूरुपी मोती ही कल्पना शोकातही मोहक वाटते.

आपली कैफीयत मांडताना ती हतभागी सांगू लागली, ‘ते वैकुंठाला गेले, त्यांच्या चरणी वहायला मी माझ्या बाळाला उराशी धरुन अखंड अश्रूंची मोहनमाळा गुंफीत आहे. हा माझा बाळ म्हणजे त्या माळेमधील कौस्तुभ मणीच होय तो चोरायला तुम्ही आलात.‘ यातील एकेक कल्पना तिच्या त्या बाळाभोवती, तिच्या मृत पती विषयीच्या उत्कट भावनाच दाखवत जातात.

अचानक ती पुसते, ‘तुम्ही म्हणता तसेच झाले असेल तर देवच निजला असे म्हणावे लागेल. तो जरी निर्दय होऊन निजला, तरी मी टाहो फोडून त्याला आळवीन अन् सांगेल, ‘की असा पोटचा गोळा । पोटांतचि देवा राहो!’ ती जेंव्हा असे म्हणते तेंव्हा ह्रदय पिळवटून निघते मग पुन्हा आविर्भाव बदलून ती म्हणते, ‘यमाचे दूत जरी माझ्या बाळाला न्यायला आले, जरी ते कितीही निष्ठूर असले तरी ते याला पाहून भूलतील, त्यांच्याही हृदयाचे पाणी होऊन ते ही याला स्नेहभराने चुंबतील.’ असे म्हणत तीच आपल्या मृत बाळाला चुंबते. त्यावेळी जमलेले सारे शोकभराने माना खाली घालतात त्यांचा तो व्यवहार पाहून आपले बाळ मेले नसून जिवंत आहे हा त्या अभागी आईचा भ्रम तुटतो. कवितेची खुबी अशी की ‘ते बाळ मेले आहे’ हे कोणीतरी दूसरे त्या आईला समजावतेय, असे कवी दाखवत नाही तर तिचा तो विकल तरीही उत्कट भ्रम मोडायची कोणी हिंमत करत नाही. असे सदय चित्र या निर्दय प्रसंगी कवी रेखाटतो. तो भ्रम जेंव्हा ती मृत बाळाचे चुंबन घेते तेंव्हा टोकाला पोहोचतो आणि तेथे जमलेले सदय दुःखाने हळहळत माना खाली घालतात नि त्या आईचा भ्रम आपोआप तुटतो असे उच्च मनो सामाजिक भावना विकासाचे विलोभनीय चित्र कवी रेखाटतो त्यावेळी कविच्या प्रतिभेला सुज्ञ वाचक मनोमन नमन करतो.

Ram Ganesh Gadkari
सूर निरागस हो!

तो भ्रम तुटताच ती अभागी; शोकाचे संयत तरीही निश्चयी स्वरुप दाखवत म्हणते, ‘जरी घडू नये ते घडले तरी मी याला सोडणार नाही. ज्याला पाळणाही रुततो त्याचा देह दगडात ? छेः छे; !! मूळीच नाही ! मी माझ्या हृदयाची खांच करीन, त्यावर माझ्या दुःखाचे दगड रचून बाळाला झाकून टाकीन. काळाचाही काळ आला तरी मी बाळाला देणार नाही. युगानुयुगे गाणे गात याला निजवून ठेवीन. कोणीही येथे थांबू नका. माझ्या प्राणांचे जाळे पसरुन, मी याला घेऊन निजणार आहे.‘ असे सांगत उराशी मृत बाळ घेऊन, पुन्हा त्याचे चुंवन घेत ती तिथेच निजली. ती अशी निजली की पुन्हा उठलीच नाही.

पतीनिधनानंतर काही महिन्यातच बाळाचा मृत्यु झाल्याने ती आई भ्रमित होऊन ‘राजहंस माझा निजला !’ सगळ्यांना सांगते तेंव्हा ते वाचताना वाचकाच्या हृदयाची कालवाकालव होत रहाते. या अभागी नवविधवा मातेचे कसे व्हावे ? या विचारांनी ऊर भरुन येतो, मन सुन्न होते ! पण कवितेच्या अंती आईही त्या मृत बाळासोबतच नैसर्गिकतेने मरण पावते हे वाचल्यावर त्या भयाण सुन्नपणातही कोठेतरी ‘एकदाची सुटली बिच्चारी !’ चा विकल दिलासा संत्रस्त वाचकाच्या हृदयाला मिळतो.
ही कविता गोविंदाग्रजांनी प्रतिभेच्या विलक्षण क्षणी; केवळ ४५ मिनिटात स्वतःला एका खोलीत कोंडून घेत लिहिली. ती प्रकाशित झाल्यावर वाचकांच्या एवढी पसंतीस पडली की, मराठी रसिकांनी गोविंदाग्रजास त्या क्षणापासून मस्तकावर असे धारण केले की शतकानंतरही उतरवले नाही.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com