शाश्वत शेतीसाठी सूक्ष्मजीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture microorganisms

तांदूळ, गहू, मका, डाळी आणि ताग ही आपल्याकडील सर्वाधिक प्रचलित आणि लाभ देणारी पिकं आहेत.

शाश्वत शेतीसाठी सूक्ष्मजीव

- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com

कृषिप्रधान आपल्या देशात जवळजवळ ५६ टक्के इतकं कार्यबल शेती व अन्य सहयोगी क्षेत्रांत सहभागी आहे. अशा परिस्थितीत शेतीतून अधिकाधिक उत्पन्न व त्यासाठी लागणारी साधनं विकसित करणे व विविध प्रयोगांद्वारे कार्यक्षमता व परिणामकारकता वाढवणे हे गरजेचं झाले आहे. शेतीविषयक विविध पैलूंवर कायम संशोधन चालू असतं. यासाठी देशभर कृषी विद्यापीठं व कृषी महाविद्यालय, तसंच अनेक संशोधन संस्था व केंद्र आहेत.

तांदूळ, गहू, मका, डाळी आणि ताग ही आपल्याकडील सर्वाधिक प्रचलित आणि लाभ देणारी पिकं आहेत. या सर्वांसाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माती अर्थात जमीन. चांगली कसदार जमीनच चांगलं पीक देऊ शकते.

मातीत सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. म्हणजेच जिवाणू, विषाणू, प्रोटोझोआ, बुरशी आणि शेवाळांचे प्रकार. कुठल्या जमिनीत कुठल्या प्रकारचे सूक्ष्मजीव सापडतात, हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. यात जमिनीची आम्लता, तापमान, ओलावा, सेंद्रिय पदार्थ इत्यादींचा समावेश असतो. जमिनीच्या वरील स्तरात जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव आढळतात व त्यांत विविधताही अधिक असते. ज्या मातीत प्राणवायू अधिक असतो, तेथेही सूक्ष्मजीव जास्त असतात. प्राणवायूची कमतरता सूक्ष्मजीवांची मात्रा व विविधता दोन्ही कमी करते. मातीतील सूक्ष्म जीवाणूंमध्ये हवामान व ऋतूप्रमाणे बदल झालेला आढळतो. सूक्ष्मजीव या बदलांशी पटकन जुळवून घेतात व भौगोलिक स्थानाप्रमाणे त्यांच्यात बदल झालेला दिसतो.

मातीतील सूक्ष्मजीवांचा अभ्यास त्यांची पर्यावरणातील भूमिका समजण्यास साहाय्यक ठरतो. हे सूक्ष्मजीव कार्बन आणि अन्य खनिजांचा पुनर्वापर करण्यात साहाय्य करतात, ज्यामुळे मातीची उत्पादकता वाढते. या सूक्ष्मजीवांवर हवामान तसंच रासायनिक खतं व कीटकनाशकांचा परिणाम होतो. कृषी उत्पादन वाढवणं हे आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात खूप मोठं आव्हान आहे. सूक्ष्मजीवांचं विश्लेषण करून मातीची गुणवत्ता तपासता येते. अन्नसुरक्षा आणि अन्नसुरक्षितता यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

एखाद्या जमिनीवर असलेली झाडं, वृक्ष, वेली, झुडुपं त्यांच्या आजूबाजूला कुठल्या प्रकारचे सूक्ष्मजीव असतील हे ठरवतात. झाडांमधून बाहेर पडणारे स्राव सूक्ष्मजीव स्वतःचं पोषण म्हणून वापरतात आणि म्हणूनच झाडाच्या सभोवतालच्या मातीत (Rhizosphere) सूक्ष्मजीवांची संख्या अधिक असते. जसं झाडापासून अंतर वाढतं, तसतशी सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. या रायजोस्पियरमधील सूक्ष्मजीवांचं झाडांबरोबर तसंच एकमेकांना पूरक कार्य चालू असतं.

मातीतले हे सूक्ष्मजीव विविध सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं काम करतात. यात झाडांची पानं, शेणखत, सेंद्रिय खतं, मृत कीटक आणि प्राणी यांचा मुख्यत्वेकरून समावेश असतो. सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव हे एकत्रित कार्य करत असतात. सूक्ष्मजीवांच्या या क्रियेमुळे मातीची रचना बदलत असते. यात प्रामुख्याने खनिजीकरण, नायट्रीफिकेशन, फास्फेटचं विद्राव्यीकरण (Solubilisation) व नायट्रोजनचं स्थिरीकरण (Fixation) या क्रिया होतात. तसंच यामुळे मातीची आम्लता बदलते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता बदलते व सूक्ष्मजीवांनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे झाडावर रोग पसरवणाऱ्या अनेक जिवाणूंचाही नाश होतो. एखादी जमीन चांगली किंवा कसदार असण्याचा अर्थ त्यात किती आणि किती प्रकारचे फायदेशीर जिवाणू आहेत असा असतो.

झाडांची वाढ करणारे जिवाणू (Plant Growth Promoting Rhizobacteria) हा विशिष्ट प्रकारच्या प्रकारच्या जिवाणूंचा समूह असतो, ज्यांच्या विविध क्रियांमुळे झाडांच्या वाढीसाठी मदत मिळते. या जिवाणूंपासून तयार केलेलं जैविक खत वापरल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अत्यंत गुंतागुंतीची क्रिया करणारे असंख्य सूक्ष्मजीव हे वेगवेगळ्या झाडांवर आणि झाडांच्या विविध भागांवर असतात. प्रत्येक झाडावर आढळणारे सूक्ष्मजीव हे त्या झाडाचं वैशिष्ट्य असतं. जैविक आणि अजैविक घटकांचा झाड आणि सूक्ष्मजीव यांच्या परस्पर सहयोगावर परिणाम होतो.

हे सूक्ष्मजीव झाडांच्या पृष्ठभागावर (epiphytes) किंवा त्यांच्या आतील भागात (endophytes) अधिवास करतात. झाडात मुख्यत्वे आजूबाजूच्या मातीतून मुळांद्वारे सूक्ष्मजीव प्रवेश करतात. झाडाच्या विविध भागांत हे सूक्ष्मजीव स्थिरावतात व कार्य सुरू करतात. यातील काही जिवाणू जैविक नियंत्रण करू शकतात / करतात. हे मुख्यत्वेकरून संप्रेरकांची पातळी आणि झाडांची प्रतिकारशक्ती सुधारण्याद्वारे केलं जातं. झाडांच्या सभोवतालच्या मातीतील सूक्ष्मजीवांमध्ये काही बदल करून कीड व रोगांवर नियंत्रण, रासायनिक खतांचा वापर कमी करणं, तसंच रासायनिक कीटकनाशकांचा वापरही कमी केला जाऊ शकतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे उत्पादकता वाढवणं.

या अभ्यासातला एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे कुठलंही झाड, वृक्ष, पीक हे कधीच वेगळं काढलेलं म्हणून जगू शकत नाही, वाढू शकत नाही, तर ते सूक्ष्मजीवांच्या साह्याने एक परिपूर्ण प्रणाली म्हणून वाढतं. एखाद्या झाडाच्या आजूबाजूच्या मातीत कुठले सूक्ष्मजीव आहेत, त्यांची काय वैशिष्ट्यं आहेत, तसंच त्या झाडाला त्यांचा काय उपयोग आहे व ही परिणामकारकता कशी वाढवता येईल, हे सर्व प्रयोगशाळेत तपासता येतं. या वेगळ्या प्रयोगशाळा असतात व तेथील चाचण्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो. शेती उत्पादनवाढीसाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग, तसंच त्यांच्यामुळे होणारे रोग, उपाय, पिकांमध्ये जनुकीय बदल व त्यामुळे मिळालेले लाभ पुढील लेखात.

(लेखिका महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

टॅग्स :agriculturesaptarang