‘लॅब’चे लाभ!

लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया अनेक प्रकारच्या किण्वनप्रक्रियांमध्ये (फर्मेंटेशन) महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
lactic acid bacteria
lactic acid bacteriasakal
Summary

लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया अनेक प्रकारच्या किण्वनप्रक्रियांमध्ये (फर्मेंटेशन) महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com

लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया (लॅब) म्हणजेच अगणित जिवाणूवंशांपैकी एक. ते जर आपण आपल्या पचनसंस्थेत राखले तर आपल्याला अनेकानेक लाभ मिळू शकतात, अगदी चांगल्या पचनक्रियेपासून ते लांबवलेल्या वृद्धत्वापर्यंत. यात प्रामुख्यानं अन्नाचं पोषणमूल्य वाढवणं, पचनसंस्थेतील अपायकारक जिवाणूंचा संसर्ग रोखणं, दुग्धशर्करा अर्थात् लॅक्टोजचं पचन सुधारणं, काही प्रकारच्या कर्करोगांचा अवरोध करणं आणि रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करणं यांचा समावेश आहे.

या जिवाणूंच्या चयापचयाच्या प्रक्रियेत लॅक्टिक ॲसिड तयार केलं जातं, तसंच यांच्यापैकी काही लॅक्टिक ॲसिडबरोबरच कार्बन डाय-ऑक्साईडही तयार करतात. या जिवाणूंचे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत.

लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया अनेक प्रकारच्या किण्वनप्रक्रियांमध्ये (फर्मेंटेशन) महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कर्बोदकांचं लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर करण्याबरोबरच प्रथिनांचं आणि स्निग्धांचं (लिपिड) विघटन, तसंच विविध प्रकारचे मद्यार्क (अल्कोहोल) आयडी हाईड ॲसिड, ईस्टर आणि गंधक (सल्फर) असलेल्या विशिष्ट संयुगांची (कंपाउंड्स) निर्मिती हे या जिवाणूंचं वैशिष्ट्य. यांपैकी अनेकांचा उपयोग दैनंदिन जीवनात विविध प्रकारे होऊ शकतो.

लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरियाचा प्रामुख्यानं उपयोग किण्वनप्रक्रियेचे प्राथमिक जिवाणू म्हणून अनेक अन्नपदार्थांमध्ये करण्यात येतो. यांत दही, योगर्ट आणि किण्वनप्रक्रिया केलेले दुधाचे विविध प्रकार, मांस, मासे, फळं, भाज्या आणि धान्याचे आंबवून केलेले प्रकार यांचा समावेश आहे. हे वाचल्यावर इडली, डोसा असे परिचयाचे खाद्यपदार्थ आपल्या डोळ्यांसमोर लगेचच येतील.

किण्वनप्रक्रियेबरोबरच अन्नपदार्थांचे स्वाद, पोत आणि पोषणमूल्य वाढवण्यात या जिवाणूंचा सहभाग असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, चीज ‘परिपक्व’ करणं, दह्याचा किंवा योगर्टचा पोत सुधारणं, तसंच वाईन तयार होताना तिला विशिष्ट वास व चव प्रदान करणं. कुठल्या प्रकारचे जिवाणू यांत वापरले गेले आहेत त्यावरून पदार्थाचं रंग-रूप निर्माण होतं.

काही लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया हे बॅक्टेरियोसिन नावाचा पदार्थ तयार करतात. हा पदार्थ अन्य जिवाणूंची वाढ रोखू शकतो किंवा त्यांना मारू शकतो. बॅक्टेरियोसिनचा उपयोग अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आणि अन्नात अपायकारक जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी केला जातो. लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया हे बुरशीरोधक म्हणूनही काम करतात. बुरशीपासून तयार होणाऱ्या विषजन्य पदार्थांचा परिणाम या जिवाणूंमुळे बऱ्याच अंशी कमी करता येतो.

हे जिवाणू काही विशिष्ट प्रतिजैविकं तयार करतात का, त्यांचा कसा व काय परिणाम होतो, तसंच अन्न वाचवण्यास त्यांचा उपयोग करता येईल का व करता आल्यास अन्नावर व त्याअनुषंगानं अन्नसेवन करण्यावर त्याचे काय व कसे परिणाम होतील यावर सातत्यानं संशोधन सुरू आहे.

अलीकडच्या काळातील या जिवाणूंचा सर्वात मोठा उपयोग हा प्रोबायोटिक म्हणून केला जात आहे. प्रोबायोटिक म्हणजे असे जिवंत जिवाणू, ज्यांच्या सेवनामुळे पचनसंस्थेतील सर्व जिवाणूंचा चांगला समन्वय साधला जातो आणि पचनसंस्थेचं आणि पर्यायानं आपलं संपूर्ण आरोग्य सुधारण्यास चांगली मदत होते. याकुल्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. रोज नित्यनेमानं दही-ताकाचं सेवन केल्यास (हे पाश्र्चराईज्ड् नसावं) हे जिवाणू पचनसंस्थेत स्थायिक होऊन सर्व लाभ देतात.

इतक्या मोठ्या प्रमाणावर या जिवाणूंचं सेवन केल्यास काही अपाय तर होणार नाही ना, अशी शंका काही वेळा येणं साहजिक आहे. या जिवाणूंना ‘ग्रास’ (जनरली रिगार्डेड ॲज् सेफ) म्हणजेच ‘सुरक्षित’ असं संबोधण्यात येतं. यांमुळे आपल्याला कोणताही अपाय होत नाही, हे अनेक प्रकारच्या संशोधनांनी सिद्ध झालं आहे.

हे जिवाणू किण्वनप्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये जसे आढळून येतात, तसेच ते अनेक वनस्पती, फळं, फुलं यांवरही भरपूर प्रमाणात असतात, असं अलीकडच्या संशोधनात आढळून आलं आहे. अशा ठिकाणी आढळणाऱ्या लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरियापासून मिळणाऱ्या अनेक पदार्थांचा शोध लागला आहे, ज्यांचे अनेकविध उपयोग करून घेता येणार आहेत. यातील महत्त्वाचा प्रयोग कृषी-उत्पादनांवर करता येऊ शकेल. हे जिवाणू बुरशी-अवरोधक रसायनं तयार करतात. त्यांमुळे बुरशीच्या प्रादुर्भावापासून फळं व भाज्या वाचवता येतील. याचा दुहेरी लाभ होईल. एक म्हणजे, नैसर्गिक बुरशीनाशकांमुळे रासायनिक प्रदूषण काही प्रमाणात कमी करता येईल आणि दुसरं म्हणजे नैसर्गिकरीत्या, आपल्याला अपाय न होता कृषी-उत्पादनांचं संरक्षण करता येईल.

तर असं हे लॅक्‍टिक ॲसिड बॅक्टेरिया म्हणजेच आपले गुड बॅक्टेरिया.

पुढच्या लेखात जाणून घेऊ या आरटीपीसीआरबद्दल...

(सदराच्या लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com