साक्षेपी समीक्षक dr rajendra mundhe writes dr kishor sanap | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr kishor sanap

साक्षेपी समीक्षक

ललित साहित्य आणि समीक्षेला नवे बळ देणारे डॉ. किशोर सानप आघाडीचे लेखक व समीक्षक म्हणून ख्यातीप्राप्त होते. वाङ्‍मयाच्या विविध प्रकारांत साहित्य आणि समाजाची तटस्थ, पारदर्शक, निर्भय वृत्तीने साक्षेपी लेखन व मीमांसा करणारे डॉ. किशोर सानप हे खरेतर गेल्या चार दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात तटस्थपणे, व्रतस्थपणे समाजासाठी लेखन करणारे लेखक होते. त्यांचे अलीकडेच निधन झाले, त्यानिमित्त त्यांचे स्मरण...

डॉ. किशोर सानप यांचा जन्म अकोला येथे ७ जानेवारी १९५६ रोजी एका अभावग्रस्त गरीब कुटुंबात झाला. वाणिज्य आणि मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ. आशाताई सावदेकरांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र नेमाडे यांचे ‘वाङ्‍मय ः एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली. १९७९ ते २०१३ पर्यंत शिक्षा मंडळाच्या वर्धा येथील गो. से. वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. सर्वदूर विख्यात अशा सांस्कृतिक क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा या संस्थेची १९८७ मध्ये स्थापना केली आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सामाजिक, वाङ्‌मयीन, सांस्कृतिक उपक्रमामध्ये भरीव योगदान दिले.

वर्धा परिसरात तळागाळातील गोरगरिबांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी लोकशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीत पदाधिकारी व वर्तमान उपाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. वर्ध्याचे निसर्ग विज्ञान मंडळ, नागपूरचे नेत्रवन व इतरही पर्यावरण-निसर्ग संरक्षणविषयक उपक्रमात १९९१ पासून पदाधिकारी म्हणून डॉ. सानप कार्यरत होते. विविध सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन, शैक्षणिक संस्थागत कार्यात पदाधिकारी, कार्यकर्ता, लेखक म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते सक्रिय राहिलेत.

बुद्ध-शाहू-फुले-आंबेडकर-गांधी-विनोबा या विचारवंतांचा समन्वयक मानवतावादी सर्वधर्मसमभाववादी प्रगतीशील विचारवंत; साहित्य आणि समाजाचा अन्योन्यसंबंध आपल्या आधुनिक प्रगतीशील लेखनातून प्रभावीपणे मांडणारा साक्षेपी लेखक म्हणूनही डॉ. किशोर सानप यांनी ओळख निर्माण केली होती. लेखकाची आधुनिकता आणि नैतिकता यांचा एकास एक संबंध मानून वाङ्‍मयीन, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनवादी चळवळीशी जैविक नाते निर्माण केले. लेखकाची नैतिकता हा बाणा मानून, समाजप्रबोधन हा लेखनाचा हेतू मानणारे डॉ. किशोर सानप हे व्रतस्थ लेखक होते.

सामाजिक उत्तरदायित्व, लेखकाचे स्वातंत्र्य, युगलेखकाचे द्रष्टेपण, साहित्य आणि समाजाचा एकास एक संबंध, लेखकाची नैतिकता, देशीयतेची विविधांगी अस्मितारूपे, सामाजिक चळवळी प्रबोधनवादी विचारसरणी- विदग्ध वाङ्‍मयाचे सामाजिक आणि सांस्कृतिक निकष अशा वाङ्‍मयीन सामाजिक- सांस्कृतिक मूल्यनिर्मितीच्याच परिप्रेक्ष्यात या लेखकाने कथा-कविता-कादंबरी- समीक्षा-संतसाहित्य-वैचारिक लेखन असे चौफेर लेखन केलेले आहे.

मूल्यमान राखून नैतिकतेच्या अंगाने स्वतः ललित आणि समीक्षाविषयक लेखन करून, वाङ्‍मयाच्या विविध प्रकारांत साहित्य आणि समाजाची तटस्थ, पारदर्शक, निर्भय वृत्तीने साक्षेपी लेखन व मीमांसा करणारे डॉ. किशोर सानप हे खरेतर गेल्या चार दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात तटस्थपणे, व्रतस्थपणे समाजासाठी लेखन करणारे लेखक होते. देशकालनिष्ठ व देशकालातीत लेखनाचे प्रमेय, साहित्य आणि समाजाच्या भूमीत रुजवणारे ते मराठी भाषा, मराठी समाज मराठी संस्कृतीला प्रगतीशील दिशा देणारे प्रतिभावंत लेखक होते. म्हणूनच मूल्यभान असलेल्या दुर्मिळ लेखकांपैकी डॉ. किशोर सानप हेही एक मराठीतील श्रेष्ठ लेखक आणि समीक्षक होते.

संतकवी ते आधुनिक- उत्तराधुनिक लेखक-कवींचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास मांडून; संत तुकाराम, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, आधुनिक व उत्तराधुनिक कथाकार-कादंबरीकार-कवी-कवयित्री यांची सखोल व प्रदीर्घ मीमांसा करणारे ललित, सैद्धांतिक व उपयोजित समीक्षा लेखन; लेखकाचा समग्र अभ्यास, वैचारिक आणि सामाजिक अशा विविधांगी समाज आणि साहित्याचा रक्तसंबंध पारदर्शकपणे आणि निर्भयपणे मांडणाऱ्या या लेखकाचे आजतागायत एकूण २८ ग्रंथ प्रकाशित झाले असून २४ ग्रंथ प्रकाशनास सज्ज ठेवले होते. त्यातील एक बाबा भांड यांच्या तंट्याबद्दल हा समीक्षेची समीक्षा करणारा ग्रंथ अलीकडेच प्रकाशकाने त्यांना पाठविला होता. त्यांचे संकल्पित ग्रंथ, श्याम मनोहर यांच्या कथात्मक साहित्याचा अभ्यास, ‘अवघा डोंगरू पोकळ असे’ ही कादंबरी आणि ‘तुकाराम दर्शन’चे पुढील खंड आता पूर्णत्वास जाणार नाहीत, याची खंत वाचकांना राहील.

डॉ. सानप यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक २०१७ ला लढविली होती. त्यात त्यांना यश आले नाही. त्याआधी ते विदर्भ साहित्य संघ, नागपूर आयोजित तिसरे जनसाहित्य संमेलन नरखेड (१९९८), तिसरे भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन, तारुखेडले, नाशिक (२००१), विदर्भ साहित्य संघ, नागपूर आयोजित ६२ वे विदर्भ साहित्य संमेलन, गोंदिया (२०१२), अक्षर कला मंच, राजुरा आयोजित दुसरे अभंग साहित्य संमेलन, राजुरा (२०१६) व या वर्षाच्या मार्च महिन्यात झालेल्या अ. भा. शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले होते, त्यावेळी ते अत्यवस्थ असल्याने त्यांच्या अर्धांगिनी प्रा. कविता सानप यांनी अध्यक्षीय भाषण वाचले होते.

साहित्य संमेलनांतून त्यांनी साहित्य आणि समाजाचे मूलभूत प्रश्न मांडून बहुजन हिताय, बहुजन सुखाय हीच भूमिका घेतल्याचे दिसते. माणूस हा त्यांच्या चिंतनाचा विषय असून, सत्यम शिवम सुंदरम अशा या सृष्टीच्या सौंदर्यशील निर्मितीला मनुष्य हाच उपकारक असल्याची सृजनशील भूमिका त्यांनी आपल्या लेखनातून आणि विचारपीठांवरून घेतली आहे. अनेक संमेलने व चर्चासत्रात अध्यक्ष- प्रमुख अतिथी, उद्‌घाटक, सत्राध्यक्ष, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रादेशिक व अखिल भारतीय साहित्य संमेलने आदींमध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतला होता.

ललित आणि वैचारिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकस लेखन करणाऱ्या समकालिनांमध्ये डॉ. किशोर सानप यांचे नाव ठळक अक्षरांनी नोंदविण्याइतके महत्त्वाचे आहे. आधुनिकता आणि नैतिकता याचा गांभीर्याने विचार करणे हे सानपांचे एक वैशिष्ट्य आहे आणि हा विचार ते स्वतंत्रपणे करतात, हे दुसरे वैशिष्ट्य... विचारवंत आणि साक्षेपी लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी डॉ. सानप यांच्या ‘समग्र तुकाराम दर्शन’ या महाग्रंथाच्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच हा मतितार्थ नोंदवला आहे. डॉ. सानप यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील एक साक्षेपी समीक्षक हरपला आहे.

टॅग्स :saptarang