हिरकणी (डॉ. रमेश गोडबोले)

dr ramesh godbole
dr ramesh godbole

शाळेचा गणवेश घातलेली, किशोरवयीन छाया लॅबच्या बाहेर आईची आतुरतेनं वाट पाहत बसली होती. ""छाया चल, जाऊ या,'' असं नंदानं खोल आवाजात म्हटल्यावर ती चटकन्‌ उठली. बाहेर अंधार पडला होता. नंदाच्या मनातही काळोख दाटला होता. उद्या शाळेची फी भरली नाही, तर छायाला शाळेतून काढून टाकणार होते. शाळेच्या गणवेशातली ही तिची शेवटचीच संध्याकाळ ठरणार होती. बसनं त्यांना खूप दूर जायचं होतं. घरी दोन छोटी मुलं एकटीच होती. त्यामुळं त्या दोघी मायलेकी झपाझपा रस्त्याकडे जात होत्या...

नंदाला रात्रभर धड झोप नव्हती. तळमळत, विचारचक्रात अडकून पडली होती. काही मार्ग सुचत नव्हता. नवरा रात्री उशिरा दारू पिऊन आल्यावर कोपऱ्यात आडवा पडला होता; पण ते नेहमीचंच होतं. त्याची तिला सवय झाली होती. शेजारी दोन धाकटी मुलं शांत झोपली होती. मात्र, मोठी मुलगी छाया पहाटेच उठली होती. स्वयंपाकाच्या जागेजवळच्या थोड्या मोकळ्या जागेत बसून पुस्तकात बघून काहीतरी पाठांतर करीत होती. तिच्याकडे नंदा टक लावून पाहत होती. तिचा निरागस चेहरा आणि अभ्यासात असलेली तिची एकाग्रता पाहून नंदाला गलबलून आलं. झोपडपट्टीतील त्या छोट्या खोलीच्या बाहेर थोडी वर्दळ सुरू झाली होती. नंदाला आता उठणं भागच होते. स्वतःचं आणि इतर तीन मुलांचं आवरून त्यांना वेळेवर शाळेत पाठवणं, डबे करून देणं इत्यादी अनेक कामं तिला उरकायची होती. तिच्या मदतीला कोणीच नव्हतं. त्यामुळं तारवटलेल्या आणि रडून लाल झालेल्या डोळ्यांनी ती उठली. छायाची मैत्रीण जवळच राहत होती. तिच्या आईकडे छायाच्या वर्गशिक्षकांनी चिठ्ठी दिली होती. ती तिनं नंदाला दिली होती. ती चिठ्ठी नंदानं उशीखाली ठेवली होती. रात्री सर्व जण झोपी गेल्यावर अंधुक प्रकाशात तिनं तीन-तीन वेळा ती वाचली होती. उशीखालची चिठ्ठी तिनं हळूच काढली आणि छायानं ती वाचू नये म्हणून देवाजवळच्या आरतीच्या छोट्या पुस्तिकेत ठेवून ती बाहेरच्या सार्वजनिक नळावर तोंड धुण्यासाठी गेली. चिठ्ठीतला मजकूर तिच्या डोक्‍यात घणाचे घाव घालीत होता. वर्गशिक्षिका बाईंनी चिठ्ठीत लिहिलं होतं ः
"आपली मुलगी छाया हिला एक हुषार विद्यार्थिनी म्हणून आम्ही ओळखतो. मात्र, गेले सहा महिने आपणास वरचेवर निरोप पाठवूनही आपण तिची शाळेची फी भरलेली नाहीत. भेटायला बोलावले, तरी आपण आला नाहीत. त्यामुळे शाळेच्या नियमांनुसार, फी भरल्याशिवाय तिला नववीच्या वार्षिक परीक्षेला बसवता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ताबडतोब फी भरावी ही विनंती.'

आधीच कर्जाच्या ओझ्यात असलेल्या नंदाला आता झोपडपट्टीतला वाणी धान्यही उधार देईनासा झाला होता. त्यामुळं नंदाला फी भरणं शक्‍यच नव्हतं.
नंदाचं नववीत असतानाच बापानं तिचं लग्न लावून दिलं. त्यामुळं तिची शाळा सुटली ती कायमचीच. आपल्या मुलींवर तशी वेळ येऊ नये म्हणून नंदा झटत होती. आपल्या मुलांनी खूप शिकावं, ही तिची तीव्र इच्छा होती. त्यातून मोठी मुलगी छाया फारच हुशार निघाली. त्यामुळं परवडत नसूनही तिनं गावातल्या एका नावाजलेल्या शाळेत तिला घातलं होतं. रात्रंदिवस काबाडकष्ट करून ती फीचे पैसे बाजूला काढून ठेवत होती. गेल्या वर्षापर्यंत तिनं एकदाही फी थकवली नव्हती. छाया शिकली, तर इतर दोन लहान भावंडांना ती आधार देईल आणि त्यांनाही चांगलं शिक्षण देणं शक्‍य होईल या आशेवर ती होती.

नंदाचं लग्न झाल्यावर पहिली काही वर्षं चांगली गेली. मात्र, पुढं नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढतच चाललं. चांगली नोकरी गेली. रोजंदारीवर प्लंबरच्या हाताखाली लहर लागेल तेव्हा तो काम करे; परंतु दारूला पैसे कमी पडले, की नंदाला शिवीगाळ करून किंवा त्यानं भागलं नाही, तर लाथा-बुक्‍या मारून तिच्याजवळचे असतील ते सर्व पैसे काढून घेई. घरातल्या विकण्यासारख्या सर्व वस्तू आता संपल्या होत्या. हे सर्व मुलांसाठी सहन करत नंदा संसाराचा गाडा ओढत होती. तिला एका कपड्याच्या कारखान्यात नोकरी मिळाली होती. त्यावर कसं तरी भागत होतं. मात्र, एक वर्षापूर्वी मंदीमुळं कारखाना बंद पडला. इतरही कारखान्यांची स्थिती वाईटच होती. त्यामुळं वणवण फिरूनही तिला धड नोकरी मिळत नव्हती. त्यामुळंच छायाची फी थकली होती. तिनं पूर्वी एकदा शाळेच्या बाईंना भेटून थोडी मुदत मागून घेतली होती; पण तरीही फी भरण्यासाठी पैसे जमलेच नाहीत. परत भेटून तेच रडगाणं किती वेळा गाणार? म्हणून ती बाईंना तोंड दाखवणं टाळत होती. चांगलं काम मिळालं, की पैसे मिळतील आणि एकदम फी भरून टाकू या आशेवर ती होती; पण शेवटी मुलीचं शिक्षण बंद पडण्याची वेळ आलीच. आता मुलीला काय सांगणार या विवंचनेत ती रात्रभर तळमळत होती.

थकलेली फी भरली, तरी शिक्षणाचा पुढचा प्रश्‍न सुटणार नव्हता. छायाला चित्रकलेची आवड होती. तिला निदान आर्किटेक्‍टचा डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत शिकवण्याचं नंदाचं स्वप्न होतं; पण ते स्वप्न पुरं होण्याची आशा मावळली होती. पुढची फी भरणं अशक्‍य होतं. पूर्वीही काही वेळा फार बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आत्महत्या करून प्रश्‍न संपवावा, असा विचार तिच्या मनात आला होता; परंतु तीन कच्च्या-बच्च्या मुलांसाठी तिचा जीव तुटत होता. त्या विचारातून ती कशी तरी मागं फिरली होती.

नोकरी मिळेना म्हणून ती एका आजींना दिवसभर सोबत म्हणून आणि त्यांचं घरकाम करून बऱ्यापैकी पैसे मिळवत होती. परंतु, त्या आजींचा मुलगा आजींना दिल्लीला घेऊन गेल्यानं ती नोकरीही सुटली. मात्र, जाताना त्या आजींनी नंदाला त्यांचं जुनं सिंगर कंपनीचं शिवणकाम करण्याचं मशिन बक्षीस दिलं. कारण त्या नंदाच्या कामावर आणि विश्‍वासूपणावर फार खूष होत्या. त्या मशिनवर झोपडपट्टीतल्या इतर महिलांचे ब्लाऊज आणि इतर उसवलेले, फाटलेले कपडे शिवून देण्याचं काम ती करत होती. त्यामुळं मुलांना खायला तरी मिळत होतं; पण सहा महिन्यापूर्वी एकदा नंदा नोकरीच्या शोधासाठी बाहेर गेली होती. परत घरी आल्यावर ते मशिन कुठं दिसेना, म्हणून तिनं शेजारणीकडे चौकशी केली, तर ती म्हणाली ः ""तुझ्या नवऱ्यानं ते फुंकून टाकलं. भंगारवाल्यानं त्याला पाचशे रुपये दिले. ते घेऊन तो पळाला.'' नंदाचं उपजीविकेचं शेवटचं साधनही गेलं.

नेहमीप्रमाणं झोपडपट्टीतल्या नळकोंडाळ्यावर बायकांची गर्दी होती. कसंतरी तोंड धुवून नंदा परत खोलीच्या दाराशी आली. छायानं दप्तर आवरून ठेवलं होतं. भिंतीवर लावलेल्या गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून ती श्‍लोक म्हणत होती. "बुद्धी दे गणनायका' ही शेवटची ओळ म्हणून ती डोळे मिटून क्षणभर देवासमोर उभी होती. ते पाहून नंदाला गलबलून आलं. तिनं हळूच तिच्या मागं जाऊन तिला जवळ घेतलं. एकदा गणपतीकडं पाहिलं. गणेशाच्या डोळ्यात तिला अश्‍वासक भाव दिसले. छायाला मिठीतून सोडून ती रोजच्या कामाला लागली; पण विचारचक्र चालूच होतं. तिला एकदम एक विचार सुचला. आजींकडे नोकरी करत असताना त्यांच्या टीव्हीवर एका कार्यक्रमात अवयवदान करण्याबाबतची माहिती देत होते. त्यात काही बायका गर्भाशय भाड्यानं देतात आणि पोटात मूल वाढवल्याबद्दल त्यांना काही लाख रुपये मिळतात, असं सांगितल्याचं तिला आठवलं. क्षणभर तिच्या आशा पालवल्या; पण नंतर लक्षात आलं, की असं केल्यानं नवऱ्याला भलताच संशय येऊन तो आपला जीव घेण्यासही मागं-पुढं पाहणार नाही. त्यामुळं तो विचार तिनं सोडून दिला. किडनी दान केल्याची काही उदाहरणंही त्या कार्यक्रमात दाखवली होती. दोनपैकी एक किडनी विकून मुलांचं भलं होईल आणि एका माणसाचा जीव वाचवण्याचं पुण्यही मिळेल, अशी कल्पना तिच्या मनात आली आणि या कल्पनेनं ती सुखावली.

नंदानं हा विचार तिच्या एका मैत्रिणीला सांगितला. तिलाही तो पटला; पण दान करण्यासाठी तुझी किडनी सक्षम आहे का, हे चांगल्या लॅबमध्ये जाऊन तपासून घे, असा सल्ला तिनं दिला. कारण ही प्राथमिक चाचणी आवश्‍यक असते हे तिला माहीत होतं. बरेच दिवस नंदाच्या मनात चलबिचल चालू होती; पण एक दिवस धीर करून ती एका प्रख्यात लॅबोरेटरीत गेली. ""किडनीच्या टेस्ट करायला किती खर्च यील?'' असं तिनं रिसेप्शनिस्टला विचारलं. तिनं त्यासाठी जो मोठा आकडा सांगितला, तो ऐकून ती परत फिरली. आणखी एका लॅबोरेटरीत हाच अनुभव आला. शेवटचा प्रयत्न म्हणून तिच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तिच्या काही तपासण्या ज्या लॅबोरेटरीत केल्या होत्या तिथं जायचं तिनं ठरवलं. ती लॅब खूप लांब असली, तरी तिथले डॉक्‍टर खूप सहानुभूतीनं वागले होते, पैसेही कमी घेतले होते, हे तिला आठवलं. तिथं प्रयत्न करावा म्हणून छाया शाळेतून आल्याबरोबर तिला सोबत म्हणून बरोबर घेऊन नंदा बसनं लॅबोरेटरीजवळ उतरली. छायाला या गोष्टीची माहिती दिली, तर तिला फार वाईट वाटेल आणि ती कदाचित शाळेत जाणंच बंद करेल, या भीतीनं तिला दाराशी थांबवून ती आत गेली. रिसेप्शनिस्टजवळ किडनीच्या टेस्टची चौकशी केली. रिसेप्शनिस्टनं सांगितलं ः ""किडनीच्या पुष्कळ प्रकारच्या टेस्ट असतात. कोणत्या टेस्ट करावयाच्या ते तुमचे डॉक्‍टर चिठ्ठीवर लिहून देतात. ती चिठ्ठी दाखवा म्हणजे त्याला किती खर्च येईल ते सांगता येईल.''

नंदाजवळ कोणतीच चिठ्ठी नसल्यानं रिसेप्शनिस्टनं तिला आत बसलेल्या डॉक्‍टरांना भेटण्यास सांगितलं. तिला आठवत असलेले पूर्वीचे डॉक्‍टर आता खूपच वयस्क झाले होते; पण चेहऱ्यावर तोच तजेला होता. डोळ्यात तोच भाव होता. त्यांना पाहून तिला खूपच धीर आला. तिनं डॉक्‍टरांना सुरवातीसच सांगून टाकलं ः ""मी खूपच गरीब आहे. कोणत्या टेस्ट करायच्या ते तुम्हीच ठरवा.'' डॉक्‍टरांनी तिला ""काय त्रास होतो? तुमचे नेहमीचे डॉक्‍टर कोण? फक्त किडनीच्याच टेस्ट का हव्यात?'' वगैरे प्रश्‍न विचारले आणि आणलेल्या पैशांत आवश्‍यक टेस्ट करून देण्याचं आश्‍वासन दिलं. नंदाला खूप धीर आला. तिनं डॉक्‍टरांना सांगितलं ः ""माझ्या किडन्या चांगल्या असतील, तर त्यातली एक दान करायची आहे.''

""किडणीच्या रोगानं कोण आजारी आहे? नवरा, भाऊ, आई-वडील?'' या डॉक्‍टरांच्या प्रश्‍नावर ती पटकन्‌ काहीच बोलेना. मात्र, डॉक्‍टरांचा अश्‍वासक चेहरा पाहून तिनं किडनी दान करण्याचं खरं कारण सांगितलं आणि आपली करुण कहाणी कथन केली. डॉक्‍टर अवाक्‌ झाले. किडनी दान करण्याचा विचार अगतिकतेतून निर्माण झाला असला, तरी तो बेकायदा आणि अतिशय धोक्‍याचा असल्याची जाणीव त्यांनी नंदाला करून दिली. त्या भाबड्या कल्पनेतल्या संभाव्य संकटांची, धोक्‍यांची माहिती समजावून सांगितली. आता आशेचा उरलासुरला किरणही नष्ट झाल्यानं तिला रडू कोसळलं. थोड्या वेळानं ती उठली. ""तुम्हाला मी उगीच त्रास दिला,'' असं म्हणून ती निघाली.

लॅबच्या बाहेर शाळेचा गणवेश घातलेली, किशोरवयीन छाया आईची आतुरतेनं वाट पाहत बसली होती. ""छाया चल, जाऊ या,'' असं नंदानं खोल आवाजात म्हटल्यावर ती चटकन्‌ उठली. बाहेर अंधार पडला होता. तसा नंदाच्या मनातही काळोख दाटला होता. उद्या शाळेची फी भरली नाही, तर छायाला शाळेतून काढून टाकणार होते. शाळेच्या गणवेशातली ही तिची शेवटचीच संध्याकाळ ठरणार होती. बसनं त्यांना खूप दूर जायचं होतं. घरी दोन छोटी मुलं एकटीच होती. त्यामुळं त्या दोघी मायलेकी झपाझपा रस्त्याकडे जात होत्या.

डॉक्‍टर दारात उभे राहून त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडं दिङ्‌मूढ होऊन पाहत होते. तेवढ्यात वीज चमकावी तशी त्यांच्या मनात एक ऊर्मी आली. त्यांनी रिसेप्शनिस्टला धावत जाऊन त्यांना गाठून परत घेऊन येण्यास सांगितलं. तोपर्यंत त्या दोघी खूप ट्रॅफिक असलेला तो रस्ता ओलांडून पलीकडे गेल्या होत्या. तिथंच बसस्टॉप होता. तेवढ्यात विश्रांतवाडीला जाणारी बस आली. त्या दोघींना तिकडेच जायचं असल्यानं चढणाऱ्यांच्या गर्दीत त्या दिसेनाशा झाल्या. मात्र, रिसेप्शनिस्ट कशी तरी बसपर्यंत पोचली होती. तिनं ड्रायव्हरला थोडं थांबण्याची विनंती केली आणि ती मागं गेली. त्या मायलेकींना खाली उतरण्यासाठी ओरडून सांगू लागली. सुदैवानं त्या शेवटच्या पायरीवर लटकून उभ्या असल्यानं पटकन्‌ उतरल्या. बस निघून गेली आणि त्या दोघींना घेऊन रिसेप्शनिस्ट परत लॅबमध्ये आली.

छायाला परत बाहेर उभी करून नंदा आत गेली. नंदा भेदरलेल्या नजरेनं डॉक्‍टरांकडे पाहू लागली. डॉक्‍टर म्हणाले ः ""तुमची मुलगी माझ्या नातीसारखी आहे. तिच्या फीची सर्व रक्कम मी तुम्हाला देण्याचं ठरवलं आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन. तुम्ही निश्‍चिंत राहा. किडनी विकण्याचा विचार मनातून काढून टाका.'' हे ऐकून नंदाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू यायला लागले. डॉक्‍टरांनी दिलेलं पैशाचं पाकीट खूप संकोचानं तिनं घेतलं आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला. ""डॉक्‍टर, तुमच्या रूपानं मला माझे वडील भेटले. सवड झाली, की छाया तुमचे पैसे परत करेल,'' एवढं बोलून ती परत निघाली.

त्यानंतर नंदा अधूनमधून येऊन डॉक्‍टरांकडून फीचे पैसे घेऊन जात होती. छायापासून ही गोष्ट तिनं बरेच दिवस लपवून ठेवली होती; पण हळूहळू तिला हे गुपित समजलं होतं. मध्यंतरी काही वर्षं गेली. एका संध्याकाळी डॉक्‍टर नेहमीप्रमाणं त्यांच्या चेंबरमध्ये बसले होते. पेशंटची गर्दी संपल्यावर ""एक मुलगी तुम्हाला भेटायला आली आहे,'' असा निरोप रिसेप्शनिस्टनं त्यांना दिला. ""तिला आत येऊ दे,'' असं म्हटल्यावर साधा पंजाबी पोषाख आणि ओढणी घेतलेली एक युवती आत आली. ती नम्रपणे उभी राहिली आणि म्हणाली ः ""मी नंदाची मुलगी छाया. तुमची मानलेली नात. आर्किटेक्‍ट डिप्लोमाचा रिझल्ट लागला. मी पहिल्या वर्गात पास झाल्याचं सांगण्यासाठी आले आहे.'' डॉक्‍टर नको म्हणत असतानाही तिनं त्यांचं न ऐकता त्यांच्या पायावर कपाळ टेकलं आणि दोन अश्रूरूपी फुलं पायांवर वाहिली. डॉक्‍टरांनी तिच्या मस्तकावर आपले थरथरते हात ठेवले आणि म्हणाले ः ""मुली, आपल्या आईचे तू पांग फेडलेस. तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत.''
डॉक्‍टरांना भेटण्यासाठी छाया परस्पर गेल्याचं कळल्यावर तिच्या पाठोपाठ नंदा लॅबमध्ये पोचली. नंदाच्या रूपानं एका आधुनिक हिरकणीचं दर्शन डॉक्‍टरांना होत होतं. नंदाला शब्द सुचत नव्हते; पण एका डोळ्यात स्वप्नपूर्तीचा आनंद, तर दुसऱ्या डोळ्यात कृतज्ञता ओसंडून वाहत असल्याचे भाव डॉक्‍टरांना तिच्या डोळ्यात दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com