
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांप्रति ‘मूकनायक’पासून ते ‘प्रबुद्धभारत’पर्यंत त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास...
व्रतस्थ पत्रकारितेचा दीपस्तंभ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठी भाषेचे भूषण ठरावी इतकी मौल्यवान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रीय लेखनसंपदा आहे. त्यांच्या अग्रलेख व स्फुट लेखातील प्रत्येक वाक्यावाक्यात, शब्दाशब्दांत अजोड लेखन सामर्थ्याचा प्रत्यय येतो. हजारो वर्षांपासून सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या वंचितांच्या वेदनांना वाचा फोडून त्यांचा उद्धार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्रतस्थपणे पत्रकारिता केली. वंचितांप्रति असणाऱ्या कळवळ्यातून ‘मूकनायक’पासून ते ‘प्रबुद्धभारत’पर्यंत त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास झाला. एक नवी भूमिका आणि नवा आशय घेऊन बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या प्रांतात प्रवेश केला. समाज प्रबोधनाचे एक विधायक आणि रचनात्मक साधन म्हणून पत्रकारितेकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी त्यांनी दिली. मानवतावादी राजकारणासाठी शुद्ध व दर्जेदार पत्रकारितेचा ‘साधन’ म्हणून उपयोग करण्याचा एक आदर्श त्यांनी जगासमोर प्रस्थापित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्तमानपत्रातील वैचारिक लेख म्हणजे श्रेष्ठ वाङ्मयीन निबंधच ठरतात. चिंतनप्रधानता, विवेकशीलता, तर्कशुद्धता ही वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात पदोपदी आढळतात. त्यांच्या आवेगी, प्रखर, प्रांजळ, सत्यान्वेषी व्यक्तीवैशिष्ट्यांचा प्रत्यय पदोपदी येतो. एका सुशील, बुद्धिवादी, व्यासंगी, प्रामाणिक माणसांचे अंतरंग या लेखनातून अगदी सहजपणे प्रकटले आहे. एका झुंजार नेत्याचा लढावू बाणा, डावपेच ओळखण्याची व आखण्याची कुशलता, प्रतिपक्षाचे खंडण व स्वमताचे मंडन करण्याचे कौशल्य पाहायला मिळते.
सत्याचा अभिमान व असत्याची चीड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा अंगभूत गुण आहे. सत्य प्रतिपादन, सत्यपूजा व सत्याची प्रतिष्ठापना यासाठी त्यांची पत्रकारिता समर्पित आहे. आपल्या वृत्तपत्रांतून बाबासाहेबांनी केवळ एक स्वप्नाळू जग उभे केले नाही; तर वास्तवातील कुरूपतेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सत्य आणि सामाजिक न्याय या नव्या मानवी मूल्यांचे दर्शन घडवले. वंचितांच्या कुरूप जीवन वास्तवामागच्या सत्याचा शोध त्यांनी घेतला. तत्त्वचिंतकाच्या लेखनात बोजडपणा, निरसता व शुष्कता येण्याची शक्यता अधिक असते.
पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रतिपादनात मात्र अशी रुक्षता आढळत नाही. विषय प्रतिपादनाच्या ओघात येणारे दृष्टांत, दाखले आणि उदाहरणे ही एकसुरी नसून वैविध्यपूर्ण आहेत. संस्कृत महाकाव्य, पुराणकाव्य आणि संत साहित्यातील दृष्टांत व दाखले, आंतरराष्ट्रीय व्यवहार, जनरीतीतील गमती, लोकव्यवहार, शेती आदींच्या अवलोकनातून, अनुभवातून ते आलेले आहेत. लोकांना विचारप्रवण करण्याच्या भूमिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन झाल्यामुळे त्यांच्या विवेचनात येणारे दृष्टांत, कथा, दाखले हे सभोवतीच्या लोकजीवनातील अधिक आहेत.
जाणीवपूर्वक भाषेला सजविण्याचा खटाटोप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेच केला नाही; कारण तो त्यांचा हेतू नव्हता. विचारसौंदर्य हे त्यांच्या शैलीचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे स्वरूप फारसे काव्यात्मक नसले तरी प्रसंगोपात विविध काव्यपंक्तीचा समर्पक वापर केला आहे. त्यांनी वापरलेल्या काव्यपंक्ती विषय प्रतिपादनाचा एक भाग म्हणूनच येतात. लेखातील आशयाशी ते काव्य पूर्णतः एकरूप होऊन जाते. ते बाहेरून जोडलेले ठिगळ वाटत नाही. काही काव्यपंक्तीमध्ये स्वतःच्या आशयानुरोधाने नाट्यपूर्ण बदल करून उपरोधाची सुंदर उधळण केल्याचे पाहायला मिळते.
आपल्या सभोवतीच्या लोकव्यवहारातील रूढ वाक्प्रचार आणि म्हणींचा प्रसंगानुरूप चपखलपणे वापर केल्यामुळे त्यांच्या लेखांची परिणामकारकता अधिक वाढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोगात आणलेल्या म्हणींची विविधता अत्यंत रंजक आहे. त्यात बोली भाषेतील म्हणीची संख्या लक्षणीय आहे. सुभाषितांच्या वापरामुळे भाषेला एक भारदस्तपणा आलेला असून, विवेचनात एक प्रवाहीपणा आला आहे. ठिकठिकाणी आशयघन आणि अर्थबहुलतेने भारलेली वाक्यरचनाही विपुल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विवेचनात संदिग्धता आणि धूसरतेचा लवलेशही आढळत नाही. आपली भूमिका मांडताना किंवा टीकाकाराच्या टीकेला उत्तर देताना बाबासाहेब जो युक्तिवाद करतात त्यातून त्यांच्या अतुलनीय बौद्धिक सामर्थ्याचे दर्शन घडते. युक्तिवादातून वितंडवाद येत नाही.
उपरोध हा बाबासाहेबांच्या लेखनातील लक्षणीय विशेष आहे. अनीती आणि असत्याबद्दल बाबासाहेबांच्या मनात असणाऱ्या संतापातून ही उपहासात्मकता आली आहे. या उपहासात विकृत प्रवृत्तीवर कटाक्ष आहे. सामाजिक विसंगतीवर प्रहार करताना ते अत्यंत जळजळीत अशी भाषा वापरतात. प्रतिपक्षावर प्रहार करताना त्यांच्या भाषेला एक वेगळेच तेज चढते. त्यातील आवेश जबरदस्त असतो. दोष, व्यंग, विकृती आणि विसंगतीवर ते प्राण एकवटून हल्ला चढवतात. पण, यामागे त्यांची दृष्टी मात्र अगदी स्वच्छ असते. टीका करतानाही आपल्या लेखनाचा दर्जा बाबासाहेबांनी कधीच घसरू दिला नाही. त्यांच्या टीकेची पातळी ही नेहमी उच्च व भारदस्त राहिली.
वर्तमान पत्रकारितेत दिसणारे चारित्र्यहनन व वैयक्तिक उपहास अशा गोष्टींचा लवलेशही बाबासाहेबांच्या पत्रकारितेत आढळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेतून बुद्धिवादाची चमक, माणुसकीचा गहिवर, मानवी मूल्यावरील गाढश्रद्धा अगदी सहजपणे प्रकटली आहे. एकंदर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्रीय लेखन आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने समृद्ध असून, पत्रकारितेच्या क्षेत्रात व्रतस्थपणे काम करणाऱ्या पुढील हजारो पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे ते दिशादर्शक ठरणार आहे.
-डॉ.रवींद्र बेम्बरे
Web Title: Dr Ravindra Bembre Writes About Dr Babasaheb Aambedkar Journalism Mooknayak Prabuddhabharat Journey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..