esakal | नवी जाणीव (डॉ. रेखा खानापुरे)
sakal

बोलून बातमी शोधा

dr rekha khanapure

नवी जाणीव (डॉ. रेखा खानापुरे)

sakal_logo
By
डॉ. रेखा खानापुरे

मानवी मनाचा थांग आणि अंदाज लागणं केवळ अशक्‍य.
कारण, काही काही प्रसंगी आपण असे काही मूर्खासारखे का वागतो, या स्वतःला पडणाऱ्या प्रश्‍नाचंच उत्तर कधी कधी सापडेनासं होतं.
नंतरच्या काळात गैरसमज सांधले जातात, चुका दुरुस्त होतात; पण कधी कधी आपल्याच वर्तनानं जीव संकोचून जातो. असे किती तरी प्रसंग बहुतेकदा सगळ्यांच्याच आयुष्यात घडतात. एकदा माझ्याही बाबतीत असं घडलं. स्वतःला पुरोगामी समजणारी मी माझ्याही नकळत कुठल्या तरी अनाकलनीय गैरसमजाच्या आवर्तात कशी काय सापडले कुणास ठाऊक.
अलीकडं मात्र मी सावध झाले आहे...अशा गोष्टी आपल्या हातून घडूच नयेत असाच प्रयत्न मी करत राहते. काही वर्षांपूर्वी हातून झालेली घोडचूक मला अशा वेळी आठवते नि मी शरमून जाते.

झालं होतं असं, की त्या वेळी माझे यजमान सिद्धार्थ यांची बदली जरा आडवळणाच्या ठिकाणी झाली होती. बदलीची नोकरी असल्यामुळे असं स्थित्यंतर आमच्या सवयीचं झालं होतं. ऑर्डर हातात आली की चंबूगबाळं आवरून निघायचं अशी आमची रीत होती. आमच्याबरोबर सासरेही होते. सिद्धार्थना कामानिमित्त वारंवार बाहेरगावी जावं लागायचं, म्हणून घरातलं माणूस माझ्या सोबतीला असावं सिद्धार्थना वाटायचं. परिणामी, सासूबाईंना गावाकडं एकटं राहावं लागायचं; पण त्या स्वभावानं सायीसारख्या मऊ! माझ्यावर आणि नातवंडांवर त्यांची खूप माया. आला दिवस आनंदात घालवावा ही त्यांची वृत्ती. आमच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळून आमचा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला की मग अधूनमधून सासरे गावाकडं जाऊन तिथली व्यवस्था पाहायचे.

...तर त्या वेळी नवीन जागी आल्यावर करावे लागणारे सगळे सोपस्कार पार पडले. मुलांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळं शाळाप्रवेशाची कामं चुटकीसरशी होऊन गेली. राहायला ऐसपैस जागाही पाहिली. सिद्धार्थ यांच्या ऑफिसपासून बऱ्याच दूर अंतरावर ते निवासस्थान असल्यानं सुरवातीला तो जरासा नाराजच होता; पण जसं त्यानं ते घर पाहिलं, तसा तो त्याच्या प्रेमातच पडला! हिरव्यागार बगीच्यानं नटलेल्या आवारात मध्यभागी असलेल्या दुमजली इमारतीचा वरचा मजला आमच्या ताब्यात होता. भाडंही कमी होतं. घरमालक, मालकीणबाई खालच्या मजल्यावर राहायच्या. दिवसभरात सवड मिळाली की मी वर कठड्याला रेलून आणि त्या खाली अंगणात उभ्या राहून, अशा आम्ही गप्पा मारायचो. अगदी तासन्‌तास. आमची अगदी घट्ट मैत्री होती. परिसरातल्या लोकांसाठी तो एक नवलाचा विषय झालेला होता. घरमालकांना याचं नवल वाटायचं. ते म्हणायचे ः ""आमच्या भांडकुदळ बायकोशी कसं काय जमतं बुवा तुमचं...?'' यावर त्या हसायच्या नि म्हणायच्या ः ""तुमच्यासारख्या भांडखोर माणसाशीच मी कजागपणे वागते. ही तर माझी गेल्या जन्मातली पाठची बहीणच आहे.'' बोलल्याप्रमाणे खरंच त्या वागायच्या. अगदी पाठच्या बहिणीनं जसं थोरल्या बहिणीच्या घरी हक्कानं वावरावं तशाच अधिकारानं मी त्यांच्याकडं वावरायची.
नव्या ठिकाणी, अनोळखी गावात मालकीणबाईंमुळे मी चांगलीच रुळले. सिद्धार्थ यांचं वरचेवर टूरला जाणं मला खटकेनासं झालं. त्या कालावधीत सासऱ्यांना गावी जावं लागलं तरी मी कुरकूर करेनाशी झाले. माझ्यातल्या या बदलानं सासरे निर्धास्तपणे शेतीवाडीच्या कामाला जाऊ लागले. अशा वेळी आम्हा दोघींची नुसती धमाल चालायची. रोज रात्रीची जेवणं एकत्र व्हायची. रात्री जेवणानंतरची शतपावली घालायला, पहाटे पाचला उठून चालायला जायला आम्ही एकत्रच बाहेर पडायचो. दुपारी कुठं जायचं झालं तर एकमेकींच्या सोबतीनं जाताना अदलाबदलीनं एकमेकींच्या साड्याही नेसायचो. शाळेत शिकणाऱ्या परकऱ्या पोरींसारखं आमचं त्या काळातलं वागणं असायचं! आम्ही दिवसभर कुचूकुचू बोलत राहायचो. नवनवे पदार्थ बनवायला शिकायचो. घरातल्यांना खाऊ घालायचो आणि स्वतःही खात राहायचो.
***

घराच्या मागच्या बाजूला रिकामी जागा होती, जराशी पडीक...जुनाट घराचे जीर्ण अवशेष असलेली. त्या ठिकाणी दिवसा व रात्रीही टिटव्यांचं ओरडणं ऐकू येई. माझ्या मनात लहानपणापासून या पक्ष्याविषयी भय दाटलेलं होतं. ही टिटवी म्हणे प्रत्यक्ष मृत्युदेव यमाची मावशी असते आणि परिसरातल्या लोकांना आपल्या भाच्याच्या आगमनाची वर्दी देणं हे तिचं काम असतं, असं काहीतरी लहानपणापासून मी ऐकत आले होते! लहानपणी आमच्या शेजारची यमुनाकाकी तर असा आवाज ऐकला की पदर खोचून बाहेर यायची नि अंधारातून न दिसणाऱ्या टिटव्यांवर शिव्यांचा भडिमार करायची. असं केल्यानं आपल्यावरचं अरिष्ट टळतं अशी तिची श्रद्धा होती. हे सगळं माझ्या मनात कुठं तरी घर करून होतं. एकदा धीर एकवटून मालकीणबाईंजवळ मी हे बोलले तर त्या म्हणाल्या ः ""मला तसं वाटत नाही.''
घरमालक म्हणाले ः ""नीट निरखून बघितलंत तर त्या ठिकाणी तुम्हाला छोटी छोटी पिलं दिसतील. त्यांना काही धोका आहे, असं जाणवलं की टिटवीचं ओरडणं सुरू होतं. शत्रूला हाकलल्यावरच टिटवीचा कोलाहल शांत होतो.''
टिटव्यांविषयी माझ्या सासऱ्यांनाही बरीच माहिती होती. त्यांचा असल्या
शकुन-अपशकुनाच्या गोष्टींवर विश्‍वास नव्हता. प्रत्येक प्राण्याचं त्याचं त्याचं विशिष्ट जीवनतंत्र असतं आणि त्यानुसार त्यांचं आयुष्य चाललेलं असतं...माणूसच त्यांना शकुन- अपशकुनांची लेबलं लावत असतो, असं त्यांचं मत.
यासंदर्भात सासरे एकदा मला म्हणाले होते ः ""आमच्या लहानपणी घुबडाला अशुभ मानलं जायचं. त्याला कुणी दगड मारला की ते घुबड तो दगड अचूक झेलतं आणि नंतर चंदन उगाळावं तसा तो दगड ते घुबड घासतं अशी समजूत होती. लोक सांगायचे की जसजसा दगड झिजेल तसतसा तो दगड मारणारा माणूसही झिजून, खंगून मरून जातो. काहीतरी खुळ्या समजुती असतात झालं!''
सासऱ्यांच्या या स्पष्टीकरणानं माझ्या मनातली चिंता कुठल्या कुठं नाहीशी झाली. पूर्वीइतकंच घरातलं वातावरण मोकळं झालं.
अचानक एक दिवस आमच्या सुखाला खग्रास ग्रहण लागलं. जिना उतरताना पाय घसरल्याचं निमित्त होऊन सासरे पडले नि त्यांनी अंथरूण धरलं. अगदी घरातल्या घरात हालचाल करणंही त्यांना जमेनासं झालं म्हणून रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या शुश्रूषेसाठी सासूबाई आल्या. पायाची शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं म्हणून तीही केली; पण उपयोग झाला नाही. एका रात्री काहीही कल्पना नसताना झोपेतच सासऱ्यांची प्राणज्योत मालवली. त्या वेळी घराभोवती कर्कशपणे ओरडत टिटव्या प्रदक्षिणा घालत होत्या. कदाचित भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांचं एखादं पिलू मारलं असावं.

सासऱ्यांचं दिवसकार्य होईपर्यंत सासूबाई कशाबशा आमच्याकडं राहिल्या. नंतर मात्र त्या जायला निघाल्या. ज्या आमच्या राहत्या घराविषयी आम्हाला जिव्हाळा होता, ती जागा "बाधित' आहे असं त्यांना वाटत होतं. त्या मला म्हणाल्या ः ""राहायला येऊन सहा महिने उलटत नाहीत तोच हे असं अघटित घडलं. चांगला धडधाकट माणूस पाहता पाहता काळाच्या पडद्याआड गेला. मला तरी ही लक्षणं ठीक दिसत नाहीत.'' घरातलं माणूस गेल्याचं दुःख सर्वांनाच झालं होतं. इतके दिवस डोळ्यांना सुखावणारा तो परिसर आता अचानक उदासवाणा भासत होता. कितीही विश्‍वास ठेवायचा नाही म्हणून ठरवलं असलं तरी टिटव्यांच्या ओरडण्याची सांगड घडलेल्या घटनेशी घातली जातच होती. ओळखीच्या लोकांनीही त्या विचाराला खतपाणी घातलं आणि काही गोष्टींचे अर्थ उलगडायला लागले. इतकी सुंदर जागा असूनही आम्ही येण्याअगोदर बराच काळ ती रिकामी पडून होती. आजूबाजूच्या भाडेकरूंच्या मानानं आम्हाला भाडंही फार कमी द्यावं लागत होतं. हा सर्व विचार मनात आला नि एकदम लख्खकन्‌ वीज चमकावी तसा डोक्‍यात प्रकाश पडला. भरल्या संसारात विषाची परीक्षा पाहायला नको म्हणून सिद्धार्थ यांचा विरोध असतानाही मी ते घर बदलायला त्यांना भाग पाडलं.
***

नवीन बंगल्यात आमचा सुखाचा संसार सुरू झाला तरी जुन्या घराकडच्या वार्ता कुणीतरी सांगायचंच! आमचं तडकाफडकी घर सोडणं मालकीणबाईंच्या जिवाला लागलं होतं. शेजाऱ्यापाजाऱ्यांजवळ माझं गुणवर्णन करून त्या सारख्या डोळ्याला पदर लावून बसायच्या. अशातच एकदा बागेत काम करताना त्यांच्या यजमानांना सर्पदंश झाला नि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास मला झाला. काहीही असलं तरी त्यांच्या सांत्वनासाठी जायलाच हवं म्हणून मी जायला निघाले; पण त्यांची भेट होणं माझ्या भाग्यात नव्हतं. त्यांची मुलं त्यांना आपल्यासोबत त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी घेऊन गेली होती. तिथं जाणं मला शक्‍य नव्हतं.
***

वर्षांमागून वर्षं उलटत गेली. नित्य नव्या जागी प्रपंच मांडताना मी घटना विसरूनही गेले होते; पण कर्मधर्मसंयोगानं सिद्धार्थ यांची पुन्हा त्याच ऑफिसमध्ये बढतीवर बदली झाली. मुलांच्या शिक्षणाच्या कारणानं या वेळी मला त्यांच्याबरोबर तिथं जाऊन राहणं शक्‍य नव्हतं, तरी ते तिथं हजर होतानाच्या स्वागतसमारंभाला मी आवर्जून उपस्थित राहिले. गावात फेरफटका मारता यावा म्हणून दोन दिवसांच्या मुक्कामाची सोय मी करून घेतली. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ ऑफिसला गेल्यावर एकटीच बाहेर पडले. इतक्‍या वर्षांत गाव बरंच बदललं होतं, तरी जुन्या खुणा अंगाखांद्यावर लेऊन खानदानी बाईसारखं आपला आब राखून होतं. गल्ली-बोळांतून फिरत अखेर मी पत्ता शोधून काढून पूर्वीच्या घरी पोचलेच. मला वाटत होतं की मी आल्याचं कळताच मालकीणबाई आमच्यातले जुने गैरसमज विसरून माझं स्वागत करतील...मीही झालं-गेलं ते सोडून देऊन त्यांची क्षमा मागेन... आणखी दोन महिन्यांनी मुलांच्या परीक्षा संपल्यावर इथं बिऱ्हाड करायचं ठरलं तर पुन्हा एकदा त्यांच्या छत्रछायेखाली राहता येईल...

अशा विचारांच्या नादात मी आमच्या जुन्या घरी कधी पोचले ते कळलंच नाही.
मालकीणबाई समोर येतील अशी अपेक्षा होती; पण तसं झालं नाही. एका अनोळखी मुलीनं माझं स्वागत केलं. त्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, मालकीणबाई दोन वर्षांपूर्वीच अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. त्यांच्या मुलांनी घराचा व्यवहार केला होता.

"कधीपासून स्वतःच्या हक्काच्या दोन खोल्या तरी असाव्यात असं मला वाटायचं. कर्ज काढून माझ्या यजमानांनी हा बंगला विकत घेतला नि आमची भरभराट झाली...'' तोंडभर हसत ती मुलगी सांगत होती. तिचा प्रत्येक शब्द मला, मी काय गमावून बसलेय, याची नव्यानं जाणीव करून देत होता.

loading image