शरद जोशी आणि शेतकरी चळवळ (सदानंद मोरे)

एका आंदोलनात सहभागी शरद जोशी. (संग्रहित छायाचित्र)
एका आंदोलनात सहभागी शरद जोशी. (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिमान झालेल्या शरद जोशी या नेत्याची पाहिजे तेवढी दखल घेतलीच गेली नाही. शरद जोशी यांची भूमिका समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या मांडणीची चर्चा करायला हवी. बदलत्या परिस्थितीचा आणि स्वतः जोशी यांच्या आकलनशक्तीचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचं आकलन व्यापक झालं. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त झालं. जातीव्यवस्था आणि ग्रामव्यवस्था यांना ओलांडून जोशी शेतीच्या व्यापक अर्थव्यवस्थेशी सांगड घालू इच्छित होते. प्रभावशाली चळवळ उभारण्यासाठी हे आवश्‍यकच होतं.

महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नातं अतूट आहे. सातशे वर्षांपूर्वी संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबात गेले. तिथल्या लोकांमध्ये मिसळले आणि धर्मजागरण करत त्यांनी संत परंपरेचं प्रवर्तन केले. या नात्याच्या उजळणीसाठीच ८८वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नामदेवांच्या कर्मग्रामात घुमान येथे भरवण्यात आले होते. त्या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मी नामदेव, गुरू गोविंदसिंग, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, शिवराम हरी राजगुरू यांचे संदर्भ देत महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले संबंध अधोरेखित केले; पण एक महत्त्वाचा दुवा माझ्याकडून राहून गेला. तो लक्षात आणून देण्याचं काम भानू काळे यांच्या ‘अंगारवाटा ः शोध शरद जोशींचा’ या शरद जोशींच्या चरित्रानं केलं. ऐंशीच्या दशकात शेतकरी संघटनेचं बीजारोपण महाराष्ट्रात करणाऱ्या शरद जोशींनी आपली संघटना थेट पंजाबात नेली आणि बघता-बघता पंजाबी शेतकऱ्यांचं नेतृत्व पटकावलं. आधुनिक इतिहासातला हा एक चमत्कारच म्हणावा लागतो. तथापि, राष्ट्रीयच काय; परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिमान झालेल्या या नेत्याची पाहिजे तेवढी दखल घेतलीच गेली नाही. हा व्यक्तिशः जोशींवर अन्याय होताच; पण ती इतिहासाशी प्रतारणाही ठरली असती.

सर्वसाधारण मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या शरद जोशींचं आत्मभान बालपणापासूनच अत्यंत तीव्र असल्याची नोंद काळे यांनी घेतली आहेच. नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम त्याच्या नेतृत्वावर आणि कार्यकौशल्यावर होत असतोच. त्या दृष्टीनं ही नोंद महत्त्वाची आहेच. जोशींच्या नेतृत्वशैलीचं, त्यांच्या पूर्ण स्वातंत्र्यवादी व्यक्तिवादाचं खरं मूळ त्यांच्या स्वभावातच सापडावं. शिवाय त्यांच्या आवडत्या लेखिकेच्या पुस्तकांच्या वाचनाचाही त्यात वाटा आहे. आयन रॅंड या अमेरिकी लेखिकेच्या कादंबऱ्या त्यांना आवडत. सामाजिक समतेचा स्वीकार हा जेव्हा युगधर्म बनला होता आणि जगातल्या अर्ध्याधिक राष्ट्रांनी कार्ल मार्क्‍सच्या समताधिष्ठित साम्यवादाचा अंगीकार केला होता, तेव्हा रॅंडबाईंनी आत्यंतिक व्यक्तिवादी नायकांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा आणि समाजाचा संघर्ष चित्रित केला. जग एकीकडं आणि हा नायक एकीकडं या झुंजीत नायकाच्या म्हणजे व्यक्तिवादी- स्वातंत्र्यवादी विचारांचा विजय होतो, असं दाखवलं.

शरद जोशी आयन रॅंडच्या कादंबरीतले नायक शोभले असते! ...तशा तोलामोलाचा प्रतिभावंत कादंबरीकार मात्र त्यांच्या वाट्याला आला असता तर. अर्थात, अजूनही वेळ गेलेली नाही.
तरीही रॅंडचे नायक आणि जोशी यांच्यामध्ये फरक आहे. रॅंडचे नायक एकाकी लढतात. संघटना वगैरे बांधण्याच्या भानगडीत पडत नाहीत. व्यक्तिनिष्ठ स्वातंत्र्यवादी लोकांची संघटना होईलच कशी? आणि झाली तर तिचं नेतृत्व कोण करणार? हरकत नाही. अमर्यादित स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान न स्वीकारताही अशा नेत्याचं नेतृत्व स्वीकारायला लोक गरजेपोटी पुढं येतील. स्वातंत्र्यपूर्व काळात खिलाफतीच्या रक्षणासाठी भारतातल्या मुस्लिमांनी महात्मा गांधींचं नेतृत्व त्यांच्या अहिंसा सत्याग्रहासकट स्वीकारलं होतं. जोशींच्या नेतृत्वाचं असंच काही झालं, असं म्हणता येईल काय?
ते काहीही असो, मला तरी जोशींचा संघर्ष हा व्यक्तिवादी विचार स्वीकारणाऱ्यानं आपल्यातल्या परोपकारी प्रेरणांना दाबून टाकत परहिताची कृत्यं करू पाहणाऱ्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष वाटतो. त्यातूनच त्यांच्या नेतृत्वाची शोकात्मिकेच्या जवळपास जाणारी कहाणी साकार झाली असावी. मला अशाच प्रकारची कादंबरी अभिप्रेत आहे, हे वेगळं सांगायला नको.

शरद जोशींची चर्चा करताना दुसऱ्या एका ‘शरद’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे कॉम्रेड शरद पाटील. शरद पाटील हासुद्धा अशाच भव्य कलाकृतीचा विषय आहे. आणि तेसुद्धा शरद जोशी यांच्यासारखेच किंबहुना अधिकच दुर्लक्षित राहिले.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या विचारांचा पुरस्कार करणारी ही दोन टोकं एकत्र आली होती. शरद जोशी मुक्त भांडवलशाही व्यवस्थेचा पुरस्कार करणारे, तर शरद पाटील समाजवादी व्यवस्थेचे समर्थक. शरद जोशी वर्णजातनिष्ठ समाजातून शेतकऱ्यांना वर्गजाणीव देणारे, तर शरद पाटील वर्गांमधील वर्णजातींकडं लक्ष वेधून त्यासाठी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी ओढवून घेणारे!
अर्थात, दोघांमध्ये एक समान धागा होता. तो म्हणजे स्त्रियांच्या प्रश्‍नांविषयीची आस्था. या आस्थेपोटीच बहुधा शरद पाटील, शरद जोशी यांनी चांदवड इथं आयोजित केलेल्या शिबिरासाठी हजारो आदिवासी स्त्री कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. व्यक्तिशः मला स्वतःला पाटील यांची ही कृती पटली नाही. मी ‘श्रमिक विचार’मध्ये अनावृत पत्र लिहून माझ्या भावना व्यक्त केल्या. शरद पाटील यांनी शरद जोशी यांच्या मेळाव्याला जाणे म्हणजे शरद पाटील यांनी शरद जोशी यांच्या जत्रेत स्टॉल लावण्यासारखं आहे, असे उपरोधिक भाष्यही केलं. त्यावर जोशींच्या काही स्त्रीवादी सहकाऱ्यांनी ‘‘तू नथीतून तीर मारतोस. सरळसरळ साहेबांबद्दल (जोशी) का लिहित नाहीस,’’ असं विचारलं. पुढं तसं लिहिण्याचाही योग यायचा होता.

खरं तर आमच्यातल्या अशा वादसंवादाची सुरवात जोशी यांच्या चाकण-आंबेठाण म्हणजेच प्रारंभिक पर्वातच झाली. त्या वेळी ते आंबेठाणमध्ये शेती करता-करता परिसरातल्या शेतकऱ्यांची संघटना उभारत होते. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं. तेव्हा त्यांचा भर कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होता. हे शेतकरी सहसा कोरडवाहू, फार तर विहीर बागायत करणारे असत.

शेतकऱ्यांची संघटना बांधण्यासाठी जोशी यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. शेतकरी हा मनुष्य हा दिवसा गावात सापडणं अवघडच. जोशी रात्री-अपरात्री त्यांच्या प्रसिद्ध बुलेटवर बसून गावात धडकायचे. गावातल्या भल्या लोकांना पंचायतीच्या किंवा सोसायटीच्या इमारतीत, चावडीवर किंवा देवळात बोलवायचे आणि त्यांच्यासमोर आपले विचार मांडायचे. असेच एकदा ते आमच्या देहूगावात आले. त्यांचे विचार ऐकायला आणि त्यांच्याशी चर्चा करायला जमलेल्या निमंत्रितांमध्ये एक मीही होतो. त्या वेळी ते कोरडवाहू शेतकऱ्यांची संघटना करायची आणि चळवळ उभारायची भाषा बोलत होते. मला हा विचार अव्यवहार्य वाटला. मी स्पष्टपणे सांगितलं, की कोरडवाहू शेतकरी हे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारासारखे असतात. त्यांचं पोट हातावर असतं. इकडे मिळवावे आणि तिकडे खर्च केले, अशा अवस्थेत उत्पादित माल न विकता व्यापाऱ्यांची वा जनतेची कोंडी करणं त्यांना शक्‍य नाही. चळवळ करायची असेल, तर त्यासाठी बागायतदार-ऊस आणि कापूस या पिकांचे उत्पादक शेतकरी टाळता येणार नाहीत. त्यांना या गोष्टी शक्‍य होतील. जोशींना तेव्हा तरी ते पटत नव्हतं. बडे बागायतदार म्हणून गणले जाणारे शेतकरी हे भांडवलदारांसारखेच असल्याची तेव्हा त्यांची धारणा असावी; पण लवकरच ती पालटली आणि पुढचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. आमच्या या चर्चेनंतर मी ‘केसरी’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात एक पत्र लिहिल्याचंही मला आठवतं.

शरद जोशी यांची भूमिका समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या मांडणीची चर्चा करायला हवी. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची पहिल्यांदा मांडणी करण्याचं श्रेय महात्मा जोतिराव फुले यांच्याकडं जातं. त्यांची ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आणि ‘इशारा’ ही पुस्तकं या संदर्भात फारच महत्त्वाची आहेत. त्यांच्या तपशीलात जायचं इथं कारण नाही. इथं सांगायचा मुद्दा असा आहे, की जोतिरावांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचं विश्‍लेषण तत्कालीन जातिव्यवस्थेच्या चौकटीत केलं होतं. अर्थात ते करताना त्यांनी तत्कालीन परकीय ब्रिटिश राजवटीचा विसर पडू दिला नव्हता. ‘आसूडा’चं प्रकाशन त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या ‘दीनबंधू’ पत्रातून क्रमशः केलं. त्यातला काही भाग सरकारची बदनामी करणारा असल्यामुळे त्यासाठी कायदेशीर कारवाई होईल, या भीतीनं लोखंडे यांनी तो छापला नाही. या कारणानं या दोन सत्यशोधकांच्या संबंधांत व्यत्ययसुद्धा आला होता. खरं तर जोतिरावांनी ‘सरकार’ (state) या गोष्टीवरच हल्ला चढवून तिचं आगंतुकत्व आणि दमनाचं आणि शोषणाचं स्वरूप सिद्ध केलं होतं.

जोतिरावांनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची मांडणी त्रिंबक नारायण अत्रे यांनी ‘गावगाडा’ या पुस्तकातून केली. ती त्यांनी फुले यांच्याप्रमाणं जातिव्यवस्थेच्या संदर्भात न करता ग्रामव्यवस्थेच्या चौकटीत केली. ही चौकट म्हणजेच गावगाड्याचं रूपक.

त्रिंबकराव अत्रे यांच्या मांडणीनंतरच्या काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शेतकरी परिषदा भरवून काही चळवळी केल्या; पण त्यातून पण त्यांची वेगळी अशी संकल्पनात्मक चौकट स्पष्ट होत नाही. त्यासाठी शरद जोशी यांच्यापर्यंत थांबावं लागतं.

शरद जोशी यांच्या शेतकरी प्रश्‍नांच्या आकलनात त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये नोकरीच्या निमित्तानं केलेल्या वास्तव्यात आणि तिथल्या समाज जीवनाच्या घेतलेल्या अनुभवासही महत्त्वाचं स्थान दिले आहे. जोशी यांच्या आयुष्यातल्या या कालखंडाबद्दल काळे यांनी विस्तारपूर्वक विवेचन केलं आहे. एरवी हा कालखंड आपल्यासाठी अज्ञातच राहिला असता.

फुले आणि अत्रे यांच्यानंतर आपण जोशी यांच्याकडे येतो, तेव्हा लक्षात येतं, की बदलत्या परिस्थितीचा आणि स्वतः जोशी यांच्या आकलनशक्तीचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचं आकलन व्यापक झालं आहे. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त झालं. जातिव्यवस्था आणि ग्रामव्यवस्था यांना ओलांडून जोशी शेतीच्या व्यापक अर्थव्यवस्थेशी सांगड घालू इच्छितात. प्रभावशाली चळवळ उभारण्यासाठी हे आवश्‍यकच होतं; परंतु भारतीय समाजात आणि ग्रामीण संदर्भ पूर्णपणे संपुष्टात आले आहेत, असं म्हणता येत नाही. कॉम्रेड शरद पाटील यांच वेळी जातिव्यवस्थेच्या अस्तित्वाकडं आणि प्रभावाकडे लक्ष वेधत होते. म्हणजेच एका पातळीवर या दोन शरदांचं काम एकमेकांना पूरकही होतं. अर्थात ते पूरक होतं, असं नुसतं म्हणून चालणार नाही. ती पूरकता नेमकेपणानं दाखवता आली पाहिजे. शरद पाटील यांना अनावृत पत्र लिहिलं, तेव्हा ती माझ्याही लक्षात आली नव्हती. विशेष म्हणजे ती या दोघांनीही नीटपणे स्पष्ट केलेली दिसत नाही. वर्गवर्णजातस्त्रीदास्यांतक, असं शरद पाटील यांच्या मांडणीचं स्वरूप होतं. शरद जोशी यांची चळवळ स्त्रीदास्याच्या अंतासाठी शंभर टक्के अनुकूल होती, यात शंका नाही. दुसरा मुद्दा शेतकरी हा एक आर्थिक वर्ग समजून जोशी चळवळ उभारीत होते. त्यात शरद पाटील यांना काही अडचण असायचं कारण नव्हतं. फक्त मार्क्‍सवादापासून फारकत घेतलेले पाटील शेतकरी नावाच्या वर्गात मोडणाऱ्यांच्या शोषणामागं त्यांनी मराठा-कुणबी-शुद्र जात वर्गाचं असणं कसं आणि कितपत जबाबदार ठरतं हे पाहणार!

या साऱ्या प्रकरणाचा व्यापक सैद्धांतिक पातळीवरून उलगडा करता येतो का, हे पाहायला हरकत नसावी; पण त्यासाठी आपल्याला युरोपच्या इतिहासात घुसायला हवं. आधुनिक अभिजात भांडवली अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ यानं ज्या अर्थशास्त्राच्या पाश्‍वभूमीवर आपला विचार मांडला, ते अर्थशास्त्र शेतीचं अर्थशास्त्र होते. त्यालाच अर्थशास्त्रातला ‘फिजिओक्रॅट’ संप्रदाय म्हणतात. मध्ययुगीन काळात पाळंमुळं रुतलेला युरोपमधला तेव्हाचा उत्पादनाचा स्रोत शेती हाच होता. स्मिथ हा औद्योगिकरणाच्या उंबरठ्यावर असलेला भांडवलशाहीचा प्रवक्ता होता. भांडवल हा या नव्या युगातला उत्पादन स्रोत असणार होता, जमीन नाही. नव्या भांडवली अर्थशास्त्रात शेतीला देण्यात आलेलं गौण स्थान मार्क्‍सला मान्यच होतं; मात्र तो भांडवली अर्थशास्त्रातल्या भांडवल या घटकाच्या ऐवजी श्रम या घटकाची प्रस्थापना करू पाहात होता. त्याच्यासाठी श्रम हा प्रधान उत्पादन स्रोत होय. थोडक्‍यात काय, की अभिजात भांडवली अर्थशास्त्र काय किंवा मार्क्‍सवादी अर्थशास्त्र काय, दोघांचीही प्रवृत्ती शेती आणि शेतकरी यांना दुय्यम मानण्याकडंच होती.

युरोपातील देशांमधली भांडवलशाही उभी राहिली, ती मुख्यत्वे त्यांच्या जगभरच्या वसाहतींच्या शोषणातून. त्यात तिथल्या शेतकऱ्यांचं शोषणही होतंच. रशियाकडं अशा वसाहती नव्हत्या आणि कम्युनिझम आणण्यासाठी तर औद्योगिक समाजाची निर्मिती होणं अत्यावश्‍यक होते. ही निर्मिती रशियानं आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांच्या शोषणातून साध्य केली.

१९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारतापुढेही वासाहतिक काळातल्या मागलेपणाचा अनुशेष भरून काढायची समस्या होती. त्याशिवाय आधुनिक जगात उभं राहणं त्याला शक्‍य नव्हतं. त्यासाठी त्यालाही शेतकऱ्यांचं शोषण करणं भाग पडलं. हे शोषण रशियातल्या शेतकऱ्यांएवढं नसेल; पण शेवटी शोषण हे शोषणच.

याचाच अर्थ असा होतो, की भांडवली अर्थशास्त्र असो किंवा मार्क्‍सवादी, दोघंही शेतकऱ्यांचं शोषण टाळू शकत नाहीत. त्यासाठी कुठं तरी ‘फिजिओक्रॅटिक’ संप्रदायाशी नातं जोडणं आवश्‍यक ठरतं. शरद जोशी यांनी नेमकं हेच केलं. भानू काळे यांनी जोशी यांचं जे अवतरण ग्रंथारंभी घेतलं आहे, ते या संदर्भात फार महत्त्वाचं आहे. ‘जगातला पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला. पंचमहाभूतांच्या लक्ष्यावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसांच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करत फळाला येतात. एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो. ज्या दिवशी हे लक्षात आलं, त्या दिवसापासूनच शेतीमध्ये तयार झालेली ही बचत लुटून न्यायला सुरवात झाली. आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे.’

जोशी सरळ-सरळ फिजिओक्रॅटिक स्कूलचं पुनरुज्जीवन करू पाहतात. औद्योगिक भांडवलशाहीच्या संदर्भात मार्क्‍सनं मांडलेली श्रमिकांच्या श्रमातून उत्पन्न झालेल्या वरकड मूल्याची आणि त्या मूल्याच्या भांडवलदारांकडून होणाऱ्या शोषणाची संकल्पना आपल्याला माहीत आहेच. शरद जोशी हीच संकल्पना फिजिओक्रॅटिक अर्थशास्त्राच्या चौकटीत मांडतात. ‘माणसांच्या श्रमांचा स्पर्श’ म्हणजे अर्थातच शेतकऱ्यांचे श्रम. एका दाण्यातून शंभर दाणे आपल्या श्रमानं निर्माण करणारा शेतकरी पुढील हंगाम येईपर्यंत एका दाण्यानंसुद्धा मोताद होतो आणि त्याला आत्महत्या करावी लागते, हे शोषण नाही काय?

भांडवलशाहीतल्या श्रमिकांचं शोषण संपुष्टात आणण्यासाठी मार्क्‍सनं श्रमिकांचं राज्य आणण्याचा कार्यक्रम दिला. त्याप्रमाणं जोशी शेतकऱ्यांच्या राज्याची भाषा करताना आढळत नाहीत. खरं तर त्यांना एकूणच राज्यसंस्था या प्रकाराबद्दलच अनास्था, नव्हे तुच्छता आहे. गेल्या शतकात दिनकरराव जवळकर आणि प्रबोधनकार ठाकरे ‘शेतकऱ्यांचं स्वराज्य’ आणण्याची भाषा बोलत होते. जोशी यांनी तसं न करता एकदम राजाजींच्या स्वतंत्र पक्षाचं पुनरुज्जीवन करण्याचं धाडस केलं. ही त्यांची मोठीच चूक होती. अर्थात, त्याचं कारण ते समतेपेक्षा स्वातंत्र्य या मूल्याला अधिक महत्त्व देत होते हे आहे.

ते काहीही असो. शरद जोशी आणि त्यांचं कार्य इतिहासात अजरामर झालं आहेच, हे मात्र निर्विवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com