समताधिष्ठित समाजरचनेचा पुरस्कर्ता (सदानंद मोरे)

dr sadanand more's article in sapatarang
dr sadanand more's article in sapatarang

पारंपरिक कर्मठ कम्युनिस्ट विचारांच्या मर्यादा समजल्यामुळं कॉम्रेड शरद पाटील त्या चाकोरीतून नंतर बाहेर पडले; पण पुढं त्यांना मुळात मार्क्‍सच्याच विचारांच्या मर्यादांची जाणीव होऊ लागली. याचा अर्थ त्यांनी मार्क्‍सचा समाजवाद किंवा क्रांतीचा विचार नाकारला असा होत नाही; पण जातिप्रधान भारतीय परिस्थितीच्या आकलनासाठी मार्क्‍सचा सिद्धान्त पुरेसा नाही व त्याला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोड द्यायची गरज आहे, या निष्कर्षांपर्यंत ते आले. त्यातून त्यांचा मार्क्‍स-फुले- आंबेडकरवाद (माफुआं) सिद्ध झाला.

विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर प्रभाव टाकणाऱ्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांत साधर्म्य आहे. या तीन व्यक्ती म्हणजे शरद जोशी, शरद पाटील आणि शरद पवार. या तिघांची कार्यक्षेत्रं व कार्यपद्धती वेगळ्या असल्यामुळं त्यानुसार त्यांच्या प्रसिद्धीत व लोकप्रियतेत फरक पडणार हे उघड आहे; पण तो मुद्दा वेगळा.
या तीन शरदांपैकी शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्धीस आले. लाखो शेतकऱ्यांचे मेळावे यशस्वीरीत्या आयोजित करून, आवश्‍यक तेव्हा रास्ता रोको आंदोलन करून शरद जोशींनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांची झोप उडवली होती.

शरद पवारांचा बाजच वेगळा. घरी शेतकरी कामगार पक्षाची पार्श्‍वभूमी असलेल्या शरदरावांनी तरुणपणीच काँग्रेसची कास धरली. सत्तेच्या माध्यमातून विकास हे काँग्रेसचे धोरण होते. समाजातल्या त्यातही भारतातल्या विविध जाती-धर्मयुक्त समाजातल्या समूहांच्या हितसंबंधांमध्ये संघर्ष होणं अपरिहार्य असल्याची जाणीव काँग्रेसनेतृत्वात पहिल्यापासूनच होती. तथापि, या परस्परविरोधी हितसंबंधांचा लसावि काढून तोच कार्यक्रम म्हणून स्वीकारून काँग्रेसनं सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येत नाही. असा कार्यक्रम राबवण्यात शरद पवारांचा हात कुणी धरू शकेल, असं वाटत नाही. त्यामुळं ते महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले असल्यास त्यात आश्‍चर्य वाटायचं कारण नाही. याउलट ‘शरद जोशी म्हणजे फक्त शेतकरीवर्गाच्या हितासाठी संघर्ष करणारे’ अशी प्रतिमा रूढ झाल्यानं त्यांच्या लोकप्रियतेला मर्यादा पडणार, हेही उघड आहे.

शरद पाटलांच्या बाबतीत लोकप्रियता तर सोडाच; पण पुरेशी प्रसिद्धीही त्यांना लाभली नाही. एकतर ते कार्ल मार्क्‍सप्रेरित कम्युनिस्ट विचारांचे व पक्षाचे. हा पक्ष कामगारांचा किंवा श्रमिकांचा पक्षपाती असल्यानं त्याच्या लोकप्रियतेला एक स्वाभाविक मर्यादा होतीच होती. त्यातही पक्षात राहून आपलं कर्तृत्व सिद्ध करत पक्षातच डांगे, नंबुद्रीपाद अशा नेत्यांप्रमाणे सर्वोच्च स्थान पटकावयाचं सोडून पाटलांनी पक्षाच्या अधिकृत वैचारिक पायालाच आव्हान दिल्यामुळं पाटलांनी हकालपट्टी ओढवून घेतली.

आर्थिक वर्ग आणि वर्गसंघर्ष यांची भाषा बोलणाऱ्या कम्युनिस्ट पक्षात शरद पाटलांनी जातींची आणि त्यातही ब्राह्मण-अब्राह्मणी संघर्षाची भाषा आणली. ती पक्षाला खपणं शक्‍यच नव्हतं.
खरंतर अशा परिस्थितीत पाटलांची लोकप्रियता निदान त्यांच्याच स्वतःच्या मराठा जातीत तरी वाढायला हवी होती की नाही? पण तसं झालं नाही. कारण जातींच्या भाषा बोलणाऱ्या पाटलांमध्ये जातीयता, जातीयवाद, जातिमत्सर यांचा लवलेशही नव्हता. त्यांची मांडणी पूर्णतः वैचारिक किंवा ‘ॲकॅडेमिक’ अशीच होती. त्यामुळं त्यांना त्या अर्थानं कोणत्याच जातीचं नेतृत्व मिळणं शक्‍य नव्हतं. जातींचं नेतृत्व करणाऱ्यांना वैचारिकतेचे काही घेणं-देणं नसतं.

शरद पाटलांच्या प्रसिद्धीत व लोकप्रियतेत आलेली दुसरी अडचण म्हणजे त्यांच्या मांडणीतली दुर्बोधता. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेब यांना लोक ‘अवघडदास’ असं म्हणत. कारण, त्यांची गायकी समजायला अवघड, अनवट अशी होती. पाटील हे ‘ॲकॅडेमिक्‍स’मधले अवघडदासच होत! त्यामुळं त्यांच्या वाटेला जायला सहसा कुणी धजावत नसे.
पाटलांच्या मातुल घराण्यात ब्राह्मणेतर चळवळीचं वातावरण होतं. माधवराव दिवाण हे खानदेशातले नाणावलेले ब्राह्मणेतर कार्यकर्ते. भिडेनामक कुणीएक जिल्हाधिकारी बहुजनांशी जातीय पद्धतीनं वागतात म्हणून दिवाणांनी त्यांच्याशी संघर्ष केला. त्यात त्यांना यश येऊन शेवटी त्या जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली. ही अर्थातच ब्रिटिश अमदानीतली घटना आहे. अशा परिस्थितीत पाटलांना खरंतर शेतकरी कामगार पक्ष जवळचा वाटायला हवा होता; पण तसं झालं नाही. ते सरळ सरळ कम्युनिस्ट पक्षाच्या छावणीत दाखल झाले आणि तेही पूर्णवेळ जीवनदायी कार्यकर्ता म्हणून!

त्या वेळच्या भारतातल्या कम्युनिस्टांमध्ये आणि एकूणच डाव्या चळवळीतले कार्यकर्ते-नेते-अभ्यासक यांच्यात सगळ्यात महत्त्वाचा व निर्णायक प्रश्‍न ‘मार्क्‍सवाद कुणाला अधिक चांगला समजला आहे,’ हा असायचा. प्रस्थापित कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचं मार्क्‍सवादाचं आकलन सदोष आहे व ते सुधारण्याची संधी पक्षात मिळत नाही म्हणून कम्युनिस्ट पक्षातून ‘लाल निशाण गट’ बाहेर पडला. एस. के. लिमये, यशवंत चव्हाण, संतराम पाटील, भास्कर जाधव, ए. डी. भोसले, दत्ता देशमुख, व्ही. एन. पाटील आदी मंडळी याच पक्षाची. तिकडं शेतकरी कामगार पक्षानंसुद्धा मार्क्‍सवादाचा अंगीकार केला होता. ‘आपल्याला मार्क्‍सवाद सगळ्यांपेक्षा, अगदी कम्युनिस्ट पक्षातले डांगे वगैरेंपेक्षाही अधिक चांगला समजतो,’ या भांडवलावर शंकरराव मोरे यांनी शेकापवरची आपली पकड मजबूत केली.

अर्थात डांगे, लिमये, मोरे अशा सगळ्याच डाव्या नेत्यांचा मार्क्‍सवाद हा मार्क्‍स-लेनिन-स्टॅलिनवाद होता. रशियातल्या कम्युनिस्ट पक्षानं मार्क्‍सवादाचा लावलेला अन्वयार्थ योग्य असल्याचं गृहीत धरूनच त्यांचं विचारमंथन आहे. त्याबाहेर जाऊन विचार करणारे ट्रॉट्‌स्की, लुक्‍झेंबर्ग अशा विचारवंतांना व त्यांच्या विचारांना बहिष्कृतच मानलं जायचं. खरंतर शेकापच्या नेत्यांकडून प्रस्थापित मार्क्‍सवादाच्या आहारी न जाता, त्यांनीच मान्य केलेल्या जोतीराव फुले यांच्या विचारांना अनुसरून नव्या स्वातंत्र्यमांडणीची अपेक्षा होती; पण त्यांच्याकडून ते होऊ शकलं नाही.
डाव्या विचारांची ही कोंडी कॉम्रेड शरद पाटील यांनी फोडली. त्यांना ब्राह्मणेतर चळवळीची पार्श्‍वभूमी लाभली नसती, तर त्यांनासुद्धा हे कितपत शक्‍य झालं असतं, याची शंकाच आहे. या पार्श्‍वभूमीमुळंच त्यांच्या मनातली जोतीरावांच्या विचारांची ज्योत विझून गेली नव्हती. त्यामुळंच कार्ल मार्क्‍सचा वर्गाधिष्ठित विचार भारतीय परिस्थितीत जसाच्या तसा लागू करण्याऐवजी इथल्या वर्ण-जात वास्तवाची दखल घेऊनच मांडणी व चळवळी केल्या पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या आणखीही असं लक्षात आलं, की मार्क्‍सवादात स्त्रियांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत; त्यामुळं या प्रश्‍नांकडंही स्वतंत्र दृष्टीनं पाहण्याची आवश्‍यकता आहे. त्यांच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल याच दिशेनं झाली.

कम्युनिस्ट पक्षात आपली कशी कोंडी झाली, याचं वर्णन करताना पाटील सांगतात ः ‘‘एक शूद्र म्हणून जेवढं जाणावयाचं - नवब्राह्मणी कम्युनिस्ट नेतृत्वाच्या कटाक्षानुसार - त्यापेक्षा जास्त जाणावयाची हाव.’’

अशा ‘हावरट’ कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनेत स्थान नसतं. त्यामुळं परिणाम व्हायचा तोच झाला. पाटलांना पक्ष सोडावा लागला; पण पाटील हार मानणाऱ्यांपैकी नव्हते व हाय खाणाऱ्यांपैकी नव्हते. प्राचीन भारतीय इतिहासातली कोडी उलगडायची झाली तर संस्कृत भाषेवरच्या प्रभुत्वाला पर्याय नाही, याचा अंदाज त्यांना एव्हाना आला होता. त्यामुळं त्यांनी धाव घेतली ती थेट बडोदे इथले संस्कृतचे विद्वान मणिशंकर उपाध्याय यांच्याकडं. उपाध्याय यांच्याकडं त्यांनी पाणिनीच्या व्याकरणाचं रीतसर अध्ययन केलं.

पाणिनीचं व्याकरण शिकताना त्यांचं लक्ष पाणिनी व त्याच्या भाष्यकारांनी निर्दिष्ट केलेल्या अन्य व्याकरणकारांकडं गेलं. त्यातले काही व्याकरणकार पाणिनीच्या वैदिक परंपरेतल्या व्याकरणकारांपेक्षा वेगळे आहेत, हेही त्यांच्या लक्षात आलं. या परंपरेचं नामकरण त्यांनी ‘अब्राह्मणी परंपरा’ असं केलं. या व्याकरणाचा अभ्यास करताना ते या निष्कर्षापर्यंत आले, की भारतातला वैचारिक, सामाजिक व राजकीय संघर्ष हा मुख्यत्वे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी परंपरांमधला आहे व त्याच दिशेनं संशोधन करून इतिहासाची फेरमांडणी करायला हवी.

या संदर्भात ‘ब्राह्मणी’ आणि ‘अब्राह्मणी’ हे शब्दप्रयोग जातिवाचक नाहीत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करायला हवं. अब्राह्मणी व्याकरणाचे कितीतरी विद्वान वर्णानं ब्राह्मण असू शकतात.
भगवान बुद्धांच्या शिष्यांमध्ये व भाष्यकारांमध्ये अनेक ब्राह्मण-पंडित होते. विशेषतः ज्यांच्या आधारे पाटलांनी आपला नवसाम्यवाद सिद्ध केला ते धर्मकीर्ती आणि दिङ्‌नाग हे बौद्ध तत्त्ववेत्ते ब्राह्मणच होते.

या अब्राह्मणी व्याकरणामुळं शब्दांच्यात वेगळ्या व्युत्पत्ती सुचू लागल्या. त्यामुळं त्यांचे अर्थ बदलले. त्यातून इतिहास नव्यानं उलगडू लागला. त्यानंतर पाटलांनी मागं वळून पाहिलेच नाही! वेद, रामायण, महाभारत, संस्कृत नाटकं, नाट्यशास्त्र, बौद्ध व जैनांचे संस्कृत-प्राकृत ग्रंथ ते वाचत आणि वाचतच गेले. बहुजनांच्या संस्कृत ज्ञानाचा ‘बॅकलॉग’ त्यांनी एकट्यानं भरून काढला, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.

पारंपरिक कर्मठ कम्युनिस्ट विचारांच्या मर्यादा समजल्यामुळं त्या चाकोरीतून पाटील बाहेर पडले; पण पुढं त्यांना मुळात मार्क्‍सच्याच विचारांच्या मर्यादांची जाणीव होऊ लागली. याचा अर्थ त्यांनी मार्क्‍सचा समाजवाद किंवा क्रांतीचा विचार नाकारला असा नाही; पण जातिप्रधान भारतीय परिस्थितीच्या आकलनासाठी मार्क्‍सचा सिद्धान्त पुरेसा नाही व त्याला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोड द्यायची गरज आहे, या निष्कर्षापर्यंत ते आले. त्यातून त्यांचा मार्क्‍स-फुले-आंबेडकरवाद (माफुआं) सिद्ध झाला. या टप्प्याचं श्रेय ते प्रा. रावसाहेब कसबे यांना देतात.

मुळात हाडाचे कार्यकर्ते असलेले, विविध चळवळी करून तुरुंगांची हवा चाखलेले कॉ. पाटील केवळ वैचारिक मांडणी करून स्वस्थ बसतील हे शक्‍यच नव्हते. आपल्या समाजवादी विचारांनुसार क्रांती करण्यासाठी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची उभारणी केली. त्याचं नाव सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. मार्क्‍स-फुले किंवा आंबेडकर या आपापल्या प्रेरणास्थानांना दैवत बनवून त्यानुसार विचारांचा वा कृतीचा व्यवहार करणारी मंडळी पाटलांच्याच मागं जातील, हे शक्‍यच नव्हतं. त्यामुळं त्यांच्याच पक्षाला अनुयायी तसे कमी मिळाले शिवाय त्यांच्याच उतरायुष्यात हा पक्षही फुटला ते वेगळे!
मार्क्‍स-फुले-आंबेडकरवाद मांडून पाटील तिथंच थांबले नाहीत. त्यांना समाजवादी क्रांतीच्या पाइकांना त्यासाठी योग्य ती वैचारिक हत्यारं घ्यायची होती. उपरोक्त प्रत्येक विचारवंताच्या मर्यादा त्यांच्या लक्षात याव्यात व त्यांना विधायक नकार (sublation) देत ते पुढंच जात राहिले. त्यांच्याच शब्दांत त्यांच्या वैचारिक प्रवासाची मांडणी करायची झाल्यास (दासशूद्रांची गुलामगिरी खंड-१ ः भाग १ नंतर) ‘जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व’च्या १९९६ मधल्या प्रकाशनापासून ‘अब्राह्मणी बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीला ‘समाजवादी सौतांत्रिकवादी’ या नव्या सौंदर्यशास्त्राची जोड मिळाली. २००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘खंड ३ ः जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी मूर्ती’पासून या अन्वेषणपद्धत व सौंदर्यशास्त्र ‘सौतांत्रिक मार्क्‍सवाद’ या नव्या तत्त्वज्ञानावर अधिष्ठित झाली.
पाटलांचा हा वेग सर्वसामान्य वाचक, जिज्ञासूच काय; परंतु कार्यकर्त्यांनाही परवडणारा नव्हताच. ‘माफुआं’पासून सुरू झालेला हा वैचारिक प्रवास सौतांत्रिक मार्क्‍सवादाशी येऊन स्थिरावला. खरंतर हा प्रवास नसून झेपच आहे.

पहिल्याच टप्प्यावर पाटलांनी व्युत्पत्ती आणि मानववंशशास्त्र यांचा आधार घेत मार्क्‍सवादातल्या प्राथमिक साम्यवादाची संकल्पना नाकारली. त्यांच्या मते भारतात पूर्वी मातृसत्ताक पद्धती होती, या सत्तेतून गणसत्ता विकसित झाली, तिचा छडा लावताना ते आद्य गणमाता निॡतीपर्यंत पोचले. ब्राह्मणी पुराकथांमध्ये या अवस्थेचा व गणमातांचा विपरीत अर्थ कसा लावण्यात आला, हेही त्यांनी सांगितलं.

मातृसत्ताक पद्धतीचा विचार करताना त्यांना अवैदिक शाक्त तंत्रमार्गाचाही नवा अन्वयार्थ स्फुरला. शाक्ततंत्रमार्गात लोक समजतात त्याप्रमाणे अनैकित वामाचार वगैरे काही नसून, तो उलट समता प्रस्थापित करण्याचा विज्ञानपूर्व मार्ग होता.

या सर्व विचारप्रक्रियेत पाटलांनी रामायण, महाभारत, बुद्धविचार आदी सगळ्याच गोष्टींचा वेगळा अन्वयार्थ लावला आणि मुख्य म्हणजे वेगळं असं अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रही सिद्ध केलं. या अनित्य जगाचा अन्वयार्थ लावून इच्छित परिवर्तन घडवून आणण्यासाठी गत्यात्मक तर्कशास्त्र पाटलांना हवं होतं. ते त्यांना बौद्ध दार्शनिक दिङ्‌नाग यांच्या विचारांमध्ये गवसलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नेणिवेच्या मानसशास्त्राचा. तेही त्यांना बौद्ध विचारांमधून मिळालं. थोडक्‍यात मार्क्‍सवाद, फ्रेजर, बोशोफेन आदी पाश्‍चात्य मानववंशशास्त्रज्ञ, युंगसारखे मानसशास्त्रज्ञ, शाक्ततंत्र, अब्राह्मणी व्याकरण, सौतांत्रिक बुद्धाचं तत्त्वज्ञान या वेगवेगळ्या विचारांच्या महासमन्वयातून पाटलांच्या सौतांत्रिक मार्क्‍सवादाचं अद्भुत रसायन सिद्ध झालं. त्याचा अंगीकार करूनच भविष्यातली सामाजिक क्रांती शक्‍य आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. सर्वसाधारण कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना सोडाच; पण पॉलिट ब्यूरोच्या सदस्यांनासुद्धा हा डोस रुचणं-पटणं अवघड आहे.

शरद पाटलांची व माझी चर्चा अधूनमधून होत असे. थोडाफार पत्रव्यवहारही होता. पाटलांचा प्रवास सुरू असताना मी लाल निशाण गटाच्या ‘श्रमिक विचार’ पत्रातून लिहीत असे. ‘यादवांच्या अंतर्गत कलहात श्रीकृष्णानं सत्रापिताच्या मालकीचा स्यमंतक मणी आपल्या ताब्यात घेतला,’ असं त्यांनी लिहिलं होतं. मी हा मणी ‘कृष्णानं अक्रूराकडंच ‘ट्रस्टी’ या नात्यानं राहू दिला,’ असं दाखवून दिलं. ‘ॲकॅडेमिक’ व्यवहाराला साजेशा पद्धतीनं पाटलांनी ते मान्य केलं.

पाटील निॡती, शूर्पणखा, गणदास आदीं बाबींपर्यंत मागं जायचे. मात्र, चळवळ करायची असेल, तर लोकांचं भूतकाळातल्या इतक्‍या पूर्वीच्या व्यक्तींशी तादात्म्य होत नाही, तो फक्त वैचारिक खेळ ठरतो. महाराष्ट्रातले लोक यादवकाळापर्यंत-चक्रधर-ज्ञानेश्‍वरांपर्यंत जातात व शिवकाळापर्यंत येऊन थांबतात, तेव्हा या अलीकडच्या इतिहासाचा अर्थ लावण्याची गरजही मी अधोरेखित केली. माझ्या सूचनेमुळं नव्हे, तर पद्धतिशास्त्राची व चळवळीची गरज म्हणून पाटील याही प्रांतात शिरले. थोडक्‍यात, पाटील यांच्या संशोधनाचं मोल फार मोठं आहे. समताधिष्ठित समाजरचना हवी असलेल्या कुणालाही कॉम्रेड शरद पाटलांना डावलून पुढं जाता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com