फेरफटका मराठीनगरीचा (सदानंद मोरे)

सदानंद मोरे
रविवार, 8 जानेवारी 2017

‘इये मराठीचिये नगरी’...संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मराठी भाषेला नगरीची उपमा दिली आहे. मराठी भाषा, मराठीभाषक आणि या मराठीभाषकांचा महाराष्ट्रदेश या सगळ्यांचं आकलन करण्यासाठी ही ओवी उपयुक्त होय. याच ओवीच्या आधारे मराठीनगरीची, मराठी भाषेची, मराठीभाषकांच्या पराक्रमांची-उपक्रमांची सैर घडवून आणणारं हे सदर म्हणजे एका अर्थानं भाषेतला ‘हेरिटेज वॉक’ - वारसापर्यटनच असेल!

‘इये मराठीचिये नगरी’...संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मराठी भाषेला नगरीची उपमा दिली आहे. मराठी भाषा, मराठीभाषक आणि या मराठीभाषकांचा महाराष्ट्रदेश या सगळ्यांचं आकलन करण्यासाठी ही ओवी उपयुक्त होय. याच ओवीच्या आधारे मराठीनगरीची, मराठी भाषेची, मराठीभाषकांच्या पराक्रमांची-उपक्रमांची सैर घडवून आणणारं हे सदर म्हणजे एका अर्थानं भाषेतला ‘हेरिटेज वॉक’ - वारसापर्यटनच असेल!

गंभीर विषयावर वैचारिक लेखन करायचं झाल्यास त्यात लेखकाचा ‘मी’ सहसा डोकावू नये, असा संकेत आहे. तरीही निदान सुरवातीला तरी या प्रकारच्या लेखनाकडं व या विषयाकडं मी कसा वळलो, हे समजण्यासाठी ‘मी’चा एवढा वापर मला आवश्‍यक वाटतो.

गोष्ट अगदी लहानपणातली आहे. संत तुकाराममहाराजांच्या गावात म्हणजे श्रीक्षेत्र देहू इथं लहानाचा मोठा होत असलेल्या मुलाला वातावरण लाभायचं ते अर्थातच वारकरी संप्रदायाचं. तुकोबांच्या समकालीन संत बहिणाबाई यांनी ‘देहूगावी थोर भक्तिपंथ’ असं या गावाचं वर्णन केलेलं आहे. तुकोबांचे आठवे पूर्वज विश्‍वंभरबाबा यांनी देहूमधल्या आपल्या राहत्या घरी विठ्ठल आणि रखुमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यापासून या गावाला भक्तिपंथाच्या केंद्राची कीर्ती लाभली. तुकोबांमुळं ती अधिक वाढली. तुकोबांच्या पश्‍चात त्यांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी वारीच्या पारंपरिक पद्धतीला ज्ञानोबा-तुकोबांच्या संयुक्त पालखीची जोड दिली. तेव्हाच्या मराठा राज्यकर्त्यांच्या सहकार्यामुळं देहू देवस्थानचं रूपांतर संस्थानात झालं.

महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून भाविक-भक्त आणि जिज्ञासू देहूगावी येतच असतात; परंतु शुद्ध एकादशीला तिथं एक छोटी वारीच भरते. तुकारामबीजेचा म्हणजे तुकोबांच्या वैकुंठगमनाचा उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यात साजरा होत असतो. शिवाय वारकऱ्यांचे हरिनामसप्ताह ठराविक वेळी होत असतात. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात तर ३० दिवस भजन, कीर्तन, पारायण, प्रवचन अशा कार्यक्रमांची पर्वणीच असते. ‘एक महिनाभर चालणारा सप्ताह’ या शब्दसमूहात शब्दार्थाची ऐशीतैशी झाली असली तरी अर्थबोध होण्यात काही अडचण येत नाही.

गावातल्या या सर्वसाधारण वातावरणाबरोबर माझ्या घरातल्या वातावरणाचाही उल्लेख स्वतंत्रपणे करायला हवा. माझं घर पारंपरिक म्हणजे किमान ७०० वर्षांपासूनचं वारकरी. माझी स्वतःची पिढी तुकोबांपासून दहावी. मधल्या पूर्वजांनी भजन-कीर्तनादी सांप्रदायिक माध्यमांतून वारकरी पंथाचा विचार त्यांना जमेल तितक्‍या लोकांपर्यंत पोचविला. पिढीजात प्राप्त झालेल्या मिराशीचं निष्ठापूर्वक जतन केलं. दरम्यानच्या काळात म्हणजे माझ्या खापरपणजोबांच्या वेळी महाराष्ट्रात सत्तांतर होऊन मराठ्यांची जागा ब्रिटिशांनी घेतली. राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या सत्तेच्या मागोमाग त्यांची इंग्लिश भाषा व तिच्या माध्यमातून युरोपातलं ज्ञान-विज्ञानही महाराष्ट्रात यथावकाश दाखल झालं. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या नवशिक्षितांमध्ये विचारांचं एक महामंथन झालं. त्याला ‘प्रबोधन’ असं म्हणण्याची प्रथा इतिहासकारांमध्ये आहे; पण या प्रबोधनाचा वारा सांप्रदायिकांना लागलाच नाही. ते त्यांच्या पारंपरिक उपसानापद्धतीतच मग्न राहिले. प्रबोधनासाठी आवश्‍य असलेल्या इंग्लिश भाषेपासूनच ते दूर राहिले. लोकहितवादी, फुले, रानडे, भांडारकर ही नावं क्वचितच त्यांच्या कानी पडली असतील.

अर्थात संतांच्या विचारांमधल्या क्षमतेचं पूर्ण भान वारकरी सांप्रदायिकांना नसलं, तरी नवशिक्षितांना मात्र होतं. त्यामुळंच फुले, रानडे, भांडारकरादिकांनी सत्यशोधक व प्रार्थना समाजाची मांडणी करताना संतांचे; विशेषतः तुकोबांचे विचार केंद्रस्थानी ठेवूनच वाटचाल केली. तुकोबा हे त्यांच्यासाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक ठरले. याच काळात याच संतांवर कडक टीकास्त्र सोडणारे इतिहासाचार्य राजवाडेही होऊन गेले. बाहेरच्या जगात घडणाऱ्या या घडामोडींचा पारंपरिक सांप्रदायिकांवर मात्र काहीच परिणाम होत नव्हता. ते त्यांच्या पारंपरिक चाकोरीच्या बाहेर जायला तयारच नव्हते; किंबहुना इंग्लिश शिक्षणाच्या अभावी त्यांना या घडामोडींची वार्ताही नव्हती.
ही कोंडी फोडायचं काम नात्यानं माझे चुलते लागणारे भागवतमहाराज यांनी केलं. भागवतमहाराज हे पंढरपूर इथल्या देहूकरांचा फड चालवणारं मातब्बर व्यक्तिमत्त्व. सन १९२५ च्या दरम्यान महाराजांनी सरळ ब्राह्मणेतर चळवळीत उडी घेऊन सत्यशोधक समाजात प्रवेश केला! त्यांच्याच पुढाकारानं ब्राह्मणेतरांचे ज्येष्ठ नेते केशवराव जेधे यांच्या घराण्याची आमच्या मोरे घराण्याशी सोयरीक जमली.

रूढार्थानं महाराज फारसे शिकलेले नव्हते. प्राथमिक शाळेत असतानाच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला होता व पूर्णपणे फडाचे काम पाहायला सुरवात केली होती; पण ‘शिक्षणाचा अभाव’ ही गोष्ट त्यांच्या मार्गात आली नाही. महाराजांना अफाट बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि प्रतिभा लाभली होती. त्या जोरावर महाराजांना परिस्थितीचं यथायोग्य आकलन होण्यास उशीर लागत नसे. महाराजांचं पाठांतर विलक्षण होतं. त्यांना भाषेची विलक्षण जाण होती. एखाद्‌दुसरी कोटी केल्याशिवाय त्यांचं वाक्‍य पूर्ण होत नसे. अर्थात हे खरं असलं तरी त्यामुळं पाश्‍चात्य शिक्षणाची व त्यातून शक्‍य होणाऱ्या संतसाहित्याच्या तौलनिक अभ्यासाची गरज संपली होती, असं मात्र नव्हे.
माझे वडील श्रीधरअण्णा हे महाविद्यालयात प्रवेश घेणारे पारंपरिक वारकरी घराण्यातले बहुधा पहिलेच असावेत. गावात उपलब्ध असणारं शिक्षण संपल्यावर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जावं, अशी त्यांची इच्छा होती; पण माझे आजोबा (म्हणजे त्यांचे वडील) नथुरामबोवा त्यासाठी अनुकूल नव्हते. ‘इंग्लिश शिक्षणामुळं मुलं बिघडतात,’ असं इतर अनेकांप्रमाणे त्यांनाही वाटत होतं; पण एकुलत्या एक हुशार मुलाला ‘नाही’ म्हणणंही त्यांच्या जिवावर आलं तेव्हा त्यांनी एक क्‍लृप्ती शोधली. ‘तू संपूर्ण गाथा पाठ कर; मगच मी तुला पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवीन’ अशी अट त्यांनी घातली. हे अवघड काम मुलाकडून होणार नाही, असाच त्यांचा समज असावा; पण अण्णांची आस प्रामाणिक असल्यामुळं त्यांनी ते आव्हान स्वीकारलं व वर्षभरात गाथा मुखोद्गत केली. आता आजोबांचा नाइलाज होता. त्यांनी आपल्या चिरंजीवांना पुण्यात जाऊन शिकायची परवानगी दिली.
पुण्यातल्या स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांनी पदवी घेण्याच्या आधीच शिक्षण सोडलं ते कॉ. विष्णुपंत चितळे यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणि १९४२ च्या चळवळीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. चिंचवडचे घारेशास्त्री यांच्याकडून घेतलेली खादीची दीक्षा त्यांना शेवटच्या श्‍वासापर्यंत पुरली.

महाविद्यालयात शिकताना अण्णांना प्रा. शं. वा. तथा मामा दांडेकर यांचा सहवास लाभला. सोनोपंत दांडेकर या नावानंही प्रसिद्ध असलेले मामा वै. विष्णुबोवा जोग यांचे शिष्य. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या मामांनी हजारो कीर्तनं करून महाराष्ट्र पिंजून काढला होता.

पारंपरिक वारकरी-कीर्तन मामांनी तार्किक युक्तिवादाच्या कोंदणात बसवलं, हे त्यांचं योगदान होय. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्राध्यापक असलेल्या मामांमुळं महाराष्ट्रातला मध्यमवर्ग वारकरी संप्रदायाकडं वळला. त्यापूर्वी दादामहाराज सातारकर यांच्यामुळं एक उच्चशिक्षित वर्ग वारकरी संप्रदायाकडं वळला होता. ज्ञानेश्‍वरांचा ‘अमृतानुभव’ आणि त्यावरची शिवकल्याण यांनी लिहिलेली टीका यांच्या आधारे दादामहाराजांनी निरूपणाची एक वेगळीच भाषा विकसित केली.

दादामहाराजांकडून संतांचं तत्त्वज्ञान आत्मसात करून त्याला जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांची जोड बॅ. रावसाहेब मेहेंदळे यांनी दिली. रावसाहेबांच्या पद्धतीनं त्यांच्या पत्नी ताईसाहेब ज्ञानेश्‍वरीवर प्रवचनं करत. तो मी ऐकलेला सर्वश्रेष्ठ भाषाविलास होता. त्यावरून महाराष्ट्रातले दहा-पाच महावक्ते खुशाल ओवाळून टाकावेत!

अण्णांनी मामांशिवाय दादामहाराज, रावसाहेब, ताईसाहेब यांना ऐकलं. त्यांच्याशी चर्चा केली.
पारंपरिक फडांवरची कीर्तनकारांची कीर्तनं त्यांना वारीच्या काळात, बीजेच्या वगैरे उत्सवात भरपूर ऐकली होती. त्यातल्या आजरेकर फडाचे प्रमुख विठोबाअण्णा यांची मांडणी त्यांना सर्वाधिक भावली. वारकरी संप्रदायाच्या विचारांची व आचारांची अत्यंत प्रामाणिक मांडणी आजरेकर फडावर केली जाई.
वारकरी तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी केल्या गेलेल्या मांडणींचा सूक्ष्म अभ्यास अण्णांनी केला होताच; पण ते सांप्रदायिक चौकटीत अडकले नाहीत. संत साहित्याचं व विचारांचं महत्त्व, दर्जा व स्थान समजून घ्यायचं झालं, तर त्यासाठी तत्त्वज्ञानाबरोबर इतर ज्ञानशाखांचाही अभ्यास करायला हवा, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्याअनुषंगानंच त्यांनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली. हजारो ग्रंथ व शेकडो नियतकालिकांचा संग्रह त्यांनी केला. वेगवेगळ्या विचारसरणींच्या विद्वानांशी चर्चा करून त्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. सामाजिक व राजकीय भान देण्यासाठी भागवतमहाराज होतेच. महाराष्ट्राचा इतिहास, ब्राह्मणेतर चळवळ, मराठी भाषा व साहित्य हे अण्णांचे आवडीचे विषय. मात्र, इतिहासाबरोबर ते वर्तमानाविषयीही तितकेच जागरूक होते. ‘मराठा’ आणि ‘प्रभात’ ही दैनिक वर्तमानपत्रं आमच्याकडं रोज येत. ‘नवभारत’पासून ‘साहित्यपत्रिके’पर्यंत आणि ‘अमृत’सारख्या मराठी डायजेस्टपासून भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकापर्यंत अनेक नियतकालिकं ते मागवत. मंडळाचे तर ते सदस्यच होते.

एवढी तयारी झाल्यानंतर त्यांच्याकडं चर्चा करण्यासाठी ज्ञानी व जिज्ञासू मंडळी येणार हे उघड होतं. अनेक देशी-विदेशी विद्वांनाचा आमच्या घरी राबता असे, असं म्हटलं तरी चालेल. डॉ. भा. पं. बहिरटांपासून ते इरीना ग्लुश्‍कोव्हा, दि. पु. चित्रे, अरुण कोलटकर यांच्यापर्यंत कितीतरी मंडळी त्यात असत.

तर अशा या घरातलं वातावरण मला लाभलं आणि त्यातून मी लहानपणापासूनच घडत गेलो. उशा-पायथ्याला पडलेली पुस्तकंच पुस्तकं, तत्त्वचर्चा करायला खुद्द वडील आणि लोकव्यवहार समजून द्यायला भागवतमहाराज हे भांडवल पदरी असताना मी अभ्यासक वगैरे झालो नसतो तरच आश्‍चर्य.

त्यात सगळ्यात जवळची, आवडीची, आस्थेची व परिचयाची बाब म्हणजे कीर्तन-प्रवचन! मामासाहेब घरी येत, त्यांची कीर्तनंही ऐकायला मिळत. आपणही त्यांच्यासारखंच तत्त्वज्ञानात एम.ए. करून कीर्तनं करायची, हे मी तेव्हाच ठरवून टाकलं होतं व त्या रोखानं वाटचालही सुरू केली होती.

इयत्ता पाचवीतला प्रसंग. विठ्ठल मंदिरात अधिक मासानिमित्त अखंड हरिनामसप्ताह सुरू झाला होता. रोज गाथाभजन, प्रवचन आणि कीर्तन. ते सगळं ऐकणं हा दिनक्रमाचाच भाग; पण या श्रवणातूनच आपण निदान प्रवचन तरी करावं, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. कीर्तनासाठी स्वर-तालज्ञानाची गरज असते. प्रवचनात ती नसते. शिवाय, प्रवचनात आधारासाठी ग्रंथ तुमच्या समोरच असतो. कीर्तनात पाठांतराला पर्याय नाही.

आता थोरांच्या कार्यक्रमात माझ्यासारख्या पोराला कोण थारा देणार? मग मी भागवतमहाराजांच्या पद्धतीनं ‘लॉबिंग’ करायला सुरवात केली. त्यामुळं आमच्या भावकीत चक्क दोन तट पडायची वेळ आली. अर्थात माझ्या या उद्योगाविषयी अण्णांना काहीच ठाऊक नव्हतं.
शेवटी बालहट्टाला यश आलं. माझ्यासाठी एका तासाचा स्वतंत्र वेळ काढण्यात आला. नेहमीच्या ठरलेल्या कार्यक्रमांना धक्का न लावता.
आता प्रश्‍न मी गीतेच्या कोणत्या श्‍लोकावर अथवा ज्ञानेश्‍वरीच्या कोणत्या ओवीवर प्रवचन करावे हा होता. तो माझा मीच सोडवला. ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाच्या सुरवातीला ज्ञानेश्‍वरांनी श्रीगुरू निवृत्तिनाथांना मातृदेवतेच्या स्वरूपात कल्पून नमन करून काही मागणंही मागितलं आहे. त्यातलं एक मागणं असे ः ‘इये मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। देणे-घेणे सुखाचि वरी। होऊ देई या जनां।।’’
माझं लक्ष या ओवीकडं गेलं. या ओवीत ज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेला नगरीची उपमा दिली आहे. या नगरीत ब्रह्मविद्येच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार (मराठी बोलणाऱ्या) जनांना वैपुल्यानं व सुखेनैव करता यावा, अशी प्रार्थना ज्ञानोबाराय करतात.

ओवीतल्या ‘ब्रह्मविद्या’ या शब्दाच्या आधारे मला अध्यात्माचं प्रतिपादन करता येणार होतं. ते तर बहुतेक प्रवचनकार करतच असतात; पण त्यांना मराठी भाषेचं काही देणं-घेणं नसतं. मी तोही मुद्दा अध्यात्माच्या बरोबरीनं चालवायचा ठरवलं. खरंतर ही ओवी आणि त्यानंतर येणाऱ्या काही ओव्या ज्ञानेश्‍वरांनी प्रसृत केलेला मराठी भाषेचा जाहीरनामाच होय!
ज्ञानेश्‍वरीत अध्यात्मविद्या सांगितलेली आहे. कारण, मुळात ज्ञानेश्‍वरी हे ज्या ग्रंथावरचं भाष्य आहे, त्या गीतेतच अध्यात्माची चर्चा आहे; पण हे भाष्य मराठी भाषेतच लिहिणाऱ्या ज्ञानेश्‍वरांचं भाषिक भान, त्यांचं मराठीवरचं प्रेम, मराठीचा अभिमान व सामान्य जनांविषयीची आस्था या गोष्टी ठायी ठायी व्यक्त होताना दिसतात. या मुद्याकडं माझं इतक्‍या लहान वयात लक्ष गेलं, हा खरं तर पिताश्रींचाच प्रसाद.

त्यांच्याकडच्या पुस्तकांच्या वाचनातून व त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून माझा हा दृष्टिकोन विकसित झाला. मराठी भाषा, ती बोलणारे लोक व त्या लोकांचा ज्ञानव्यवहार असा हा त्रिकोण माझा तेव्हापासून पाठपुरावा करतोय. तो पिच्छा सोडायला तयार नाही.

सन १९९० मध्ये ज्ञानेश्‍वरी ग्रंथाच्या लेखनाची सप्तशताब्दी साजरी झाली. त्या प्रसंगी आम्ही काही वारकऱ्यांनी पैठण-नेवासे-आळंदी अशी दिंडी काढली होती. ज्ञानेश्‍वरी डोक्‍यावर घेऊन. वाटेतल्या मुक्कामाच्या स्थळी कीर्तन-प्रवचन व व्याख्यानांच्या माध्यमातून लोकांचं भाषिक भान जागृत करण्याचा आमचा प्रयत्न होता. या उपक्रमाला आम्ही ‘ज्ञानेश्‍वरीची विजययात्रा’ असं नाव दिलं होतं. दिंडीची सांगता पुण्यातल्या गरवारे कॉलेजमध्ये ‘मराठी भाषा ः काल, आज आणि उद्या’ या विषयावरच्या परिसंवादानं करण्यात आली. परिसंवादाला दि. पु. चित्रे, राम बापट, जयंत लेले असे मोठे अभ्यासक उपस्थित होते.

ही विजययात्रा ज्ञानेश्‍वरीच्या लेखनस्थळी म्हणजे नेवाशात आली, तेव्हा तिथल्या मुक्कामातच माझं प्रवचन झालं. या प्रवचनात मी पुन्हा एकदा ‘इये मराठीचिये नगरी...’ हीच ओवी घेऊन निरूपण केलं. मराठी भाषा, मराठीभाषक आणि त्यांचा महाराष्ट्रदेश यांचं आकलन करण्यासाठी ही ओवी उपयुक्त आहे.

रूढार्थानं मी मराठीचा पदवीधर किंवा प्राध्यापक नाही, भाषाशास्त्राचाही नाही; पण तरीही महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार समितीचं अध्यक्षपद मला देण्यात आलं. याचं कारण माझं लहानपणापासूनचं भाषिक भान असू शकेल काय?
ते काहीही असो... वर्षभर चालणाऱ्या या लेखमालेचं ‘मराठीचिये नगरी’ असं नामकरण करताना मला ज्ञानेश्‍वरीवरचं माझं पहिलं प्रवचन आठवते व नेवासा नावाच्या खरोखरीच्याच मराठीनगरीत (इथंच ज्ञानेश्‍वरी लिहिली गेली म्हणून) ज्ञानेश्‍वरीच्या सप्तशताब्दीनिमित्तानं त्याच ओवीवर दुसऱ्यांदा केलेलं प्रवचनही आठवतं. माझं पहिलं प्रवचन हे वयाचा व अभ्यासाचा विचार केला, तर जवळपास अंतःप्रेरणेतून स्फुरलं होतं. मात्र, दुसरं प्रवचन ही विचारपूर्वक, औचित्याला धरून केलेली कृती होती.
आता याच ओवीच्या आधारे मराठीनगरीतून एक फेरफटका मारायचा आहे. एका अर्थानं हा भाषेतला ‘हेरिटेज वॉक’ - वारसापर्यटनच असेल!

Web Title: dr sadanand more's article in sapatarang