...हा निव्वळ योगायोग नव्हे (सदानंद मोरे)

सदानंद मोरे
रविवार, 5 मार्च 2017

महाराष्ट्रधर्म या एका तत्त्वामुळं न्या. महादेव गोविंद रानडे हे शिवरायांच्या स्वराज्याचा संबंध ज्ञानेश्‍वरादी महाराष्ट्रीय संतांनी मराठी भाषेमधून प्रतिपादन केलेल्या धर्माशी लावू शकले होते. त्याचा विचार करताना ज्ञानेश्‍वर आणि शिवराय यांच्यातला अनुबंध दिसू लागतो. या दोघांमधल्या साम्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या वयात एकानं ज्ञानेश्‍वरी लिहून भाषिक स्वराज्याचा पाया घातला, त्याच वयात दुसऱ्यानंही राजकीय स्वराज्याची उभारणी केली. अर्थात, या साम्यस्थळाला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही. दोघांचाही संबंध धर्माशी होता, की ज्या धर्माला रानडे हे ‘महाराष्ट्रधर्म’ असं म्हणतात.

महाराष्ट्रधर्म या एका तत्त्वामुळं न्या. महादेव गोविंद रानडे हे शिवरायांच्या स्वराज्याचा संबंध ज्ञानेश्‍वरादी महाराष्ट्रीय संतांनी मराठी भाषेमधून प्रतिपादन केलेल्या धर्माशी लावू शकले होते. त्याचा विचार करताना ज्ञानेश्‍वर आणि शिवराय यांच्यातला अनुबंध दिसू लागतो. या दोघांमधल्या साम्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या वयात एकानं ज्ञानेश्‍वरी लिहून भाषिक स्वराज्याचा पाया घातला, त्याच वयात दुसऱ्यानंही राजकीय स्वराज्याची उभारणी केली. अर्थात, या साम्यस्थळाला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही. दोघांचाही संबंध धर्माशी होता, की ज्या धर्माला रानडे हे ‘महाराष्ट्रधर्म’ असं म्हणतात.

मराठ्यांच्या राज्याच्या (ज्याला शिवाजीमहाराजांपासून ‘स्वराज्य’ म्हणायची प्रथा होती) इतिहासलेखनाचा तात्त्विक पाया रचण्याचं न्या. महादेव गोविंद रानडे यांचं कार्य किती महत्त्वाचं होतं, हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी समर्पकपणे स्पष्ट केलं आहे. राजवाडे हे स्पष्टीकरण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता हेगेल याच्या संदर्भात करतात. हेगेल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासाकडं एक एकसंध एकक (Unit) म्हणून पाहतो. हेगेल हा चैतन्यवादी किंवा चिद्‌सत्तावादी असून, त्याच्या मते मानवी इतिहासातून स्वतः चैतन्य (Spirit किंवा Idea) व्यक्त होत असतं किंवा स्वतःला प्रकट करत असतं. चैतन्याचा हा आत्माविष्कार स्वतःच स्वतःचं आकलन करून घेण्यासाठी, आत्मप्रतितीसाठी होत असतो. ज्यांना आपण राष्ट्रे/समाज/संस्कृती म्हणतो ते चैतन्याच्या प्रकटीकरणाच्या प्रवासातलं उत्क्रांत टप्पे असतात. इतिहासाचे कर्ते नायक या प्रक्रियेत चैतन्याला साह्यभूत होत असतात. चैतन्याचं पूर्ण आविष्करण होऊन त्याला आत्मप्रतिती येणं ही इतिहासाची पूर्तता होय.
हेगेलनं ज्या एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ही मांडणी केली, तेव्हा युरोप खंडातली राष्ट्रं कर्तृत्वाच्या ऐन भरात असून, त्यांची संपूर्ण जग जिंकण्याच्या रोखानं वाटचाल होत होती. आशिया खंडातली राष्ट्रं जिंकली जाऊन गुलाम बनत होती. भारत हे असंच एक राष्ट्र. हेगेलच्या लेखी चैतन्याच्या आत्मप्रकटीकरणाच्या या प्रक्रियेत म्हणजेच इतिहासात भारताचं योगदान नगण्य आहे. महाराष्ट्रातले मराठे हे तर या देशातला एक छोटासा लोकसमूह. त्यांचं नाव तर हेगेलच्या गावीही नाही. तो ग्रीक-रोमनांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणार!

हेगेलच्या मताचा उल्लेख व उच्चार करून राजवाडे एक धाडसी विधान करतात. हेगेलला न्या. रानडे यांचं पुस्तक वाचायला मिळतं, तर त्याला त्यानं लिहिलेल्या इतिहासाची फेरमांडणी करावी लागली असती. मराठ्यांचा इतिहास हा एक तात्त्विक सूत्रानुसार घडला असून, तो वैश्‍विक परिप्रेक्ष्यात महत्त्वाचा ठरतो. कारण, त्यामुळं मानवजातीच्या विकासात व पर्यायानं चैतन्यसत्तेच्या प्रगटीकरणात त्याचा लक्षणीय वाटा किंवा हातभार आहे. मराठ्यांच्या इतिहासाशिवाय मानवजातीचा म्हणजेच विश्‍वाचा इतिहास अपूर्ण राहिला असता!

महाराष्ट्राच्या इतिहासलेखनात जेवढं महत्त्व रानडे यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीला आहे, तेवढंच महत्त्व रानडे यांच्या मांडणीचं महत्त्व ओळखणाऱ्या राजवाडे यांच्या या मर्मदृष्टीलासुद्धा (Insight) आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. रानडे यांच्या मांडणीमुळं मराठ्यांचा इतिहास वैश्‍विक पातळीवर पोचून त्याला जगाच्या इतिहासात स्थान मिळतं, हे पहिल्यांदा राजवाडे यांनीच निदर्शनाला आणून दिलं. दुर्दैवानं राजवाडे यांनी आपली ही कामगिरी स्वतःची स्वतःच वाया घालवली. रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचं जे तात्त्विक सूत्र सांगितलं होतं व ज्याच्यामुळं मराठ्यांच्या इतिहासाचं जागतिक पातळीवरचं उन्नयन शक्‍य होत होतं, ते ओळखणाऱ्या राजवाडे यांनी या सूत्राचा संकोच केला. ही राजवाडे यांची वैचारिक शोकान्तिका होय.

राजवाड्यांच्या लेखनकर्तृत्वाची सुरवात होण्याच्या आधीच जोतीराव फुले यांनी मानवी इतिहासाचं एक सूत्र सांगितलं होतं व ते म्हणजे लोकसत्तेचा विकास. फुले यांनी ‘हे सूत्र निर्माणकर्त्या ईश्‍वरानंच दिलं आहे,’ असं सांगून हेगेल-रानडे यांच्याप्रमाणे इतिहासाला एक दैवी अधिष्ठान प्राप्त करून दिलं होतं. तथापि, फुले यांच्या पश्‍चात चालवल्या गेलेल्या चळवळीत जातीय संघर्षाला महत्त्व व प्राधान्य मिळून फुले यांनी दिलेलं हे सूत्र त्या गदारोळात कुठं लुप्त झालं, हे कळलंच नाही.

खुद्द राजवाडे यांची कारकीर्द घडत असताना लोकमान्य टिळक व महात्मा गांधी जे विचार मांडत होते, त्यांच्यातही इतिहासलेखनाची तात्त्विक सूत्रं सापडण्याची शक्‍यता होती. या दोघांच्या सूत्रांचा संघर्ष व्हायची जशी शक्‍यता होती, तशीच त्यांचा समन्वय घडवून आणला जाणं हेही काही अशक्‍यकोटीतलं नव्हतं. टिळकांच्या विचारांवर वेदान्तमताची छाप होती. त्यांनी भारतीय स्वातंत्रलढ्याची मांडणी वेदान्ताच्या म्हणजेच मोक्षाच्या परिभाषेत करीत असताना तिला गीतोक्त भागवतधर्माची म्हणजेच निष्काम कर्मयोगाची जोड दिली. गांधीजींनी तर ‘मानवी इतिहासाची वाटचाल संघर्षापेक्षा सहकार्यातून व हिंसेपेक्षा अहिंसेतून झाली आहे,’ असं सांगत शरीरबळापेक्षा आत्मबळाला महत्त्व दिलं. हे आत्मबळ म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून नैतिक बळ होतं. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गानं वाटचाल करत म्हणजे अहिंसात्मक लढा देत भारतानं स्वातंत्र्य मिळवलंच; परंतु नंतरच्या काळातही या बाबतीत भारताचं अनुकरण करत इतर वासाहतिक परतंत्र देशांनीही स्वातंत्र्याकडं प्रवास केला. हे भारताचं जगाच्या इतिहासात योगदान नव्हे तर दुसरं काय आहे?
या विवेचनाचा संबंध रानडे-राजवाडे यांच्यापर्यंत कसा पोचतो, असं कुणालाही वाटेल. मुद्दा हा आहे, की राजवाडे यांच्या कारकिर्दीच्या पूर्वार्धात राजकीय क्षेत्रात ते टिळकांचे अनुयायी होते, तर टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजेच आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात (जो थोडाच होता) त्यांनी गांधीजींना अनुसरलं. त्यामुळेही टिळक-गांधीजींच्या विचारांमधला इतिहासलेखनाशी निगडित असलेला भाग समजून घेणं राजवाडे यांच्यासाठी अशक्‍य नव्हतं. ते आणखी जगतात, तर कदाचित त्यांनी तसं केलंही असतं, असं म्हणायला वाव आहे; पण तो भाग वेगळा. वस्तुस्थिती अशी आहे, की इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकरांनी दाखवल्याप्रमाणे राजवाडे हे आपली पूर्वीची बांधिलकी व मांडणी बाजूला ठेवून एकीकडं मार्क्‍सवादाला जवळ येणाऱ्या भौतिकवादाकडं व दुसरीकडं गांधीविचारांकडं वळण्याच्या टप्प्यावर असताना कालवश झाले. त्यांच्यापश्‍चात त्यातला भौतिकवादी विचार घेऊन कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारखे मार्क्‍सवादी भारताचा इतिहास द्वंद्वात्मक पद्धतीनं मांडू लागले, तर दुसरीकडं भा. वा. भटांसारखे त्यांचे पारंपरिक अनुयायी त्यांच्या चातुर्वर्ण्याधिष्ठित विचारांना कवटाळून बसले.

न्या. रानडे यांच्या मांडणीमधल्या ज्या तात्त्विक सूत्राच्या आधारे मराठ्यांचा इतिहास जागतिक पातळीवर नेता येईल, असं राजवाडे यांना वाटतं, ते सूत्र म्हणजे अर्थातच महाराष्ट्रधर्म. याच सूत्राचा संकोच केल्यामुळं राजवाडे यांच्यातली क्षमता तर वाया गेलीच; परंतु ते सूत्रही वाया गेलं. महाराष्ट्रधर्म या एका तत्त्वामुळं रानडे हे शिवरायांच्या स्वराज्याचा संबंध ज्ञानेश्‍वरादी महाराष्ट्रीय संतांनी मराठी भाषेमधून प्रतिपादन केलेल्या धर्माशी लावू शकले होते. त्याचा विचार करताना ज्ञानेश्‍वर आणि शिवराय यांच्यातला संबंध दिसू लागतो.

या दोघांमधल्या साम्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या वयात एकानं ज्ञानेश्‍वरी लिहून भाषिक स्वराज्याचा पाया घातला, त्याच वयात दुसऱ्यानंही राजकीय स्वराज्याची उभारणी केली. अर्थात, या साम्यस्थळाला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही. दोघांचाही संबंध धर्माशी होता की ज्या धर्माला रानडे हे ‘महाराष्ट्रधर्म’ असं म्हणतात.
ज्ञानेश्‍वरांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ज्ञानेश्‍वरीचा आणि धर्माचा संबंध खुद्द त्यांनीच ‘ज्ञानेश्‍वरी’च्या समारोपात स्पष्ट केलेला आहे. ज्ञानेश्‍वरांची गुरुपरंपरा ही नाथसंप्रदायाची होती. नाथसंप्रदाय हा संपूर्ण भारत देशात पसरलेला व प्रभाव असलेला संप्रदाय होता. विशेष म्हणजे, तो लिंगभेद व जातिभेद यांची मातब्बरी न मानणारा, त्याच्या पलीकडं जाऊ पाहणारा धर्मपंथ होता. आई-वडिलांच्या अकाली वियोगानंतर, याच पंथाच्या भोजलिंगकाका या नाथसांप्रदायिकानं ज्ञानेश्वरादी चार भावंडांचा सांभाळ केला, हे लक्षात घ्यायला हवं.

भोजलिंगकाका हे जातीनं सुतार होते, हे सांगितलं म्हणजे नाथसंप्रदायाची भूमिका लक्षात येईल. ज्ञानेश्‍वरांच्या वडिलांनी-विठ्ठलपंतांनी- संन्यास या चतुर्थ आश्रमाचा अंगीकार केला होता; पण गुरूंच्या आदेशावरून ते परत गृहस्थाश्रमात आले. या दुसऱ्या टप्प्यातल्या गृहस्थाश्रमात त्यांना चार अपत्यं झाली. पारंपरिक सनातनी धर्मशास्रानुसार संन्यास घेतलेल्या व्यक्तीनं पुन्हा गृहस्थ होऊन प्रपंच करणं हा मोठाच अपराध होय. मुख्य म्हणजे, त्याची फळं केवळ संबंधित व्यक्तीलाच नव्हे, तर तिच्या मुला-बाळांनाही भोगावी लागतात. अशा व्यक्तीची संतती वर्णबाह्य म्हणजेच बहिष्कृत ठरते. ज्ञानेश्‍वरादी चार भावंडं अशा प्रकारे बहिष्कृत होती व म्हणूनच त्यांना नाथसंप्रदायाचा आश्रय घ्यावा लागला. नाथसंप्रदाय हा तसा बंडखोरच मानावा लागतो. प्राकृत भाषांचा अंगीकार करून आध्यात्मिक अनुभूती सर्वसामान्य स्त्री-पुरुषापर्यंत पोचवायचं कार्य नाथसिद्ध करत असत.

ज्ञानेश्‍वरांचे थोरले बंधू निवृत्तिनाथ यांना सुदैवानं गहिनीनाथ हे नाथसिद्ध गुरू म्हणून लाभले. गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना सांप्रदायिक उपदेश केला आणि निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्‍वरांना. ज्ञानेश्‍वर हे अशा प्रकारे ज्ञाननाथच होत.नाथपरंपरेला धरून संप्रदायातलं ज्ञान गुरूनं आपल्या शिष्याला द्यायचं असतं. पुढं तो शिष्य स्वतः गुरू होऊन ते ज्ञान त्याच्या शिष्याला देणार असतो. अशा प्रकारचं ज्ञान देताना जात आणि लिंग यांचा विचार केला जात नसला, तरी शिष्याची पात्रापात्रता मात्र पारखून घेतली जाते; परंतु गहिनीनाथांनी मात्र वेगळा विचार केला. समकालीन परिस्थितीचं अवलोकन केलं असता त्यांच्या लक्षात आलं, की मर्यादित शिष्यशाखेच्या माध्यमातून उपदेश करणं आता पुरेसं नाही. हे ज्ञान सार्वत्रिक करायची गरज आहे. यासंबंधीचं ‘ज्ञानेश्‍वरी’मधलं निवेदन सुस्पष्ट आहे.

नाथसंप्रदायाचे आदिगुरू श्रीशंकर, त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ ही पूर्वपरंपरा सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्‍वर या परंपरेचा पुढचा प्रवास स्पष्ट करतात.
ते म्हणतात ः ‘तेणे (म्हणजे गहिनीनाथांनी) कळि कळितु भूतां। आला देखोन निरुता। ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा। दिधली ऐसी।। ना आदिगुरू शंकरा। लागोनि शिष्यपरंपरा। बोधाचा हा संसारा। जाला जो आमुते।। तो घेऊनि आघवा। कळी गिळतया जीवा। सर्व प्रकारे धावा। करी पां वेगी।।’

गहिनीनाथांच्या लक्षात आलं, की सद्यस्थितीत कली भूतांना ग्रासत आलेला आहे. त्याच्यापासून त्यांचं रक्षण करायचं असेल, तर गुरुपरंपरेनं आपल्यापर्यंत त्यांचा चालत आलेला बोध सगळ्यांपर्यंत पोचवला पाहिजे. एव्हाना स्वतः गहिनीनाथ बऱ्यापैकी वृद्ध झालेले असणार. तेव्हा हे काम त्यांनी आपले तरुण शिष्य निवृत्तिनाथांवर सोपवलं.

निवृत्तिनाथांनी गुरूची आज्ञा किती आणि कशी चोखपणानं पालन केली, हे ज्ञानेश्‍वर पुढं पावसाच्या उपमेतून स्पष्ट करतात ः आधीच तव तो कृपाळू। वरी गुरू-आज्ञेचा बोलु। जाला वर्षाकाळु। खवळणे मेघा।। मग आर्ताचेनि वोरसे गीतार्थग्रंथनमिसे। वर्षला शांतरसे तो ग्रंथु।।
निवृत्तिनाथ स्वतः कृपाळू स्वभावाचे होतेच. त्यात त्यांना गुरूंची आज्ञा झाली. मग काय, त्यांनी गीतार्थाचा जणू सर्वत्र वर्षावच केला.
ज्ञानेश्‍वर पुढे सांगतात, ‘तो वर्षाव झेलून त्याचं सेवन करणारे आपण जणू चातक पक्षीच आहोत.’

निवृत्तिनाथांनी गीतेच्या निरूपणाच्या माध्यमातून लोकांचं व्यापक प्रमाणावर प्रबोधन केलं हे खरं; पण त्यांनी या निरूपणाला ग्रंथरूप दिलं नाही. ती जबाबदारी त्यांनी ज्ञानेश्‍वरांवर सोपवली. ती ज्ञानेश्‍वरांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ या ग्रंथाची निर्मिती करून समर्थपणे निभावली, म्हणून ते ग्रंथनिर्मितीचं श्रेय निवृत्तिनाथांना देतात.
ग्रंथाची एकूण फलश्रुती काय असेल, याविषयीची ज्ञानेश्‍वरांची ओवी अगदी मुद्द्याची आहे. ‘परी साचचि गुरुनाथे। निमित्त करुनि माते। प्रबंधव्याजे जगाते। रक्षिले जाणा।।’

कलिग्रस्त जगाचं रक्षण हे ज्ञानेश्‍वरीचं उद्दिष्ट असल्याचं खुद्द रचनाकार ज्ञानेश्‍वरच सांगतात आणि ज्ञानेश्‍वरीतल्या विचारांची वैश्‍विक क्षमता जमेस धरूनही ज्ञानेश्‍वरांनंतरच्या ग्रंथनिर्मितीच्या काळातलं जग हे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं जग होतं. त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना त्यांच्या भाषेतून धर्म सांगायचं काम ज्ञानेश्‍वरांनी ‘ज्ञानेश्‍वरी’द्वारे केलं, म्हणून तर पसायदानात ते ज्ञानेश्‍वरीसाठी ‘धर्मकीर्तन’ हा शब्द वापरतात.

या पार्श्‍वभूमीवर शिवाजीमहाराजांनी काय केलं, हे पाहिलं म्हणजे ज्ञानेश्‍वर आणि शिवाजीमहाराज यांच्यातला अनुबंध समजून येईल आणि त्यासाठी अन्य कुणाचा संदर्भ घेण्याऐवजी स्वतः शिवपुत्र संभाजीराजांचं याविषयीचं मत उद्‌धृत करणं उचित ठरेल. संभाजीराजे हे संस्कृतपंडित होते आणि त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषणम्‌’नामक ग्रंथ लिहिला, हे सर्वज्ञात आहे.

ग्रंथारंभी प्रथेनुसार देवतांना नमन केल्यानंतर शंभुराजे आपल्या कुळाचं थोडक्‍यात वर्णन करतात. प्रथम ते आपले आजोबा शहाजीराजे भोसले यांचं वर्णन करतात. त्यानंतर पिताश्री शिवछत्रपतींचं ते जयजयकारपूर्वक वर्णन करतात.
‘‘कलिकालभुजंगमावलीढं निखिलधर्ममवेक्ष विक्‍लवं यः। जगतः परिरंशतोवतापोत्तीर्णः स शिवच्छत्रपतिर्जयत्यजेयः।।
शंभूराजांच्या या शिववर्णनपर श्‍लोकाचं ज्ञानेश्‍वरीमधल्या उपरोक्त ओव्यांशी लक्षणीय साम्य असल्याचं कुणाच्याही लक्षात यावं. ज्ञानेश्‍वर ज्या कवीचा उल्लेख करतात व ज्याच्यापासून रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्‍वरीची निर्मिती झाल्याचं सांगतात, त्याच कळिकाळरूपी भुजंगानं वेढलेल्या व उपद्रविलेल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी शिवछत्रपतींचा जन्म असल्याचं संभाजीराजे सांगतात. ‘कलितु’ आणि ‘विक्‍लवं’ या शब्दांचं ध्वनिसाम्य व अर्थसाम्यही विचारात घेण्यासारखं आहे. मुद्दा सरळ आणि स्पष्ट आहे. ज्ञानेश्‍वरांनी केलेल्या भाषिक आणि धार्मिक कार्यामागची भूमिका आणि शिवरायांच्या राजकीय कार्यामागची भूमिका या एकमेकांना पूरक आहेत. अर्थात ज्ञानेश्‍वरांचं कार्य हे शिवरायांच्या कार्याच्या अगोदरचं असल्यामुळं न्या. रानडे त्याला पायाभूत मानतात.

शिवरायांच्या कार्याचं याप्रमाणे मूल्यमापन करणाऱ्या संभाजीराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार ताब्यात घेतल्यानंतर ताबडतोबीनं ज्या गोष्टी केल्या, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, श्रीक्षेत्र आळंदी इथल्या ज्ञानेश्‍वरांच्या समाधी-मंदिराच्या व्यवस्थेसाठी वर्षासन लावून देणं.

संभाजीराजांचं हे कृत्य हा केवळ योगायोग समजणं चुकीचं ठरेल, यात शंका नाही.

Web Title: dr sadanand more's article in sapatarang