हिंमतबहादूर भागवत (सदानंद मोरे)

हिंमतबहादूर भागवत (सदानंद मोरे)

इतिहासमीमांसक कसा असावा, याचा राजारामशास्त्री भागवत हे एक आदर्श नमुना होते, असं म्हणावा लागेल. भारतात इतिहासलेखनावर जातीय हितसंबंधांची छाप आणि छाया पडू न देणं अवघडच आहे. ही सिद्धी भागवतांनी साधली होती आणि हे केवळ इतिहासाच्या प्रांतापुरतं मर्यादित नव्हतं.‘भागवतांची धराच हिंमत’ असा उपदेश राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना एका कवितेतून केलेला आहे. राजारामशास्त्री भागवत हे खरोखरच ‘हिंमतबहादूर’ होते!

इतिहासलेखनाच्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या मुख्य प्रवाहाला पर्यायी परंपरा जर कोणती असेल तर ती राजारामशास्त्री भागवत, ‘ज्ञानकोश’कार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर आणि कॉम्रेड शरद पाटील यांची. अर्थात इथं ‘परंपरा’ हा शब्द कितपत यथार्थ ठरेल, याची थोडी शंकाच आहे. कारण, यांच्यापैकी उत्तरकालीन अभ्यासकांना पूर्वकालिनांबद्दल थोडाफार आदर असला तरी ते पूर्वकालीन आपले पूर्वसुरी आहेत किंवा आपण एकाच परंपरेतले आहोत, हे त्यांनी कधीच मान्य केलं नसतं. केतकरांना भागवतांबद्दल आदर होता आणि केतकरांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांचं भागवतांच्या लेखनाशी नातं सांगता येतं, यात शंका नाही. पाटील यांना केतकरांच्या संशोधनाबद्दल आदर असून, ते अधूनमधून केतकरांची मतं उद्‌धृत करताना आढळतात. तथापि, भागवतांच्या संशोधनाचा मात्र त्यांना बहुधा पत्ता नसावा!

पण तरीही या तिघांच्या लेखनाची पुनर्रचना करून ते एका परंपरेतले आहेत, असं दाखवून देता येणं शक्‍य आहे!

यासंदर्भात पद्धतिशास्त्र हा बऱ्यापैकी निर्णायक मुद्दा ठरू शकतो. खरंतर राजारामशास्त्री भागवतांच्या लेखनातून पद्धतिशास्त्रीय सजगता पुरेशी आढळून येत नाही; पण त्यांनी भाषिक पद्धतीचा म्हणजे व्युत्पत्ती आणि व्याकरण यांचा पुरेपूर वापर केला आहे व तसाच वापर केतकर आणि पाटील करतात. मात्र जाणीवपूर्वक! परत यासंदर्भात केतकरांपेक्षा पाटील यांची जाणीव अधिक तीव्र दिसते.
भाषिक संदर्भात सांगायचं झालं तर या तिघांनाही संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्ही भाषांचं महत्त्व मान्य आहे. इतकंच नव्हे तर, प्रचलित प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन संस्कृतपेक्षा प्राकृतला अधिक महत्त्व देण्याची प्रवृत्ती या तिघांमध्येही आढळते, हे आणखी एक साम्यस्थळ.

केतकरांनी अमेरिकेसारख्या पाश्‍चात्य देशात समाजशास्त्राचं पद्धतशीर अध्ययन केलं असल्यामुळं त्यांचं यासंदर्भातलं ज्ञान अद्ययावत होतं. त्याचा उपयोग ते इतिहासलेखनात करताना आढळून येतात. अर्थात तत्कालीन वेबर वगैरे समाजशास्त्रज्ञांच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरील पद्धतीविषयी, विशेषतः कार्ल मार्क्‍सच्या अर्थशास्त्रमूलक समाजशास्त्रीय पद्धतीविषयी, ते उदासीन दिसतात. याचं कारण कदाचित भांडवलशाही मानणाऱ्या अमेरिकेतलं त्यांचं शिक्षण हे असू शकतं.
अर्थात आणखी दोन गोष्टींची चर्चा केल्याशिवाय या साम्य-भेदविवेचनाला पूर्णता येणार नाही. एकूण जातिव्यवस्था आणि जातिव्यवस्थेतलं ब्राह्मणांचं स्थान व महत्त्व ही पहिली गोष्ट होय. शरद पाटील स्वतः जातीनं ब्राह्मण नव्हते. शिवाय त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी ब्राह्मणेतर चळवळीची. त्यांच्या मातुल घराण्यातले माधवराव दिवाण हे खानदेशातल्या ब्राह्मणेतरांचे एक अग्रगण्य नेते होते. ही पार्श्‍वभूमी, स्वतःचा अभ्यास व चिंतन यांच्या जोरावर पाटील ब्राह्मणेतरी जातिनिष्ठ चळवळीचे रूपांतर ‘अब्राह्मणी’ या ज्ञानक्षेत्रातल्या कोटीत किंवा कॅटेगरीत
करू शकले.

केतकरांच्या बाबतीत तसं काही म्हणता येणार नाही. स्वजातीचं साभिमान समर्थन करण्यात ते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्याइतके आघाडीवर नसले, तरी त्यांच्या लेखनात हा धागा अनुस्यूत आहे. अर्थात त्याचं कारण जातीयच असलं पाहिजे, असं समजायचं कारण नाही. इतिहास, धर्म आणि समाजशास्त्र यांच्या संबंधीची केतकरांची स्वतःची अशी एक भूमिका आणि दृष्टी आहे. तीत गतकाळात आपल्याच वर्णाचं काही चुकलं असेल, तर त्यावर टीका करायला त्यांची हरकत नसेल; पण त्यानं केलेल्या चांगल्या गोष्टी पुढं आणण्यात त्यांना कोणताही अपराधगंड नाही. हिंदू धर्माच्या सहिष्णू आणि समावेशक स्वरूपाचं व कार्याचं श्रेय ते निःशंकपणे ब्राह्मणांना देतात; पण जेव्हा भाषेचा प्रश्‍न येतो, तेव्हा मात्र संस्कृतचा पक्षपात करून त्यापोटी प्राकृतकडं तुच्छतेनं पाहणाऱ्या, इतकंच नव्हे तर, इंग्लिशच्या प्रेमात पडलेल्या ब्राह्मणांवर टीका करायला ते कचरत नाही.

राजारामशास्त्री यांचं सगळंच और! त्यांची जात न सांगता त्यांचं लेखन एखाद्याला वाचायला दिलं, तर ‘हा माणूस ब्राह्मणेतर चळवळीचा प्रवक्ता असणार’, असंच त्याला वाटेल. शास्त्रीबुवांच्या या लेखनामुळं त्यांच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्यावर चौफेर हल्ले करून त्यांना विक्षिप्त ठरवलं आणि त्यांच्या मतांकडं दुर्लक्ष करण्याची कायमची सोय करून ठेवली. वस्तुतः स्वतः शास्त्रीबुवांनीच ‘ब्राह्मणांमध्येच कर्मठ आणि सुधारक अशा फळ्या असतात व त्यांचा एकमेकांशी संघर्ष होत असतो,’ असं स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. त्यामुळं त्यांना अमुक एका जातीच्या विरुद्ध मानणं चुकीचं आहे.

खरंतर इतिहासमीमांसक कसा असावा, याचा राजारामशास्त्री भागवत हे एक आदर्श नमुनाच होते, असं म्हणावा लागेल. भारतात इतिहासलेखनावर जातीय हितसंबंधांची छाप आणि छाया पडू न देणं अवघडच आहे. ही सिद्धी भागवतांनी साधली होती आणि हे केवळ इतिहासाच्या प्रांतापुरतं मर्यादित नव्हतं. प्रत्यक्ष व्यवहारातही ते असेच वागले. ‘वेदोक्ता’च्या प्रकरणात त्यांनी छत्रपती शाहूमहाराजांची आणि मराठा जातीची बाजू उचलून धरली.
इतिहासाच्या साधनांची निःपक्ष छाननी करताना त्यांनी संस्कृत भाषेतल्या वेदांसह अनेक साधनांमधल्या माहितीवर आक्षेप घेतला. ‘यज्ञकर्म करणाऱ्यांनी व पौराणिकांनी खोटा इतिहास लिहिला,’ असं स्पष्टपणे सांगण्याचं धाडस त्यांनी केलं.

भागवतांचं हे म्हणणंसुद्धा कितपत खरं आहे, याची चर्चा स्वतंत्रपणे करायला हवी, हा भाग वेगळा. मुद्दा आपल्याला भावलेलं सत्य सप्रमाण मांडण्याचा आहे आणि त्यात भागवतांची बरोबरी कुणी करू शकेल, असं वाटत नाही. जातीच्या बरोबरीनं मुद्दा येतो तो धर्माचा आणि धर्मसंप्रदायाचा. याबाबतीतही राजारामशास्त्री हितसंबंधांना ओलांडून जातात. खरंतर त्यांचं ‘भागवत’ हे आडनावच त्यांचं वैष्णव संप्रदायाशी असलेलं नातं सूचित करतं; पण तसा विचार करणाऱ्यांपैकी भागवत नव्हतेच. सत्याचा अपलाप करून ते विपरीत स्वरूपात मांडण्यात जसे जातीय हितसंबंध कारण ठरतात, तसे सांप्रदायिक पूर्वग्रहसुद्धा. भारताच्या प्राचीन इतिहासासंदर्भात असं घडलं, त्यासाठी भागवत एकीकडं यज्ञीय परंपरेतल्या ब्राह्मणांना आणि दुसरीकडं वैष्णव संप्रदायाच्या ब्राह्मण पौराणिकांना जबाबदार धरतात! वसिष्ठ आणि विश्‍वामित्र, तसंच परशुराम विरुद्ध हैहय कुल यांच्या संघर्षात शास्त्रीबुवा वसिष्ठ आणि परशुराम यांची बाजू घेण्याऐवजी विश्‍वामित्र आणि हैहय कुलाची बाजू घेतात, तसंच ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातल्या स्पर्धेतही ते ब्राह्मणांऐवजी क्षत्रियांची बाजू घेतात. ‘पुराणे वगैरे ग्रंथ लिहिण्याची मक्तेदारी असल्यामुळं की काय ब्राह्मणांनी आपल्या नायकांना मोठं केलं आणि इतरांची रास्त आणि न्याय्य बाजू कमकुवत करून टाकली,’ हा त्यांचा आक्षेप आहे.

जातीय क्षेत्रासह सर्व समस्यांवर आपल्या स्वकीयांच्या हितसंबंधांच्या निरपेक्ष भूमिका घेणाऱ्यांची खरी कसोटी लागते ती लिंगभावाचा प्रश्‍न येतो तेव्हा, म्हणजेच स्त्रियांचा दर्जा, तसंच हक्क यांच्या संदर्भात. भागवत, केतकर आणि पाटील हे तिघंही या कसोटीला उतरतात, याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. वर्ग, वर्ण, जात आणि लिंगभाव अशा सगळ्या क्षेत्रांतली गुलामगिरी संपुष्टात आणण्यासाठी चळवळीच्या आणि बौद्धिक चर्चेच्या पातळ्यांवर सतत कार्यरत असलेले पाटील यांच्या याबाबतच्या बांधिलकीविषयीचा प्रश्‍नच उद्भवू नये. हे कार्य करत असताना ते व्याकरण, व्युत्पत्ती आणि मानवशास्त्र यांचा आधार घेतच अतिप्राचीन काळातल्या स्त्रीसत्तेपर्यंत पोचू शकले, हे सर्वज्ञात आहे. केतकरांसाठी हा प्राधान्याचा मुद्दा नसला, तरी स्त्री-पुरुष समानता त्यांना मान्य असावी, असं म्हणण्याइतका पुरावा नक्कीच उपलब्ध आहे. विशेष म्हणजे स्त्रियांसाठी भविष्यकालीन कायदे कसे असावेत, याचं दिग्दर्शन त्यांनी ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीत वैजनाथस्मृतीच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण त्यापेक्षा फार पुढं गेलो आहोत, असा दावा शे-पाऊणशे वर्षांनंतर आजही करता येत नाही.

यासंदर्भात राजारामशास्त्री भागवतांचं म्हणणंही स्त्रियांच्या स्थानाला व हक्कांना कल देणारं होतं, असं दाखवता आलं म्हणजे भागवत-केतकर-पाटील अशी एक परंपरा मानता येते, हे माझं म्हणणं शाबित होईल.

स्त्रियांविषयीच्या कर्मठ आणि सुधारकी कल्पना स्पष्ट करताना भागवतांनी शैव आणि वैष्णव यांच्यातल्या भेदाच्या प्रारूपाचा उपयोग करून घेतला आहे. त्यासाठी शिव आणि विष्णू या देवतांमध्ये तुलना करायलासुद्धा ते मागं-पुढं पाहत नाहीत.
शास्त्रीबुवा विचारतात ः ‘विष्णूची पत्नी सतत त्याचे पाय रगडणारी. ही जर साक्षात भगवंताच्या पत्नीची स्थिती, तर तल्लिंगी जातीची (म्हणजे अर्थात एकूणच स्त्रियांची) स्थिती तिच्यापेक्षा चांगली कोठून असणार? स्त्रीजातीने विष्णूचा किंवा वैष्णवांचा कोणत्या जन्मी कोणता असा अपराध केला होता, की त्यांतील रत्नास (लक्ष्मी ही समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणून) व तल्लिंगकांस ते सतत दासीप्रमाणे वागवतात?’

आता लक्ष्मी-विष्णू या दांपत्याच्या विरोधात ते शिव-पार्वतीचं युगुल कसं उभं करतात ते पाहा ः ‘शिव आणि शिवा यांचा जो अर्धांगक्षेम, तो सर्वथैव मनास पावन करणारा असून, लोकोत्तर व अनिर्वचनीय आनंदाची एक खाण होय.’
आणखी एके ठिकाणी ते म्हणतात ः ‘शैवांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोहोंचेही हक्क सारखे असत. शिवाचे स्वरूप जे कल्पिले आहे, ते बरोबर अर्धे पुरुष व अर्धे स्त्री, असेच कल्पिले आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हती’ व ‘भार्यापुत्रश्‍चदा सश्‍चत्रयस्ते निर्धनाः स्मृतः’ हे ब्राह्मणांचं मूळचं शास्त्र. स्त्रीस स्वतंत्र कर्माधिकार तर बिलकूल नाही. हा मीमांसकांचा एक मुख्य सिद्धान्त.’

शास्त्रीबुवांनी स्वतःच्या मुलीचं उपनयन केलं होतं, ही एकच गोष्ट त्यांची वर्तमानातली भूमिका स्पष्ट करण्यास पुरेशी ठरावी.
परत इतिहासाकडं वळायचं झाल्यास अशा मुद्द्यापर्यंत यायला हवं, की जिथं शास्त्रीबुवा आणि कॉम्रेड पाटील यांचं नातं जुळू शकतं. शास्त्रीबुवा लिहितात ः ‘अगदी अतिप्राचीन काळचे लोक स्त्रीप्रधान होते, पुरुषप्रधान नव्हते. ‘सूर्या’ हा शब्द वेदात स्त्रीलिंगी येतो. ‘सूर’ हे नाव सूर्यास तो जगताची ‘आई’ अशी कल्पना करून दिलेले आहे.’ यज्ञक्रियेतसुद्धा ‘होता’ हा पुरोहित मुळात स्त्री असली पाहिजे, असं भागवतांचं म्हणणं. होता देवतांना आवाहन करतो. भागवत म्हणतात ः ‘देवास बोलावण्याचे काम पूर्वीच्या काळी स्त्रियांचे असावे, असे अनुमान निघते. ‘देवता’ हा शब्द संस्कृतात नित्य स्त्रीलिंगी आहे. स्त्रियांचे आमंत्रण स्त्रियांनीच करणे योग्य दिसते.’ माझ्या आठवणीप्रमाणे, पाटील यांचा ज्या निॡती या गणदेवतेवर भर आहे, तिचाही उल्लेख भागवतांच्या लेखनामध्ये जवळपास तशाच रोखानं आलेला आहे.

भागवतांच्या पद्धतीविषयीही थोडी चर्चा करायला हवी. भागवतांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांचा आधार घेताना त्यांच्यावर टीकाही केलेली आहे,
त्याचबरोबर त्यांनी विद्वानांकडून तुच्छ मानली जाऊन उपेक्षित ठेवलेल्या प्राकृत भाषेला, विशेषतः महाराष्ट्री प्राकृतला, योग्य ते स्थानही दिलेलं आहे.
माझ्या समजुतीनं, भागवतांच्या एकूण सिद्धान्तांवर नजर टाकली, तर त्यांचा कार्ल मार्क्‍सप्रमाणे प्रधान आणि गौण यांच्यात उलटापालट करण्यावर भर होता, असे दिसेल. भागवंतांची ही उलथापालथ केवळ काळाची नसून स्थळाचीही असते. संस्कृत व प्राकृत या भाषांमधला संबंध उलगडताना त्यांनी ‘संस्कृत ही मूळ भाषा आणि प्राकृत तिचा अपभ्रंश’ या प्रचलित व विद्वत्प्रिय गृहीताला धक्का देऊन ‘प्राकृत ही मूळ असून, संस्कृत भाषा ही प्राकृतात बदल करून कृत्रिमपणे घडवण्यात आली,’ अशी मांडणी केली.

भागवतांनी केलेली भूगोलाची उलथापालथ तर विलक्षणच आहे. ‘यादवांचं मूळ स्थान उत्तरेत असून, ते नंतर दक्षिणेत आले,’ असंच परंपरा मानत आलेली आहे. मात्र, भागवतांनी ‘दक्षिण भारत, विशेषतः महाराष्ट्र, हेच यदुक्षेत्र असून यादव मूळचे इथलेच; ते इथून उत्तरेकडं पसरले,’ असा साहसी सिद्धान्त मांडला. मात्र, नंतर पौराणिकांनी यादवांच्या स्थानांची बेमालूम उलटापालट केली. त्यामुळं आता भागवत जे उलटं करत आहेत, ते खरंतर उलटं नसून, आधीच केल्या गेलेल्या उलट्याचं सुलटं करणं आहे!

-मार्क्‍सनं हेगेलला (म्हणजे त्याच्या ‘डायलेक्‍टिक्‍स’ला) डोक्‍यावर उभं केलं याचा अर्थ, मुळात हेगेलनंच ते (डायलेक्‍टिक्‍स) डोक्‍यावर उभं केलं होतं, त्याला मार्क्‍सनं सरळ, पायावर उभं केलं, असा घेतला जातो. तसाच काहीसा प्रकार भागवतांचा आहे. या पद्धतीला ‘व्यत्यासात्मक समीक्षा’ (Transformative critique) असं म्हटलं जातं. मार्क्‍सच्या आधी हा प्रयोग- उद्देश्‍य आणि विधेय यांचा व्यत्यास करून- फ्यूरबाख यांनी हेगेलच्याच संदर्भात केला होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात भागवंतांच्याही अगोदर ही पद्धत महात्मा जोतीराव फुले यांनी वापरली होती; पण तो मुद्दा वेगळा.
अशा प्रकारची क्रांतिकारक उलथापालथ करण्याचा भागवतांचा संप्रदाय (School) निर्माण होईल, असा संभवच नव्हता; परंतु जाणकारांनी त्यांची योग्य ती नोंद घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भागवतांबद्दल खूप आदर होता. डॉ. बाबासाहेबांचं भागवतांसंबंधीचं मत शास्त्रीबुवांच्या निवडक साहित्याच्या संपादक दुर्गा भागवत यांनी ‘प्रस्तावना-खंडा’त उद्‌धृत केलं आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात ः ‘राजारामशास्त्री भागवत हे आपले एक हितचिंतक आहेत, याची अस्पृश्‍यांना चांगलीच जाणीव होती, हे माझ्या लहानपणी मला आढळून आले. अस्पृश्‍योद्धारासाठी अगदी सुरवातीच्या काळात चळवळ करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. अस्पृश्‍यांसाठी झटणारे ते एक अत्यंत कळकळीचे कार्यकर्ते होते व त्यात त्यांचे कोणत्याही प्रकारचे राजकीय उद्दिष्ट नव्हते. याव्यतिरिक्त राजारामशास्त्री भागवतांची आठवण म्हणजे ‘हिंदू समाजाने आपला पाया तपासण्याची वेळ आली आहे,’ असे सांगणारा पुरुष त्या काळात तरी विरळाच होता...त्यांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध केले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.’

‘भागवतांची धराच हिंमत’ असा उपदेश राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना एका कवितेतून केलेला आहे. राजारामशास्त्री भागवत हे खरोखरच ‘हिंमतबहादूर’ होते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com