संघर्ष आणि स्वामिनिष्ठेची चाकणची भूमी !

२१ जून १६६०, हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला, प्रती - औरंगजेब समजल्या जाणाऱ्या शाहिस्तेखानाच्या हजारोंच्या सैन्यानं पुण्याबरोबरच जवळच असलेल्या चाकणच्या भुईकोटालाही वेढा घातला होता.
Chakan Fort
Chakan FortSakal
Summary

२१ जून १६६०, हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला, प्रती - औरंगजेब समजल्या जाणाऱ्या शाहिस्तेखानाच्या हजारोंच्या सैन्यानं पुण्याबरोबरच जवळच असलेल्या चाकणच्या भुईकोटालाही वेढा घातला होता.

२१ जून १६६०, हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला, प्रती - औरंगजेब समजल्या जाणाऱ्या शाहिस्तेखानाच्या हजारोंच्या सैन्यानं पुण्याबरोबरच जवळच असलेल्या चाकणच्या भुईकोटालाही वेढा घातला होता. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सिद्धी जौहरच्या वेढ्यात किल्ले पन्हाळगडावर अडकून पडले होते. स्वराज्यावर एकाच वेळी असं दुहेरी संकट आलं होतं. चाकणच्या भुईकोटाला पडलेला शाहिस्तेखानाचा वेढा आणि पन्हाळ्याभोवती ठाण मांडून बसलेलं सिद्धीचं तोफांसह सज्ज असलेलं सैन्य काही मागं हटायला तयार नव्हतं.

तिकडं बहिर्जी नाईकांनी शोधलेल्या चोरवाटेनं छत्रपती शिवाजी महाराज घोडखिंडीतून् विशाळगडाकडं रवाना झाले. सिद्धीच्या सैन्याशी दिवसभराच्या लढाईनंतर बाजीप्रभु देशपांडे अन्‌ फुलाजीप्रभु देशपांडे यांच्यासह शेकडो मावळ्यांनी आणि प्रतिशिवाजी महाराज बनलेल्या शिवा काशीद यांनी हौतात्म्य पत्करलं. तर इकडं चाकणच्या भुईकोटाला शाइस्ताखानाचा पडलेला वेढा भुईकोटातील मोजकेच मावळे जिद्दीनं परतवून लावत होते.

शाहिस्तेखानाचं सैन्य सुमारे २१ हजारांचं तर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वाखाली मोजके मावळे या वेढ्याला अत्यंत निर्धारानं, निकरानं, प्राणपणानं तोंड देत होते. शत्रूसैन्याची संख्या आणि हत्यारं, दारूगोळा, तोफा हे सगळं पाहूनही मराठ्यांचं सैन्य घाबरलं नाही, त्यांनी पहिल्या दिवसापासूनच तीव्र प्रतिकार सुरू केला. इतकंच नाही तर काही मावळे रात्रीच्या अंधारात किल्ल्यावरून खाली मोंगली सैन्यात घुसायचे, कापाकापी करायचे अन्‌ मोगल सैन्य पाठलाग करण्याच्या आतच किल्ल्यावर परतायचे. या अचानक धाडीमुळं मुघलांचं सैन्य हैराण झालं होतंच. पण काही धाडसी मावळे हुक्के म्हणजे गावठी बॉम्ब फेकून मुघल सैनिकांना बेजार करून सोडत. म्हणजे नारळ किंवा कवठाच्या फळामध्ये आतला गर काढून त्याच्यामध्ये अणकुचीदार (पॉईंटेड) खिळे भरायचे आणि त्याला एक वाताण लावायचं. शत्रूसैन्यात घुसलं की ते वाताण पेटवायचं आणि फुललं की अंगावर टाकून द्यायचं. मावळे हे हुक्के घेऊन जायचे आणि शत्रूसैन्यात घुसून मनसोक्त दिवाळी साजरी करायचे. ते टोकदार खिळे लागून् अनेक मोगली सैनिकांना जखमा व्हायच्या. अशा प्रकारे मावळ्यांनी महिना उलटला तरी आपला हा प्रतिकार अखंड सुरू ठेवला होता.

सैनिकांनाच काय पण खुद्द शाहिस्तेखानालाही आता हे सगळं पाहून किल्ल्यावरील धान्यसाठा आणि दारूगोळा संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. तरी त्यानं आपल्या सरदारांना बोलावून घेऊन हा वेढा आणखी तीव्र कसा करता येईल? भुईकोट कसा ताब्यात घेता येईल असं गंभीरपणे विचारलं. त्यातल्या एकानं काहीशा गांभीर्यानं पण त्यापेक्षाही सहजपणे सुचवलं की, आपल्या वेढ्याच्या ठिकाणापासून खंदकाखालून किल्ल्यापर्यंत भुयार खोदायचं आणि किल्ल्यात सैन्य घुसवून तो ताब्यात घ्यायचा. हजारो सैनिक तिथं होते, शाइस्ताखानानं खरंच ही सूचना मनावर घेतली आणि भुयार खोदायला सुरूवात झाली. किल्ल्यातल्या मावळ्यांपर्यंत ही बातमी जाऊ न देता भुयार खोदण्याचं काम फार नेटानं सुरु झालं आणि तब्बल ५४ दिवसांनंतर १४ ऑगस्ट १६६० च्या संध्याकाळी या भुयारातून पुढं सुरुंग लावून किल्ल्याचा बुरुजच उडवण्यात आला आणि खानाचं सैन्य आत घुसलं.

चाकणच्या भुईकोटाचा बुरुज धाडकन कोसळला, तिथले सैनिक मेले, तोफा पडल्या आणि किल्ल्याच्या तटबंदीला खिंडार पाडण्यात मुघलांना यश मिळालं. हजारो सैनिक आत किल्ल्यात घुसू लागले, पण हिंदवी स्वराज्यावर अटल निष्ठा असलेले सुमारे अडीचशे बुरुज मराठा सैनिकांच्या रुपानं आत जिवाच्या आकांतानं प्रतिकार करू लागले. १५ ऑगस्टच्या सूर्योदयानंतरही हजारोंचं सैन्य आत घुसण्याच्या बेतात असतानाही किल्ल्यातील मोजक्या मराठा शिलेदारांनी फिरंगोजींच्या नेतृत्वाखाली पराक्रमाची शर्थ केली, पण अखेर पराभव समोर दिसू लागला. तरीही भेकडपणानं पळायचं नाही असंच मावळ्यांचं वर्तन होतं. किल्लेदारासह या मावळी मनगटातलं ते अचाट शौर्य पाहून हत्तीवर स्वार झालेल्या शाहिस्तेखानानं देखील किल्लेदार फिरंगोजी यांना बादशहाला सामील होण्याचं आमंत्रण दिलं. अर्थात त्यांनी ते नाकारलं. तरीही खानानं फिरंगोजीसह जिवंत मावळ्यांना गड सोडण्याची परवानगी दिली. जखमी सैनिक, मेलेल्यांची प्रेतं, भगवा ध्वज आणि काही साहित्य बरोबर घेऊन फिरंगोजीनं अत्यंत दु:खी मनानं ५४ दिवसांच्या पराक्रमानंतर हा चाकणचा भुईकोट सोडला.

शिवचरित्रातील स्वामिनिष्ठेचा अन्‌ पराक्रमाचा हा तेजस्वी अध्याय आजही या भुईकोटाच्या रुपानं चाकणमध्ये पहायला मिळतो. पुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचं नाव ठेवलं संग्रामदुर्ग !

पुणे-नाशिक या मोठ्या रहदारीच्या मार्गावरील पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं हे चाकण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे अर्वाचीन आणि स्वातंत्र्योत्तर काळातली देखील प्रेरणाभूमीच आहे असं वाटतं. शेती आणि व्यापाराबरोबर विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) असल्यामुळं या परिसराला देशाच्या औद्योगिक विकासात एक महत्त्वाचं स्थान लाभलं आहे. ऑटोमोबाईल उत्पादनांचं देशभरातलं प्रमुख केंद्र म्हणून चाकण ओळखलं जातं. व्होक्सवॅगन, बेंझ, महिंद्रा, जग्वार, जनरल इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, ह्युंदाई अशा नामवंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसह ७०० पेक्षा लहान-मोठ्या उद्योग-आस्थापनांनी चाकण आणि परिसरानं भारताच्या औद्योगिक नकाशावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याबरोबरच चाकणची एक विशेष ओळख स्वातंत्र्योत्तर भारतातल्या शेती आणि सामाजिक क्षेत्राशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांचं प्रबोधन करून, लक्षावधी शेतकरी स्त्री-पुरुषांना संघटित करून देशव्यापी शेतकरी संघटना उभारण्याच्या शरद जोशी यांच्या क्रांतीकारी प्रयोगाची जन्मभूमी देखील हीच.

आपले वडील आयुष्यभर पोस्टात नोकरी करून ज्या सुपरिंटेंडेंट पदावर निवृत्त झाले ते पद नोकरीच्या सुरूवातीलाच मिळाल्याचे पाहून वडिलांना झालेला कमालीचा आनंद अनुभवतच शरद जोशी हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्ष देऊन १९६० मध्ये मुंबईत टपालखात्यात डेप्युटी डायरेक्टर पदावर रूजू झाले. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलं होतं. केंद्र सरकारमधील सेवा बजावल्यानंतर ३३ व्या वर्षी म्हणजेच १९६८ मध्ये ते स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या मुख्यालयात बर्न इथं नव्या जबाबदारीच्या पदावर रूजू झाले. १९७० मध्ये वडिलांच्या निधनानंतर काही महिने ते भारतात आले आणि इथल्या सर्वंकष परिस्थितीचा विशेषत: शेती, शेतकरी, गरीबीचा अभ्यास केला. अर्थात या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास आधीपासूनच होता आणि स्वित्झर्लंडमध्येही तो सुरूच होता. प्रचंड वाचनामुळं जगभरातील शेतकऱ्यांची दु:स्थिती, गरीबीचा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. अभ्यासानंतरच्या प्रत्यक्ष कृतीच्या दिशेनं जाण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला आणि त्यातूनच ही प्रतिष्ठेची आणि सुखासीन नोकरी सोडून् भारतात परतण्याचा विचार त्यांनी पक्का केला. कोरडवाहू शेती विकत घेऊन त्यामध्ये काही प्रयोग करण्याचे त्यांनी दोन वर्षे आधीपासून ठरवले.

ऐन आणीबाणीतच १९७६ मध्ये भारतात परतलेल्या शरद जोशींनी काही ओळखींमधून चाकणजवळच्या आंबेठाण या खेडेगावाच्या हद्दीत सुमारे साडे तेवीस एकर कोरडवाहू शेती विकत घेतली. १९७७ पासून या बरड जमिनीत त्यांनी शेतमजूर, कामगारांसह स्वत: हातात कुदळ फावडी घेऊन प्रचंड परिश्रम घेतले. समोर संत तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर दिसायचा. जवळच भामा नदी होती, पुढं ती भीमा नदीला जाऊन मिळते. भामा नदीवरच आसखेड धरण बांधण्यात आलं आहे. भामनेरच्या या खोऱ्यांतील आपल्या शेतजमिनीला शरद जोशींनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतून स्फूर्ती घेऊन `अंगारमळा'' हे समर्पक नाव दिलं.

विहीर खुदाईसह मशागतीची कामं, बांधबंदिस्ती आणि मग वेगवेगळी पीकं घेण्यास त्यांनी सुरूवात केली. पहिल्यांदा घेतलेल्या काकडीच्या विक्रीतून खर्च वजा जाता १८३ रु. राहिले, दुसऱ्यांदाही काही फायदा झाला. मात्र तिसऱ्यांदा काकडीच्या पिकाचा विक्री हिशेब त्यांनी आडत्याने दिलेल्या लखोट्यातील कागदावर वाचला आणि त्यांना धक्काच बसला. वाहतूक खर्च, हमाली, दलाली, मार्केट कमिटी चार्ज, वजनकाटा, मुख्यमंत्री फंडाला निधी हे सगळं जाता त्या व्यवहारातून फायदा राहिला बाजूलाच, शेतकरी म्हणून जोशींनाच उलटी पट्टी आडत्याला देणं लागत होतं. पुढचं बटाट्याचं पीक तर रोगामुळं गेलंच. शेतकऱ्यांना उत्पादनखर्चापेक्षा अधिक दर मिळण्याची म्हणजे हमीभाव मिळण्याची व्यवस्थाच नसल्यानं सगळीकडून नाडला जाणारा शेतकरी `जगाचा पोशिंदा'' असूनही कर्जाच्या चक्रव्युहात फसवला जातो हे वास्तव अभ्यासाअंती जाणून् शरद जोशींनी त्यावर मार्ग शोधला. १९७८ मध्ये चाकणच्या बाजारपेठेत त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं नाफेडच्या कांद्यांची खरेदी सुरू केली, व्यापारी आणि भूमीपुत्र म्हणवण्याऱ्या राजकारण्यांना या आंदोलनाचं आणि शरद जोशी यांचं वेगळेपण एव्हाना लक्षात आलं होतं. चाकणच्या या आंदोलनाची दखल खुद्द केंद्र सरकारनंही घेतली होती.

`इंडिया विरुद्ध भारत'' हे वास्तव मांडतानाच शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न, शेती सुधारणा, त्यांचे हक्क, कृषी अर्थव्यवस्था समजावून देत त्यांना गरीबीतून बाहेर पडण्याचा संघटित मार्ग म्हणून १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची त्यांनी स्थापना केली. स्वातंत्र्योत्तर भारतातलं सर्वात मोठं जनआंदोलन या संघटनेच्या रूपात त्यांनी उभारलं. मतं आणि गर्दी जमवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेण्याची, पाणी प्रश्नासह आपापल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांना संघटित होऊ न देण्याची खबरदारी घेणाऱ्या नेत्यांनी शेतकरी स्त्री-पुरुषांच्या या अभूतपूर्व देशव्यापी संघटनेचा धसकाच घेतला होता. स्वामीनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा, विकासनिष्ठा याबरोबरच चाकणच्या या भूमीनं भारतीय शेतकऱ्यांना संघर्षाचा मंत्र दिला, शरद जोशी यांचा `अंगारमळा'' आणि त्यांचं जीवन हा त्याचाच एक आविष्कार आहे.

(सदराचे लेखक पत्रकार आणि शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com