सामान्य-असामान्य : गुढी यशाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success

अनिकेत चौगुले खूप उत्साही, धडपड्या तरुण. बीकॉमपर्यंतच शिकलेला; पण जगाच्या शाळेत शिकण्याची चाणाक्ष आणि चौकस बुद्धी असलेला. प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची, ज्ञान आत्मसात करण्याची चिकित्सक बुद्धी.

सामान्य-असामान्य : गुढी यशाची

- डॉ. संजय वाटवे

अनिकेत चौगुले खूप उत्साही, धडपड्या तरुण. बीकॉमपर्यंतच शिकलेला; पण जगाच्या शाळेत शिकण्याची चाणाक्ष आणि चौकस बुद्धी असलेला. प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची, ज्ञान आत्मसात करण्याची चिकित्सक बुद्धी. जोडीला धडपड करून मेहनत करण्याची जिज्ञासू वृत्ती. घरची परिस्थिती बेतास बात. घरात खाणारी तोंडं सहा. अनिकेतला दोन भाऊ होते, म्हातारी आजी पण घरात होती. गरिबी असली, तरी घरात संस्कार चांगले होते. प्रामाणिक मेहनतीचं बी रुजवलं होतं. घरातले सगळे पुरुष लवकर उठून कामाला लागायचे. भाड्याच्या घरात फार काळ कोणालाच राहायचं नव्हतं.

अनिकेतला बीकॉम करताकरता हिशेब लिहिण्याची कामं मिळायला लागली. त्याची गोड बोलण्याची क्षमता, माणसं जोडण्याची कला, कष्ट करण्याची तयारी, कामातला प्रामाणिकपणा या गुणांमुळे तो खूप लोकप्रिय होत गेला. नवनवीन कामं मिळत गेली. बीकॉम झाल्यानंतर ओळखीच्या दुकानदाराकडे सेल्समन कम असिस्टंट मॅनेजरचा जॉब मिळाला. तयार कपडे, होजिअरी, मुलांचे ड्रेसेस असं मोठं दुकान होतं. दुकान लक्ष्मी रोडला असल्यामुळे चिकार गर्दी असायची. अनिकेत खूप सचोटीनं आणि जिज्ञासू वृत्तीनं काम पारखत गेला. मुळातच हुशार असल्यानं कपड्याचे प्रकार, पोत, प्रत असं सगळं शिकत गेला. सप्लायरला भेटून माल कसा बनवतात, कापड कोठून मिळवतात, कापडाची प्रत कशी ठरवायची, याची टिपणं काढत गेला. शिवणकला, फॅशन्स, डिझाइन सगळं शिकत गेला. अभ्यास करत गेला, विचार करत गेला.

दुकानात येणाऱ्या गिहाईकांना काय आवडतं, कसं आवडतं, कुठल्या फॅशन्समध्ये कुठले रंग आवडतात हे अभ्यासत गेला. स्टाईल्स, फॅशन्स, पॅटर्न, डिझाइन सगळ्यात तो तज्ज्ञ बनला. नवीन कस्टमरला काय आवडेल ते अचूक ओळखायला लागला. कशा पद्धतीनं माल दाखवायचा, सेल्स टॉक् काय करायचा... सगळ्यात हुशार बनला. स्वतःच्या प्रगतीचा विचार करत होताच; फक्त कलाटणी बाकी होती.

अनिकेत माझ्याकडे आला ते मोठं बाड घेऊनच. त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. त्यात सगळं PERT Anlyasis, market anlyasis , भांडवल मिळवण्याचे मार्ग, सप्लायरची लिस्ट, तयार कपड्यांचे मार्केटिंग सगळं सगळं लिहिलं होतं. अभ्यास तयार होता. नव्हतं फक्त डेअरिंग. त्याचसाठी तो माझ्याकडे आला होता. लहानपणापासूनच गरिबीचे चटके खाल्ल्यामुळे स्वभावात बुजरेपणा, मिंधेपणा, चोरटेपणा आला होता. आत्मविश्वास आपोआप येत नाही. अंगीभूत गुणांना सामाजिक शाबासकी, यश यांचाही पाठिंबा लागतो. अनिकेतला रोग, आजार नव्हताच, होता तो फक्त complex. त्याला personality development ची ट्रीटमेंट हवी होती.

काही महिन्यातच तो या समस्यांतून बाहेर आला. धडपडीला धडाडीची जोड मिळाली. बँकेकडून कर्ज मिळून स्वतःचा तयार कपड्याचा startup सुरु करण्याचं धाडस केलं. मला उद्‌घाटनाला बोलवायला आला. मी कार्ड पाहिलं, तर ब्रॅडचं नाव होतं, ‘डर्बीशायर’. मी कौन्सिलिंगमधे त्याच्याशी सगळे विषय बोलत होतोच. मी त्याला विचारलं, ‘‘हे नाव का निवडलं?’’ लगेच त्याच्या डोळ्यात ज्ञान तरळलं. तो म्हणाला, ‘‘माझा कपडेविक्रीचा अनुभव. लोकांना एकशब्दी आणि इंग्लिश नाव आवडतं. म्हणून ‘डर्बीशायर’! एक भारदस्त, लयबद्ध नाव.’’ त्याचं उत्तर मला आवडलं. मी त्या शायरच्या ‘शायरी’ला दाद दिली.

मी त्याच्या उद्‌घाटनाला गेलो. अनिकेत खूप भारावून गेला. लवकरच त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला. काही शाळांच्या युनिफॉर्मची ऑर्डर मिळाली. खूप चांगलं काम करून नाव कमावलं, पैसे कमावले. विचारपूर्वक वेगवेगळे डिझायनर ड्रेसेस तो कल्पकतेनं बनवू लागला.

अनिकेत माझ्याकडे पेढे घेऊन आला होता. त्याला फॉरेनच्या शाळांच्या युनिफॉर्मची खूप मोठ्ठी ऑर्डर मिळाली होती. आत्मविश्वास, प्रयत्न, अभ्यास, सचोटी अशा अनेक गुणांमुळे यशाची गुढी उभारली होती.! एके काळी मान खाली घालून, अंग चोरून अस्पष्ट बोलणारा अनिकेत, दुसऱ्याला प्रेरणा देणारं खणखणीत बोलत होता. त्याच्या वागण्या बोलण्यात एक प्रभावी रुबाबदारपणा आला होता. एक प्रेरक आत्मविश्वास आला होता.

आणि का नाही? आधी मागे मागे पडलेला घोडा डर्बी जिंकला होता!