
सामान्य-असामान्य : ‘मीसागूचा भाकतांडा’
- डॉ. संजय वाटवे
मित्रांनो, ३ जूनला वटपौर्णिमा येईल. तोच पती मागण्याचा हा दिवस. हल्लीच्या ढासळत्या, कोसळत्या विवाह पद्धतीमध्ये ही मागणी दुर्मीळच! माझ्याकडे येणाऱ्या मॅरेज कौन्सेलिंगच्या केसेसमध्ये ‘या जन्मी छळलंस पुन्हा भेटू नको’ अशीच वाक्यं ऐकायला मिळतात. पण पती प्रसन्न प्रभाकरसारखा असेल तर? ऐका तर त्याची कहाणी.
तुम्ही कधी ‘मीसागूचा भाकतांडा ‘हा मंत्र ऐकला आहे का? नसेलच. बरोबरच आहे. तसाच आहे तो ! एका जोडीपुरता किंवा घरापुरता त्याचा उपयोग; पण मंत्रकारानी आपल्या आचरणानी दिलेला गुरुमंत्र सगळ्या समाजाला उपयुक्त, आदर्श आहे.
प्रभाकर मूळचा मावळातला. पुण्यात नोकरी मिळाली म्हणून इथे स्थायिक झाला. वय असेल ४०- ४२. प्रभाकर हसतमुख, उमदा, वारकरी संप्रदायातला. वडील कीर्तनकार. तेच संस्कार त्याच्यावर. रत्नमाला त्याच्या नात्यातली. मोठी शंकरभक्त. स्वयंपाकात हुशार. या गुणांकडे बघून तिच्याशी लग्न केलं. एक वर्षात सारिका झाली. दोन-तीन वर्षांतच रत्नमाला नॉर्मल नाही, हे प्रभाकरच्या लक्षात आलं. तिला भास व्हायचे. त्या आवाजांशी ती संभाषण करायची. हातवारे करायची, त्यांच्याशी भांडायची, त्यांच्यावर ओरडायची. कधातरी पाच-दहा मिनिटं असं व्हायचं. नंतर हे रोजचंच झालं.
शेजारीण करणी करते म्हणून भांडायला लागली. घरी येणं नको झालं. अनेक जणांनी ‘वेडी आहे, सोडून दे’ असा सल्ला दिला. प्रभाकर म्हणायचा, ‘आपलं माणूस आहे मी तिला बरी करणार.’ आधी ससूनमध्ये, नंतर येरवड्याला दाखल केली. दोन वर्षांनंतर घरी आणली. ती खूप शांत झाली होती; पण विचित्रच वागायची. ध्यानस्थ बसायची. शंकराचा धावा करायची. मंत्र पुटपुटायची. घरचं केलं तर केलं, नाही तर नाही. प्रभाकरला घरकामाची सवय झालीच होती. तो स्वतःचा आणि मुलीचा डबा बनवायचा.
तिची लक्षणं पाहून मित्र म्हणाले, ‘आता खासगीत ने, खर्च कर तरच ती बरी होईल.’ प्रभाकर प्रेमानं तिला घेऊन आला. असली केस घरात आहे याचा खेद, तणाव नव्हता. रत्नमालाची केस क्रॉनिक झाल्यामुळे खूप विचित्र वागत होती. शंकराचा विषय निघाल्यावर ती म्हणाली, ‘मी डोळे मिटल्यावर मला शंकर महादेव दिसतात. ते माझ्याशी बोलतात. पण डोळे उघडल्यावर घाणेरडी माणसं दिसतात. असल्या डोळ्यांचा काय उपयोग? मला डोळ्यांचा आणि गोळ्यांचा उबग आला आहे.’ प्रभाकर शांतपणे समजावत बसला.
त्यानंतर रत्नमाला माझ्याकडे आली नाही. गोळ्याही व्यवस्थित घेतल्या नाहीत. गोळ्या संपल्या की प्रभाकर गोळ्या घेऊन जायचा.अशानी केस थोडीच सुधारणार होती? एक दिवस घरात भयंकर प्रसंग घडला. तिचे ‘निरुपयोगी’ डोळे काच खुपसून फोडून घेतले. प्रभाकरनी तिला ससूनला दाखल केलं. जखमा बऱ्या झाल्या; पण दोन्ही डोळे गेले. प्रभाकर चिडला, रडला, ओरडला नाही. कंबर कसून कामाला लागला. लहान मुलीचं बघू लागला. बायकोची सेवा करू लागला.
‘तू नियमित गोळ्या घेतल्या असत्यास तर हा झटका आला नसता,’ असं पटवण्यात यश आलं. तिला हाताला धरून घेऊन आला. तिची अवस्था बघून मला चर्र झालं. दोघांचं counselling झालं. तिनेही गोळ्या घेण्याचं वचन दिलं. प्रभाकरला हा डबल कामाचा लोड फार काळ खेचता येणार नाही, असं मी म्हणालो. त्यांना दृष्टी नसली तरी घरकामाचं ट्रेनिंग हळूहळू द्यायला सांगितलं. प्रभाकरला उत्साह आला. त्यांनी जोमानं ट्रेनिंग सुरू केलं.
प्रत्येक व्हिजिटला कुठली तर चांगली बातमी आनंदानं सांगायचा. या महिन्यात २० वेळा केर काढला. तर कधी वेणीफणी मला करायला लागत नाही. कधी मुलीचा डबा भरायला लागली, अशा बातम्या द्यायचा. त्याची उमेद पाहून मी चकित व्हायचो. त्याचे प्रयत्न, नियमित औषधं आणि प्रेम यांमुळे रत्नमाला सुधारत गेली. बरीच कामं स्वतः करायला शिकली. तिच्या आजाराबद्दल किंवा डोळे फोडून घेण्याबद्दल कधीच त्रागा केला नाही.
एका व्हिजिटला तो खूप आनंदात दिसला. कारण विचारल्यावर म्हणाला, ‘गॅस शेगडीची सुरक्षा गेले काही महिने शिकवतो आहे. त्याला यश मिळालं.’ मग ओल्या डोळ्यानी म्हणाला, ‘मला आता आयता डबा मिळायला लागला.’ माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तो म्हणाला, ‘योग्य वेळेला योग्य पदार्थ मिळावा, म्हणून बरण्यांची विशिष्ट रचना केली. त्याचा एक मंत्र बनवून तिच्याकडून असंख्य वेळा घोकून घेतला. जप केल्यासारखं.’ मग उत्साहानं उठून बरण्यांच्या क्रमवारीच्या मंत्राची चिठ्ठी मला दाखवली.
‘मीठ, साखर, गूळ, चायपत्ती पहिला खण. भाकरीचं पीठ, कळणा, तांदूळ, डाळ दुसरा खण.’...‘मीसागूचा भाकतांडा’ हाच तो मंत्र. बोलणं संपल्यावर प्रेमानं तिला उठवून सावकाश चल, असं म्हणत घरी घेऊन निघाला. माझ्या डोळ्यासमोर कौन्सेलिंगसाठी आलेल्या कोत्या व क्षुद्र मनाच्या असंख्य केसेस तरळल्या. उमद्या मनाचा ‘मालक’ प्रेमाने धर्मपत्नीला सांभाळत घरी निघाला. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींचा आचरटपणा, थिल्लरपणा, आवडीनं चघळला जातो. असंख्य लाईक्स्, फॉलोअर्स मिळतात. हे कसले आदर्श? प्रेम, माया, उत्साह, हसरेपणा अशा अनेक सद्गुणांचा असा पुतळा मात्र उपेक्षित राहतो. हे खरे आदर्श! यांना फॉलोअर्स पाहिजेत.
‘मीसागूचा भाकतांडा’ या मंत्राचा तुम्हाला काही उपयोग नाही. त्याचं मनन करण्याची गरज नाही; पण या मोठ्या माणसाला नमन मात्र नक्की करा.