जीवन सत्याचं प्रभावी दर्शन!

समाजसन्मुख आणि लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या वेचक व्यक्तींच्या जीवनातील ठळक व महत्त्वपूर्ण घटनांची काव्यमय अभिव्यक्ती इंद्रजित भालेराव यांच्या ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहात अनुभवता येते.
book bhuministanchi mandiyali
book bhuministanchi mandiyalisakal
Summary

समाजसन्मुख आणि लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या वेचक व्यक्तींच्या जीवनातील ठळक व महत्त्वपूर्ण घटनांची काव्यमय अभिव्यक्ती इंद्रजित भालेराव यांच्या ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहात अनुभवता येते.

- डॉ. सतीश बडवे saptrang@esakal.com

समाजसन्मुख आणि लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या वेचक व्यक्तींच्या जीवनातील ठळक व महत्त्वपूर्ण घटनांची काव्यमय अभिव्यक्ती इंद्रजित भालेराव यांच्या ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहात अनुभवता येते. कवितेच्या स्फुट अभिव्यक्तीबरोबरच काहीशा दीर्घतेकडे झुकलेल्या या कविता आहेत. संतपरंपरेपासून ते अलीकडच्या समाजमनस्क व्यक्तींच्या विधायक विचार व कृतींचा वेध घेणारी ही एक लक्षणीय मांडणी आहे. संपूर्ण काव्यसंग्रह त्या त्या व्यक्तींशी संवाद साधणारा आणि त्यांच्याशी समरस होत त्यांचं ‘पोर्टे्ट’ वाचकांसमोर ठेवणारा आहे. एका अर्थी मध्ययुगापासून ते आजच्या वर्तमानापर्यंतच्या विधायक दृष्टीचा शोधच त्यातून प्रकटतो. जनसामान्यांच्या उन्नयनासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या व स्वकर्तृत्वाने विचारांचा मानदंड उभा करणाऱ्या कर्तृत्ववान पुरुषांची ही शब्दचित्रं कवीच्या आत्मनिष्ठ जाणिवेचं दर्शन घडवतात. पण, त्याबरोबरच त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंना प्रकाशझोतात आणतात. चरित्राचा काव्यमय आकृतिबंध त्यातून साकारतो. या सर्वांशीच कवीचं एक आत्मीय नातं असल्याचंही वाचताना सतत जाणवत राहतं.

इंद्रजित भालेराव यांच्या अंतर्मनात ठाण मांडलेल्या या व्यक्ती आहेत. त्यांच्याशी जुळलेलं आंतरिक नातं आणि त्यांची लोककल्याणाची भूमिका या कवितांमधून प्रकट होताना दिसते.

या काव्यसंग्रहाच्या शीर्षकातून कवीची दृष्टी समर्पक पद्धतीने व्यक्त होते. ‘भूमिनिष्ठा’ आणि ‘मांदियाळी’ हे दोन्ही शब्द विशिष्ट दृष्टिकोन व्यक्त करणारे आहेत. भूमिनिष्ठा हाच ज्यांच्या जगण्याचा ध्यास होता अथवा आहे आणि जी इथल्या सत्त्वशील परंपरेशी बांधील आहेत, अशीच शब्दचित्रं इथं अर्थपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झालेली आहेत. एक अर्थी व्यक्तिकेंद्री विचार त्यातून प्रकट होत असला, तरी तो निव्वळ व्यक्तिकेंद्री नसून विचारकेंद्री आहे असं सहज लक्षात येतं. ही त्या व्यक्तींची चरित्रं नाहीत. जात, पंथ, भाषा, प्रांत, देश यांच्या पलीकडं जाऊन त्या कर्तव्यनिष्ठ जीवन जगलेल्या व्यक्तींची जीवनधारणा व्यक्त करणारी इंद्रजित भालेराव यांची अभिव्यक्ती आहे. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या परप्रांतीय भव्य व्यक्तिमत्त्वांची उचित नोंद इथं कवीने घेतली आहे. टागोरांनी शेती प्रयोग करणारं श्रीनिकेतन स्थापलं, नोबेल पुरस्काराचे पैसे ग्रामोद्धारासाठी दिले, मुला-जावयांना शेती संशोधन करून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटायला सांगितलं, अशा नोंदी करीत त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भूमिका इथं मांडल्या आहेत.

महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनकर्तृत्वाचा शोधही या कवितेत घेतलेला आहे. यशवंतराव चव्हाण, भाई उद्धवराव पाटील, शरद जोशी, विलासराव साळुंखे, पोपटराव पवार, साधनाताई आमटे या आधुनिक काळातील प्रभावी व्यक्तिमत्त्वांचं कर्तृत्व कविमनाला भुरळ घालणारं ठरलेलं दिसतं. यशवंतराव चव्हाणांचं कर्तृत्व समाजकारण, राजकारण, साहित्य यांसारख्या सर्व क्षेत्रांतून प्रगट झालं, त्याची नोंद कवीने घेतली आहे. भालेराव यांचा हा काव्यसंग्रह त्यांच्या प्रगल्भ व परिपक्व लेखनाची निशाणी आहे. दीर्घतेकडे झुकणारा या कवितेचा घाट हा त्यांच्या लेखनप्रयोगाचा आविष्कार आहे. लयबद्ध अभंगसदृश मांडणी, काहीशी मुक्त, गद्यात्मक अभिव्यक्ती, उदात्त विचारांचं केवळ जतन न करता, स्वतःच्या जीवनात त्यांचं प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या व्यक्तींचं जीवनचित्रण, तत्त्वनिष्ठ जगण्याचं बळ देणारी थोरामोठ्यांची जीवनदृष्टी यातून साकारलेली ही कविता आहे. या साऱ्या चरित्रनायकांची जनसंवादी भूमिका आणि त्यांच्या जीवनकार्याविषयी असणारी आत्मीयता याचं मिश्रण त्यांच्या कवितेतून प्रगटते. भूमी, शेती, शेतकरी, वंचितांचा समूह या साऱ्यांना कवेत घेऊन जगण्याची दिशा कशी शोधता येते, याचं प्रभावी दर्शन या कवितेत आहे. ‘आम्ही सारे भारतीय आहोत’, या उक्तीचा सार म्हणून प्रगटणारी इंद्रजित भालेराव यांची कविता मांडणीच्या नवेपणाबरोबरच जीवनसत्याचं प्रभावी दर्शन घडवते. पुस्तकाची निर्मिती विलास फुटाणे यांनी सौंदर्यदृष्टी ठेवून केली आहे. सरदार जाधव यांचं देखणं मुखपृष्ठ व आतील समर्पक रेखाचित्रं यामुळे भालेराव यांच्या कवितेचा परिणामही अधिक गडद होत जातो.

पुस्तकाचं नाव : भूमिनिष्ठांची मांदियाळी, कवी : इंद्रजित भालेराव, प्रकाशन : आदित्य प्रकाशन, औरंगाबाद (८४४६७९६५५७), पृष्ठं : १५६, मूल्य : २५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com