शंभर शरद ऋतू जगण्यासाठीचा मार्गदर्शक ग्रंथ (डॉ. शैलेश गुजर)

family doctor
family doctor

डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल विवेचन सोप्या मराठीत डॉ. श्री तांबे यांनी या ग्रंथातून केलं आहे.

"चरक', "सुश्रुत', "वाग्भट' आदी ग्रंथांतले आरोग्यनियम, आयुर्वेदिक औषधं, रोग-उत्पत्तीची कारणं, त्यांची मीमांसा या ग्रंथातून सहजसोपी करून सांगण्यात आली आहे. संस्कृत भाषा आणि तिचं अध्ययन-अध्यापन हळूहळू लोप पावत चाललं आहे. अशा या संक्रमणकाळात संस्कृत भाषेतला आयुर्वेद सोप्या मराठी भाषेत या ग्रंथातून सांगितला गेल्यामुळं, आरोग्याच्या ठोस कल्पना ज्या चक्रातून सिद्ध झाल्या आहेत, त्या डॉ. श्री तांबे यांनी वाचकांपर्यंत सहजपणे पोचवल्या आहेत.

आरोग्यशास्त्राचे सामान्य नियम, पर्यावरणाचा आरोग्यावर परिणाम, तरंगांचा परिणाम, संगणक आणि त्यामुळं उद्भवणाऱ्या व्याधी यांचं विवेचन या ग्रंथात आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्रात रोग आणि उपचार अशी सांगड असते, तर आयुर्वेद हा शरीर निरोगी कसं ठेवावं आणि आरोग्य प्राप्त कसं करावं हे दाखवतो आणि जर त्यातूनही मानवी चुकांमुळं रोगनिर्मिती झालीच तर आयुर्वेदातली शमन व शोधनचिकित्सा उपयोगी ठरते हा सिद्धान्त या ग्रंथातून युक्तीनं पटवून देण्यात आला आहे.
आयुर्वेदात आरोग्याची कल्पना मांडताना शरीर, मन, इंद्रिय यांचं आरोग्य सांगितलं आहे, तसंच वात, पित्त, कफ यांचं संतुलन म्हणजे आरोग्य आणि त्यांच्यातलं बिघडलेलं संतुलन म्हणजे रोगी-अवस्था, याविषयीचं विवेचन फारच सुंदररीत्या करण्यात आलं आहे. मन, बुद्धी जर समतोल व स्थिर असेल तर प्रज्ञापराध घडणार नाही. योग्य तेच आहार-विहार माणूस घेईल तर आरोग्य, अन्यथा रोगी-अवस्था!
पर्यावरणाचा, आरोग्य आणि आयुर्वेद याचा संबंध, वृक्षांचं आरोग्य, पर्यावरणाची काळजी आणि त्यातून संतुलनाची कृती या ग्रंथात सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे.

निसर्गाचा पहिला संपर्क मानवी त्वचेशी होतो; त्यामुळं प्रथम त्वचा खराब होते. पर्यावरणऱ्हासामुळं ती गतीनं होत आहे. अशा वेळी त्वचेची काळजी कशी घ्यावी, याची उत्तम माहिती या ग्रंथात आहे. "शत धौत-धृत' या पारंपरिक आणि अतिशय गुणकारी औषधाच्या माहितीमुळं त्वचेचं आरोग्य राखण्यात मदतच होईल.
आपण आपलं आरोग्य वजनाच्या काट्यानं पाहतो; पण पौष्टिक आहार किती खातो? "कॅलरी बेस'वर जाण्यापेक्षा शरीराची रचना वात, पित्त, कफ प्रकृती समजून आहाररचना केली तर लठ्ठपणा न येता शरीर सुडौल, बांधेसूद, आरोग्यपूर्ण राखता येतं.
"स्थूलता' हेदेखील कुपोषण असतं, त्याचा विचार या ग्रंथातून मांडण्यात आला आहे. पोषक तत्त्वांचा आणि प्रकृती-परीक्षणाचा विचार न करता खाल्लेलं अन्न नि:सत्त्व असतं; त्यामुळं कुपोषण होऊन स्थौल्य व्याधी होते. पचनशक्ती आणि जठराग्नी म्हणजे आतड्यांची अन्न पचवण्याची क्षमता आणि तयार होणाऱ्या रसाची सात धातूंत परिवर्तन करण्याची क्षमता जर सुदृढ असेल तर आरोग्य उत्तम राहतं. अन्यथा स्रोतसांमधून दूषित रस जाऊन व्याधी निर्माण होतात, या महत्त्वाच्या आयुर्वेदसिद्धान्ताची सोप्या मराठीतून केलेली रचना यातून डॉ. श्री तांबे यांचा आयुर्वेद-अभ्यास आणि भाषांतराचं शास्त्रीय सामर्थ्य दिसून येतं.

पाणी हेदेखील एक प्रभावी औषध आहे. त्याचा उकळून आणि सोन्याबरोबर शास्रीय वापर केला तर, सुवर्णसिद्ध जल प्यायलं तर प्रतिकारशक्ती वाढते. वाचकांनी सुवर्णसिद्ध जल प्राशन करावं, असं सुचवतानाच त्यावर संशोधन होण्याची गरजदेखील या ग्रंथात नमूद करण्यात आली आहे.
गेल्या शतकात आयुर्वेद मराठी भाषेतून सर्वसामान्यांसाठी सांगण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रांतून झाला होता; परंतु "सकाळ'नं डॉ. श्री तांबे यांचा ग्रंथ मराठीतून उपलब्ध करून दिला हे कौतुकास्पद होय.
व्यायामाचं महत्त्व अधोरेखित करताना देशी व्यायाम, सूर्यनमस्कार, कुस्ती या खेळप्रकारांमुळं मन, बुद्धी, विचारशक्ती, धारणाशक्ती प्रभावी राहते असं स्पष्ट करण्यात आलं असून, झोप येण्यासाठी अतिशय मोलाचा सल्ला या ग्रंथातून देण्यात आला आहे.

दूरदर्शन, संगणक-मोबाईल आणि त्यांच्या स्क्रीनचा तीव्र प्रकाश, इंटरनेट यांमुळं माणसाचं शारीरिक व मानसिक आरोग्य सध्या धोक्‍यात आल्याचा इशारा देतानाच त्यावरचे प्रभावी उपायही इथं सांगण्यात आले आहेत.
यकृत, हृदय, मूत्रमार्ग, किडनी, मेंदू यांच्या आजाराविषयीचं आणि आयुर्वेदिक उपचारांविषयीचं या ग्रंथातलं मार्गदर्शन वाचकाला उपयोगी ठरणार आहे. ग्रंथातली संस्कृत सुभाषितं व त्यांचे अर्थ वाचकांना दीर्घ काळ मार्गदर्शक ठरतील असे आहेत.
संगीत हे केवळ मौज-मजेचं नाही तर ते आरोग्यदायकही आहे हे लेखकानं सप्रमाण सिद्ध केलं आहे.
भारतीय संगीत, राग, सूर, ताल, वाद्यं हे आरोग्य प्रदान करतात. "संगीत' हे मानसिक आरोग्य वाढवतं व रोग्यांना रोगमुक्ती देऊ शकतं. यावर संशोधन केल्याचं जाणवतं.

निरोगी जगण्यासाठी आयुर्वेदात ऋतुचर्या-दिनचर्या सांगितल्या आहेत. ऋतुचक्रामुळं शरीरातले वात-पित्त-कफ यात बदल होतात. तथापि, आहार-विहारानं त्यात समतोल राखून आरोग्य प्राप्त करण्याची ग्रंथातली माहिती उपयुक्त आहे.
एकूणच, मराठीत आयुर्वेद घरोघरी पोचवण्याचं मोठं कष्टप्रद कार्य करण्यात आल्याचं "Best of फॅमिली डॉक्‍टर' या ग्रंथातून जाणवतं.
सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत आपली तीन-चार हजार वर्षांची आरोग्यपूर्ण आयुर्वेद-जीवनशैली पुन:स्थापित करण्याचा सक्षम प्रयत्न डॉ. श्री तांबे यांनी सिद्ध केला आहे.

ज्यांना आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी 100 शरद ऋतू जगावेत, अशी मनीषा आहे, अशा मराठी वाचकांनी "Best of फॅमिली डॉक्‍टर' वाचून कुटुंबातल्या प्रत्येकाला समजावून द्यावं म्हणजे डॉ. श्री तांबे यांचे प्रयत्न कामी येतील आणि 100 शरद ऋतू जगण्याचा मार्ग वाचकांना सापडेल!

पुस्तकाचं नाव : Best of फॅमिली डॉक्‍टर
लेखक : डॉ. श्री बालाजी तांबे
प्रकाशक : सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (8888849050)
पृष्ठं : 270
मूल्य : 650 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com