झीलॅंडियात दडलंय काय? (डॉ . श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar write article in saptarang
dr shrikant karlekar write article in saptarang

आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा भूवैज्ञानिकांचा आधीपासून अंदाज होताच. त्याचं अस्तित्व असल्याचं गेल्या वर्षी निश्‍चित झालं. त्यानंतर आतापर्यंत झीलॅंडियासंदर्भात अनेक कल्पना, संकल्पना, सिद्धान्त मांडले गेले आणि 27 जुलै 2017 पासून या आठव्या खंडाच्या प्रदेशात अधिक भूशास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी गाळ-उत्खननही सुरू झालं. पृथ्वीवरच्या सगळ्याच खंडांच्या इतिहासावर यातून बरंच काही हाती लागण्याची शक्‍यता तेव्हापासूनच निर्माण झाली होती.

विशेष म्हणजे, पृथ्वीवर सापडणाऱ्या अटलांटिससारख्या इतरही काही प्राचीन शहरांची रचना परग्रहवासियांनी करून ठेवली असल्याचं म्हटलं जात असून, अटलांटिस हे कदाचित नव्यानंच शोध लागलेल्या झीलॅंडियावरही असू शकेल अशी शक्‍यता, "नॅशनल जिओग्राफिक' या वाहिनीवरच्या "प्राचीन परग्रहवासी ' (Ancient Aliens ) या कार्यक्रमात पंधरवड्यापूर्वीच वर्तविण्यात आली आहे.

झीलॅंडिया हा खंड न्यूझीलंडच्या आजूबाजूला पसरलेला असून, त्याचा 94 टक्के भाग प्रशांत महासागराच्या पाण्याखाली बुडालेला आहे. वर डोकावणारा भाग आहे तो न्यूझीलंडचा आणि जवळपासच्या काही छोटेखानी उंचवट्यांचा! झीलॅंडियाचं सगळं भूकवच जाड असून ते समुद्रात बुडालेलं आहे. हा खंड म्हणजे न्यूझीलंडच्या परिसरात समुद्रतळावर, ईशान्येकडच्या लाऊ-कोलंविल्हे पर्वतरांगेपासून नैर्ऋत्येकडच्या रिझोल्यूशन पर्वतरांगेपर्यंत पसरलेला दोन लाख 86 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा उंचवटा आहे. याला "टॅस्मन्टिस' असंही म्हटलं जातं. न्यूझीलंड आणि त्याच्या आजूबाजूची अनेक लहान मोठी बेटं झीलॅंडियात समाविष्ट आहेत.
झीलॅंडिया हा खंड दोन समांतर पर्वतरांगा आणि त्यामधल्या खचदरीनं तयार झाला असून, पर्वतरांगांची उंची समुद्रतळापासून एक ते दीड हजार मीटर आहे. या खंडावर ज्वालामुखीय क्रिया घडून गेल्याचे अनेक पुरावे आढळतात. गोंडवनाच्या काळातली अश्‍मीभूत (Fossilized) जंगलं आणि ज्वालामुखीय चिखलही या खंडावर आढळून आला आहे.

"विज्ञानविषयक अनेक गुणधर्मांमुळं त्याला खंडाचा दर्जा देणंच सयुक्तिक आहे,' असा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनिया इथल्या शास्त्रज्ञांचा दावा होता. 50 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या खंडाचं भूकवच हे खंडीय (Continental) स्वरूपाचं आहे आणि त्याच्या आजूबाजूचं कवच पातळ, समुद्रीय (Oceanic) आहे. केवळ या एकाच गोष्टीवरूनही झीलॅंडिया हा खंड ठरू शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या बुडालेल्या खंडावर आढळणारे विविध प्रकारचे खडक सामान्यतः समुद्रतळावर आढळत नाहीत.

पृथ्वीवर दहा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गोंडवन या महाखंडाचा (Super-continent) झीलॅंडिया हा एक भाग होता. अंटार्क्‍टिकशी व ऑस्ट्रेलियाशी हा खंड जोडलेला होता. क्रिटेशियस कालखंडाच्या शेवटच्या काळात म्हणजे साडेआठ कोटी वर्षांपूर्वी तो गोंडवनपासून तुटून अलग झाला व तुटलेल्या भागात कवचाची जाडी कमी होत गेली. न्यूझीलंडचा प्रदेश त्यावर बेटासारखा शिल्लक राहिला. साडेआठ कोटी वर्षांपूर्वी झीलॅंडिया हा गोंडवन महाखंडापासून दूर झाला आणि ईशान्येकडं सरकला. ही स्थानबदलाची क्रिया 5.3 कोटी वर्षांपूर्वी थांबली. अडीच कोटी वर्षांपूर्वी याच्या दक्षिणेकडच्या प्रशांत भू-तबकाजवळचा भाग उत्तरेकडच्या भागाच्या तुलनेनं 500 किलोमीटर अंतरानं नैर्ऋत्येकडं सरकला.

आज परिचित असलेले पृथ्वीवरचे सात खंड हे सध्याच्या समुद्रपातळीपासून वर आहेत आणि ते समुद्रबूड किंवा भूखंडमंच (Continental Shelf ) या उथळ प्रदेशानं वेढलेले आहेत. प्रागैतिहासिक आणि भूशास्त्रीय काळात; विशेषतः हिमयुगाच्या कालखंडात (Ice Age ) समुद्रपातळी आजच्यापेक्षाही खाली असताना हे भूखंडमंच पाण्याबाहेर होते व खंडांचाच भाग होते. झीलॅंडिया मात्र आजही पाण्याखालीच बुडालेला खंड आहे! झीलॅंडिया हा अद्यापपर्यंत दुर्लक्षित असाच खंड होता. त्याच्या अस्तित्वाचा अंदाज असला तरी भूशास्त्रात व तबकविवर्तनी (Plate Tectonics) या संकल्पनेत त्याचा उल्लेख अभावानंच आढळतो. आजच्या नवीन संशोधनानंतर आणि झीलॅंडियाच्या प्रदेशात नव्यानं सुरू झालेल्या गाळ-उत्खननानंतर मात्र तबकविवर्तनी सिद्धान्तात नवीन विचारांची भर पडेल हे नक्की. गेल्या वर्षी जुलैपासून सुरू झालेल्या संशोधनासाठी "जोईड्‌स रिझोल्यूशन ' या गाळ काढणाऱ्या जहाजाचा वापर करण्यात येत असून, हे जहाज टास्मान समुद्रात पाच हजार मीटर खोली असलेल्या भागात सागरतळाखाली 300 ते 800 मीटरवरून अवसादांचे (Sediments ) नमुने
गोळा करील असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, या जहाजानं तीन ते चार हजार मीटर खोलीवरून आठ हजार अवसाद नमुने गोळा केले आहेत. हा सगळा गाळ अश्‍मीभूत (Fossilized) स्वरूपात असून यात शास्त्रज्ञांना या भागांत अनेक वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पतींचे आणि प्राण्यांचे शेकडो अवशेष आढळून आले आहेत; त्यामुळं झीलॅंडियाच्या निर्मितीचं आणि भू-तबकांच्या हालचालींचं कोडं उलगडायला मदत होत आहे.

जेमी ऍलन या अमेरिकी शास्त्रज्ञाच्या मते, पाच कोटी वर्षांपूर्वी भू-तबकांच्या हालचालींच्या आकृतिबंधात मोठे बदल झाले. त्यामुळे प्रशांत महासागराचं भू-तबक न्यूझीलंडखाली सरकलं; त्यामुळे न्यूझीलंड प्रदेशाचं उत्थापन (Uplifting) घडून आलं आणि ज्वालामुखीच्या नवीन कंकणाकृती प्रदेशाची निर्मिती झाली. भू-तबकांच्या हालचालीतला हा बदल नजीकच्या भूशास्त्रीय कालखंडातला एक मोठा बदल असून टास्मान समुद्रातल्या गाळसंकलनातून त्याविषयीचा ठोस पुरावाही सापडत आहे.
झीलॅंडिया साडेआठ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन या महाकाय भूखंडापासून सुटून गेल्यामुळं त्या वेळच्या समुद्रातले जलजीव व त्यांचं कोट्यवधी वर्षं जुनं जीवन आणि समुद्रातल्या कार्बनच्या पातळ्या यांवर कसकसे परिणाम झाले असावेत, या भागातल्या हवामानावर त्याचा कसकसा परिणाम झाला असावा, याबद्दलची माहिती आता हळूहळू कळू लागली आहे. त्याचा आधार घेऊन भविष्यातल्या हवामानबदलाबद्दल काही आडाखेही बांधता येतील, अशी शास्त्रज्ञांची धारणा आहे. भू-तबकं एकाखाली एक सरकल्यामुळं ज्वालामुखीची अग्निकंकणं कशी तयार होतात, समुद्रातल्या प्रवाहांचं चक्र व पर्यायानं हवामानाचं चक्र कसं बदलतं, पाच कोटी वर्षांपूर्वी भू-तबकांच्या रचनेत कसकसे बदल घडून आले, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरंही गाळसंकलनानंतरच्या अभ्यासातून मिळण्याची मोठी शक्‍यता आता निर्माण झाली आहे.

हवामानबदल वर्तविण्याच्या यापूर्वीच्या कोणत्याही प्रारूपात (Model) झीलॅंडियासारख्या उथळ समुद्रातल्या बेटांचा विचार कधीही झालेला नाही. अशा बेटांचा उथळपणा आणि त्यांचं भौगोलिक स्थान यांचा कधीही विचार न झाल्यामुळं हवामानबदलांच्या प्रारूपात अनेक त्रुटी राहिल्या असाव्यात. त्याही आता कमी करता येऊ शकतील. पृथ्वीचं हवामान, सागरतळाचा भूशास्त्रीय इतिहास, पराकोटीच्या (Extreme) हवामानाचे कालखंड, समुद्रतळावरचं जीवन, भू-तबकविवर्तनी, भूकंप निर्माणकारी प्रदेश, समुद्रतळावरच्या बेटांचं कंकण (Island Arcs ) अशा अनेक गोष्टींची उत्तरं झीलॅंडियाच्या आजूबाजूच्या संशोधनातून मिळण्याची मोठी शक्‍यता निर्माण झाल्यामुळे झीलॅंडियाच्या या शोधाचं शास्त्रज्ञांना मोठं अप्रूप वाटतं आहे!
सध्या सुरू असलेल्या झीलॅंडियाच्या संशोधनामुळे पृथ्वीच्या एकूणच भूशास्त्रीय इतिहासासंबंधी भरपूर नवी माहिती उजेडात आली आहे. लाखो वर्षांपूर्वीच्या अनेक भूशास्त्रीय घटनांचं तार्किक स्पष्टीकरण आता सहजपणानं देता येईल. अजूनपर्यंत हजारो फूट खोलीवरचं या भूखंडाच्या तुकड्याचं अस्तित्व अपरिचितच होतं. आता लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पूर्वी झीलॅंडिया हा भूखंड आजच्यापेक्षाही अधिक उथळ पाण्यात असावा. आज तो पूर्वीपेक्षा जास्त खोलीवर आहे. समुद्राच्या उबदार, उथळ पाण्यात जगणाऱ्या जिवांच्या भोवती असलेले छोटेखानी शिंपले, जमिनीवर वाढू शकणाऱ्या वनस्पतींचे परागकण यामुळे पूर्वी झीलॅंडियाचा भूगोल आणि त्यावरचं हवामान हे खूपच वेगळं असावं, असे संकेत नवीन उत्खननातून मिळाले आहेत.

ऑस्ट्रेलियापासून झीलॅंडिया नेमका कधी आणि कसा विभक्त झाला असावा, याविषयी अनेक तर्क-वितर्क असले तरी त्याबद्दलचा नेमका अंदाज बांधणं कठीण आहे, असंही नवीन माहितीतून पुढं येत आहे. "झीलॅंडिया हा खऱ्या अर्थानं भूमिखंड नसून तो भूमिखंडसदृश असावा' या मतप्रवाहाला नव्या संशोधनातून पुष्टी मिळत आहे. पॅसिफिकच्या अग्निकंकणाचा (Ring of fire) भूप्रदेश हा झीलॅंडियाचा महत्त्वाचा घटक असण्याची शक्‍यताही वर्तवण्यात आली आहे!

सगळ्यांना त्रस्त करून टाकणाऱ्या पृथ्वीवरच्या सध्याच्या हवामानबदलांबाबतची व प्राचीन हवामानबदलांबाबतची माहिती, त्यांचे आकृतिबंध याविषयी नेमकी माहिती, गोळा केलेल्या विस्तृत सांख्यिकी साठ्यावरून (Data bank ) मिळू शकेल, हे या संशोधनाचं बलस्थान आहे. या प्रदेशातल्या भूकंपविषयक आणि ज्वालामुखीय क्रियांचा तिथल्या जीवनावर कसकसा परिणाम झाला असावा, याबद्दलही काही ठोकताळे मांडता येतील. हे ठोकताळे आजच्या भूकंपविषयक व ज्वालामुखीग्रस्त प्रदेशांसाठी पथदर्शक ठरू शकतील. प्राचीन काळी विविध भूखंडांवरून प्राणी व वनस्पती इतरत्र कसकशा पसरल्या असतील व त्यांची स्थलांतरणं कसकशी झाली असतील, याचाही माग काढणं यातून शक्‍य होऊ शकेल.

समुद्रात बुडालेल्या अटलांटिस नावाच्या ज्या शहराचा उल्लेख ख्रिस्तपूर्व 347 च्या दरम्यान ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो यानं केला होता, ते अटलांटिस शहर झीलॅंडियावरच असावं, असाही एक अंदाज वर्तवण्यात येत आहे! अर्थात हा एक केवळ कयास असून तो सिद्ध करणंही तसं कठीणंच. "अटलांटिस हे मोठी वस्ती असलेलं शहर एका मोठ्या भूगर्भीय हालचालीनंतर समुद्रात बुडालं असावं,' असं प्लेटो यानं म्हटलं होतं. हे शहर खरंच अस्तित्वात होतं का आणि असलं तर कुठं...अटलांटिकमध्ये? भूमध्य समुद्रात? प्रशांत महासागरांत की अन्य कुठं यावर आजही संभ्रम कायमच आहे! हे शहर झीलॅंडियावरही असू शकेल, अशी शक्‍यता नॅशनल जिओग्राफिक या वाहिनीवरच्या कार्यक्रमात पंधरवड्यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती.
"जोईड्‌स रिझोल्यूशन'च्या प्रकल्पात मिळालेल्या प्रचंड माहितीचं विश्‍लेषण अजूनही सुरूच आहे.

पृथ्वी, त्यावरचे भूखंड, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांची निर्मिती, भूखंडवहनाची प्रक्रिया आणि हवामान अशा अनेक बाबतींतल्या अनेक विस्मयकारक गोष्टी या विश्‍लेषणातून समोर येण्याची शक्‍यता अजिबात नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com