पाणथळीचा अद्भुत आविष्कार (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं चित्र आहे. जागतिक पाणथळदिन कालच (ता. 2 फेब्रुवारी) झाला, त्यानिमित्तानं "कच्छचं रण' या पाणथळीविषयी...

गुजरात राज्यातलं कच्छचं रण हा पाणथळ प्रदेश (Wetland) म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आणि देखणा आविष्कार आहे. इतर पाणथळींपेक्षा अनेक बाबतींत वेगळा असलेला हा प्रदेश आपलं अगदी स्वतंत्र रूप अजूनही टिकवून आहे! फार मोठ्या भूशास्त्रीय उलथापालथीतून गेल्यावरच या पाणथळीला तिची आजची सगळी वैशिष्ट्यं प्राप्त झाली आहेत. भूजल किंवा पृष्ठजलामुळं कायमस्वरूपी किंवा ठराविक कालांतरानं संपृक्त होणाऱ्या भूभागाला पाणथळ प्रदेश असं म्हटलं जातं. नदीची पूरमैदानं, सरोवरं, किनारी दलदलींचे प्रदेश, खारफुटीची जंगलं ही सगळी याचीच उदाहरणं. पाणथळ प्रदेश जगातल्या सर्वाधिक उत्पादक अशा परिसंस्था आहेत. आजूबाजूच्या पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या अतिसंवेदनशील अशा या परिसंस्था अनेक जीवांचे उत्तम अधिवास आहेत. भारतातल्या सर्वच पाणथळ प्रदेशांनी संपन्न अशी जैवविविधता जपली आहे. कच्छच्या विस्तृत भागांत कच्छचं मोठं रण (Great Rann of Kachchh) ही पाणथळी पसरली आहे. तिच्या आग्नेयेला कच्छचं छोटं रणही (Little Rann) आहे. कच्छचं मोठं रण जगांत त्याच्या विस्तारासाठी, भूवैज्ञानिक इतिहासासाठी आणि जीवाश्‍मांसाठी एकमेव (Unique) म्हणून प्रसिद्ध आहे. सोळा हजार चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त क्षेत्रफळाच्या या पाणथळ प्रदेशात 20 कोटी वर्षं जुन्या ज्युरॅसिक कालखंडातल्या अवसादी (Sedimentary) खडकांचं प्राबल्य असून त्यात अगणित अशा जीवाश्‍मांचा अक्षरशः खच पडल्याचं आढळून येतं. या पाणथळ प्रदेशाची सरासरी उंची पाच मीटरपेक्षाही कमी आहे. दर वर्षी इथं तीनशे ते चारशे मिलिमीटर पाऊस पडतो. याच्या उत्तरेला थरच्या वाळवंटातल्या वाळूच्या टेकड्यांचा परिसर असून दक्षिणेला बानीचा गवताळ प्रदेश आहे. मोठ्या रणातल्या पच्छम, खदीर, बेला आणि चोरार या बेटांवर 23 ते 7 कोटी वर्षांपूर्वीचे स्तरित, अवसादी खडक असून तेही असंख्य जीवाश्‍मांनी समृद्ध आहेत. सात ते दोन कोटी वर्षांपूर्वी कच्छच्या रणाला उथळ समुद्राचं रूप प्राप्त झालेलं होतं. अकरा हजार वर्षांपूर्वी हिमयुगाच्या काळांत समुद्रपातळी खाली गेल्यामुळे रण गुजरातच्या खंबायतच्या आखाताला जोडलं गेलं होतं. आजपर्यंत अनेक वेळा कच्छच्या आणि गुजरातच्या इतर भागांत समुद्रपातळी कमी-अधिक प्रमाणात वर-खाली होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्या त्या वेळी अनेक सागरी वनस्पती आणि प्राणी समुद्रातल्या गाळात अडकून नष्ट झाले. त्यांचे जीवावशेष कच्छमध्ये आज जीवाश्‍मांच्या (Fossils) स्वरूपात फार मोठ्या संख्येनं आढळून येतात. या जीवाश्‍मांतली विविधता ही खरोखरच आश्‍चर्यकारक असून जगात आज जीवाश्‍मांचा खजिना असलेलं ठिकाण म्हणूनच कच्छ आणि कच्छचं रण ओळखलं जातं! कच्छचं रण ही पाणथळी जशी हंगामी (Seasonal) क्षारयुक्त म्हणून ओळखली जाते, तसं तिला वाळवंटी पाणथळ (Desert Wetland) असंही म्हटलं जातं. पावसाळ्यांत पाण्याखाली बुडालेला प्रदेश कोरड्या ऋतूत पाणी कमी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनामुळे क्षारांनी भरून जातो आणि सगळी पाणथळी पांढऱ्या शुभ्र रंगानं आच्छादून जाते. आपल्या प्रचंड मोठ्या भूशास्त्रीय प्रवासातल्या विविध घटनांचे अनेक पुरावे जीवाश्‍म, खडक आणि भूरूपांच्या स्वरूपात या पाणथळीनं जपून ठेवले आहेत.

भूशास्त्रीय काळांत हा अरबी समुद्राचाच एक भाग होता. त्यानंतर या भागाचं जे उत्थापन (Uplifting) झालं त्यामुळे तो समुद्रापासून तुटला आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या पाणथळीत झालं. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत पाणथळीतल्या खोल पाण्यामुळे तिथं नौकानयनही (Navigation) करता येत असे. नंतरच्या काळात मात्र पाणथळीत झालेल्या गाळाच्या प्रचंड संचयनामुळे इथं चिखलाचे विस्तीर्ण सपाट भाग (Mud flat ) तयार झाले. आज केवळ पावसाळ्यांत ही पाणथळी पाण्यानं भरून जाते आणि वर्षाच्या उर्वरित काळात ती क्षारांचं एक विशाल वाळवंट बनते! या पाणथळीच्या उत्क्रांतीत वारंवार होणाऱ्या भूकंपांचं मोठं योगदान आहे. सन 1819 मध्ये इथं झालेल्या विनाशकारी भूकंपात अनेक गावं नष्ट झाली आणि 90 किलोमीटर लांबीच्या नैसर्गिक बंधाऱ्याची निर्मितीही झाली. अल्लाह बंड (Allah Bund) असं नाव देण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे सिंधू नदीचा मार्ग बदलला आणि पाणथळीला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही संपुष्टात आला. या भूकंपाच्या साधारणपणे 800 वर्षं आधीही असाच मोठा भूकंप झाल्याची नोंद आहेच. त्यानंही या प्रदेशाच्या भूरूपिकीत (Geomorphology) बदल घडवून आणले होते. या पाणथळीच्या प्रदेशांत आज लोकसंख्या खूपच कमी असली तरी मानवी वस्त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात याला खूप महत्त्व आहे. 60 हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडं जे प्राचीन मानवाचं स्थलांतर (Migration) झालं त्या स्थलांतराच्या दुसऱ्या टप्यात ते मुख्यतः कच्छच्या रणाकडंच झालं असं मानववंशशास्त्रज्ञ स्पेन्सर वेल्स यांचं मत आहे. ख्रिस्तपूर्व 2600 वर्षांपूर्वी हा प्रदेश सिंधू संस्कृतीचा किंवा हडाप्पा संस्कृतीचा भाग होता. मोठ्या कच्छच्या रणात खदिर बेटावर ढोलावीरा नावाचं पुराजीवशास्त्रीय (Archaeological) वसतिस्थान उत्खननांत आढळून आलं आहे. याच्या जवळच 17 ते 18 कोटी वर्षं जुन्या झाडांचे अवशेषही सापडले असून ते किनाऱ्यावरच्या दगडांत जीवाश्‍मस्वरूपात दिसतात. इथली नऊ मीटर लांब आणि अर्धा ते एक मीटर व्यासाची झाडं वालुकाष्मांत व चुनखडकांत अश्‍मीभूत (Petrify ) झालेली आहेत! जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशाचं संधारण आणि तिथल्या नैसर्गिक संपदेचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीनं इराणमधल्या रामसर शहरात सन1971 मध्ये "रामसर आंतरराष्ट्रीय करारा'(Treaty)ला मान्यता देण्यात आली होती. या करारानुसार, कच्छच्या रणाला सन 2002 मध्ये रामसर पाणथळीचा (Ramsar Wetland) दर्जा देण्यात आला आहे.आज या पाणथळ प्रदेशांत अठरा जमातींचं वास्तव्य आढळतं. मात्र, इथली परिस्थिति आज मोठ्या वाहनांची वर्दळ, वृक्षतोड, क्षारउत्पाटन (Extraction) यांसारख्या घटनांनी बाधित होऊ लागली आहे. या विस्तीर्ण पाणथळीतच अनेक छोट्या पाणथळीही दिसून येतात. वाळवंटी पाणथळ, क्षार पाणथळ, लगून पाणथळ, दलदल पाणथळ यांनी आणि त्यातल्या जैवविविधतेनं कच्छचं रण अगदी समृद्ध बनलं आहे. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना, फ्लेमिंगोंना आणि अनेक प्राण्यांच्या जमातींना या पाणथळीनं मोठाच आधार दिला आहे.

आज भारतातल्या या अशा संवेदनशील ठिकाणच्या जैवविविधतेला कुठलंही संरक्षण नाही आणि म्हणावी तशी ओळखही त्याला दिली गेलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे पाणथळ प्रदेश हे जलीय जैवविविधतेचे (Aquatic Biodiversity) प्रचंड मोठे साठे असतात. परिसरीय, पर्यावरणीय आणि आर्थिक असं त्यांचं महत्त्वही खूप मोठं आहे. ही पाणथळी आज शहरीकरण, प्रदूषण आणि बदलतं भूमी उपयोजन यांचा खूप मोठा ताण तणाव सहन करत आहे. परिणामी, तिचा भौगोलिक विस्तार आक्रसतो आहे आणि तिची आर्थिक, पर्यावरणीय आणि जलशास्त्रीय क्षमताही कमी होते आहे. या पाणथळ जागेत जी जलजीवांची पैदास होत असते, ती माणसाच्या त्या भागात चालणाऱ्या विविध उद्योगांमुळे कमी होऊ लागली आहे. आपल्याकडं या पाणथळक्षेत्राच्या संधारणाची व विकासाची कुठलीही ठोस आणि सुनिश्‍चित यंत्रणा नाही, हे कच्छमधल्या या पाणथळीचा अभ्यास केल्यावर निदर्शनास आलं आहे. भारताच्या एकूण जलनीतीमध्ये अशा प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. भारतातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यासाठी या पाणथळींच्या पुनर्निर्मितीसाठी ती आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com