घोषणा 'मनुष्ययुगा'ची (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली.
असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी...

अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे "मनुष्ययुग' असं नामकरण करण्याच्या निर्णयाला ता 24 मे 2019 रोजी संमती दिली आहे. यामुळे होलोसिन (Holocene) या 11 हजार 700 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या भूशास्त्रीय कालखंडाची अखेर होऊन "मनुष्ययुग' सुरू झाल्याच्या अनेक वर्षांच्या चर्चेला आता विराम मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही!

"नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकानुसार हा अभ्यासगट यासंबंधीचा प्रस्ताव 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरविज्ञान आयोगाला (इंटरनॅशनल स्ट्रॅटीग्राफी कमिशन) सादर करणार आहे. एकदा अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुपकडून (एडब्ल्यूजी) हा प्रस्ताव अंतिम स्वरूपात मांडण्यात आला की जगभरातल्या सर्व स्तरवैज्ञानिकांकडून त्याचा विचार होईल आणि सर्वात शेवटी भूशात्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून त्याचं मूल्यांकन केलं जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरविज्ञान आयोग ही आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय संघटनेशी निगडित संस्था पृथ्वीचा स्तररचनेतून प्राप्त झालेला इतिहास महाकल्प (इरा), कल्प (पिरिअड) आणि पर्व (इपॉक) अशा कालगणनेत मांडण्याचं कार्य करते.

भूशास्त्रीय कालगणना श्रेणीतल्या विविध कालखंड विभागात पृथ्वीच्या जन्मापासून आत्तापर्यंत घडत आलेल्या निरनिराळ्या भूवैज्ञानिक घडामोडींचा संशोधनाअंती समावेश केलेला असतो. भूखंडनिर्मिती, भूखंडवहनाचा कालखंड, रूपांतरण, हिमयुगं इत्यादी गोष्टी त्यांच्या घटनाक्रमानुसार यात दाखवलेल्या असतात. त्या त्या कालखंडातल्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश करून एक अनुक्रमीय भूरचनाही (जिओक्रोनॉलॉजी) दिलेली असते.

सर्वसाधारणपणे पृथ्वीपृष्ठाखाली किंवा वर आढळणारे विविध खडकांचे स्तर व त्यांची रचना, अनुक्रम यांचा अभ्यास म्हणजे शिलास्तरविज्ञान (लिथो स्ट्रॅटीग्राफी) आणि अवसादीय किंवा गाळाच्या खडकातल्या थरांचा अभ्यास म्हणजे अवसाद स्तरविज्ञान (सेडीमेंट स्ट्रॅटीग्राफी). या दोहोंचा कालगणना व कालनिश्‍चिती यासाठी उपयोग केला जातो. पृथ्वीपृष्ठाखालील विविध स्तरातल्या जीवाष्मांच्या (फॉसिल्स) साह्यानं ते थर कोणत्या भूशास्त्रीय कालखंडात निर्माण झाले असावेत ते ठरवून त्यावरून प्राचीन पर्यावरणीय इतिहासाची पुनर्रचना केली जाते. स्तरात आढळणाऱ्या जीवाष्मांच्या साह्यानं जो अभ्यास केला जातो त्यास जैवस्तरविज्ञान (बायो स्ट्रॅटीग्राफी) असं म्हटलं जातं. पृथ्वीवरच्या जीवांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी स्तररचनाविज्ञानाचा खूपच उपयोग होतो. कोणते जीव केव्हा जन्माला आले, केव्हा नष्ट झाले याचाही यातून शोध घेता येतो. भूशास्त्रीय कालगणनेचा अनुक्रम हा स्तररचनाविज्ञानातूनच नक्की करण्यात येतो. स्तरविज्ञानात कालानुक्रम फारच महत्त्वाचा. जवळजवळच्या दोन स्तरांतला विसंवाद, त्यातल्या सीमारेषा व ज्या प्रक्रियेतून ते स्तर बनले त्यांचं स्वरूप अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासातून प्राचीन पर्यावरणाचा उलगडा करता येतो. पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या सगळ्या भूशास्त्रीय काळाची भूवैज्ञानिकांनी निरनिराळ्या कालखंडात विभागणी केलेली आहे. ही विभागणी प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा चार प्रमुख महाकल्पांमध्ये किंवा अजीव (अझोइक), प्राग्‌जीव (प्रोटेरोझोइक), पुराजीव (पॅलिओझॉइक), मध्यजीव (मेसोझोइक) आणि नवजीवन (कायनोझोइक) अशा नावांनीही करण्यात आलेली आहे. भूशास्त्रीय कालगणनेनुसार साडेचार अब्ज वर्षांपासून म्हणजे पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या कालखंडाची महाकल्प (इरा), कल्प (पिरिअड) आणि युग (इपॉक) अशा काळांत विभागणी आहे.

पृथ्वीचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंतच्या साडेचार अब्ज वर्षांत, विविध कालखंडात नद्या, हिमनद्या, समुद्रतळ, वाळवंटे, गुहा यांत विविध प्रकारचा गाळ गाडला गेला किंवा अडकून पडला. त्या त्या कालखंडातले खडक, खनिजे, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष आणि जीवाष्म गाळाच्या विविध थरांत बंदिस्त झाले. आज उत्खनन करताना किंवा भूकंप, महापूर, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीनंतर, पूर्वी गाडल्या गेलेल्या अशा गोष्टी पुन्हा दिसू लागतात. रेडिओ कार्बन, थर्मोल्युमिनिसन्स, पॅलिओ मॅग्नेटिझम अशा कालमापनाच्या अनेक पद्धती वापरून त्यांचं भूशास्त्रीय वय ठरवलं जातं. ज्या थरात त्या गोष्टी सापडल्या त्यावरून त्या काळातल्या भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि भूशास्त्रीय पर्यावरणाबद्दलचे निष्कर्ष काढले जातात. यातूनच पृथ्वीच्या सगळ्या इतिहासाची पुनर्निर्मिती केली जाते.

होलोसिन म्हणजे नूतनतम या सध्या सुरू असलेल्या भूशास्त्रीय युगाची सुरवात 11 हजार 700 वर्षांपूर्वी झाली असं मानण्यात येतं. याच कालखंडाच्या अगदी अलीकडच्या म्हणजे गेल्या काही दशकांच्या, मनुष्याच्या प्राबल्यामुळे महत्त्वाच्या बनलेल्या काळाला "आंथ्रपोसिन' म्हणजे "मनुष्ययुग' म्हणावं अशा तऱ्हेची ही सूचना आहे. सध्याच्या काळातल्या मनुष्याचा सगळ्या पृथ्वीवरच्या परिसंस्थावर, पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर जो चांगल्या-वाईट प्रकारचा आत्यंतिक आणि दूरगामी परिणाम होतो आहे तो पाहता, हा कालखंड केवळ आणि केवळ मनुष्याचाच कालखंड आहे असं प्रकर्षानं लक्षात येतं! त्यामुळेच या भूशास्त्रीय काळाचं "मनुष्ययुग' असंच नामकरण करणं गरजेचं आहे अशी वैज्ञानिकांच्या एका मोठ्या गटाची धारणा आहे.

"मनुष्ययुग' ही संज्ञा पारिस्थितिकी तज्ज्ञ युजेन स्टोरमर यांनी सन 1908 मध्ये सुचवली होती आणि पॉल क्रुटझेन या नोबेल पुरस्कार विजेत्या रसायनशास्त्रज्ञानं सन 2000 पासून या संज्ञेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या पृथ्वीभोवतालच्या वातावरणावर सगळ्यात मोठा परिणाम करणारा घटक कुठला असेल तर तो फक्त मनुष्यप्राणी आणि त्याचे विविध उद्योग हाच होय. आणि म्हणूनच आजचं युग हे "मनुष्ययुग'च आहे!

सन 1873 मध्ये इटालियन भूशास्त्रज्ञ अंतोनियो स्टोपानी यांनी माणसाच्या पर्यावरणावरील वाढत्या प्रभावाचा विचार करून या काळाला "मानववंश युग' असं म्हटलं होतं. सन 1999 मध्ये मायकेल साम्वेज यांनी "होमोजिओसिन' असं नामकरण केलं होतं.

खरं म्हणजे, या मनुष्ययुगाची नेमकी सुरवात कधी झाली हे अजूनही नक्की करता आलेलं नव्हतं. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धातल्या औद्योगिक क्रांतीचा कालखंड ही या "मनुष्ययुगा'ची सुरवात मानावी असं प्रथमतः ठरलं. मात्र, त्यानंतर काही संशोधकांनी, कृषी आणि नवपाषाण (निओलिथिक) क्रांतीपासून म्हणजे 12 हजार वर्षांपासून या युगाची सुरवात मानावी असं सुचवलं. भूमी उपयोजन, सर्व प्रकारच्या परिसंस्था व जैवविविधता यावर सहजपणे दिसू लागलेला मनुष्याचा प्रभाव आणि परिणामी काही जीवजंतूंच्या विनाशाला व लोप पावण्याच्या क्रियेला नेमकी कधी सुरवात झाली हे ठरवणं तसं कठीणच काम होतं.

कोणताही अडथळा नसेल तर पृथ्वीवरची जैवविविधता घातांकी दरानं वाढत राहते. मात्र, गेल्या काही शतकांत माणसाच्या निसर्गातल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ही वाढ काही ठिकाणी संथ गतीनं होते आहे, तर काही ठिकाणी ती पूर्णपणे थांबलेली आहे. पृथ्वीवरील पृष्ठजल, भूजल, मृदा, वनस्पती आणि वातावरणाचा थर यातल्या बदलांचा विचार करता होलोसिनचा उत्तरार्ध म्हणजे गेल्या पाच हजार वर्षांचा काळ हा मनुष्ययुगाचा कालखंड आहे, असा दावा काही शास्त्रज्ञ करत आहेत.

अनेक अभ्यासकांच्या मते, माणसाच्या निसर्गातल्या व पर्यावरणीय प्रक्रियांतल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरची जैवविविधता झपाट्यानं कमी होत असून पृथ्वीवरील सर्व पारिस्थितिकी संस्था (इकोसिस्टिम्स) या एकसारख्याच बनू लागल्या आहेत. त्यातली वैशिष्ट्यं नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्या सगळ्या एकसुरी दिसू लागल्या आहेत.

सन 2010 मधल्या एका संशोधनानुसार, जगातल्या सगळ्या समुद्रातल्या वनस्पती-प्लवकचं (फायटोप्लांक्तन) प्रमाण गेल्या दशकात निम्म्यावर आलं आहे. प्रवाळ व प्रवाळप्रदेश, सदाहरित जंगलं आणि आर्द्रभूमी-प्रदेश ही पृथ्वीवरची ऊर्जाकेंद्रं आहेत. इथूनच जैविक विविधता सर्वदूर पसरते. तिच्या विनाशाला आणि लोप पावण्याला आजचा मनुष्यच कारणीभूत आहे. वैज्ञानिकांच्या मते, आत्ताच्या अंदाजानुसार सध्या अस्तित्वात असलेले प्रवाळ हे या "मनुष्ययुगा'तल्या घटनांचा पहिला बळी ठरण्याची शक्‍यता आहे. गेल्या लाखभर वर्षात वातावरणातील कार्बन डाय ऑक्‍साइडचं प्रमाण 180 पीपीएमपासून 280 पीपीएमपर्यंत बदलतं राहिलं आहे. मात्र, सन 2013 च्या आकडेवारीनुसार हेच प्रमाण 400 पीपीएम इतकं झालं आहे.

गेली काही शतकं सोडली तर आधीचा कालखंड जगभरातच तुलनेनं कमी लोकसंख्येचा आणि मर्यादित मानवी क्रिया-प्रक्रियांचा होता. पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या सहजपणे लक्षात येणाऱ्या घटना आणि माणसाची निसर्गात अनिर्बंध, अविवेकी ढवळाढवळ सुरू असल्याची निरीक्षणं गेल्या हजार वर्षांत प्रामुख्यानं आणि गेल्या दोन-तीन शतकांत प्रकर्षानं दिसून येत आहेत. त्यानुसार गेली हजारभर वर्षं ही "मनुष्ययुग' म्हणून अधिक ठळकपणे मान्यता पावत आहेत असं दिसतं.

मनुष्ययुगाची ही सगळी लक्षणं गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मृदेच्या स्तरात आढळणाऱ्या अवसादात आणि उत्खननपदार्थात बंदिस्त झाली असून त्यांचा अभ्यास करून "मनुष्ययुगा'ची नेमकी सुरवात केव्हा झाली ते नक्की करता येईल, असं "एडब्ल्यूजी'मधल्या अभ्यासकांना वाटत आहे.

"मनुष्ययुग' या आधुनिक भूशास्त्रीय कालखंडातलं नागरीकरण, शेतीव्यवसाय यांच्याशी निगडित अशा घटनांमुळं झालेलं अपक्षरण (इरोजन) व अवसादवहन (सेडिमेंट ट्रान्सपोर्ट), तसंच कार्बनवृद्धी, पर्यावरणबदल, जागतिक तापमानवाढ, सागरपातळीतले बदल, सागरजलाचं आम्लीकरण, जैव-आवरणात (बायोस्फिअर) झालेले तीव्र बदल आणि कॉंक्रिट, फ्लाय ऍश, प्लास्टिक यांसारख्या नवीन खनिजांची आणि खडकांतली वाढ, तंत्रजीवाश्‍मांच्या (टेक्‍नोफॉसिल्स) संख्येदतली मोठी वाढ यामुळे हा कालखंड केवळ आणि केवळ मनुष्याच्या क्रिया-प्रक्रियांशीच संबंधित आहे, हे आता नक्की झालं आहे. या क्रिया-प्रक्रिया ज्या स्तरप्रकारात (स्ट्रॅटो टाईप) किंवा स्तरच्छेदात (स्ट्रॅटो सेक्‍शन) बंदिस्त झाल्या असतील ते स्तर भूशात्रीय खूण (मार्कर) म्हणून जागतिक पातळीवर ओळखता येणं हा यातील महत्त्वाचा भाग असेल. सन 1950 च्या अणुचाचण्यांनंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जा नाभिकीय केंद्रं (रेडिओ न्युक्‍लीड्‌स) पसरली. त्यांचाही जागतिक पातळीवर उपयोग होईल असं या अभ्यासगटातल्या तज्ज्ञांना वाटत आहे. कारण, अशी केंद्रं सागरी अवसादात, बर्फाच्या थरांत आणि लवणस्तंभात विपुलतेनं शिल्लक आहेत.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा (क्रोनोस्ट्रॅटीग्राफी) नवीन तक्ता नवीन माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली ता 13 जुलै 2018 रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यात '"मेघालयपर्व' अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला होता. भारताच्या दृष्टीनं ही एक अभिमानास्पद बाब असून संपूर्ण भूशास्त्रीय कालगणनाश्रेणीत (जिऑलॉजिकल टाइम स्केल) भारतातल्या प्रदेशांच्या नावांवरून कालगणना श्रेणीतला कालखंड संबोधण्याची ही पहिलीच वेळ होती!

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय गटानं भारतातील मेघालय राज्यातील मावमलु (Mawmluh) या चुनखडकातल्या गुहेत तयार झालेल्या लवणस्तंभांच्या (स्टॅलेक्‍टाइट) केलेल्या अभ्यासातून महत्त्वाच्या जागतिक घटनांचा उलगडा झाला होता. या गुहेतल्या संशोधनानुसार असं लक्षात आलं, की 4200 वर्षांपूर्वी जगभरात अचानक मोठा दुष्काळ पडला, तापमानात घट झाली आणि त्यामुळे जगातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या. जगानं दुष्काळाचं हे संकट 200 वर्षं सोसलं. इजिप्त, ग्रीस, सीरिया, पॅलेस्टाईन, मेसोपोटेमिया याचबरोबर सिंधू-खोरं आणि चीनमधल्या यांगत्सेचं खोरं इथल्या संस्कृती जास्त बाधित झाल्या. या सर्व ठिकाणांची शेतीप्रधान संस्कृती जवळजवळ नामशेष झाली.

समुद्रसपाटीपासून 1300 मीटर उंचीवर असलेल्या या गुहेतल्या चुनखडकात तयार झालेल्या लवणस्तंभातल्या अवसादांच्या पृथक्करणातून हा निष्कर्ष काढता आला म्हणून होलोसिन कालखंडाच्या 4200 वर्षं ते आजपर्यंतच्या कालखंडाला "मेघालयपर्व' असं नाव देण्यात आलं. याच वेळी होलोसिन या नूतनकाळाची विभागणी ग्रीनलॅंडियन
(11700 ते 8300 वर्षांपूर्वीचा काळ), नॉर्थग्रीपिअन (8300 ते 4200 वर्षांपूर्वीचा काळ ) आणि मेघालयन (4200 ते आजपर्यंतचा काळ ) अशी निश्‍चित करण्यात आली . हे तिन्ही कालखंड समुद्रतळावरील व सरोवरातला गाळ, हिमनद्यांतला आणि हिमनगांतला बर्फ व ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी लवणस्तंभातल्या कॅल्साइट खनिजांचे थर यावरून सुनिश्‍चित करण्यात आले आहेत . 11 हजार 700 वर्षांपूर्वी ग्रीनलॅंडियन काळात मिळालेले तापमानवाढीचे पुरावे, आठ हजार 300 वर्षांपूर्वीच्या नॉर्थग्रीपिअन काळातल्या आत्यंतिक थंडीचे पुरावे आणि मेघालयकाळातले चार हजार 200 वर्षांपूर्वीचे महादुष्काळाचे अनेक पुरावे अशा अवसादात मिळाले. मेघालयपर्वात चीनकडून मध्य आशियाकडं व भारतातल्या मेघालय प्रदेशाकडं मोठी मानवी स्थलांतरं झाली असावीत असाही निष्कर्ष काढणं शक्‍य झालं. या दुष्काळाचे पुरावे जगातल्या इतर ठिकाणच्या भूअवसादात आणि प्राचीन पुरातत्त्व ठिकाणीही सापडतात.

"मेघालय'पर्वात जगभरात समुद्र आणि वातावरणातील अभिसरणचक्रात मोठ्या हालचाली होऊन हवामानबदल घडून आले. याचे पुरावे जगात इतरत्र अनेक ठिकाणी अवसादांच्या थरात, प्राणी-वनस्पती यांच्या जीवाश्‍मांत आणि रासायनिक समस्थानिकांत (आयसोटोप्स) साचून राहिलेले आढळतात. त्यांचं कालमापन करून त्या वेळच्या पर्यावरणाचे नेमकं वर्णन करता येतं. ग्रीनलॅंडियन आणि नॉर्थग्रीपिअन काळातल्या कालमापन सीमा बर्फाच्या साठ्यात साचून राहिलेल्या जीवाश्‍मामुळे नक्की करता आली, तर मेघालयातल्या गुहेत लवणस्तंभातल्या उपलब्ध जीवाश्‍माच्या साह्यानं चार हजार 200 वर्षांची सीमा ठरवता आली. आज अठराव्या शतकानंतरचा काळ हा खऱ्या अर्थानं "मनुष्याचा कालखंड' मानावा, यावर एकवाक्‍यता दिसते आणि म्हणूनच "मेघालयपर्व' त्याआधी चार हजार 200 वर्षं असावं असंही सुचवण्यात आलं आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com