पृथ्वीची ‘तप्तपदी’! (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

डॉ. श्रीकांत कार्लेकर
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

पृथ्वीवरच्या आजपर्यंतच्या तापमानविषयक नोंदी पाहता २०१६ या वर्षाची नोंद ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून होण्याची शक्‍यता वाढली आहे. ही जागतिक तापमानवाढ रोखली नाही, तर भयंकर आणि सर्वदूर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात देण्यात आला आहे. आपल्या आजूबाजूचं हवामान लक्षणीयरीत्या बदलत असल्याची आणि तापमान वाढत असल्याची जाणीव गेल्या काही दिवसांत जवळजवळ सगळ्यांनाच होऊ लागली आहे. नव्या संशोधन अनुमानांमुळं सर्वांनाच जागरूक राहता येईल आणि परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील.

पृथ्वीवरच्या आजपर्यंतच्या तापमानविषयक नोंदी पाहता २०१६ या वर्षाची नोंद ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून होण्याची शक्‍यता वाढली आहे. ही जागतिक तापमानवाढ रोखली नाही, तर भयंकर आणि सर्वदूर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात देण्यात आला आहे. आपल्या आजूबाजूचं हवामान लक्षणीयरीत्या बदलत असल्याची आणि तापमान वाढत असल्याची जाणीव गेल्या काही दिवसांत जवळजवळ सगळ्यांनाच होऊ लागली आहे. नव्या संशोधन अनुमानांमुळं सर्वांनाच जागरूक राहता येईल आणि परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील. मात्र, हे बदल खूपच दीर्घकालीन असल्यामुळं एकदम भांबावून जाण्याचीही गरज नाही.

या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर याकाळात जागतिक तापमान १९६१ ते १९९० या कालखंडातील सरासरी तापमानापेक्षा ०.८८ अंश सेल्सिअसने जास्त होतं, असं निरीक्षण जागतिक हवामान संस्थेनं नमूद केलं आहे. पृथ्वीवरच्या आजपर्यंतच्या सर्व तापमान नोंदी पाहता २०१६ या वर्षाची नोंद सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून करता येण्याची शक्‍यताही त्यामुळं वाढली आहे.

या वर्षी सुरवातीपासूनच सक्रिय झालेला एल्‌ निनो आणि हवामानात होत असलेले दीर्घकालीन बदल या दोन गोष्टींचा हा परिपाक असावा आणि म्हणूनच या दोन कारणांमुळं तापमानात इतक्‍या झपाट्यानं वाढ झाली असावी, असा निष्कर्ष नासाच्या निरीक्षणांनुसार आणि संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालानुसार काढण्यात आला आहे. या अहवालानुसार, वातावरणात हरितगृह वायू त्यांची उच्चतम पातळी गाठत आहेत आणि आर्क्‍टिक महासागरातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तर गोलार्धात उष्णतेच्या प्रमाणात जानेवारी ते सप्टेंबरच्या दरम्यान झालेली तापमानवृद्धी तुलनेनं सर्वाधिक आहे, असं दिसून आलं आहे.

आर्क्‍टिक रशियात दीर्घकालीन सरासरी तापमानात सहा ते सात अंश सेल्सिअसनं, तर अलास्का आणि वायव्य कॅनडात तीन अंश सेल्सिअसनं वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. हैतीमधे झालेलं विध्वंसक वादळ, चीनमध्ये आलेला जोरदार पूर, कॅनडातल्या उष्णतेच्या लहरी आणि अनेक ठिकाणी जाणवलेले दुष्काळ या घटना या तापमानवृद्धीमुळेच असाव्यात, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, यात आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे संपूर्ण ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरवातीच्या कालखंडात सैबेरियन रशियातल्या तापमानात चार अंश सेल्सिअसनं घट झाली आहे!  
यंदाचं म्हणजे २०१६चं जागतिक तापमान सरासरीपेक्षा १.२ अंश सेल्सिअसनं वाढण्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. या शतकातल्या सतरा सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी सोळा वर्षं तापमान सरासरीपेक्षा फार जास्त नव्हतं; मात्र या वर्षाची सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद झाल्यास हे वर्ष जागतिक तापमानवाढ दोन अंशांच्या अत्युच्च मर्यादेकडं झुकत असल्याचं निदर्शक ठरेल, यात शंका नाही.   

ही जागतिक तापमानवाढ रोखली नाही, तर भयंकर आणि सर्वदूर परिणामांना सामोरं जावं लागेल; तसंच जागतिक जैवसाखळीवर विपरीत परिणाम होतील, असा इशाराही संयुक्त राष्ट्रांनी देऊन ठेवलाय. अशा तऱ्हेच्या अंदाज आणि भाकितांमुळं भांबावून जाण्याची मात्र मुळीच गरज नाही. हवामानाबद्दलची सध्या चालू असलेली अचूक निरीक्षणं, त्यासंबंधी मिळवली जाणारी भरपूर आकडेवारी आणि त्यांचा उष्णतावाढीसारख्या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठी करता येणारा नेमका उपयोग, यामुळं हे चित्र बदलूही शकेल, असा विश्वासही अनेक तज्ज्ञांना वाटतोच आहे.
बदलांचं नक्की कारण काय?
तापमानात होणारे हे बदल कशामुळं होत आहेत, याचं नेमकं उत्तर खरं म्हणजे आजही आपल्याला संपूर्णपणानं गवसलेलं नाही. आतापर्यंतच्या हवामानशास्त्रीय संशोधनातून एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे, की पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी असे अल्पकालीन तीव्र तापमानबदल यापूर्वी अनेक वेळा झाले आहेत. मात्र, त्यावेळची बदलामागची कारणं सध्याच्या पेक्षा नक्कीच वेगळी होती आणि त्यातली बरीचशी नैसर्गिक होती. आज जगभरात वाढत असलेला माणसाचा हस्तक्षेप या बदलास मोठ्या प्रमाणावर हातभार लावतो आहे, याबद्दल शास्त्रज्ञांच्या मनात अजिबात संदेह नाही.
गेल्या काही वर्षांपासून, जवळजवळ दर वर्षी हवामानबदलामधल्या उष्णता या घटकातल्या बदलांचे आकृतिबंध स्पष्ट करणारं संशोधन समोर येत आहे. यात संशोधकांना ज्या समान गोष्टी आढळल्या आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत. दीर्घकालीन उष्ण हवेचा कालखंड आणि त्याकाळात अधूनमधून दिसून येणारे थंड किंवा बाष्पयुक्त हवेचे अडथळे दाखवणाऱ्या - अवकाळी पाऊस, हिमवृष्टी, गारा, वादळं यांसारख्या घटना सातत्यानं; पण ठराविक काळानं घडत आहेत. या सर्वत्र समान हवामानशास्त्रीय घटना आहेत.

उष्णतावृद्धीची यंत्रणा
उष्णतावृद्धीची आणि हवामानबदलाची यंत्रणा ही अनेक शास्त्रज्ञांच्या मते अगदी साधी सरळ यंत्रणा आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग, समुद्र आणि वातावरणाचा थर यांच्यामध्ये होणारं ऊर्जेचं संक्रमण, तिचं संचलन, आगमन आणि बहिर्गमन केवळ एवढ्याच गोष्टींशी तात्कालिक आणि दीर्घकालीन हवामानबदलाचा आणि विशेषतः उष्णतावाढीचा संबंध आहे, असं लक्षात आलं आहे. अनेकांच्या मते सूर्याकडून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत आजही फारसा बदल झालेला नाही.  
हवामानातील हे उष्णतेशी संबंधित बदल समजण्यासाठी पृथ्वीवरच्या जागतिक बदलांचे आकृतिबंध समजून घेणं नेहमीच महत्त्वाचं राहिलेलं आहे. गेल्या वीस हजार वर्षांतच, पृथ्वीवरच्या हिमआवरणाचं प्रमाण ३३हून जास्त टक्‍क्‍यांनी कमी झालं आहे. समुद्राची पातळी अनेक मीटर्सनी सगळीकडेच उंचावली आहे. बर्फाच्या आवरणाचा दाब कमी झाल्यामुळे त्याखालच्या भूभागाची उंची वाढली आहे. वनस्पती आणि अरण्य प्रदेशांचं विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात अनेक वेळा स्थानबदल आणि आंदोलन झालं आहे. जगभरातल्या अनेक सरोवरांमध्ये पाण्याचं प्रमाण वारंवार कमी- जास्त झालं आहे. वाळवंटी प्रदेशांचा विस्तार वाढला आहे आणि कमीही झाला आहे.

उष्णतावृद्धीच्या सूचक घटना
अलीकडच्या काळातल्या काही घटना मात्र थोड्याशा काळजीपूर्वक अभ्यासानंतर आणि निरीक्षणांनंतरच लक्षात येत आहेत. आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिका; तसंच ग्रीनलॅंड प्रदेशातल्या समुद्रावरील बर्फाची कमी होणारी जाडी, महासागर, उपसागर आणि आखातं यांच्यातल्या जलचरांच्या नष्ट होणाऱ्या जाती, प्रजाती, वाळवंट आणि जंगलांच्या बदलत असलेल्या सीमा, वनस्पतींचं बदलणारं साहचर्य या घटना आधुनिक काळातल्या उष्णतावृद्धीच्या सूचक घटनाच आहेत.  
जागतिक तापमानवृद्धी हा सध्याच्या काळातला मुख्य हवामानबदल आहे. २०१४पासूनच्या घटना तापमानातील तीव्र वाढ दर्शवणाऱ्या आहेत.  एका अंदाजानुसार तर एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसनं वाढ होईल आणि या तापमानवृद्धीचे खूप दूरगामी परिणाम होतील. जास्त उंचीवरचे जेट प्रवाह दुर्बल होतील, वारे त्यांच्या दिशा बदलतील, वृष्टीचं प्रमाण कमी होईल, बरीचशी वृष्टी केवळ पाऊस या स्वरूपातच होईल, हिमवृष्टीचं प्रमाण कमी होईल, पुरांची संख्या आणि तीव्रता वाढेल, उन्हाळ्यात वादळांची संख्या वाढेल, हिवाळ्यात पाऊस पडेल, सागरपातळी दर वर्षी वीस ते तीस मिलिमीटरनं वाढेल, किनारी प्रदेशातलं भूजल अधिक खारट होईल. ध्रुव प्रदेशातला बर्फ पूर्णपणे वितळेल, दुष्काळप्रवण परिस्थितीचं प्रमाण वाढेल आणि शेतीप्रधान देशातलं शेतीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटेल. या सगळ्या घटनांकडं अर्थातच एक इशारा म्हणून पाहणंही आवश्‍यक आहे हे नक्की. भविष्याचं निराशाजनक चित्र दाखविण्याचा इरादा यामागं नाही, हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे.
सामान्यपणे हवामानात होणाऱ्या दीर्घकालीन बदलांचा कालखंडच खूप मोठा असतो आणि हे बदल अगदी संथ गतीनं होत असतात. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण, पृथ्वीच्या आसाचा कल आणि त्याचं प्रमाण, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं अंतर, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणपातळीचा कल, भूमी खंडांचं वितरण आणि त्यांचे स्थानबदल अशा अनेकविध गोष्टींमुळं पृथ्वीभोवतालच्या वातावरणात संथ गतीनं बदल होत असतात.  त्यातून जागतिक पातळीवर तापमान, पर्जन्यमान यांचे आकृतिबंध सतत बदलत असतात आणि त्यामुळं हवामानबदल निश्‍चितच संभवतात. मात्र, ही एक अती दीर्घकालीन प्रक्रिया असल्यामुळं माणसाच्या नेहमीच्या जीवनाशी त्याचा लगेचच संबंध येण्याची शक्‍यता कमी असते. मात्र, या दोन्ही अल्प आणि दीर्घकालीन बदलांचा तापमान हा प्रमुख निदर्शक असल्यामुळं ठराविक काळानंतर त्यातील बदलांचा आढावा आणि मागोवा घेणं गरजेचं असतं. 

पृथ्वी, समुद्र आणि वातावरणाची यंत्रणा
पृथ्वी- समुद्र- वातावरण ही यंत्रणा क्‍लिष्ट असली, तरी ती एका निश्‍चित पद्धतीनं परिणामकारकपणे कार्यरत असते. हवामानात होणाऱ्या दूरगामी बदलांसाठी या यंत्रणेतील सगळे नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. मात्र, सध्या सगळीकडं आढळणारे उष्णतेतले आणि पर्यायानं हवामानातले अल्पकालीन आणि तीव्र बदल हे पृष्ठभागानजीकच्या ‘तपाम्बर’ या वातावरण थरात मानवी क्रिया-प्रक्रियेमुळे होत असलेली ढवळाढवळ आणि हस्तक्षेप याचाच परिपाक आहेत, याबद्दलही दुमत आढळत नाही. एका अभ्यासानुसार, नंतर ‘तपस्तब्धी’ या ‘तपाम्बरा’च्या उच्चतम सीमेची उंची हजारो मीटरनी वाढली आहे. असे घातक बदल होऊ नयेत म्हणून निसर्गाचं संतुलन राखणं नेहमीच आवश्‍यक असतं.
जगातल्या सगळ्या महासागरांच्या सरासरी तापमानांत सध्या वाढ होत आहे. समुद्राच्या सातशे मीटर खोलीपर्यंत एक दशांश अंश सेल्सिअसनं वाढ जाणवते आहे. अंटार्क्‍टिकाच्या द्वीपकल्पीय भागात समुद्राचं तापमान पाच दशांश अंश सेल्सिअसनं वाढल्याचं दिसून आलं आहे. पृष्ठीय तापमानात होणाऱ्या या वाढीमुळं हिम आवरणाचे खालचे थरही आता वितळू लागले आहेत.

सागरपातळीत वाढ शक्‍य
अंटार्क्‍टिकाच्या तापमानातल्या वाढीचा नजीकच्या काळात जाणवू शकेल असा मोठा परिणाम म्हणजे जागतिक सागरपातळीतली वाढ. दरवर्षी तीन मिलिमीटर वेगानं ही वाढ होऊ शकते. हिमविलयन क्रियेमुळं जागतिक समुद्रात गोडं पाणी मोठ्या प्रमाणात मिसळून सगळ्या समुद्रांच्या पाण्याची क्षारता कमी होईल. वाढत्या उष्णतेमुळे आणि हिमविलयनामुळे अंटार्क्‍टिकाच्या थंड प्रदेशात कधीही न आढळणारे पक्षी आणि प्राणी दिसू लागतील. आत्तापासूनच या खंडावरच्या पक्ष्यांच्या काही प्रवृत्तींत बदल होऊ लागल्याचं पक्षितज्ज्ञांचं निरीक्षण आहे. अंटार्क्‍टिकावरचं तापमान वाढू लागल्यावर आणि त्यामुळे बर्फ कमी होऊ लागल्यावर अनेक भाग बर्फाच्या आवरणातून मुक्त होतील!

उत्तर ध्रुवाकडच्या आर्क्‍टिक महासागरात बर्फ वितळून त्याचं नीचांकी प्रमाण ११ सप्टेंबर २०१५च्या निरीक्षणात दिसून आलं. १९८१ ते २०१०च्या तुलनेत आर्क्‍टिकवरचं हिमआवरण १८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रातून नष्ट झालं आहे. आर्क्‍टिकच्या हिमविलयन प्रक्रियेवर एल्‌ निनोचा परिणाम असावा, असं नक्की सांगता येत नसलं, तरी अंटार्क्‍टिकाच्या हिमवितरणावर आणि वाढीवर एल्‌ निनोचा परिणाम असल्याचं सूचित होत आहे.

तापमानवाढीमुळं जगातलं आणि विशेषतः आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिकावरचं हिम वितळत असून हिमालय, युरोपियन आल्प्स इथल्या हिमनद्याही वेगानं वितळत असल्याचं निरीक्षण गेल्याच वर्षी जगभरात प्रसारित करण्यात आलं होतं. गमतीचा भाग म्हणजे अमेरिकेतील बोल्डर, कोलोराडो इथल्या राष्ट्रीय हिम आणि बर्फ सांख्यिकी केंद्र (NSIDC : National Snow and Ice Data Center) यांनी अंटार्क्‍टिका खंडावरील हिमाच्या विस्तारात व साठ्यात मोठी वाढ झाल्याचं निरीक्षणही नोंदवलं आहे!

गेल्या काही वर्षांतल्या आणि दिवसांतल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, उन्हाळ्याची वाढती तीव्रता, थंडीच्या लाटा, अनपेक्षित हिमवृष्टी, ढगफुटी, गारपीट, समुद्राचं किनाऱ्यावर वाढतं आक्रमण या कोणाच्याही सहजपणे लक्षात याव्यात, अशा घटना आहेत. या घटना ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी त्यांच्या आगमनाच्या किंवा घडून येण्याच्या निर्धारित वेळेपूर्वीच त्या घडणं ही गोंधळात टाकणारी स्थिती आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही.
आपल्या आजूबाजूचं हवामान लक्षणीयरीत्या बदलत असल्याची आणि तापमान वाढत असल्याची जाणीव गेल्या काही दिवसांत जवळजवळ सगळ्यांनाच होऊ लागली आहे. मात्र, हे बदल तात्पुरते आहेत, की पृथ्वीवर होऊ लागलेल्या एका मोठ्या संक्रमणाचे निदर्शक आहेत, हे नेमकेपणानं सांगता येत नाही, अशीही काहीशी संभ्रमावस्था यामुळे तयार झाली असल्याचं दिसून येत आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातल्या तापमानवाढीच्या, त्याचबरोबर वादळं, पूर अशा काही हवामानशास्त्रीय आणि पर्यावरणीय घटना पाहता हवामानबदलाची प्रक्रिया तीव्र होऊन तिचा वेगही खूपच वाढल्याचं पृथ्वीवर अनेक ठिकाणी जाणवतं आहे.

आधुनिक काळातली जागतिक तापमान नोंदींची सुरवात १८८०पासून झाली. २०१६ या वर्षातल्या आतापर्यंतच्या नोंदी तापमानात उच्चतम वाढ दाखवत असल्यामुळं या घटनेच्या परिणामांबद्दल भीती निर्माण होणं साहजिक आहे. सर्वांनाच या संशोधन अनुमानामुळं जागरूक राहता येईल आणि परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील. यादृष्टीनंच संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालाकडं पाहणं इष्ट ठरेल. मात्र, या भाकितांमुळं भांबावून जाण्याची मुळीच गरज नाही, असं या अनुषंगानं म्हणावंसं वाटतं!

Web Title: dr shrikant karlekar's saptarang article

फोटो गॅलरी