पुन्हा तेलगळती आणि हतबल यंत्रणा (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

डॉ. श्रीकांत कार्लेकर
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मॅपल आणि डॉन कांचीपुरम या दोन मालवाहू जहाजांची तमिळनाडूतील चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या कामराजर बंदरात नुकतीच टक्कर झाली आणि त्यानंतर डॉन कांचीपुरम जहाजाला भेग पडून मोठी तेलगळती सुरू झाली. या तेलगळतीमुळं तेलतवंग समुद्रात आणि किनाऱ्यावर सर्वत्र पसरण्याचा मोठा फटका जवळच्या अनेक पुळणींना बसला आहे. अशा प्रकारच्या तेलगळतीमुळं होणारे परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास, त्यावरचे उपाय आणि मर्यादा आदी गोष्टींचा घेतलेला वेध.

मॅपल आणि डॉन कांचीपुरम या दोन मालवाहू जहाजांची तमिळनाडूतील चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या कामराजर बंदरात नुकतीच टक्कर झाली आणि त्यानंतर डॉन कांचीपुरम जहाजाला भेग पडून मोठी तेलगळती सुरू झाली. या तेलगळतीमुळं तेलतवंग समुद्रात आणि किनाऱ्यावर सर्वत्र पसरण्याचा मोठा फटका जवळच्या अनेक पुळणींना बसला आहे. अशा प्रकारच्या तेलगळतीमुळं होणारे परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास, त्यावरचे उपाय आणि मर्यादा आदी गोष्टींचा घेतलेला वेध.

मॅ  पल आणि डॉन कांचीपुरम या दोन मालवाहू जहाजांची तमिळनाडूतील चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या कामराजर बंदरात २८ जानेवारी रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास टक्कर झाली आणि त्यानंतर डॉन कांचीपुरम जहाजाला भेग पडून मोठी तेलगळती सुरू झाली. हे मालवाहू जहाज ३२,८१३ टन इतकं पेट्रोलियम तेल घेऊन जात होतं.

या घटनेला आज दोन आठवड्याहून अधिक काळ उलटून गेला असला, तरी घटनास्थळ आणि त्याभोवतीच्या दहा किलोमीटरच्या परिसरातील तेलतवंग नष्ट करण्याच्या प्रयत्नांना अजूनही म्हणावं तसं यश आलेलं नाही! थिरुवल्लूर, खरं म्हणजे चेन्नई आणि कांचीपुरम जिल्ह्यातल्या किनाऱ्याच्या आणि किनारासमीप समुद्राच्या स्वच्छतेचे प्रयत्न लगेचच सुरू करण्यात आले होते. २ फेब्रुवारीपर्यंत केवळ ८५ टन तेलयुक्त चिखल (Sluge) एरनावूरच्या किनाऱ्याजवळून काढून टाकण्यात यश आलं होतं. याच ठिकाणी समुद्री प्रवाहांमुळं सर्वांत जास्त तेलयुक्त चिखल जमा झाला होता. त्यानंतर जैविक प्रक्रिया करण्यासाठी हा चिखल एन्नोर बंदराकडे पाठविण्यात आलाय. या तेलगळतीमुळं तेलतवंग समुद्रात व किनाऱ्यावर सर्वत्र पसरण्याचा या आपत्तीचा मोठा फटका एरनावूर, चेन्नई, मरिना बीच, वसंतनगर, कोट्टिवक्कम, पालवक्कम आणि इंजाबक्कमच्या पुळणींना बसल्याचं दिसून येतं आहे.
या तेलतवंगाचा परिणाम पुढचे अनेक दिवस होतच राहणार हे लक्षात घेऊन, कामराजर बंदरापासून साठ किलोमीटरच्या परिघात तेलतवंग समुद्रात पसरण्याचे प्रवाहमार्ग निश्‍चित करणं, सागरी जीव आणि वनस्पती यांवर होणारे परिणाम तपासणं या गोष्टी सुरू झाल्या आहेत. ईशान्येकडून येणारे जोरदार वारे आणि दक्षिणेकडून येणारे प्रबळ सागरी प्रवाह यामुळे हे तेल वेगानं दक्षिणेकडं पट्टिनापक्कमपर्यंत आणि त्या पुढंही इलिओट्‌स बीचपर्यंत जाऊन पोचलं आहे. ताशी सहा ते दहा मीटर वेगानं पुढं सरकणारा हा तेलाचा तवंग नष्ट करण्याचं मोठंच आव्हान संबंधित यंत्रणापुढं आहे.

काळ्या रंगाचे तेल गोळे किनाऱ्यावर पसरले आहेत. किनाऱ्यावरच्या धूपरोधक भिंती (Anti-erosion walls ) काळ्या झाल्या आहेत. भारताचा किनारा ऑलिव्ह रिडली या कासवाच्या प्रजातीचा आवडता किनारा म्हणून ओळखला जातो. या तेलगळतीनंतर आतापर्यंत या प्रकारची चाळीस कासवं तेलतवंगानं बाधित होऊन किनाऱ्यावर आलीत.
समुद्रातील या तेलगळती व तेल तवंगाचा किनारी पर्यावरणावर नेमका किती व कसा परिणाम झाला आहे आणि भविष्यात होणार आहे, ते अजूनही स्पष्ट  झालेलं नाही. सरकारी पातळीवर त्या संबंधीचं कोणतंही स्पष्टीकरण अजूनही उपलब्ध नाही. मात्र किनाऱ्यावर दिसू लागलेल्या दुष्परिणामांचा स्थानिक लोकांशी बोलून अंदाज घेता आला आणि समस्येचं गांभीर्य लक्षात आलं. स्थानिकांच्या निरीक्षणावर आणि वर्णनावर पूर्णपणे विसंबून राहता येत नसलं, तरी अशा तऱ्हेच्या घटना यापूर्वी जगात आणि भारतात अन्यत्र जेव्हा घडल्या तेव्हाचे परिणाम अभ्यासून स्थानिकांच्या निरीक्षणातील सत्यता तपासून पाहता येईल.

७ ऑगस्ट २०१० रोजी मुंबईजवळ जहाजांच्या झालेल्या टकरीनंतर असंच संकट ओढवलं होतं. त्यानंतर सुरू झालेल्या तेलगळतीमुळं समुद्रपृष्ठ आणि किनारी प्रदेशातलं पर्यावरण धोक्‍यात आलं होतं. मुंबईच्या दक्षिणेकडं अलिबागपर्यंतचा प्रदेश तेलगळतीमुळं बाधित झाला होता. जहाजातलं तेल ताशी तीन टन या वेगानं समुद्रात पसरून मुंबईपासून अलिबाग, मारवा, घारपुरीपर्यंत तवंग पसरला होता. जहाजावरचे तीनशे कंटेनर समुद्रात बुडाल्यामुळं पाचशे टनांपेक्षा जास्त इंधन तेल समुद्रात सांडलं होतं.

जगातल्या अनेक राष्ट्रांनी समुद्रातल्या तेलगळतीसंदर्भात आज अनेक नियम कडक केले आहेत. अमेरिकेत १९८९नंतर यामुळंच तेलगळतीचे प्रकार झपाट्यानं कमी झाले आहेत. तेलवाहू जहाजावरच्या कडक निर्बंधामुळंच हे शक्‍य झालं. १९८९मध्ये अलास्काच्या १७७० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावरच्या पर्यावरणाचं तेलवाहू जहाजावरील तेलगळतीमुळं अतोनात नुकसान झालं. हजारो समुद्री ऑटर्स आणि पक्षी नष्ट झाले. किनाऱ्यावरील खडकाळ प्रदेशात खडकावर जमलेल्या तेलाचा थर हजारो कामगार लावून स्वच्छ करण्यात आला. १९९०मध्ये लावण्यात आलेल्या oil pollution act च्या  कडक अंमलबजावणीचा आज खूपच चांगला परिणाम दिसतो आहे.
समुद्रातल्या जहाजातून गळती सुरू झाल्यापासून त्याचे परिणाम किनारी प्रदेशात दिसू लागेपर्यंत २० ते २४ तासांचा कालावधी लागतो. त्यानंतरच किनारा स्वच्छता मोहीम हाती घेतली जाऊ शकते. यासाठी किनाऱ्यापासून सत्तर किलोमीटर अंतराच्या आतील सर्व तेलवाहक जहाजावर कडक नजर ठेवणं गरजेचं असतं.

किनारी परिसर, तेलगळती आणि तेलतवंगापासून मुक्त ठेवण्यासाठी जगभरात जी यंत्रणा राबवली जाते, त्यात मुख्यतः गळतीच्या ठिकाणीच उपलब्ध यंत्रणांचा वापर केला जातो. यात तेलतवंग पसरण्यास अटकाव करणारे जाळीसदृश बूम, पाण्यापासून तेल वेगळं करणारे स्कीमर्स, तेलशोषक पदार्थांचा वापर, लेसर किरणांच्या साह्यानं तेलवाहू जहाजाजवळ पसरलेलं तेल जाळून टाकणं, रासायनिक डिस्पर्सल वापरणं, विशिष्ट bacterial स्ट्रेन वापरणं या आणि अशा अनेक पद्धतींचा वापर केला जातो. मात्र, खवळलेला समुद्र, बर्फाच्छादित समुद्रपृष्ठ अशा परिस्थितीत या सर्वच पद्धतींचा परिणामकारक उपयोग होतोच असं नाही. किनाऱ्यावरच्या पुळणीवर शोषक कागद पसरून किंवा मोठमोठ्या चाळणी वापरून वाळूतले तेलतवंग आणि डांबराचा थर दूर करून पुळणी स्वच्छ केल्या जातात.

तेलतवंग किनाऱ्याच्या दिशेनं पसरून किनारी पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम दूरगामी स्वरूपाचे असतात. अनेक वर्षं किनारा स्वच्छता मोहिमा राबवूनही तेलगळतीनं बाधित किनारे स्वच्छ होत नाहीत, असा जागतिक अनुभव आहे. किनाऱ्यावरच्या खडकांच्या खूप खाली हजारो गॅलन तेल आणि डांबर पाझरत जातं. खडकावर किंवा पृष्ठभागावर राहिलेल्या तेलाचं अस्फाल्ट बनतं.
तेल कंपन्या तेलगळतीच्या पर्यावरणीय परिणामांचा कधीही विचार करत नाहीत. त्यासंबंधीचा अभ्यास आणि संशोधन ही तर खूपच लांबची गोष्ट! काही देशांनी तेल कंपन्यांना या गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. त्यासाठी ऑईल स्पिल रिस्पॉन्स प्रोग्रॅम्स तयार केले आहेत. या कंपन्यांकडून तेलगळतीनंतर  भरमसाट कर वसूल करण्याच्या योजनाही आहेत. शिवाय पर्यावरण पुनर्निर्माण करण्यासाठी कडक अटी आणि बंधनं आहेत.

भरती-ओहोटीचे प्रवाह आणि वारे यांमुळं तेलतवंग पसरण्याचा वेग नेहमीच वाढतो. मॉन्सूनमधल्या प्रचंड मोठ्या लाटा, अनुतट प्रवाह, मोठी भरती आणि महाकाय लाटा (SURGE) यांमुळंही ही घटना वेगवान होते. किनाऱ्याला समांतर दिशेनं जाणारे प्रवाह किनारपट्टीवरील खारफुटीची जंगलं, खाड्या आणि पुळणी यांच्या दिशेनं सतत तेल आणि डांबर नेत राहतात. हा प्रकार शेकडो किलोमीटरपर्यंतच्या किनाऱ्यावर अनेक दिवस होत राहतो.

किनाऱ्यावरचे वन्य जीव, सागरी जीव, जंगलं यांमुळं बाधित होतात. पक्ष्यांच्या पंखावरही तेलतवंग पसरतो. मासे, स्थलांतरित पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी, चिखलप्रदेशातले जीव यावर अनेक वर्षांपर्यंत यांचा परिणाम जाणवत राहतो. फुटणाऱ्या लाटांत चिकटपणा जाणवू लागतो. आपल्याकडं नागावपर्यंतच्या किनाऱ्यावर खारफुटीच्या जंगलात चिखलात काळे डांबरयुक्त गोळे आजही आढळून येतात.

समुद्रातल्या आणि खाडीतल्या मासेमारीवर निर्बंध, पुळण पर्यटनावर बंदी, खारफुटी झाडांच्या तोडणीवर आणि वापरावर निर्बंध याचबरोबर जनजागृती या गोष्टीमुळं तेलगळतीच्या संकटाचा आणि संबंधित पर्यावरण प्रदूषणाचा सामना करता येतो. तेलगळतीचे खाडीतल्या जैववैविध्यावर होणारे परिणाम दहा वर्षांपर्यंत जाणवत राहतात. त्यामुळं इतका दीर्घ काळ किनारी पर्यावरण बाधित होण्याचीही शक्‍यता असते.

अनेक वेळा हे सर्व तेल चिखलयुक्त गाळ प्रदेशात झिरपतं. भरतीच्या वेळी जे पाणी खारफुटी प्रदेशात काही काल साचून राहतं, त्याचा मोठा हातभार या प्रक्रियेला लागतो आणि आत झिरपलेलं हे तेल अनेक दशकं चिखलयुक्त गाळात, खालच्या थरात साचून राहतं.

गाळात अडकलेलं तेल, वेळोवेळी गाळातून सुटत राहतं आणि त्याचे मोठे पर्यावरणीय परिणाम तिथल्या मत्स्य जीवनावर आणि इतर सागरी वनस्पतींवर होतात. अर्थात ही परिस्थिती अशीच ठेवणं आणि हे अडकलेलं तेल बाहेर न काढणं हेच अनेक वेळा हितावह असतं. कारण या गाळातून तेल काढणं पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक असतं. खुरटलेल्या रोगट खारफुटीची पुढं अनेक वर्षं होत राहणारी वाढ हाही तेलगळतीतूनच निर्माण झालेला अटळ परिणाम असतो आणि एखाद्या किनारी प्रदेशातल्या खारफुटीची सशक्त आणि विस्तृत वाढ तो कायमस्वरूपी संपवून टाकू शकतो. त्यामुळं तेलतवंगानं ग्रस्त आणि बाधित झालेल्या खारफुटी प्रदेशातल्या खारफुटीवरचा तवंग निपटून काढणं आणि त्याच प्रदेशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खारफुटीची वाढ करणं असे उपाय तेलगळतीनंतर किनाऱ्यावर लगेच सुरू करणं फायद्याचं ठरतं.

समुद्रात जहाजांमुळे होणारी तेलगळती आणि तिचे दूरगामी परिणाम लक्षात येत असूनही तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात दिसून येणारी आपली हतबलता हीच आजची वस्तुस्थिती आहे हे मात्र नक्की.

Web Title: dr shrikant karlekar's saptarang article