असामान्य कामगिरी, दुर्दम्य आशावाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Raghunath Mashelkar book

‌‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ हा एक सुंदर, परिपूर्ण चरित्रग्रंथ ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी मराठी वाचकांच्या हाती दिला आहे.

असामान्य कामगिरी, दुर्दम्य आशावाद

- डॉ. श्रीपाद जोशी, saptrang@esakal.com

‌‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ हा एक सुंदर, परिपूर्ण चरित्रग्रंथ ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी मराठी वाचकांच्या हाती दिला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर हे एक श्रेष्ठ, बहुआयामी, जागतिक कीर्तीचं भारतीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाचे कठोर तपशील समाजासमोर आलेले नव्हते. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तींच्या मदतीने डॉ. माशेलकर यांनी जे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन, आपल्या परिश्रमाच्या व जन्मदत्त प्रतिभेच्या मदतीने विज्ञानक्षेत्रात असामान्य कामगिरी केली, तिचेही तपशील अतिशय चिकाटीने गोळा करून ते समाजासमोर मांडण्याची अजोड क्षमता डॉ. देशपांडे यांनी दाखवली.

विशेषतः श्रीमती अंजनीताईंच्या जीवनात एक प्रसंग घडला. त्यांचा बाळ रघुनाथ प्रथमच विमानाने परदेश प्रवासास निघाला होता. विमान आकाशात झेपावताच श्रीमती अंजनीताईंना विमानतळावर भोवळ आली. कारण, त्यांच्या परिस्थितीच्या संदर्भात कदाचित जुनी कष्टप्रद स्मरणं येऊन दुःख-सुखाने हे घडलं असावं. हा प्रसंग वाचताना सर्वच वाचकांच्या डोळ्यांत आसवं दाटतील. माझं मन भरून आलं, आसवं ओघळली. ‌‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ डॉ. सागर यांनी खरंच डॉ. माशेलकर यांच्या चरित्राचा खूप सखोल अभ्यास केला आहे; पण प्रसंग शब्दबद्ध करणं हे चातुर्य आहे. चातुर्य आहे रचनेत मोठे, असं म्हटलं जातं, त्याचा प्रत्यय या चरित्रग्रंथातून वारंवार येत राहतो. या चरित्र ग्रंथात डॉ. देशपांडेंनी इतके प्रसंग रेखाटलेत, इतक्या आठवणी, संवाद, सुंदर प्रसंग, स्मरण नोंदी केल्यात, की वाचक सलग वाचत जातो, यातून डॉ. माशेलकर यांचं मोठेपण आकळत जातं.

नगरपालिका, रेल्वे स्टेशनवरील मोफतच्या दिव्याच्या प्रकाशात शिकलेला मुलगा भारताच्या पंतप्रधानांचा विज्ञान सल्लागार होतो, ही असामान्य गोष्ट आहे. म्हणूनच या चरित्रग्रंथाचे नायक डॉ. माशेलकर हे प्रेरक आहेत. परिस्थितीबद्दल तक्रार करण्यापेक्षा दुर्दम्य आशावादाने त्यावर मात करता येते, हे डॉ. माशेलकर यांनी स्वचरित्र, चारित्र्याने तर दाखवलंच, तसंच हळदीच्या पेटंटच्या लढाईनेही दाखवून दिलं. डॉ. माशेलकर यांनी दुर्दम्य आशावादाचा संदेश स्वचरित्राने आजच्या तरुणांना दिला आहे.

हे सारं डॉ. सागर देशपांडे यांनी या चरित्रग्रंथात कौशल्याने दाखवलं आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर १९७६ मध्ये इंग्लंडमधून भारतात परतले आणि पुणे येथील एन.सी.एल.मध्ये दाखल झाले, तर १९९५ मध्ये महासंचालक म्हणून कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च दिल्ली (C.S.I.R.) इथे आले. या दरम्यानचा काळ डॉ. सागर यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, तपशीलवार कसा, केव्हा लिहिला, हा मोठा प्रश्न आहे. डॉ. माशेलकर यांचं चरित्रलेखन करताना लेखक डॉ. सागर यांनी मराठीतील चरित्र लेखनाची परंपरागत पद्धत बाजूला ठेवली. डॉ. माशेलकर यांची जीवन वाटचाल, घटना, प्रसंग, संघर्ष, सुयश, संशोधन, देशस्थिती, त्यातील डॉक्टरांची भूमिका, दृष्टी, द्रष्टेपण, परदेशातील काम, अनंत अडथळे, त्यावर केलेली मात, त्यांना मिळालेले पुरस्कार यांची गुंफण केली ती अप्रतिम. खरं लिहायचं तर, हा चरित्रग्रंथ अगदी वेगळ्या लेखनरीतीने साकार केला आहे.

डॉ. माशेलकर आणि भारतीय विज्ञान वाटचाल हे जणू एकच झालेत. मोठमोठे नेते, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, शास्त्रज्ञ विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, तत्त्वज्ञ, नेते आणि डॉ. माशेलकर यांच्या भेटी, बैठका, विज्ञान विषयांवर भविष्य, वर्तमान यांवरील चर्चा, यांचे सविस्तर तपशील या चरित्रग्रंथात येतात.

डॉक्टरांचं जीवन पुढे सरकत जातं. देश, स्थिती, काळ यांच्याशी डॉक्टर इतके एकरूप झालेत की, त्यांना स्वतःचं असं वेगळं जीवन जणू राहिलेलं नाही. इतका देशाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या ध्यासाने व्यग्र शास्त्रज्ञ भारतात दुर्मीळ आहे. म्हणूनच हा ग्रंथ वाचणारा वाचकही व्यापक, समजूतदार होतो. ‌‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती’ याचा अनुभव येतो व हात आपोआप जोडले जातात.

जागतिक पातळीवरची विज्ञानातील नवनिर्मिती, तुलनेत भारतीय विज्ञान प्रगती, औद्योगिक जगतात १९८० ते २००० पर्यंत काय घडत होतं, तुलनेत भारत कोठे होता, त्रुटी भरून काढण्याचे प्रयत्न कसे होते, राजकीय नेते व वैज्ञानिक यांचा समनुयोग कसा होता, तत्कालीन एकंदर स्थिती, डॉ. माशेलकर यांनी देशाला कोणतं मार्गदर्शन केलं यांचे महत्त्वपूर्ण तपशील या चरित्रग्रंथातून वाचकांसमोर येतात.

‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ या चरित्रग्रंथात त्यांचे समकालीन शास्त्रज्ञ, विचारवंत, उद्योगपती, पंतप्रधान, राष्ट्रपती व अन्य राजकीय नेते, देशाचं विज्ञान धोरण यांचा सहज परिचय होत जातो. १९८० ते २०१० या काळात देशाला वळण लावणाऱ्या, देशाला वैज्ञानिक प्रगतिपथावर नेणाऱ्या शास्त्रज्ञांची कामगिरी यांचा लेखकाने सहज, सुलभ परिचय करून दिला आहेच; पण हे प्रज्ञावंत एकमेकांना कसे भेटले ते प्रसंग, याची वाचकांना तपशीलवार माहिती दिली आहे. ती एखाद्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून प्रथमच पुढे आलेली आहे.

घरातले डॉ. माशेलकर कसे असतील, या प्रश्नाचं सुंदर उत्तर ‌‘कुटुंबाची केमिस्ट्री’मध्ये आलेलं आहे. त्यातून त्यांची आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, त्यांचं प्रेमळ आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपणारे स्वभाव यांचं दर्शन होतं. सौ. वैशाली यांची कला पती माशेलकर यांनी जोपासली आहे. माशेल गावाशी त्यांचे ऋणानुबंध कसे आहेत, त्याचं डॉ. सागरनी खूप आस्थेने वर्णन केलं आहे. ‌‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ या ग्रंथाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यांचं नक्कीच आणखीही वर्णन करता येईल. या ग्रंथाची तीन वैशिष्ट्यं अशी - १. या ग्रंथाला लेखकाचं मनोगत म्हणून लाभलेलं डॉ. देशपांडे यांचं प्रास्ताविक, २. डॉ. माशेलकर यांना लाभलेली विविध पदं, गौरव, सन्मान, पुरस्कार हे तपशील प्रथमच इथे एकत्रित आलेत, ३. डॉ. माशेलकर यांचे आशीर्वाद या ग्रंथास लाभलेत.

पुस्तकाचं नाव : दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर

लेखक : डॉ. सागर देशपांडे

संपादन : स्मिता देशपांडे

प्रकाशक : सह्याद्री प्रकाशन, पुणे

संपर्क : ९३५६२०८२९६

sahyadriprakashan@gmail.com

पृष्ठं : ६२४ (रंगीत ४८ पानांसह)

मूल्य : ९९९ रुपये