त्रास सांगावा कसा? (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

लहान मुलांना अनेक गोष्टी नक्की कशा प्रकारे सांगायच्या हे कळत नाही. अगदी लहान मुलांना बोलताच येत नाही, तर थोड्या मोठ्या मुलांना नेमक्‍या शब्दांत सांगता येत नाही. आपल्याला आई-बाबा रागावतील, अशा भीतीमुळंही अनेक मुलं योग्य प्रकारे व्यक्त होत नाहीत. त्यासाठी पालकांनी त्यांच्यामध्ये विश्‍वास निर्माण करणं, संवादाचा धागा बळकट करणं आवश्‍यक असतं.

"मला आत्ता कसला तरी त्रास होतो आहे' आणि "मला आत्ता कशानं तरी छान वाटतं आहे,' अशा प्रकारच्या काही भावना नुकत्याच जन्मलेल्या मुलांच्यासुद्धा मनामध्ये असतात. म्हणून तर मुलं थंडी वाजायला लागली, दुपटं ओलं झालं, की रडायला लागतात, तेव्हा ती तक्रार करत असतात. जेव्हा ती छान असतात, त्यांना बरं वाटत असतं, तेव्हा ती शांत असतात. "रडणं' किंवा "शांत असणं' ही बोलता येण्यापूर्वीची मुलांची ही भाषाच असते. ती त्यातून खूप काही सांगत असतात.
दोन- अडीच वर्षांनंतर मुलं हळूहळू बोलायला लागतात. तो त्यांचा राग असेल, प्रेम असेल, काळजी असेल! त्यांच्या दृष्टीला हे सगळं जग नवं असतं. त्यातून त्यांना इतके प्रश्न पडत असतात ते प्रश्न असतील. शब्दातून नाही, तर नजरेतून बोलतात. हेच त्यांचं व्यक्त होणं असतं.

आई आपल्याला सोडून कुठे तरी जाणार आहे, हे कळल्यानंतर मूल अस्वस्थ होतं. या इतक्‍या तीव्र भावना आईबद्दल जास्त असतात. याचं कारण नऊ महिने बाळ पोटात असताना आईचाच आवाज त्याला स्पष्टपणे ऐकू येत असतो. या आवाजाचा त्याला फार आधार असतो. या आवाजामुळंच "इथं मी सुरक्षित आहे,' अशी भावना निर्माण होत असते. आईला बाळ सोडत नाही, ते यासाठीच. "मला सोडून जाऊ नकोस. तू मला हवी आहेस,' हे विविध प्रकारे सांगण्याचा ते मूल आटोकाट प्रयत्न करतं.
आपली आई आपल्याला रोजच सोडून जाणार आहे हे त्याला समजेपर्यंत वेळ जातो. मूल जिथं असतं, तिथं ते सुखात, आनंदात असतं; पण तरीसुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात ते आईची वाट बघत असतं. आई दिसली, की त्याला जगावेगळा आनंद होतो. आई जवळ नसल्याची मनातल्या मनात खंत असते, दुःख असतं, काळजी असते... म्हणूनच आई दिसल्यावर ते सगळं दु:ख आणि असुरक्षितता निघून जाते आणि आनंदाचं भरतं येतं. काही वेळानं आईला सोडून मूल इकडंतिकडं जातं; पण आता त्याला सुरक्षित वाटत असतं.

अनेकदा आपण बघतो, की अगदी छोटी दोन-तीन वर्षांची मुलंसुद्धा त्यांच्या मनावर परिणाम करून घेतात, ते त्यांच्या शारीरिक परिणामांवरून दिसून येतं. त्यांना काय हवं आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, हे ती सांगू शकत नाहीत; पण त्यांचं घटलेलं वजन, अचानक बदललेल्या सवयी, खूप रडणं, इतर कोणाकडं न जाणं, आपल्या माणसांना चिकटून बसणं या वागण्यातून त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घेता यायला हवं. म्हणून, लहान असल्यापासून मुलांशी भरपूर बोलायला हवं. कधीकधी त्यांना सगळे शब्द समजले नाहीत, तरीसुद्धा त्यामागची भावना कळते.
एका लहानशा मुलीचा हा बोलका किस्सा. छोट्या बालवाडीत जाणारी ही छोटीशी मुलगी. बहुतेक सगळ्या बालवाड्या सकाळच्या लवकरच्या वेळात असतात. त्यामुळं वेळेत उठून, खाऊन-पिऊन, आंघोळ करून, पटापटा आवरायचं. युनिफॉर्म, हेअरबॅंड, शूज, बेल्ट, बॅच, टिफिन, वॉटर बॅग असा सगळा इंग्रजी सरंजाम शिस्तीत घेऊन स्कूलबसच्या वेळेआधी घराबाहेर पडणं, ही गोष्ट फार अवघड असते. घराघरांमध्ये त्यावेळेला एक युद्ध चाललेलं असतं. घरात एक मूल असलं, तरी ही अटीतटीची असते. दोन मुलं एकाच वेळेला आवरून बाहेर पडणार असतील, तर या दंग्याला पारावार राहत नाही. आई-बाबा वेळेशी स्पर्धा करत मुलांचं आटपत असतात. रागवत- ओरडत असतात. या गंभीर प्रसंगात मुलांना कुठंही रेंगाळायची परवानगी नसते. तसं झालं तर धपाटा मिळतो. रडारडी सुरू झाली, की मग सगळ्यालाच उशीर होतो. एक दिवस या मुलीला आईनी सकाळी उठवलं आणि खुर्चीवर ठेवलं, तर ती जोरजोरात रडायला लागली. "काय झालं' विचारलं, तर अजूनच भोकाड पसरून रडायला लागली. रडतरडत तिनं घड्याळाकडे बोट दाखवलं. तिला कसंबसं शांत केलं. दुसऱ्या दिवशी शाळेत जायची वेळ आली तेव्हा पुन्हा तिनं कालच्यासारखंच वागणं सुरू केलं. त्या वेळेला घरच्यांना कळलं, की ती काय सांगायचा प्रयत्न करत आहे.

एरवी आपली आई आपल्याशी चांगलं वागते आणि शाळेत जाताना अशी का वागते, हे तिला कसं समजणार? तिला अजूनही "वेळ' म्हणजे नक्की काय असतं, हेच माहीत नाही, तर वेळेवर आवरणं आणि वेळेवर पोचणं यातलं दडपण तिला कसं कळणार? तिला एवढंच कळलं होतं, की आपली आई सारखी घड्याळाकडे पाहते. घड्याळाकडे बोट दाखवते आणि रागावते- ओरडते- मारते. शाळेची बस कशासाठी येते, आपल्यामुळे इतर लोकांना उशीर होतो म्हणजे नक्की काय, या निरागस प्रश्नांची उत्तरं तिला कशी समजवणार? या वयात घड्याळ हा तिचा शत्रू झाला होता. कारण आई आपल्याला उगाचच त्रास देते ते या घड्याळामुळे, असा तिचा समज झाला होता.
हे झालं खूपच लहान मुलांविषयी. मात्र "बोलता येणाऱ्या'; पण "न बोलणाऱ्या' मुलांच्या मनातलंसुद्धा काही कळत नाही. अशा वेळी त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या वागण्यावरून ते जाणून घ्यावं लागतं. एरवी खूप दंगा करणारा, छान बोलणारा चौथीतला एक मुलगा अचानक गप्पगप्प राहू लागला. त्याच्यामधला बदल लक्षात येण्यासाठी खूप दिवस गेले. कारण तो काहीही घरी बोलला नाही. याचं कारण असं होतं, की त्याच्यापेक्षा मोठा असलेला सातवीतला एक मुलगा उगाचच त्याला बघून त्याच्या मनात भीती निर्माण होईल असे हावभाव करत होता आणि हा चौथीतला मुलगा या वागण्यामुळे पार भेदरून गेला होता. मार्क कमी पडायला लागले, या कारणासाठी जेव्हा शिक्षकांनी शाळेतल्या मानसतज्ज्ञांकडे पाठवलं, तेव्हा याचा उलगडा झाला.

असं वाटेल, की त्यानं याबद्दल आधी का सांगितलं नाही? घरी किंवा शाळेत, शिक्षकांना, कोणाला तरी सांगितलं असतं, तर हा प्रश्न निर्माणच झाला नसता. अशा वेळेला त्या मुलाच्या मनाची भावनिक अवस्था आपण समजून घ्यायला हवी. त्याला सांगावंसं का वाटलं नाही, याची अनेक कारणं असू शकतात. आपल्या मनातल्या भीतीच्या भावनांना कोणत्या शब्दात सांगायचं, हा अत्यंत साधा प्रश्न मुलांना पडलेला असतो. दुसरं असं, की आई-बाबा आपल्याला रागवतील अशी भीती त्यांच्या मनात असते, असं कित्येक वेळा अनुभवाला आलेलं आहे. मुलं आई-बाबांना सांगत नाहीत, त्यांच्याशी मोकळेपणानं बोलत नाहीत आणि स्वतःला त्रास करून घेतात.
खरं तर मुलांमध्ये झालेले बारीकसारीक बदल त्यांच्या जवळ असणाऱ्यांना कळू शकतात आणि शांतपणे जवळ घेऊन, त्यांच्यावर "शंभर टक्के' विश्वास दाखवून (हा विश्वास आपल्या शब्दातून आणि स्पर्शामधून व्यक्त होतो), त्यांना बोलतं केलं, तर मुलं आई-बाबांपाशी मोकळी होतील आणि हेच तर आपल्याला हवं आहे! त्रास सहन करणं हा उपाय नसतो. सकारात्मक राहून त्रासावर उपाय शोधणं आणि तो करणं, हा उपाय असतो. आपल्या "अव्यक्त' लहानग्यांच्या बाबतीत हा उपाय करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com