आई बोलते तेव्हा... (डॉ. श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे drshrutipanse@gmail.com
रविवार, 3 जून 2018

तक्रारखोर सुरात आई काही सांगत असेल तर मुलं, विशेषतः टीन-एजमधली मुलं, आईच्या सांगण्याकडं लक्षच देत नाहीत, असं एका प्रयोगानुसार सिद्ध झालं आहे... पण मुलांना सांगितल्यावाचून आईला राहवतही नाही, त्याचं काय करायचं? यावर एकच चांगला उपाय म्हणजे आई-बाबांनी; खासकरून आईनं, मुलांशी कमीत कमी, मोजकं आणि नेमकं बोलायचं. हे खूप अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे; पण "बोलण्याचा फायदा' काहीच नसेल तर "कमीत कमी बोलण्याचा' प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? मोजकं, नेमकं, विषयाला धरून, विषयाला पुरेसं एवढंच बोलण्याची नवी सवय लावून घेतलेली बरी.

तक्रारखोर सुरात आई काही सांगत असेल तर मुलं, विशेषतः टीन-एजमधली मुलं, आईच्या सांगण्याकडं लक्षच देत नाहीत, असं एका प्रयोगानुसार सिद्ध झालं आहे... पण मुलांना सांगितल्यावाचून आईला राहवतही नाही, त्याचं काय करायचं? यावर एकच चांगला उपाय म्हणजे आई-बाबांनी; खासकरून आईनं, मुलांशी कमीत कमी, मोजकं आणि नेमकं बोलायचं. हे खूप अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे; पण "बोलण्याचा फायदा' काहीच नसेल तर "कमीत कमी बोलण्याचा' प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? मोजकं, नेमकं, विषयाला धरून, विषयाला पुरेसं एवढंच बोलण्याची नवी सवय लावून घेतलेली बरी.

बाळ लहान असतं तेव्हा आईचा आवाज आणि स्पर्श ही एक अनमोल गोष्ट असते. आपल्याकडं आईची थोरवी गायली गेलेली आहे. ती पूर्णपणे खरी आहे. आई असतेच मौल्यवान! अपवाद वगळता आईला पर्याय नसतोच. पाश्‍चात्य देशांत आईच्या आवाजाचा मुलांवर कसकसा परिणाम होतो, यावर अनेक संशोधनं झाली आहेत. आईचा शांत आवाज हा मुलांच्या मेंदू-विकासावर चांगला परिणाम करत असतो. आईच्या चिडक्‍या आवाजानं मुलं अस्वस्थ होतात. आईचा आवाज हा मुलांसाठी फार महत्त्वाचा आधार असतो. छोटी बाळं रडतात; पण जेव्हा ते आपल्या आईचा आवाज ऐकतात तेव्हा आपोआप शांत होतात. रडायचं थांबतात. आईच्या बोलण्यामुळं, प्रोत्साहनपर शब्दांमुळं, मुलांच्या मेंदूतली विशिष्ट क्षेत्रं उद्दीपित होतात. विशेषत: ऑटीझम झालेल्या मुलांना आईच्या चांगलं बोलण्याचा खूप फायदा होतो. भावी काळात मुलांचे सामाजिक संबंध सुधारण्यासाठीसुद्धा आईचे चांगले शब्दच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आईच्या आवाजानं ताण कमी होतो, असं सात ते बारा या वयोगटातल्या मुलांवर केलेलं एक संशोधन सांगतं. ऑक्‍सिटोसिन हे एक छान हार्मोन आहे. आईशी छान संवाद झाला की हे हार्मोन निर्माण होतं आणि अपत्याला बरं वाटतं, म्हणून आईनं मुलांशी शांत आणि स्थिर आवाजात संवाद साधणं फार आवश्‍यक आहे. या आवाजात बोलायची आईला सवय असेल तर आईला मुलांवर एकूणच कमी चिडचिड करावी लागते.

"आमची मुलं असं शांतपणे वगैरे बोलून ऐकत नाहीत!' अशी उपहासात्मक तक्रार जेव्हा आई करते, तेव्हा त्याचा अर्थ इतकाच असतो की मुलाशी शांत, स्थिर आणि समजुतीनं बोलण्याचा फार कधी प्रयत्नच केला गेलेला नाही. मुलांना याची सवयच नसेल, तर मुलं ऐकणार तरी कसं? काही दुर्दैवी कुटुंबांत आई-मुलं यांच्यात आश्वासक नातं तयार होत नाही. याचं कारण शोधून त्यावर उपाय केला पाहिजे. कारण, मुलं आणि आई यांच्यात जे नैसर्गिक नातं आहे ते आहेच, ते कुणीही नाकारू शकत नाही. काही भांडकुदळ आणि विचित्र घरांमध्ये "तुझी आई वेडीच आहे, तिचं काय ऐकायचं?' अशी अपमानास्पद भाषा बोलली जाते. आईला कमी लेखलं जातं. अशा वेळी आईनं आपल्या आवाजाचं स्वत:च्या लेखी आणि मुलांच्या लेखी असलेलं महत्त्व ओळखावं.
सध्याच्या काळात आईऐवजी मुलांना जे कुणी सांभाळतं, ते जर चांगला संवाद साधत असतील तर साधारण असेच निष्कर्ष निघण्याची शक्‍यता आहे. मात्र, असं असलं तरी आईनं आपल्या छोटुकल्यांशी बोलण्यासाठी काही वेळ काढावाच; पण एक धोक्‍याची घंटा म्हणजे, हीच गोड परिस्थिती कायम टिकत नसते. बाळ लहान असतं तेव्हा त्याचं सगळं काही आई पुरवते. बाबा प्रत्येक गोष्टीकडं लक्ष देतात. बारा-तेरा वर्षांची होईपर्यंत मुलंही आई-बाबांचं ऐकतात. आई-बाबांशिवाय त्यांना दुसरं जग नसतं; पण नेमकी यामुळंच आई-बाबांना; विशेषत: आईला, मुलांना बारीकसारीक सूचना देण्याची सवय लागते. ही सवय चांगलीच असते. कारण, लहानग्या मुलांना या सूचनांची गरज असते. या सूचना मुलं पाळतात. "आईचं ऐकायचं असतं, आईला सगळं कळतं' यावर मुलांचा शंभर टक्के विश्वास असतो. यथावकाश मुलं मोठी होतात. त्यांची ही सूचनांची गरज संपते; पण आई-बाबा तिथंच अडकून राहतात. ते मोठे होतच नाहीत! ते सतत सूचना करत राहतात. मुलांना बोलतात, ओरडतात. कसं वागावं...रस्ता कसा ओलांडावा...मित्रांशी कसं वागावं...आपलं आपलं व्यवस्थित कसं आवरावं याच्या एकूण 1760 सूचना देत राहतात. या सूचनांची मुलांना मुळीच गरज नसते. आपल्याला मोठ्या माणसांप्रमाणे वागवावं, ही त्यांची खरी गरज असते. त्याला/तिलाही सूचना, सल्ले, मदत, सगळं काही हवं असतं; पण हे सल्ले त्याला/तिला हवे असतील तेव्हाच. त्याला/तिला ज्या विषयावर सूचना हव्या असतील त्याच विषयावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला/ तिला "साधासुधा सल्ला' हवा असतो. त्यात मागचा उकरून काढलेला इतिहास+आई-बाबांचा त्याग+उपदेश हे असलं काही नको असतं. असा "साधासुधा सल्ला', मदत त्याला/ तिला मिळते का? नाही!! मागचा उकरून काढलेला इतिहास+आई-बाबांचा त्याग+उपदेश हे पॅकेज कायम बरोबर असतं. हे मुलांना जेव्हा कळून चुकतं, तेव्हा मुलं पालकांकडं सल्ला मागायला येतच नाहीत. त्यांच्या वाऱ्यालाही ती उभी राहत नाहीत. बहुतेक सगळ्या गोष्टी परस्पर बाहेरच निपटून टाकतात. कारण तेच त्यांना परवडतं. मित्राचा किंवा मैत्रिणीचा सल्ल्ला कसा सोपा-सरळ! त्यांचा सल्ला घेताना या पॅकेजचा मागमूसही नसतो; त्यामुळं हा सल्ला मागणं सोपं असतं. केवळ यामुळंच मुलं आई-बाबांच्या अनुभवी सल्ल्यांना सरळसरळ मुकतात. आई-बाबांचा अनुभव, आई-बाबांचं निःस्वार्थ-निरपेक्ष प्रेम यांना मुकतात. "आई-बाबा हे जगातले सर्वोच्च "वेलविशर' असतात', "त्यांना फक्त मुलांचं हित हवं असतं' या कशाला मग अर्थच उरत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते "पॅकेज'! मागचा उकरून काढलेला इतिहास+आई-बाबांचा त्याग+उपदेश हे सगळं आपण टाळू शकत नाही का?

टाळायला शिकलं पाहिजे. याचं कारण, आई-बाबांचं असं बोलणं मुलांना इतकं त्रासदायक होतं असतं, की मुलं हे ऐकतच नाहीत, असं सांगितलं तर पटेल का? पण हे खरं आहे आणि आता न्यूरोलॉजिकल लॅबमध्ये ते सिद्धही झालेलं आहे. पिट्‌सबर्ग, कॅलिफोर्निया-बर्कले या विद्यापीठांतल्या काही संशोधकांनी एकत्र येऊन क्‍यूंग ली यांच्या नेतृत्वात एक प्रयोग केला. यात 14 वर्षांच्या आसपासची 32 निरोगी मुलं सहभागी झाली होती. त्यात 22 मुली होत्या. या सगळ्यांना काही प्री-रेकॉर्डेड आवाज ऐकवले गेले. त्यात आई नेहमी त्यांच्याशी जसं बोलते, ती वाक्‍यं रेकॉर्ड केलेली होती. ज्या वेळी मुलांना हे आवाज ऐकवले गेले, तेव्हा आईच्या तक्रारखोर आवाजाला त्यांच्या मेंदूनं कसलाही प्रतिसाद दिला नाही. याचं कारण काय असेल? आईचे पहिले काही शब्द ऐकल्यावर आई पुढं काय बोलणार, किती वेळ बोलणार हे सगळं मुलांना पूर्ण पाठ असतं. या बोलण्याला काही प्रतिसाद देण्याची गरज त्यांच्या मेंदूला वाटलीच नाही. जर असं असेल तर आईनं अनेकदा, शंभर वेळा तेच ते सांगण्याचा काय उपयोग? आई-बाबांनी आपली वेळ आणि शक्ती कशासाठी खर्च करायची?
...पण सांगितल्यावाचून, सल्ले दिल्यावाचून आई-बाबांना राहवत नाही त्याचं काय करायचं? यावर एकच चांगला उपाय म्हणजे आई-बाबांनी; विशेषत: आईनं, मुलांशी कमीत कमी, मोजकं आणि नेमकं बोलायचं. हे खूप अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे; पण "बोलण्याचा फायदा' काहीच नसेल तर "कमीत कमी बोलण्याचा' प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? आई नेहमीसारखी "पकवत' नाही, हे लक्षात आल्यावर आई काय बोलते, याकडं जिवाचे कान देऊन मुलं ऐकतील. जशी लहानपणी ऐकायची तशीच!

मोजकं, नेमकं, विषयाला धरून, विषयाला पुरेसं एवढंच बोलण्याची नवी सवय लावून घेतलेली बरी. याशिवाय जे काही मुलांना सांगायचंच आहे, ते दोन ओळींची चिठ्ठी लिहून, घरातल्या फळ्यावर खडूनं लिहून, मोबाईलवर मेसेज पाठवून किंवा इतर कुणाकरवी निरोप पाठवून सांगावं; पण शाब्दिक सल्ले टाळावेत. गप्पा भरपूर माराव्यात, लक्षही असू द्यावं; पण बोलावं कमी! वरील संशोधन हे केवळ "टीन-एज'मधल्या मुलांवर केलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष आहेत. या वयाच्या आधी आणि नंतर कायमच मुला-मुलींना आई हवी असते, तिचा आवाज हवाहवासा वाटत असतो, हे एक सत्य आहेच; पण ज्यांची मुलं या वयात आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावं.

Web Title: dr shruti panse write article in saptarang