कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा

book review
book review

जगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकारप्राप्त करून घेण्यासाठी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावं लागलं. असं असलं, तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत अनेक क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे. काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत आणि आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि अन्य क्षेत्रांत त्यांनी भरारी घेतली आहे, उच्च स्थानं भूषवली आहेत. भारतीय स्त्रिया आता अन्य देशांतही आघाडीवर आहेत. विशेषत: यांत्रिकी, वाणिज्य, व्यवस्थापकीय आणि माहिती-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत हे घडतं आहे. अशांपैकी काही यशस्वी स्त्रियांची माहिती समाजात पसरली, तर त्याच्या कार्याची माहिती मिळेलच; पण त्याचबरोबर आपणही असं काही करावं किंवा करू शकतो, अशी स्फूर्तीही तरुणींना मिळेल. असा प्रयत्न या "भारतीय उद्योजिका : कॉर्पोरेट क्षेत्रातील तीस सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा' या पुस्तकात करण्यात आला आहे. मूळ लेखिका सुमन वाजपेयी आणि अनुवादक ज्योती नांदेडकर यांचं याबद्दल कौतुक आणि अभिनंदन करायला हवं.
या पुस्तकात अशा तीस महिलांची माहिती थोडक्‍यात; पण प्रभावीपणे देण्यात आली आहे. या स्त्रिया विविध क्षेत्रांत अगदी अत्युच्च पदावर पोचल्या आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वानं आपल्या व्यवसायाला अधिक उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि असं करताना त्याबरोबर आपले संसारही सांभाळले आहेत. एक प्रकारे अशी तारेवरची कसरत त्यांनी यशस्वीरीत्या केली आहे. यापैकी काहींना उद्योजकतेचं बाळकडू त्यांच्या वडील वा सासरच्या घराण्यांकडून मिळालं, तर काहींचं शिक्षण आणि अनुभव एका क्षेत्रात; पण प्रत्यक्ष काम दुसऱ्याच क्षेत्रात असंही झालं आहे. काहींना शिक्षण भारतात चांगल्या संस्थांतून मिळालं, तर काहींनी परदेशी जाऊनही ते घेतलं. काहींना त्यांच्या पिता वा पतीच्या आकस्मिक निधनानंतर उद्योगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली, तर काहींनी तसं करून उद्योग परत रुळावर आणून ते पुढच्या पिढीच्या स्वाधीन केले आहेत. काहींनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अत्युच्च स्थान आपल्या कर्तृत्वानं प्राप्त करून घेतलं आहे. पेप्सी कंपनीच्या इंद्रा नूयी, हॅलेट पॅकार्डच्या नीलम धवन, जे. पी. मॉर्गनच्या कल्पना मोरपारिया या अशांत आहेत. थरमॅक्‍सच्या अनू आगा आणि मेहेर पदमसी, टॅफे ट्रॅक्‍टरच्या मलिका श्रीनिवासन, राजश्री शुगरच्या राजश्री पाथी, बायोटेक कंपनीच्या किरण शॉ-मुजुमदार, लिज्जत पापडाच्या ज्योती नाईक, डीएलएफच्या पिया सिंग यांनी यांत्रिकी वा अन्य उत्पादनक्षेत्रात भरारी घेतली आहे. बॅंकिंगच्या क्षेत्रात चंदा कोचर, तर्जनी वकील, नैनालाल किडवाई, मीना सन्याल, फाल्गुनी नय्यर, रंजनाकुमार या आहेत. बालाजी फिल्मच्या एकता कपूर, यूटीव्हीच्या झरीना मेहता, पार्क हॉटेल ग्रुपच्या प्रिया पॉल, अपोलो हॉप्सिटलच्या प्रिथा रेड्डी यांनीही चाकोरीबाहेरचा क्षेत्रात उडी घेतली आहे.
या सर्वांचा परिचय करून घेताना हे लक्षात येईल, की त्यांना प्रसंगी कष्टातून, स्पर्धेतून, प्रसंगी ऐषाराम, कौटुंबिक जबाबदाऱ्या काही काळ बाजूला ठेवून काम करावं लागलं आहे. अशांचा हा परिचय करून देताना त्यांची कोटुंबिक पार्श्वभूमी, जबाबदाऱ्या अंगावर घेत विविध आव्हानांना दिलेलं तोंड, तशातही जोपासलेले छंद, पुढच्या पिढीकडेही दिलेलं लक्ष अशा अनेक पैलूंवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यापैकी बहुतेकांचा राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वानं "आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे' हे वाचन सार्थ ठरलं आहे.

पुस्तकाचं नाव : भारतीय उद्योजिका : कॉर्पोरेट क्षेत्रातील सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा
मूळ लेखिका : सुमन वाजपेयी
अनुवाद : ज्योती नांदेडकर
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठं : 264, मूल्य : 275 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com