संकटाला संधी मानणारा उद्योजक...

Subhashchandra-Goyal
Subhashchandra-Goyal

हरयानातल्या छोट्या खेडागावातील एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतात केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्‍वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील मीडिया सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात १७ रुपये असताना, शिक्षण अर्धवट सोडून, वडिलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायाला पुनश्‍च उभे करण्याची जिद्द बाळगून त्यांनी आपल्या उद्योजकीय कामगिरीला सुरुवात केली. काही वर्षांतच सगळी देणी भागवून आपल्या व्यवसायाला कर्जमुक्त केले. एवढेच नव्हे तर एका दशकात त्यांनी आपल्या व्यवसायाला शंभर कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलले आणि आज एस्सेल ग्रुप या भारतभर आणि जगभर विस्तार असलेल्या आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगसमूहात त्याचे रूपांतर केले. 

आज घडीला त्यांची वैयक्तिक संपत्ती (नेट वर्थ) आहे ५६० कोटी डॉलर (६३२०० कोटी रुपये).  एखाद्याला अडथळा वाटणारी कोणतीही संधी  त्यांनी अडथळा म्हणून बाजूला सारली नाही तर तिचा वेळोवेळी समर्पक उपयोग करून घेतला. मग ती वडिलांच्या व्यवसायाची दिवाळखोरी असो, अर्धवट सोडून द्यावे लागलेले शिक्षण असो वा पुढे उद्योगात आलेल्या अनेक आव्हानात्मक अडचणी असोत, उद्योगवृद्धीचा त्यांनी सातत्याने ध्यास घेतला. त्यातून विविध क्षेत्रांत उच्चपातळी गाठलेले वीसपेक्षा अधिक उद्योग त्यांनी उभे केले. ज्यात विविधता आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा समर्पक उपयोगही त्यांनी केला आहे. 

आपल्या घराण्यातील सर्वांत ज्येष्ठ घटकाचे कर्तव्य म्हणून त्यांनी परिवारातील साऱ्या सक्षम मंडळींना आपल्या उद्योगविश्‍वात स्थान देत त्यांच्यावर विश्‍वासाने विविध जबाबदाऱ्याही सोपवल्या. त्याचबरोबर जिथे गरज वाटली तिथे त्यांनी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना अधिकारपद देऊन उद्योगात व्यावसायिकताही जोपासली. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनने त्यांना मानद डॉक्‍टरेट पदवी प्रदान करून त्यांच्या उद्योजकीय कर्तृत्वाची दखल घेतली आहे. 

अर्थात केवळ संपत्ती वाढवणे हे सुभाषचंद्रा यांनी आपले जीवितकार्य मानले नाही. विपश्‍यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला त्यांनी स्तूपही बांधला. मुलांसाठी "कीडझी'' आणि "झी लर्न'' तसेच "ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया'' हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेल्सवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात. एकल विद्यालय फाउंडेशनमार्फत आदिवासीबहुल क्षेत्रात काम करतात. यातून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. आपल्या हिस्सार या हरयानातल्या भागाचे राज्यसभेत त्यांनी काही काळ प्रतिनिधित्वही केले आहे.  अशा या धडाकेबाज उद्योजकाचे रूपांतर एका उद्योगपतीत झाले ते केवळ ३-४ दशकांत. लेखक सुधीर सेवेकर यांनी प्रत्यक्षात हे चरित्र विस्ताराने मांडून विविध अडचणी, कसोटीचे प्रसंग आणि व्यवसायातील चढउतार यातून सुभाषचंद्रांनी कसे मार्ग काढले ते सोदाहरण स्पष्ट केले आहे. सेवेकरांसारख्या व्यक्तीकडून अशा सुंदर पुस्तकाची निर्मिती होताना त्यांचा हा दीर्घकालीन अनुभव आणि अभ्यासू वृत्ती याचे प्रतिबिंब पदोपदी दिसून न आले तरच नवल. सुभाषचंद्रा यांच्या प्रदीर्घ जीवनप्रवासातील अनेक बारकावे, विचारपूर्वक धाडसी निर्णय घ्यायची क्षमता, उद्योजकीय गुणवैशिष्ट्ये, प्रगल्भ बुद्धिमत्ता, शिकवण, कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी तसेच चिकाटी त्यांच्या लेखनशैलीतून, या पुस्तकातील १६ प्रकरणे आणि ९ परिशिष्टांतून प्रकट होतात.

पुस्तकाचं नाव : माध्यमसम्राट सुभाषचंद्र गोयल 
दालचावल ते टीव्ही चॅनल - एका रोमांचक प्रवासाचा वेधक धांडोळा 
लेखक : सुधीर सेवेकर 
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२)
पुणे (०२०-२४४३६६९२)
पृष्ठं : २१६ 
मूल्य : २५० रुपये. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com