प्राचीन ग्रंथांचा अभ्यासपूर्ण वेध...

विद्यावाचस्‍पती अजित कुलकर्णी यांनी सद्‍गुरूंच्या आज्ञेवरून गेली अनेक वर्षं श्रीमद्‍भागवत कथन केले.
ancient texts
ancient textssakal
Summary

विद्यावाचस्‍पती अजित कुलकर्णी यांनी सद्‍गुरूंच्या आज्ञेवरून गेली अनेक वर्षं श्रीमद्‍भागवत कथन केले.

- डॉ. सुप्रिया अत्रे, saptrang@esakal.com

विद्यावाचस्‍पती अजित कुलकर्णी यांनी सद्‍गुरूंच्या आज्ञेवरून गेली अनेक वर्षं श्रीमद्‍भागवत कथन केले. श्रीमद्‍भागवत ग्रंथावरील श्रीमद्‍भागवत महापुराण केवळ गद्यानुवाद - दैनंदिन भक्ति‍रसवर्धिनी ३६५ प्रवचने आणि श्री एकनाथी भागवत केवळ अध्यायानुसार गद्यानुवाद विवेचन या ग्रंथांची त्‍यांच्या सिद्धहस्‍त लेखणीतून निर्मिती झाली आहे.

श्रीमद्‍भागवत या ग्रंथात १२ स्‍कंद, ३४१ अध्याय आणि १८ हजार मंत्र आहेत. वेदव्यासरचित अशा या महान ग्रंथातील १८ हजार श्‍लोकांवर आधारित ३६५ प्रवचने डॉ. अजित कुलकर्णी यांनी या ग्रंथात लिहिली आहेत. प्रत्‍येक प्रवचनाच्या शेवटी आजच्या काळाशी निगडित असे तात्‍पर्यही दिले आहे. श्रीमद्‍भागवत ही भगवंताची वाङ्‍मयीन मूर्ती मानली जाते, त्‍यामुळे ते भगवंताचे निजधामही आहे. सर्वच वाचकांना, श्रोत्‍यांना हा ग्रंथ विशेष महत्त्‍वाचा वाटतो. अशा ग्रंथावरील ३६५ प्रवचने म्‍हणजे खरोखरच पर्वणी आहे. कुलकर्णी यांनी रसाळ भाषेत या ग्रंथात प्रत्‍येक दिवशी एक विशेष विचार, जणू ज्ञानभक्‍तीचा एकेक मंत्रच आपल्‍यापर्यंत पोचवला आहे. सुमारे चारशे पानांचे दोन खंड एवढी या ग्रंथाची व्याप्ती आहे.

या ग्रंथाच्या मनोगतात कुलकर्णी म्‍हणतात, ‘मनुष्यजन्म मिळणे ही भगवंताची मोठी कृपा आहे. तेव्‍हा मनुष्याने या देहाचे सार्थक करून घेण्यासाठी महर्षी व्यासांनी श्रीमद्‍भागवताची रचना केली. याची अनुभूती प्रत्‍येक मनुष्याने करून घ्यावी. त्‍यासाठी ही ग्रंथरचना हा अल्‍पसा प्रयत्‍न आहे. प्रयत्‍न जरी अल्‍पसा असला, तरी तो महत्त्वाचा आहे. कारण एका पानामध्ये संपूर्ण अध्यायाचे सारांशाने मर्म सांगणे ही सोपी गोष्ट नाही; पण कुलकर्णी यांनी ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे, असेच म्‍हणावे लागेल.

या ग्रंथाला श्रीक्षेत्र बद्रिकाश्रमाचे आचार्य भास्‍कराचार्य यांचे आशीर्वाद लाभले आहेत. प्रत्‍येक अध्यायाच्या अनुषंगाने अप्रतिम अशी चित्रे असून, त्‍यातून भक्तिरसाचीच निर्मिती होते. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठही देखणे झाले आहे. मुखपृष्ठावरील मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती मनोवेधक आहे, श्रीमद्‍भागवत या ग्रंथात भगवंतांचा अवतार, लीला, गुण त्‍यांचे पराक्रम, राजांची चरित्रे, भक्‍तांची चरित्रे आणि अर्थातच जीवनविषयक तत्त्‍वज्ञानाची चर्चा आली आहे.

जीवनाचे दिशादर्शक

कुलकर्णी यांचा दुसरा ग्रंथ म्‍हणजे श्री एकनाथी भागवत. या ग्रंथाचा केवळ अध्यायानुसार गद्यानुवाद आहे. संतांनी आपल्‍याला जगण्याचा खरा अर्थ, धर्माचा खरा अर्थ समजावला. हे साहित्‍य म्‍हणजे आपल्‍या जीवनाचे दिशादर्शकच आहे. हे उज्ज्‍वल संचित आपल्याला समृद्ध करीत असते. या संतपरंपरेत एकनाथ महाराजांचे स्‍थान अढळ आहे. त्‍यांनी केवळ साहित्यनिर्मितीच केली नाही, तर प्रत्‍यक्ष कृतीतून समाजप्रबोधनाचे कार्य केले. रूढी-परंपरा यांच्यावर आघात करून त्‍यांच्यावर तत्त्‍वज्ञानाच्या अंगाने सुधारणा केल्या. एकनाथ महाराजांचा श्री एकनाथी भागवत हा ग्रंथ अग्रगण्य मानला जातो. वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथांपैकी हा एक आहे. हा १८ हजार ७९८ ओव्यांचा ग्रंथ असून श्रीमद्‍भागवताच्या बारा स्‍कंधांपैकी अकराव्या स्‍कंधावर लिहिलेली ही टीका आहे. एकूण १४६७ श्‍लोकांवर एकनाथांनी मराठीत भाष्य केले आहे. या एकनाथी भागवतात परमार्थाविषयीचे ज्ञान, जीवनातील अडचणी, त्‍यावर नाथांचे भाष्य व तत्त्वज्ञान आहे.

कुलकर्णी यांनी प्रत्‍येक अध्यायातील विषयाच्या विचारांचा मराठीत अनुवाद केला आहे. सुमारे पाचशे ते साडेपाचशे पृष्ठांचा हा ग्रंथ ज्ञानामृताने परिपूर्ण असून, समजून घेण्यासाठी शांतचित्ताने आवर्जून वाचावा असाच आहे. या ग्रंथात एकूण ३१ अध्याय आहेत. पहिला अध्याय सद्‍गुरू स्‍तवन, श्रीकृष्णाच्या व्यक्‍तिमत्त्‍वाचं वर्णन करून, राजा परीक्षिताचा प्रश्न व त्‍याला श्री शुकदेवांचे उत्तर असा आहे. या अध्यायापासून सुरुवात होऊन, एकेक अध्याय मायेची कल्‍पना, भगवंतांचे अवतार, विविध राजे आणि त्‍यांचे संवाद - प्रश्‍नोत्तरे, सत्‍संगाचा महिमा, हंसगीता, भिक्षुगीता, ऐलगीता, परमार्थाचे निरूपण अशा अनेक आध्यात्‍मिक गोष्टींचे विवरण केले आहे.

कुलकर्णी यांचे हे दोन्ही ग्रंथ अतिशय उपयोगी, प्रेरणादायी आहेत. आपल्‍या आध्यात्‍मिक उन्नतीतून त्‍यांनी व्यासंगी अभ्यासूवृत्तीतून या ग्रंथाची निर्मिती करून, वाचकांना ज्ञानाची कवाडे खुली करून दिली आहेत, ज्‍याचा फायदा तरुण पिढीने करून घेतला पाहिजे, असे वाटते.

पुस्तकाचं नाव : श्रीमद्‍भागवत महापुराण (खंड १ आणि २)

लेखक : अजित कुलकर्णी

प्रकाशक : श्री सद्‍गुरू श्रीधर दत्तात्रेय सेवा प्रतिष्ठान, पुणे

(०२०- २४३५६०६१, ९४०३५८०३७२)

खंड : १ पृष्ठं : ३७६ मूल्य : ५०० रुपये.

खंड : २ पृष्ठं : ५६८ मूल्य : ७०० रुपये.

एकनाथी भागवत,

पृष्ठं : ५२८ मूल्य : ६०० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com